'मुलींनी लग्नानंतर माहेरी लुडबुड करू नये' असं म्हणण्यामागची मानसिकता काय दर्शवते ?

    • Author, आनंद पवार
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमध्ये राजकीय लढत रंगली आहे. त्यात सुप्रिया सुळे यांच्या माहेरकडून 'मूळ' पवार असणे आणि सुनेत्रा पवार यांचे ते सासर असल्याने त्या जन्माने ‘मूळ’ पवार नसणे या अर्थाचे भाष्य करण्यात आलं.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटले की सुप्रिया सुळे या कधी सासरीच गेल्या नाहीत. त्यांना सासरची नाती, सासरच्या रीती, तिथे कशा समर्पण भावनेनी काम करावं लागतं हे कसं माहीत असणार.

प्रचारावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या होत्या, "लग्न झाल्यानंतर मुलीने आपल्या माहेरी लुडबुड करू नये अन्यथा वाद निर्माण होतात. मग ते काका पुतण्यात होतात. भावाभावांत होतात. एकदा तिला सासरी लग्न करून दिलंय तर तिने सासरीच नांदावं ना. माहेरी फार लुडबुड करू नये अन् लक्ष देऊ नये.' त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या बाजूने तसेच विरोधात वक्तव्यं येत आहेत."

मुळात ही चर्चा होताना हा देखील विचार करणे आवश्यक आहे की असा विचार करण्यामागे काय कारण असते, त्याच्या मुळाशी नेमकी कोणती मानसिकता असते.

माहेर असो किंवा सासर महिलेला कायम पदोपदी तिच्या ‘बाहेरच्या’ असण्याची आठवण करुन दिली जाते. असंख्य महिलांच्या वाट्याला येणाऱ्या या छळाला सुळे-पवार नणंद-भावजयमुळे वाचा फुटली ते एक अर्थी बरंच का झालं याचं विश्लेषण केलं आहे आनंद पवार यांनी.

जे 'मूळ' तेच उत्तम किंवा तेच परिणामकारक असे मानण्याचा दुराग्रही प्रघात सर्वच क्षेत्रांमध्ये दिसतो. जे तथाकथित 'मूळ' किंवा 'असली' नाही ते सगळे नकली आणि म्हणून दुय्यम दर्जाचे असा दर्प त्यामागे असतो.

असली-नकली, आपले-परके, आतले-बाहेरचे हे आधार व्यक्ती-व्यक्तींमध्ये किंवा समूहांमध्ये भेदभाव करायला जाणीवपूर्वक वापरले जातात.

जात, धर्म, श्रद्धा, प्रांत, प्रदेश, विचारधारा या आधारावर मूळ की नक्कल असा भेदभाव होतो हे आपल्याला ज्ञात आहे, मात्र या चर्चेने आता कौटुंबिक परिघातही प्रवेश केला आहे. लेकीसुनांच्या मूळ आडनावावरून त्यांचे कुटुंबातील असली-नकली स्थान ठरवले जाते आहे.

मुलींचं लग्न झालं की 'सुटलो एकदा'चे ही भावना काय दर्शवते?

भारतीय उपखंडात बाईचा उपरेपणा आयुष्यभर संपत नाही. मुलीला जन्मतःच परक्याचे धन मानणाऱ्या समाजात तिचा 'काळजीपूर्वक' सांभाळ करणारे माहेर आणि लग्नानंतरही तिला 'परक्याचं लेकरू' समजणारे सासर अशा दोन्ही व्यवस्था तिला आपले मानत नाहीत.

आईवडिलांचं कुटुंब मुलींना तिच्या लग्नापर्यंतच्याच नावाची आणि आडनावाची खात्री देतं. आपल्याकडे आजही बहुतांश मुलींना कुणाशी लग्न करायचे याचे संपूर्ण निर्णय स्वातंत्र्य नाही, त्यामुळे त्यांचं लग्न एकतर त्यांच्या संमतीविना किंवा फारतर त्यांची जबरदस्तीची संमती घेऊन लावून दिलं जातं.

मुलीचं लग्न झालं की 'सुटलो एकदाचे' ही तिच्या कुटुंबाची भावना काय दर्शवते? दुसरीकडे, लग्नानंतर मुलींचं आयुष्य अनेक अर्थांनी बदलतं. तिला आपलं घर, आपली माणसं, गाव आणि नाव असं सगळं सोडून एका संपूर्ण नवीन अवकाशात प्रवेश करावा लागतो.

कित्येक मुलींना तर तू सासरी उभी जात आहेस, पण त्या घरातून परत येताना आडवीच ये असे सांगितले जाते. आता तुझा इथला संबंध सुटला हे तीला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जाते. सासरी पाठवून दिल्या जाणाऱ्या मुलींना कायमची घालवून देण्याची मानसिकता माहेरच्या मंडळींच्या कृतघ्नतेतून येते असे नव्हें, मात्र या भेदभावाच्या रिवाजालाच प्रेम, काळजी आणि इतिकर्तव्यता मानली जाते.

