You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुरुषांनो, तुमच्या आरोग्याबद्दल 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, दिल्ली
आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. पुरुषाची शारीरिक आणि मानसिक घडण स्त्रियांपेक्षा वेगळी असते.
पुरुष आणि स्त्रियांची जनुकीय रचना वेगळी असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात. त्यामुळे काही रोगांचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी तर पुरुषांमध्ये जास्त असतं. पुरुषांच्या आरोग्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.
1) टक्कल असेल तर हृदयरोगाचा धोका अधिक
तुम्ही पुरुष असाल, तुम्हाला टक्कल पडलं असेल, केस अगदी चाळिशीच्या आत पांढरे केस झाले तर ही साधीसुधी बाब नाही. अशी लक्षणं असेल तर तुम्हाला हृदयरोगाची दाट शक्यता आहे असं 2017 मध्ये केलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.
भारतात 2000 तरुण पुरुषांवर हे संशोधन हे संशोधन करण्यात आलं. ज्या मुलांना हृदयरोगाच्या समस्या होत्या त्यांना अवेळी टक्कल पडलं होतं किंवा पांढरे झाले होते. लठ्ठपणापेक्षाही हा मोठा धोका असल्याचं या संशोधनात समोर आलं. मात्र ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन च्या मते हृदयरोगाशी इतर धोके ही तितकेच महत्त्वाचे आहेत.
डॉ. माईक नॅप्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, “ज्या पुरुषांना टक्कल पडलंय किंवा ज्यांचे केस पांढरे झाले आहेत, त्या पुरुषांमध्ये हृदयरोगाचा धोका ओळखणं जास्त सोपं होतं.”
डॉ.कमल शर्मा या अभ्यासातले मुख्य संशोधक होते. ते म्हणाले, “अकाली वृद्धत्व हाही एक मुद्दा इथे असू शकतो. काही रुग्ण लवकर म्हातारे होतात आणि त्याचं प्रतिबिंब केसांमध्ये होणाऱ्या बदलात जाणवतं.”
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्राध्यापवक अलन ह्युजेस यांच्या मते असं संशोधन याआधी झालं आहे. वयोमानानुसार DNA त बदल होतात. त्यामुळेही हे बदल होतात. असंही ते म्हणाले.
2013 साली जपानमध्ये 37000 लोकांवर हा अभ्यास करण्यात आला होता. त्यात टक्कल पडलेल्या 32 टक्के लोकांना हृदयरोग होता.
पक्षाघाताचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असल्याचं मत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. केदार टाकळकर यांनी व्यक्त केलं.
2) मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
पुरुष हा मानसिकदृष्ट्या कणखर असावा, त्याने कधी रडू नये, असे अलिखित नियम समाजाने घालून दिलेले असतात. मात्र पुरुषांचं मानसिक आरोग्य हा एक मोठा विषय आहे. ताणतणाव हे स्त्री पुरुष दोघांनाही असतात. फक्त कारणं थोडीफार वेगळी असतात. पैसा कमावणं हे पुरुषांच्या ताणतणावाचं सगळ्यात मुख्य कारण असल्याचं डॉ.पालकर यांचं मत आहे. पैसा किती मिळतो यावर पुरुषांची किंमत ठरते. याचा मोठा ताण पुरुषांवर असतो. पैसे कमावणं हे पुरुषांचंच काम आहे हे समाजाने बिंबवलं तरी आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. यासाठी पालकांशी, जोडीदाराशी योग्य संवाद असावा असं ते सुचवतात.
स्त्रियांना मानसिक आरोग्याच्या समस्या आढळल्या तर त्या बोलून मोकळ्या होतात तर कधी रडून मोकळ्या होतात. पुरुषांचं तसं होत नाही. आपल्या मानसिक समस्यांमबद्दल पुरुषांमध्ये जागरुकता असली तरी ते मोकळणेपणाने बोलत नाही असं निरीक्षण डॉ पालकर नोंदवतात.
