रशियन पोलीस 'सेक्स थीम' पार्ट्यांवर एकमागोमाग एक छापे टाकतायेत, कारण...

    • Author, अमालिया झतारी आणि अॅनास्तासिया गोलुबेवा
    • Role, बीबीसी रशियन

रशियातील सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबरमध्ये एलजीबीटीक्यू चळवळीला 'अतिरेकी विचारसरणी' असल्याचा निकाल दिल्यानंतर रशियातील सरकारी यंत्रणेकडून सेक्स पार्ट्यांना लक्ष्य केलं जातं आहे.

मागील काही महिन्यात सेक्स-थीम असलेल्या खासगी आणि सार्वजनिक पार्ट्यांवर रशियाच्या विविध भागात पोलिसांनी किमान सहावेळा छापे टाकले आहेत. यातील काही इव्हेंटचं एलजीबीटीक्यू समूहाशी काहीशी संबंध नव्हता.

फेब्रुवारीमध्ये रशियन पोलिसांनी येकातेरिनबर्ग या शहरातील नाईट क्लबवर छापा टाकला होता. या नाईट क्लबमध्ये 'ब्ल्यू वेल्वेट' या नावाने सेक्स-थीम असलेल्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीत सहभागी झालेल्यांनी त्यांची ओळख लपवण्यासाठी चेहरा पूर्णपणे झाकलेला होता.

किमान 50 पोलिस कर्मचाऱ्यांनी या छाप्यात भाग घेतला होता. यातील काही एफएसबी विशेष सुरक्षा पथकाचे सदस्य होते, अशी माहिती पार्टीच्या आयोजकांनी बीबीसीशी बोलताना दिली.

पोलिसांनी पार्टीतील प्रत्येकाला त्याचा चेहरा दाखवण्याची सक्ती केली. त्याचबरोबर त्यांची खासगी माहितीदेखील विचारली, असे पार्टीचे एक आयोजक स्टानिस्लाव स्लोविकोवस्की म्हणाले.

''पोलिसांनी मला विचारलं की पार्टीमध्ये कोणी समलिंगी (गे आणि लेस्बियन) आहेत का? या पार्टीत एलजीबीटीसंदर्भात प्रचार केला जातो आहे का?''असं स्टानिस्लाव यांनी सांगितलं.

त्यांनी पुढे सांगितलं की, ''पोलिसांनी त्यांना विचारलं की या पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं आहे का? अर्थात अंमली पदार्थांबाबत त्यांना फारसा रस नसल्याचं दिसून येत होतं.''

मागील दशकभरापासून रशियन यंत्रणा, एलजीबीटीक्यू चळवळीला अतिरेकी विचारसरणी ठरवणारे कायदे आणून एलजीबीटीक्यू समूहातील समलिंगींना बेकायदेशीर ठरवून त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

2013 मध्ये रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहानं तथाकथित एलजीबीटी प्रचाराला प्रतिबंध घालणारं विधेयक मंजूर केलं होतं. या कायद्याद्वारे एलजीबीटीक्यू समूहातील व्यक्तींच्या अधिकार आणि त्यांच्या समस्यांवरील सार्वजनिक चर्चेला मर्यादा घालण्यात आल्या.

मागील वर्षी एलजीबीटीक्यू समूहाविरुद्ध अधिक कठोर कायदा आणण्यात आला होता.

जुलै महिन्यात रशियन संसदेनं उभयलिंगी म्हणजे ट्रान्सजेंडर संक्रमणाला किंवा परिवर्तनाला बंदी घातली होती. 1997 पासून ही बाब कायदेशीर होती. मात्र आता अधिकृत कागदपत्रांमध्ये लिंगबदल विषयक शस्त्रक्रिया, हार्मोनल थेरेपी आणि लिंगबदल या गोष्टींना बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये रशियाच्या सर्वोच्च न्यायालयानं एलजीबीटीक्यू चळवळीला अतिरेकी विचारसरणी ठरवलं आहे.

इस्लामिक स्टेट आणि जेहोवाज विटनेसेस या मूलतत्ववादी ख्रिश्चन संघटनांप्रमाणे एलजीबीटीक्यूचा समावेश अतिरेकी गटांमध्ये करण्यात आला होता.

आता रशियामध्ये एलजीबीटीक्यूला समर्थन देणं हे एक गुन्हेगारी कृत्य असून त्यासाठी 10 वर्षापर्यतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

'या पार्ट्या स्वीकारार्हतेचं प्रतिक'

(बीडीएसएम म्हणजे बोंडाज डिसिप्लिन डॉमिनन्स अॅंड सबमिशन. या गटात दोन व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे संबंध ठेवतात.)

