पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो? त्याची लक्षणं काय असतात? डॉक्टरांना कधी दाखवायचं?

न्यू ब्रायटन, विर्रल येथील फिलिप ऑल्डरसन यांना जुलै 2016 मध्ये, वयाच्या 44 व्या वर्षी, दुसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. आता 53 वर्षांचे असलेले ऑल्डरसन यांना पूर्णपणे बरे झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ते म्हणाले की, स्तनाच्या कर्करोगासाठी महिलांचे नियमित तपासणीचे वय 50 ऐवजी 40 वर्षे असावे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

ऑल्डरसन यांना ही गाठ त्यांच्या लहान मुलीशी खेळताना जाणवली. ते म्हणाले, "बहुतेक पुरुषांनी इतकी छोटी गाठ असल्यामुळे दुर्लक्ष केले असते, पण मी ठरवलं की मी तसं करणार नाही आणि मला वाटतं, हाच निर्णय माझा जीव वाचवणारा ठरला."

ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 55,000 महिलांना आणि 400 पुरुषांना स्तनाचा कर्करोग होतो, असं 'ब्रेस्ट कॅन्सर नाऊ' या संस्थेने सांगितलं आहे. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग दुर्मिळ आहे आणि त्यांच्या नियमित तपासणीसाठी कोणतीही योजना नाही.

ऑल्डरसन म्हणाले, "मी 'पुरुषीपणा' दाखवून दुर्लक्ष करायचं ठरवलं नाही. गाठ सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांकडे गेलो."

दोन आठवड्यांनी क्लॅटरब्रिज हॉस्पिटलमध्ये स्कॅन आणि बायॉप्सी झाली आणि त्यांना स्तनाचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं.

ते पुढे म्हणाले, "स्तनाचा कर्करोग असल्यामुळे थोडीसं लाजिरवाणं वाटलं, पण जेव्हा 'कर्करोग' हा शब्द ऐकतो, तेव्हा खरंच भीती वाटते."

"चार आठवड्यांनी मला हॉस्पिटलमध्ये महिलांच्या वॉर्डवर मॅस्टेक्टॉमीसाठी बोलावण्यात आलं, तो अनुभव खूप वेगळा होता."

"गाठ सापडल्यानंतर लगेच डॉक्टरांकडे गेलो, त्यामुळे शारीरिक त्रास खूप कमी झाला. मला हे लवकर लक्षात आलं याबद्दल मी खूप आभारी आहे, कारण अनेक डॉक्टरांनी पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग कधीच पाहिलेला नसतो."

युनायटेड किंग्डममधल्या ऑल्डरसन यांचा हा अनुभव असला तरी त्यांच्याइतके सर्वजण सजग असतातच असं नाही. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग ही संकल्पनाच बहुतांश लोकांना माहिती नसते. त्यामुळे असा काही आजार होऊ शकतो हे लक्षात येत नाही. त्यामुळेच याकडे दुर्लक्ष होतं. पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाची माहिती सविस्तर असणं गरजेचं आहे.

1. पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण किती आहे? कोणत्या वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो?

पुरुषांचा विचार करता पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग अगदी दुर्मिळ आहे. साधारणतः 60 ते 70 वयोगटातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण दिसते. अर्थात तो आधीही उद्भवू शकतो.

याबद्दल जागरुकता कमी असल्यामुळे अनेक पुरुषांना त्याची जाणिवच नसते. केआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. जिग्नेश सिंघवी यांच्या माहितीनुसार साधारणतः स्तनाच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी "1 % इतकं पुरुष स्तन कर्करोगाचं प्रमाण आहे."

पुरुषांच्या स्तन कर्करोगाबद्दल एमजीएम कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ब्रेस्ट आँकॉलॉजी विभागातील सिनियर कन्सल्टंट डॉ. वेदा पद्मा प्रिया यांनी अधिक माहिती दिली.

त्या सांगतात, "पुरुषांमध्येही स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात. परंतु पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग ओळखण्यात सर्वात मोठं आव्हान असतं ते त्याचं निदान वेळेत होणं. बहुतांशवेळा याचं निदान उशिरा होतं. पुरुषांमध्ये स्त्रियांप्रमाणे स्तनाचा विकास झालेला नसतो त्यामुळे त्वचा आणि स्तनाचा कर्करोग झाल्यास त्वचा आणि स्नायू (muscle) यांचा सहभाग लवकर होतो. (थोडक्यात पुरुषांमध्ये स्तनाचा भाग महिलांपेक्षा खूपच कमी असतो. त्यामुळे जर स्तनाचा कर्करोग झाला, तर तो त्वचा आणि खालील स्नायूपर्यंत लवकर पसरतो. महिलांमध्ये स्तनाच्या ऊती (tissue) जास्त असतात, त्यामुळे कर्करोग त्या ऊतींमध्येच काही काळ राहतो.)"