स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेरची कामं करतात. त्याचप्रमाणे पुरुषांनीही घरातली कामं शिकायला हवी असंही डॉ.पालकर सुचवतात. पुरुषांनी त्यांच्या भावना अधिक मोकळेपणाने मांडल्या तर त्यांचा योग्य प्रकारे निचरा होईल, ताणतणाव कमी होतील आणि ते कमी करण्यासाठी इतर उपायांचा आधार घ्यावा लागणार नाही असं डॉ. पालकर यांना वाटतं.
पुरुष कायमच लंपट, लाळघोटे असतात असं सरसकट लेबल लावलं जातं. त्यामुळे पुरुषांना त्यांच्या मैत्रिणीशी, स्त्री सहकाऱ्यांशी बोलणं कठीण होऊन बसतं असं मानसोपचार तज्ज्ञ अक्षता भट यांचं मत आहे.
आपल्या शरीराचा योग्य स्वीकार न करणं हेही पुरुषांमध्ये आढळून येणारी एक समस्या आहे. अती लठ्ठ किंवा अती बारीक असेल तर त्यांना हिणवलं जातं. या समस्येला Body Dysmorphia असं म्हणतात. त्यामुळे स्टिरॉईडचा वापर किंवा अती खाणं या गोष्टी वाढतात आणि वेगळ्या समस्या निर्माण होतात असं डॉ. अक्षता भट सांगतात.
3) व्यसनं तातडीने सोडा
पुरुषांमध्ये व्यसनाधीनता ही दिवसेंदिवस वाढत जाणारी मोठी समस्या आहे. शालेय वयापासूनच या सवयीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दारू, सिगरेट, गांजा, ड्रग्स च्या विळख्यात पुरुष दिवसेंदिवस जास्त अडकत चालल्याचं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. देवाशिष पालकर सांगतात. क्षणिक ताण घालवण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. मात्र ताण घालवायला इतर मार्गाचा वापर करावा असं ते सुचवतात.
लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात जागतिक पातळीवर कॅन्सरमुळे जितके मृत्यू झाले त्यांच्यापैकी 44.4 टक्के मृत्यू सिगारेट, दारूचा अतिरेक आणि अतिरिक्त BMI मुळे झाले आहेत. तंबाखुजन्य उत्पादनामुळे 25 वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यामुळे सगळ्या प्रकारची व्यसनं पुरुषांनी तातडीने सोडायला हवीत.
4) लैंगिक आरोग्याबद्दल समज गैरसमज
‘आपल्याकडे सेक्स बोकाळला आहे, पण सेक्स एज्युकेशन नाही’ असं मत सेक्सॉलॉजिस्ट डॉ. प्रसन्न गद्रे व्यक्त करतात. पुरुषांना योग्य लैंगिक शिक्षण मिळत नाही. पुरुषांना योग्य वेळेला योग्य व्यक्तींकडून लैंगिक शिक्षण मिळण्याचा ते आग्रह धरतात. पुरुषांनी त्यांच्या स्त्रियांच्या लैंगिकतेचा आणि तिच्या शरीराचा आदर बाळगला पाहिजे असंही ते पुढे म्हणतात.
सेक्स आणि सेक्शुअलिटी बदद्ल पुरुषांना प्रचंड गैरसमज असतात. सेक्ससाठी पहिलं पाऊल पुरुषांनीच टाकलं पाहिजे हा या गैरसमजातलाच एक. हा गैरसमज डॉ. गद्रे खोडून काढतात. तसंच लिंगाचा आकार जितका मोठा तितका पुरुषार्थ जास्त हाही एक मोठा गैरसमज आहे. शहर ते ग्रामीण भागात जातो तसा हा समज मोठ्या प्रमाणात वाढतो. पण सेक्स हा आकार आणि लांबीपेक्षा आत्मविश्वासावर अवलंबून असतो.
