You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीवर
"नाशिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून बायकोला वाचवलं आणि माझं मेलेलं बाळ हातात दिलं. गाडीला पैसे नव्हते म्हणून ते बाळ परकरमध्ये गुंडाळलं, पिशवीत घातलं आणि एसटीने गावाकडं निघून आलो. कुणी गाडी विचारली नाही, कुणी मेलेल्या बाळाबद्दल चौकशी केली नाही. काहीच नाही..."
पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात जोगलवाडी नावाचं एक गाव आहे. या गावात सखाराम आणि अविता कवर राहतात.
प्रगत राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी 11 जूनच्या पहाटेपासून पुढचे दोन दिवस सखाराम आणि अविता यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेतलंच पाहिजे.
वीटभट्टीवर मजुरी करणारं हे कातकरी आदिवासी समाजाचं जोडपं त्यांच्या बाळाला जन्म देणार होतं. 26 वर्षांच्या अविता गर्भवती होत्या. 11 जूनच्या पहाटे अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यानंतर घडलेला घटनाक्रम कुणाही संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणारा आहे. आणि तेही मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरापासून शे-दोनशे किलोमीटरच्या अंतरावरील.
मुंबईपासून 168 किलोमीटरवर असणाऱ्या पालघरमधील मोखाडा तालुक्यातील आरोग्याची परिस्थिती विदारक आहे.
कवर दाम्पत्याची झालेली हेळसांड खरंतर इथे अनेकांच्या नशिबी आलेली आहे.
विशेष म्हणजे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची तहान भागवणारी अनेक धरणं मोखाडा आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत, पण या भागातील नागरिकांची मात्र सगळ्याच बाबतीत नेहमीच हेळसांड होत असते.
पालघर जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, पाणीटंचाई अशा समस्यांच्या दरवर्षी प्रकाशित होत असतात. मात्र, एवढी वर्षं या प्रश्नांचं वार्तांकन होऊनही या भागात काहीच बदललं नसल्याचं सध्या दिसून येतंय.
सखाराम आणि अविता यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
पहाटे तीन वाजता पोटात दुखायला सुरु झाल्यानंतर अखेर स्थानिक आशा सेविकेच्या प्रयत्नातून दुपारी 12 वाजता एक खासगी गाडी मिळते. रुग्णवाहिकेला फोन करूनही रुग्णवाहीका जोगलवाडीत येत नाही.
मिळालेल्या खासगी गाडीने त्यांना खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं जातं. तिथे गेल्यानंतर काय झालं? याबाबत बोलताना सखाराम यांनी बीबीसीला सांगितलं की, "खोडाळ्यात माझी बायको वेदनेने तडफडत होती. तिथे तब्बल दोन तास आम्ही फक्त उभे होतो. अशा परिस्थितीत माझ्या तोंडून दोन-तीन शिव्या निघाल्या. मी शिवीगाळ केल्यावर तिथे पोलीस आले आणि त्यांनी मला मारहाण केली. या गोंधळात खोडाळ्यावरून मोखाड्याला जायला आम्हाला उशीर झाला. अँब्युलन्स वेळेत आलीच नाही. शेवटी दोन तासांनी अँब्युलन्स आली."
स्थानिक पोलिसांनी फक्त समज दिली आणि मारहाण केली नसल्याचं बीबीसी मराठीला सांगितलं आहे.
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी मोरे यांनी बीबीसीला सांगितलं की, "इथे आले तेव्हा रुग्णाच्या पोटातील बाळाचे ठोके होत नव्हते, म्हणून आम्ही मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवायचं ठरवलं. पण आमच्या इथे रुग्णवाहिका नव्हती म्हणून आसेवरून ती मागवली आणि यामुळे दोन तास उशीर झाला."
अखेर अविता आणि सखाराम मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर पोटातलं बाळ दगावल्याचं सखाराम यांना सांगितलं. पण अविता यांना ताप होता आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठीच्या सुविधा मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी रुग्णाला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला.
नाशिकमध्ये पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते. तिथे डॉक्टरांनी अविता यांच्यावर उपचार करून पोटातील मृत अर्भक सखाराम आणि अविता यांच्या हवाली केले.
'कुणीच विचारलं नाही म्हणून मेलेलं बाळ पिशवीत घेऊन आलो'
नाशिक जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर सखाराम कवर यांच्याकडे त्यांचं मृत बाळ सुपूर्द केलं गेलं. आता नाशिकवरून मोखाडा आणि मोखाड्यावरून त्यांच्या गावी म्हणजेच जोगलवाडीला जायला गाडी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.
सखाराम म्हणतात, "बाळाला घेतलं, बायकोच्या परकरात गुंडाळलं, एका पिशवीत घातलं आणि बायकोला घेऊन बसमध्ये बसलो. त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला कुणीच विचारलं नाही की आता हे मृत बाळ आणि बायको घेऊन तुम्ही कसे जाणार आहात? खाजगी गाडी करायला पैसे नव्हते म्हणून बसने यावं लागलं. 80 किलोमीटरचा रस्ता त्यादिवशी संपतच नव्हता, पिशवीत माझं मेलेलं बाळ आणि मी तसेच घरी आलो."
जोगलवाडीत सखाराम यांनी त्यांचं मृत बाळ जमिनीत पुरलं आहे.
11 जून आणि 12 जून रोजी घडलेला हा प्रकार माध्यमांना कळायला आणखीन तीन दिवस लागले आणि जोगलवाडीत अँब्युलन्स पोहोचायला जसा उशीर झाला अगदी तसाच उशीर ही अत्यंत गंभीर बातमी माध्यमांपर्यंत पोहोचायला झाला.
त्यानंतर विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा सखाराम यांच्या घरी पोहोचले. त्यांची विचारपूरस केली, अविता यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले.
सखाराम म्हणतात, "आता किती जणांना सांगू काय घडलं ते? अँब्युलन्स उशिरा आली, माझं बाळ गेलं, आमदार आले विचारपूस केली आणि निघून गेले. आता पोट भरण्यासाठी मला एकट्यालाच कामावर परतायचं आहे कारण बायकोला अजूनही उठता येत नाही."
या सबंध प्रकरणाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. मी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोमवारी याबाबतचा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर आम्ही दोषींवर कठोर कारवाई करणार आहोत."
'अँब्युलन्स वेळेत पोहोचलीच नाही'
अविता म्हणतात, "पहाटे पोटात दुखायला सुरु झालं तेव्हाच माझ्या नवऱ्याने 108 वर कॉल केला होता. त्याचवेळी अँब्युलन्स आली असती तर माझं बाळ वाचलं असतं. पण दवाखान्याकडं निघायला दुपारचे बारा वाजले, डॉक्टरांनी तपासायला तीन वाजले आणि सहा वाजता माझ्यावर शस्त्रक्रिया केली गेली."
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन परिस्थितीत राज्यातल्या रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी 937 अँब्युलन्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या अँब्युलन्स राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी असल्याचा दावा केला जातो.
पालघर जिल्ह्याची आकडेवारी पहिली तर या जिल्ह्यात एकूण 29 अँब्युलन्स आहेत. पण 11 जूनच्या पहाटे सखाराम आणि अविता यांच्या घरी एकही अँब्युलन्स पोहोचली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)