आत्तापर्यंत घरातील छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये त्या मुलीने लक्ष घातलेले असते, घरातील चीजवस्तू जपून ठेवलेल्या असतात, मात्र लग्नाच्या काही काळानंतरच तिने माहेरी स्वतःचे म्हणून ठेवलेले सामान-सुमान, कपडे, आवडीच्या चीजवस्तू असलेली कपाटं, कप्पे, कोपरे रिकामे केले जातात. कालांतराने तिच्या माहेरी लक्ष घालण्याला लुडबुड मानले जाते.

माहेरच्या निर्णय प्रक्रियेतून तिला अलगदपणे बाहेर काढले जाते आणि माहेरच्या संपत्तीतून तिचा अधिकार संपत जाऊन तो केवळ दिवाळीच्या साडीचोळी इतकाच शिल्लक राहतो. भविष्यात जर तिने संपत्तीचा अधिकार मागितलाच तर तिची साडी-चोळीदेखील बंद होते किंवा तिचे माहेर तिला कायमचे तुटते.

दुसरीकडे लग्नानंतर सासरी मुलींचे आयुष्य अनेक अर्थांनी संपूर्ण बदलते. तिला आपलं घर, आपली माणसं, गाव आणि नाव असं सगळं सोडून एका संपूर्ण नवीन अवकाशात प्रवेश करावा लागतो.

त्या संपूर्ण नवीन अवकाशात फारसे बदल न करता तिलाच स्वतःमध्ये पूरक बदल करून घ्यावे लागतात. थोड्याफार फरकाने बहुतेक विवाहितांची हीच कथा, मात्र सरंजामी कुटुंबात तर लग्नानंतर मुलीच्या वाट्याला सासरच्या मंडळींसोबत संपूर्ण गोतावळा येतो.

अशा कुटुंबात नवीन चालीरीती शिकून घेणे, बदललेली देवदैवतं सांभाळणे, आल्यागेल्यांची सरबराई करणे, सणसमारंभात दागदागिने घालून आणि डोक्यावर पदर घेऊन सासरच्या आडनावाची किंमत वाढवणे हे सगळं करावं लागतं.

स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांसाठी स्वतःची ओळख बदलून, हे सगळे बदल स्वीकारून एक संपूर्ण नवीन ओळख धारण करणं हे सोपं काम नव्हे. कालांतराने तिचा स्वीकार केलाही जातो आणि वयाच्या उत्तरेकडे झुकताना काही प्रमाणात निर्णयांत स्थानही मिळतं पण अर्थात सगळे आवाक्यात आणि मोजूनमापूनच.

एवढं असूनही क्वचित प्रसंगी कौटुंबिक ताणतणावाच्या वेळी त्यांचं माहेर काढलं जातं. अगदीच नाही काढलं तरी 'तुम्ही बाहेरच्या' किंवा 'आमच्याकडे असं चालत नाही' किंवा 'तुम्ही आता घराण्यात आलेल्या आहात' किंवा 'ते तसलं शहाणपण तिकडे, तुमच्या घरी दाखवा' हे स्रियांना ऐकवलं जातं.

अतिशय बेमालूमपणे तिच्या माहेरबद्दल हीन किंवा कुचेष्टा करणारा सूर लावला जातो आणि तिला भावनिकदृष्ट्या हतबल केलं जातं. तुम्ही आमच्या 'मूळ' नाही याची सातत्याने तिला जाणीव करून दिली जाते आणि तिचं उपरेपण विविध मार्गांनी अधोरेखित केलं जातं.

भौतिक किंवा सामाजिक भांडवलाच्या वाटपाच्या वेळी स्त्रियांचं हे उपरेपण ठळकपणे अधोरेखित केलं जातं. कुटुंब तर कुटुंबच, पण समाजदेखील या गप्पांमध्ये चवीने सहभागी होतो.

विवाहित स्त्री सासरच्या मूळ कुटुंबातील की बाहेरची?

एखाद्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं 'मूळ' असणे किंवा नसणे ही चर्चा काहींना केवळ सांस्कृतिक असावी असं वाटू शकतं.

परंतु एखादी व्यक्ती त्या 'मूळ' कुटुंबातील आहे की नाही हे म्हणण्याचा निकष काय असावा असा प्रश्न विचारला तर हा मुद्दा केवळ सांस्कृतिक नसून थेट रक्त-नातेसंबंधाचा आहे हे लक्षात येतं.

यातील चर्चेतील 'मूळ' हा संदर्भ थेट वंशशुद्धीशी संबंधित आहे, कुटुंबाच्या चालीरीती आणि रीतिरिवाज पालनाशी नाही. ही सगळी चर्चा ते 'मूळ' बीज कुण्या पुरुषाचे याभोवती होत असते.