हस्तमैथुनाबद्दल पुरुषांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. त्याबद्दल विविध समाजमाध्यमांवर, खासगी गप्पांमध्ये दबक्या आवाजात बोललं जातं. मात्र हस्तमैथुनामध्ये वाईट काहीही नाही. व्यक्तीने स्वतःच शारीरसुखाचा आनंद मिळवण्यात काहीही चूक नाही. ही अत्यंत खासगी, वैयक्तिक बाब आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणं गुन्हा आहे.
हस्तमैथुनामुळे कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही. त्यामुळे प्रजननावर, वीर्यनिर्मितीवर परिणाम होत नाही किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं असे बदलही होत नाहीत. हस्तमैथुनामुळे प्रतिकारक्षमतेवर आजिबात परिणाम होत नाही. कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही.
हस्तमैथुनातून वीर्य जातं आणि त्यामुळे रक्त कमी होतं व शेवटी प्रतिकारक्षमता कमी होते असा एक गैरसमज असतो त्यावर बोलताना डॉ. गद्रे म्हणाले, "पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी यांचं प्रमाण आणि वीर्य यांचा काहीही संबंध नाही. वीर्य गेल्यामुळे रक्त कमी होऊन प्रतिकारक्षमता कमी होते हा अत्यंत चुकीचा समज आहे. असं काहीही नसतं."
लैंगिक आरोग्यांच्या समस्येमुळे मानसिक आरोग्यही बिघडतं. “सध्याची जीवनशैली तणावपूर्ण आहे. त्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो आणि तो शारीरिक आणि लैंगिक क्रियांमध्येही दिसतो. शीघ्रपतन, लैंगिक ताठरता नसणे या समस्यांशी पुरुष झगडत आहेत त्याच्याशी सामना करण्याशी ताणतणावांना योग्य प्रकारे तोंड देणे हा उपाय असल्याचं डॉ. पालकर सांगतात.”
Penile Fracture ही सुद्धा पुरुषांमध्ये आढळणारी पण फारसं न बोललं जाणारी समस्या आहे. साध्या मराठीत सांगायचं झालं तर लिंग फ्रॅक्चर होणं. सेक्स करताना लिंग योनीत जाण्याऐवजी स्त्रीच्या पायावर किंवा गुप्तांगावर आदळलं तर लिंग फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना केली नाही तर शारीरिक आणि लैंगिक परिणाम होण्याची शक्यता आहे. 57.2 टक्के पुरुषांना सेक्स करताना ही समस्या उद्भवल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे. ही समस्या 30-50 या वयोगटात जास्त प्रमाणात आढळून येते. सेक्स करताना स्त्री पुरुषाच्या शरीरावर असेल किंवा अनैसर्गिक सेक्स करत असाल तर लिंग फ्रॅक्चर होण्याची शक्यता बळावते.
हस्तमैथुन करताना किंवा ताठरलेल्या लिंगावर एखादी वस्तू पडली तर लिंग फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता आहे.
मुळात सेक्स ही नातं सेलिब्रेट करण्याची प्रक्रिया आहे. स्त्री पुरुषांनी एकत्र राहण्याची संधी आहे. त्यामुळे सेक्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा असं डॉ. प्रसन्न गद्रे सांगतात.
5) पुरुषांमध्येही रजोनिवृत्ती
महिलांमध्ये जसं रजोनिवृत्ती असते तशी ती पुरुषांमध्येही असू शकते. त्याला Andropause असं म्हणतात. या अवस्थेवर सध्या बरंच संशोधन सुरू आहे. चाळिशी, पन्नाशी, साठीत काही शारीरिक आजार झाला तर ही अवस्था येऊ शकते.
पुरुष आणि स्त्रिया शारीरिकदृष्ट्या वेगळे असतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा चिवट असतात. स्त्रियांचं जीवनमान जास्त असतं. त्यामुळे पुरुषांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे.
सुदृढ जीवनशैली, आनंदी स्वभाव, ताणतणावांचे नियोजन, योग्य मित्रमैत्रिणीची साथ यामुळे पुरुषांचं आरोग्यमान चांगलं राहू शकतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)