डॉ. वेदा पद्मा प्रिया पुढं सांगतात, "यानंतर आव्हान म्हणजे पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हेच माहिती नसतं. त्यामुळे माहितीच्या अभावापायी पुरुष स्तनामधील बदलांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना ते बदल समजतच नाहीत."

गायनॅकोमॅस्टिआ नावाचा पुरुषांच्या छातीशी संबंधित आजार बहुतांश लोकांनी ऐकलेला असतो. त्याच्यामध्ये आणि पुरुष स्तनाचा कर्करोग यात फरक आहे.

गायनॅकोमॅस्टिआ या आजारात मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये स्तन ग्रंथी ऊतींच्या प्रमाणात वाढ होते. यामध्ये इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्समधील असंतुलनामुळे ही स्थिती निर्माण होते.

गायनॅकोमॅस्टिआ एका किंवा दोन्ही स्तनांवर होऊ शकतो किंवा एकाच स्तनावर तो होऊ शकतो. तसेच स्युडोगायनॅकोमॅस्टिआ या स्थितीत पुरुषांच्या स्तनांमध्ये ग्रंथी ऊती न वाढता फक्त चरबी वाढणे.

नवजात बाळं, पौगंडावस्थेत असलेले मुलगे आणि वृद्ध पुरुषांमध्ये हार्मोन्सच्या नैसर्गिक बदलांमुळे गायनॅकोमॅस्टिआ होऊ शकते. याशिवाय इतर कारणेही असू शकतात.

2. पुरुष स्तन कर्करोगाची लक्षणं कोणती?

पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं सुरुवातीला अगदीच वेदनारहित आणि सूक्ष्म असतात. त्यामुळे त्याकडे लक्ष जात नाही. याचं सर्वात जास्त आढळलं जाणारं लक्षण म्हणजे स्तनाग्राच्या जवळ किंवा खाली गाठ येणं.

पुरुषांच्या स्तनामध्ये ऊती कमी असल्यामुळे अशी गाठ लगेच लक्षात येऊ शकते. पण बहुतांशवेळा तो स्नायू असेल किंवा तो मेद असेल असं समजलं जातं. काहीवेळेस कसला तरी संसर्ग झाला असेल असं वाटतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

डॉ. जिग्नेश सिंघवी सांगतात, काहीवेळेस स्तनाग्रं आतल्या दिशेने वळून आत जातं. स्तनाग्रातून कधी स्वच्छ, कधी दुधी तर कधी रक्त असलेला स्राव बाहेर येतो. तिथल्या त्वचेही फरक दिसतो. तिथली त्वचा लाल होते, त्वचेचा पोत बदलणं अशी लक्षणं दिसतात."

डॉ. सिंघवी पुढे म्हणाले, "कधीकधी कॉलरबोन आणि काखेमध्ये सूज दिसते. कधी स्तनाच्या बाजूची जागा सोलवटलेली किंवा तिथे जखम दिसते. दुर्दैवाने, पुरुष अनेकदा या बदलांकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांना दाखवण्यास संकोच करतात, ज्यामुळे निदान उशिरा होते. जेव्हा ते वैद्यकीय मदत घेतात, तेव्हा आजार स्थानिक पातळीवर प्रगत अवस्थेत किंवा मेटास्टॅटिक टप्प्यावर पोहोचलेला असतो. या सुरुवातीच्या लक्षणांची जाणीव आणि वेळेवर सल्ला घेणे आवश्यक आहे."

3. हा आजार कोणत्या पुरुषांना होण्याची शक्यता जास्त असते?

आता हा आजार दुर्मिळ असला तरी तो उद्भवण्यास काही घटक कारणीभूत आहेत. साधारणतः वय वाढलेल्या पुरुषांत म्हणजे साठी-सत्तरीतल्या पुरुषांमध्ये तो आढळतो. पण जनुकीय कारणांमुळे तो तरुणांमध्येही दिसू शकतो.

हा कर्करोग कोणत्या पुरुषांना होण्याची शक्यता जास्त असते असा प्रश्न आम्ही चेन्नईच्या व्हीएस हॉस्पिटलमध्ये मेडिकल आँकॉलॉजी विभागात सिनियर कन्सल्टंट असणाऱ्या डॉ. नित्या श्रीधरन यांनाही विचारला.

डॉ. नित्या सांगतात, "काही कारणांमुळे धोका वाढू शकतो. यात त्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास, संप्रेरकांतील असमतोल, वजन जास्त असणं, यकृताच्या तक्रारी तसेच बीआरसीए सारखी जनुकं कारणीभूत असतात. यामध्ये उपचारांची प्रक्रिया हा मोठा प्रश्न नाही पण पुरुष रुग्णांनी दवाखान्यात उशिरा येणं हा मोठा प्रश्न आहे. काहीतरी लक्षणं दिसत आहेत हे समजून त्याची तपासणी करुन घेण्याला फारच वेळ लावला जातो. बाकी उपचारांसाठी डॉक्टरांची तपासणी, स्कॅनिंग, बायोप्सी अशी प्रक्रिया असते."

