45 व्या वर्षी रिटायर होऊन मनासारखं जगायचं असेल तर किती बचत आणि गुंतवणूक हवी?

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

‘फायनान्शियल इंडिपेन्डन्स, रिटायर अर्ली’ (FIRE) म्हणजे ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा आणि लवकर निवृत्त व्हा’ ही चळवळ गेल्या दशकभरापासून जगभर अत्यंत वेगानं पसरतेय आणि शेकडो लोक या चळवळीच्या उद्देशाचा अवलंबही करतायेत.

जगातल्या बहुतांश देशांमध्ये वय वर्षे 55 ते 60 असं निवृत्तचं वय आहे.

अमेरिकेसारख्या देशात निवृत्तीला फारसं महत्त्वं नाहीय. मात्र, तिथं लवकरात लवकर आर्थिक स्वतंत्र होऊन, आपला भार कुणावरही पडू नये, अशा उद्देशांना अधिक महत्त्व आहे.

40-45 वर्षांपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वंत्रत, स्वावलंबी होण्याकडे अनेकांचा कल दिसतो. हेच ‘FIRE’ चळवळीचं केंद्रबिंदू आहे.

वैयक्तिक आर्थिक नियोजन (पर्सनल फायनान्स प्लॅनिंग) अंतर्गत उत्पन्नातील मोठा भाग बचत करणं आणि खर्चावर मर्यादा आणून जगणं, अशी खबरदारी घेतली जाते. या ‘FIRE’ चळवळीनुसार भविष्यातील खर्चासाठी बचत करण्याचा उद्देश ठेवण्यात येतो.

FIRE चळवळ नेमकी सुरू कधी आणि कशी झाली?

आर्थिक

फोटो स्रोत, Getty Images

1980 ते 2000 या वर्षांदरम्यान जन्मलेली पिढी ‘FIRE’ चळवळीकडे बऱ्याच प्रमाणात आकर्षित झालेली दिसून येते. ‘Early Retirement Extreme’ या पुस्तकात लेखक जेकब फिस्कर यांनी ‘FIRE’चा सिद्धांत अधिक विस्तृतपणे मांडलाय.

विकी रॉबिन यांनी त्यांच्या ‘युअर मनी ऑर युअर लाईफ’ या पुस्तकात ‘FIRE’ सिद्धांताचं समर्थनही केलंय. याशिवाय, अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘FIRE’ चळवळीचा प्रचार-प्रसार केलाय.

या सगळ्यामुळे या चळवळीकडे आकर्षित होणाऱ्यांच्या संख्येचं प्रमाण मोठं आहे.

वयाच्या चाळीशीनंतर खऱ्या अर्थानं आयुष्याला सुरुवात होते, अशी भावना परदेशात बऱ्याच प्रमाणात दिसून येते. FIRE चळवळीनं तर या भावनेला एकप्रकारे दुजोरा आणि आधारच दिलाय.

अनेक लोक त्यांच्या चाळीशीत किंवा पंचेचाळीशीत नोकरी सोडून आवडत्या करिअरकडे किंवा छंदाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यात FIRE चळवळीनुसार जरी त्यांच्याकडे नियमित नोकरीचा पगार येत नसला, तरी केलेल्या गुंतवणुकीतून आणि बचतीतून त्यांचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर राहतं, शिवाय आवडत्या गोष्टीही बिनधास्तपणे करता येतात.

भारतात ‘FIRE’ चळवळ इतकी लोकप्रिय का?

आता नोकरी करत असलेली पिढी ही आधीच्या नोकरदार पिढीपेक्षा स्वभवाने, विचाराने वेगळी आहे. त्यांच्या कल्पना, स्वप्नंही वेगळी आहेत. पूर्वी एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीत किंवा सरकारी विभागात आयुष्यभर काम करायची. आता एखाद्या कंपनीत किमान पाच वर्षे काम करणंही मोठं मानलं जावं, अशी स्थिती आहे.

पूर्वी वयाची साठी पूर्ण केल्यानंतर निवृत्तीवेतनाची सोय होती. आता तसं नाहीय. त्यामुळे काम करत असतानाच जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं, या विचारातूनच FIRE सिद्धांताचा उगम झाला आणि या सिद्धांताचं एकप्रकारे चळवळीत रुपांतर झालं.