जातीय, धार्मिक किंवा वांशिक संदर्भातसुद्धा एखादी व्यक्ती त्या 'मूळ' गटाची की 'अन्य' कुणी आहे हे पुरुष बीजांवर ठरवलं जातं. हा सगळा विचार भेदभावाशी थेट संबंध असलेल्या वंशशुद्धीच्या मुद्द्याशी जोडलेला आहे.

असेच काहीसे लग्न करवून कुटुंबात आणलेल्या स्त्रियांबाबतही आहे. दुसऱ्या कुटुंबातील स्त्री लग्नकरून एखाद्या कुटुंबात आली तर तिचं गर्भाशय वापरून जन्माला आलेली संतती मात्र त्या कुटुंबाची 'मूळ' बनते कारण त्याकामी त्या कुटुंबातील पुरुषाचं बीज कामी आलेलं असतं.

ज्या कुटुंबातील पुरुषबीजामुळे व्यक्ती जन्मते तेच तिचं 'मूळ' असा हा पितृसत्ताक विचार आहे. म्हणूनच नुकतंच राजकीय पटलावर केलेल्या 'मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार' या विधानाचे आणि त्यावर पत्रकार परिषदेत पिकलेल्या खसखसीचं विश्लेषण पितृसत्तेच्या चष्म्यातूनच करावं लागतं.

पितृसत्ता, राजकारण आणि स्त्रिया

पितृसत्ता ही स्त्रियांना दुय्यम मानणारी, त्यांना नियंत्रित करणारी आणि पुरुषांना वारसा, सत्ता आणि नियंत्रण देणारी भेदभावाची सामाजिक व्यवस्था आहे.

या व्यवस्थेच्या मुळाशी 'पुरुष' असतो आणि या व्यवस्थेत सर्व फायदे आणि सवलती हे पुरुषकेंद्रित असतात.

पितृसत्तेचे भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय फायदे हे पुरुषांप्रमाणेच काही निवडक स्त्रियांनाही मिळतात. परंतु या स्त्रिया कुठल्यानं कुठल्या पद्धतीने पुरुषांशी संबंधित असणाऱ्या, त्यांचे वर्चस्व मान्य करणाऱ्या आणि पुरुषांच्या सत्तेच्या अधीन राहून त्याचा पुरस्कार करणाऱ्या असाव्या लागतात.

असं असेल तर पुरुषही पितृसत्तेच्या मांडलिक स्त्रियांचा 'अनौपचारिक सत्कार' करतात, त्यांचा मानसन्मान करतात आणि त्यांना आपल्या नियंत्रणाखाली सत्तेचा थोडा वाटा द्यायला तयार होतात.

त्यामुळे ढोबळमानाने स्त्रियांचा सत्ताप्रवेश हा मुळात पितृसत्तेच्या महाद्वारातून आणि एखाद्या पुरुषाचा हात धरूनच झालेला असतो.

मात्र यातील मुख्य मेख अशी आहे की पितृसत्तेने स्त्रियांना 'बहाल' केलेला हा सत्तेचा वाटा पुरुष त्यांना हवे तेंव्हा काढूनही घेऊ शकतात.

ज्या स्त्रिया स्वयंप्रेरणेनं आणि प्रयत्नांनी सत्तापदाला पोहोचतात आणि तिथे टिकून राहण्यासाठी धडपड करतात त्यांना मात्र विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो हे आपले सामाजिक वास्तव आहे.

हजारों वर्षांपासून पितृसत्तेची ही व्यवस्था विषमतेचं राजकारण करत आहे आणि राजकारणात विषमता पोसते आहे.

पितृसत्ता भलतीच चिवट, जाता जात नाही! रोजच्या व्यवहारातून, मनातून, विचारातून, अभिव्यक्तीतून, वेगवेगळ्या पद्धतीने- कधी स्पष्टपणे तर कधी छुप्या पद्धतीने पितृसत्ता तिचे अस्तित्व आणि प्रभाव दाखवते.

भले-थोरले, जाणते आद्य-धोरणकर्तेही पितृसत्तेच्या या प्रभावातून सुटत नाहीत. त्यामुळे अशा चुकलेल्या वाक्याची, त्यावर खदखदून हसलेल्या निवडक लोकप्रतिनिधींची आणि पत्रकारांची, आणि त्यातून जनमानसात गेलेल्या पितृसत्ताक संदेशाची कठोर मीमांसा ही केलीच पाहिजे.

एका बाजूला आपल्या कायदेशीर नावात आईचं नाव समाविष्ट करून पितृसत्ताक रुढीला परिवर्तनशील धक्का देण्याचे स्वागतार्ह प्रयत्न होत असतानाच दुसऱ्या बाजूला याच आयाबायांना उपरे समजणारी भाषा प्रसृत करणे हे लोकांच्या समतेच्या प्रवासाला खीळ घळण्यासारखे ठरेल.