छापा टाकण्यात आलेल्या 'ब्ल्यू वेल्वेट' पार्टीमध्ये गुन्हेगारीस्वरुपाचं काहीही घडलं नव्हतं, असं स्टानिस्लाव स्लोविकोवस्की यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

ते म्हणाले की, या पार्टीमध्ये काही कामुक कार्यक्रम किंवा सादरीकरण होतं आणि त्यातील काही घटक बीडीएसएम गटाशी निगडीत होते. पार्टीत सहभागी झालेल्यांना वेगवेगळ्या लैंगिक क्रियांमध्ये भाग घेण्याचं आमंत्रण देण्यात येत होतं.

स्लोविकोवस्की पुढं म्हणाले की, त्याचवेळी पार्टीत सहभागी झालेल्यांकडून संभोग करण्याची अपेक्षा नव्हती किंवा त्यांच्यावर तसा दबावदेखील आणण्यात आला नव्हता.

येकातेरिनबर्ग शहरातील पोलिसांनी नंतर जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं की त्या रात्री सुरक्षा दलांकडून प्रतिबंधात्मक छापा टाकण्यात आला होता.

''बीडीएस पार्ट्यांचा वापर करून एलजीबीटी समुदाय एकत्र येण्याची शक्यता कोणीच नाकारू शकत नाही,'' असा युक्तिवाद येकातेरिनबर्ग पब्लिक चेंबरचे सदस्य असलेल्या दिमित्री चोक्रीव यांनी केला.

''रशियन यंत्रणांकडून मागील काही वर्षात एलजीबीटीक्यू समुदायावर कारवाया केल्या जात असतानासुद्धा हा समुदायाच्या त्याचं अस्तित्व राखून आहे,'' असंही चोक्रीव पुढं म्हणाले.

''एलजीबीटीक्यू समुदायाला स्वत:चं मनोरंजन करण्याची आणि त्यांच्या कल्पना लक्षात घेण्याची आवश्यकता वाटते आहे. त्यामुळंच ते बीडीएसएम गटाच्या कार्यक्रम किंवा पार्ट्यांच्या आडून याप्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. बीडीएसएम गटाच्या कार्यक्रमांवर अद्याप बंद नाही,'' असं बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं.

रशियात मागील दशकभरापासून मोठ्या शहरांमध्ये सेक्स पार्ट्या होत आहेत. या पार्ट्या प्रामुख्यानं कॉस्मोपॉलिटन शहरी वर्गापुरत्या मर्यादित आहेत.

तुलनेनं फारच थोडे लोक या प्रकारच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याचा अंदाज आहे. कलात्मक क्षेत्रात किंवा आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीयांमधून काही जण याकडे आकृष्ट झाले आहेत.

या पार्ट्या रशियन समाजात मोकळेपणा आणि स्वीकारार्हता यांचं प्रतीक म्हणून सुरू झाल्या होत्या. मात्र, प्रतिगामी कायद्यांमुळं सातत्याने वाढत असलेल्या दबावामुळं आणि घ्याव्या लागत असलेल्या परवानग्यांमुळं, या पार्ट्यांमागचा मुख्य विचार खूपच मागं पडला आहे.

'जवळपास नग्न' पार्टी- स्कॅंडल

अनास्तासिया इवलीवा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टीव्ही निवेदकेच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर रशियन यंत्रणांकडून सेक्स पार्ट्यांवर लगाम घालण्याच्या प्रयत्नात डिसेंबरमध्ये वाढ झाली. या वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या निमंत्रितांना असे कपडे परिधान करून येण्यास सांगण्यात आलं होतं, ज्यात ते जवळपास नग्न दिसतील.

सोशल मीडियावर या पार्टी माहिती देण्यात आली. यात हजर असलेल्यांमध्ये रशियातील आघाडीचे अनेक सेलिब्रिटीदेखील होते. यात रशियन मीडियामधील महत्त्वाची व्यक्ती असलेली केनिया सोबचाक होती. व्लादिमिर पुतिन यांचे मार्गदर्शक आणि दीर्घकाळचे सहकारी अॅनातोली सोबचाक यांची ती मुलगी आहे. याचबरोबर प्रसिद्ध पॉप गायक फिलिप किरकोरोवदेखील हजर होते.