जनुकीय बदलांबद्दल डॉ. सिंघवी यांनी सविस्तर माहिती दिली. ते सांगतात, BRCA2 या जनुकातील बदल याबाबतीत जास्त धोकादायक असतो. क्लाइनफेल्टर्स सिंड्रोममध्ये इस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि हा धोका वाढतो. कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळच्या नातलगांत म्हणजे आई, बहीण, मुलगी यांना ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सर असेल तर याची शक्यता वाढते.

काही उपचारांत टेस्टोस्टोरोन कमी होतं आणि इस्ट्रोजेन वाढतं. तसेच लिव्हर सिऱ्होसिस, लठ्ठपणा, हार्मोन थेरपी यामुळेही यात बदल होतो. अती मद्यपान अतिवजन वाढणं याचाही परिणाम होतो असं डॉ. सिंघवी सांगतात.

4. पुरुष स्तन कर्करोगाचं निदान कसं होतं त्यावर काय उपचार आहेत?

पुरुषाच्या स्तनाच्या कर्करोगाचं निदान डॉक्टरांकडे तपासणी होऊन मग मॅमोग्राफ, अल्ट्रासाऊंड आणि गाठीची बायोप्सी करुन केली जाते. यात सर्वात अडथळा असतो उशीर होण्याचा. पुरुष डॉक्टरकडे फार उशीरा जातात आणि तोपर्यंत कॅन्सर पसरलेला असतो.

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबई, इथं जनरल आणि ब्रेस्ट सर्जन असणाऱ्या डॉ. रेश्मा पालेप सांगतात, पुरुषांच्या सत्नाच्या कर्करोगावर शस्त्रक्रीया, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी, हार्मोन थेरपी असे महिलांच्या स्तन कर्करोगाप्रमाणेच उपचार केले जातात.

डॉ. सिंघवी सांगतात, "यावरील उपचारांत शस्त्रक्रियेद्वारे स्तनातील ऊती, स्तनाग्र आणि तिथल्या लसिका ग्रंथी काढून टाकतात. गाठीच्या आकारानुसार किमोथेरपीचा विचार केला जातो. तसेच बहुतांश पुरुषांना हार्मोनल थेरपी देतात. तसेच पुरुषांना मानसिक आधार दिला जातो."

5. पुरुष स्तनाच्या कर्करोगावर बोलण्यास का लाजतात?

डॉ. रेश्मा पालेप सांगतात, "बहुतांश पुरुषांना या विषयावर बोलण्याची लाज वाटते. बऱ्याचवेळा त्यांना हा महिलांचा प्रश्न आहे असं वाटत असतं. पण यामुळेच आजाराचं निदान व्हायला आणि उपचार मिळायला वेळ लागतो."

डॉ. रेश्मा सांगतात, "त्यामुळेच या आजाराबद्दल जागरुकता गरजेची आहे. सार्वजनिक आरोग्य शिबिरं, माध्यमांनी याची माहिती पुरुषांना दिली पाहिजे. स्थानिक आरोग्यसेवकांना याची माहिती देऊन त्यांनी जागरुकता वाढवली पाहिजे. शाळा-कॉलेजबरोबर ग्रामिण भागातही त्याची माहिती पसरली पाहिजे."

डॉ. रेश्मा पालेप पुढे सांगतात, "जागरुकतेबरोबरच बीआरसीए 1 आणि बीआरसीए 2 म्युटेशन्सच्या शक्यतेमुळे ज्या कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास आहे, त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे, त्यांनी तपासणी करुन घेतली पाहिजे. पुरुषांनी छातीवरील कोणत्याही गाठीकडे आणि स्तनाग्राच्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये. छातीवर सूज आली असल्यासही तपासणी करुन घ्यावी."

6. स्तनाच्या कर्करोगात पुरुषांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची?

पुरुषांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगात शारीरिक, वैद्यकीय मदतीबरोबर मानसिक आरोग्याच्या मदतीची गरज लागते. पुरुष भीती, लाज किंवा आत्मविश्वास गमावणे अशा भावनांना सामोरे जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना कुटुंबाकडून, आधारगटांकडून मदत मिळणं अतिशय चांगलं असतं. भावनिक, मानसिकदृष्ट्या उत्तम आरोग्य असणं हे आजारातून बरं करण्यासाठी उपयोगी ठरतं.

म्हणूनच डॉ. सिंघवी सांगतात, "छातीवरच्या सर्व बदलांकडे लक्ष द्या, पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगावर उपचार शक्य आहेत. जितक्या लवकर निदान होईल तितकं चांगलं. आजार लपवण्यात काहीही धैर्य नाही तर त्याच्याशी लवकरात लवकर सामना करण्यात खरं धैर्य आहे, हे लक्षात ठेवा."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)