शिवाय, आता कामाच्या वेळाही पूर्वीसारख्या एकच नसतात, तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कामं केली जातात. मुंबई, हैदराबाद, गुरुग्राम, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये विशिष्ट वेळेलाच होणारी वाहतूककोंडी याच पद्धतीमुळे होते.

आर्थिक

फोटो स्रोत, Getty Images

एकच काम दीर्घकाळ न करण्यासाठी आताच्या पिढीचा कल दिसतो, ते याचमुळे.

म्हणूनच, उजेड असतानाच घराची स्वच्छता करून घ्यावी, असं म्हटलं जातं. तसंच, आर्थिक बचत, गुंतवणुकीबाबत आजची पिढी विचार करते.

शिवाय, आता पर्सनल फायनान्सबाबत जी माहिती उपलब्ध आहे, तशी पूर्वी नव्हती. आरोग्य विम्यापासून निवृत्ती नियोजनापर्यंत सर्वच गोष्टींची माहिती आता चटकन उपलब्ध होते.

पूर्वी एजंट किंवा कंपन्यांमार्फतच गुंतवणूक केली जात असे. आता तसं नाहीय. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आर्थिक नियोजनाचं मार्गदर्शन एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागलंय. पर्यायाने आपापल्या गरजेनुसार अनेकजण गुंतवणूक करतात. हे सर्व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे होऊ लागलंय.

FIRE सिद्धांतामध्ये नेमके कोणते घटक आहेत?

विमा (Insurance Policy) – आपल्या वार्षिक खर्चाच्या वीसपट जास्त जीवन विमा असावा. संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमान काढलेला असावा.

भविष्य निर्वाह निधी (PF) – एखादा कर्मचारी 45 वर्षांचा होईपर्यंत, त्याच्या कुटुंबाच्या वार्षिक खर्चाच्या 25 पट भविष्य निर्वाह निधी असायला हवा, असं FIRE सिद्धांत सांगतं. महागाईवर मात करण्यासाठी असा निधी या सिद्धांताची गुरुकिल्ली आहे.

आर्थिक उद्दिष्टं – प्रत्येक महिन्याला प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी पुरेशी गुंतवणूक करावी. यात कोणतीही तडजोड होता कामा नये. आर्थिक उद्दिष्टांसाठी समान पद्धतीने गुंतवणूक करत राहणं हे वैयक्तिक आर्थिक नियोजनाचंही तत्व आहे.

खर्चावरील नियंत्रण – वेळोवेळी खर्चाचा आढावा घेऊन अतिरिक्त खर्च आणि अनावश्यक खर्च कमी करणे हे FIRE चे मुख्य तत्व आहे. मासिक पगारातून बचत केल्यानंतर उर्वरित रक्कम खर्चासाठी वापरली जावी. मात्र, हे नेहमीच शक्य नसते, त्यामुळे खर्च कमी करण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

आर्थिक

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

FIRE वरील मुख्य टीका – FIRE सिद्धांतावर प्रामुख्यानं अशी एक टीका होते की, काटकसरीनं जगणं म्हणजे आयुष्यात आनंद घेण्याच्या संधींवर पाणी सोडणं होय. पण ही टीका समर्थनीय दिसत नाही. कारण उपभोग ही भावनात्मक गोष्ट आहे आणि आर्थिक बाबींमध्ये भावनांना स्थान नसते.

हा सिद्धांत जास्त उत्पन्न असलेल्यांनाच लागू होतो, अशी टीकाही केली जाते. या टीकेत काही प्रमाणात तथ्य आहे, हे खरं आहे. पण जे उद्याची गरज ओळखून बचत करण्यास सुरुवात करतात, तेच आर्थिकदृष्ट्या आणखी एक पाऊल उचलू शकतात.

FIRE चळवळीचे परिणाम – FIRE सिद्धांतामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलीय. सध्याची वाढणारी म्युच्युअल फंड एसआयपी ही देखील या FIRE च्या चळवळीतून जन्मलेली कल्पना आहे.

साहजिकच गुंतवणूकदारांच्या या वाढीमुळे शेअर बाजारात चांगलं वातावरण आहे. पूर्वी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या शेअर बाजारावर राज्य करत असत. पण आता तशी परिस्थिती नाही.

गुंतवणुकीच्या संधींच्या वाढत्या लोकप्रियतेसह फसवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढतेय. अलीकडे सोशल मीडियावर लोकांकडून लहान गुंतवणूकदारांना फसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)