या पार्टीमधील बहुतांश निमंत्रितांनी अगंप्रदर्शन करणारे पोषाखच परिधान केले होते. त्यातील काहींचे कपडे मात्र खूपच अधिक अंगप्रदर्शन करणारे होते. रॅपर (म्हणजे रॅप गाणारा) वॅसिओ याने तर लिंगावर फक्त एक मोजा घातला होता.

या पार्टीच्या फोटोंनी तर रशियात खळबळ उडवून दिली होती.

रॅपर वॅसिओला 15 दिवसांच्या तुरुंगावासाची शिक्षा झाली आणि त्याचबरोबर त्याने केलेल्या अंगप्रदर्शनाबद्दल त्याला 2 लाख रुबल्सचा दंडदेखील करण्यात आला.

या पार्टीचं आयोजन करणाऱ्या इवलीवाला देखील एक लाख रुबल्सचा दंड ठोठावण्यात आला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना या पार्टीचे फोटो दाखवण्यात आल्यानंतर तर इवलीवा आणि तिच्या निमंत्रितांच्या अडचणीत वाढ झाली होती.

या पार्टीत भाग घेणाऱ्या काही सेलिब्रिटींनी सांगितलं की त्यांचे प्रसार माध्यमांमधील अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द झाले आणि त्यांना कायदेशीर कारवाया होण्याबाबतच्या धमक्यादेखील मिळाल्या.

रशियात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतिन यांनी सांस्कृतिक मूल्ये जपण्यावर जोर दिला होता. त्याचा फायदा होत पुतिन पाचव्यांदा या पदावर निवडून आले.

पार्टी आयोजक दबावाखाली...

अलीकडच्या काळात सेक्स पार्ट्यांवर पडलेल्या छाप्यांमधून एक पॅटर्न दिसून आला. पोलिस पार्टीत आले. त्यांनी प्रत्येकाला खाली बसण्यास किंवा झोपण्यास सांगितलं, प्रत्येकांच्या ओळखपत्राची माहिती घेतली.

बहुतांश छाप्यांबद्दलचं वृत्त क्रेमलिन (रशियन संसद) च्या माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आलं. काही वृत्तवाहिन्यांनी तर या पार्ट्यांमध्ये सहभागी झालेल्या काही लोकांची वैयक्तिक माहितीदेखील प्रसिद्ध केली.

ही छापेमारी किंवा दबाव फक्त सार्वजनिक कार्यक्रमांपुरताच मर्यादित नव्हता. खासगी पार्ट्यांमध्येही पोलिसांनी हस्तक्षेप केल्याच्या किमान दोन घटना घडल्या.

पार्ट्यांमधील काही पुरुष निमंत्रितांना युक्रेन युद्धावर पाठवलं जाण्याची धमकीदेखील देण्यात आल्याची माहिती पार्टीतील एक निमंत्रितानं बीबीसीला दिली.

वाढत्या छापे आणि सार्वजनिकरित्या होणाऱ्या हेटाळणीच्या पार्श्वभूमीवर, पार्टीचं आयोजन करणारे मागे हटले आहेत. पार्ट्यांचं प्रमाण घटलं आहे.

फेब्रुवारीमध्ये मॉस्कोतील स्थानिक एलजीबीटीक्यू समुदायात लोकप्रिय असलेली क्वीर टेक्नो पार्टी-पॉपॉफ किचन आणि सेक्स थीम असलेली किंकी पार्टी, अशा दोन्ही पार्टी आयोजकांकडून जाहीर करण्यात आलं की ते रशियातील कार्यक्रमांचं आयोजन थांबवणार आहेत.

किंकी पार्टीच्या आयोजकांकडून जाहीर करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे की, ''यापुढं सेक्सशी निगडीत कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रम, पार्टीचं आयोजन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा आम्हाला इशारा देण्यात आला आहे.''

''ते कोणत्याही प्रसिद्ध पार्टी किंवा कार्यक्रमाचं आयोजन थांबवू शकतात हे दाखवण्यासाठी आम्ही योग्य उदाहरण असल्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. तुमच्या निमंत्रितांच्या सुरक्षेची खात्री तुम्ही देऊ शकत नसल्यास याप्रकारच्या पार्ट्यांचं आयोजन करणं अशक्य आहे,'' असं पॉपॉप किचनच्या निकिता एगोरोव-किरिलोव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

''ते सर्व छापे, धमकावणं, पार्टीतील निमंत्रितांची वैयक्तिक माहिती घेणं...हे फक्त एकदा जरी घडलं तर त्यानंतर लोकांना तुमची पार्टी सुरक्षित असल्याचं तुम्ही पटवून देऊ शकत नाही,'' असं निकिता म्हणाल्या.