कांतारा : पंजुर्ली हे वराहाचं रूप हिंदू पुराणातील देवाच्या 10 अवतारांपैकी एक आहे का? ही परंपरा मानणारे काय सांगतात?

दयानंदा राकेतश्वरीच्या रुपात दैवी कोला सादर करत असताना
    • Author, बाला सतीश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कांतारा चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा, ती भयावह वाटणारी देवता आणि तिची भक्ती करणारे गावकरी, ते सर्व पाहून अनेकांच्या अंगावर शहारे येतात.

कांतारा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर या भूताच्या आणि त्याच्या पूजेच्या प्रथेबद्दल बराच रस निर्माण झाला आहे.

अलीकडेच, तिरुमाला ब्रह्मोत्सवमचा भाग म्हणून काहीजण मदावीधूच्या रस्त्यांवर भूतांच्या वेषात उतरले होते. ते वादग्रस्त ठरलं होतं.

ही कला आहे, एक उत्सव आहे की ग्रामदेवतेबद्दल वाटणारी भक्ती आहे की अंधश्रद्धा आहे, याबद्दल वेगवेगळी मतं आहेत.

अर्थात ही एकप्रकारची लोककला आहे. मात्र ती एखाद्या विशिष्ट कुटुंबातील लोक वडिलोपार्जितरित्या सादर करत असतात. ती वार्षिक उत्सवाच्या रुपात सादर केली जाते. यात सर्व गावकरी सहभागी होतात.

ही कला सादर करणारा कलावंत वाद्यांच्या तालावर नृत्य करतो आणि त्यावेळी त्याच्यामध्ये त्या ग्रामदेवतेचा किंवा निसर्ग देवतेचा वास असतो, असं मानलं जातं.

मग भूताची पूजा म्हणजे काय असतं? ती देवतेचीच पूजा असते की आत्म्यांची पूजा असते? ही पूजा कोण करतं, कुठे करतं आणि का करतं? ती करण्यामागची भावना काय असते? या सारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या लेखातून जाणून घेऊयात.

ही प्रथा कुठे पाळली जाते?

भूता कोला किंवा दैव कोला ही तुळू नाडू प्रदेशात (केरळ सीमेजवळील कर्नाटकचा एक भाग) किंवा तुळू भाषिक लोकांमध्ये असलेली प्रथा आहे.

कर्नाटकचा दक्षिण भाग आणि केरळचा उत्तरेकडील भाग यांच्या सीमावर्ती भागात ही प्रथा आहे.

कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये तसंच केरळचा कासारगोड जिल्हा या पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या भागात ही प्रथा आढळते.

दयानंदा राकेतश्वरीच्या रुपात दैवी कोला सादर करत असताना
फोटो कॅप्शन, दयानंदा राकेतश्वरीच्या रुपात दैवी कोला सादर करत असताना

तुळू लोकांबरोबरच काही मल्याळी लोकदेखील ही प्रथा पाळतात.

केरळमधील थेय्यम कला प्रकार या प्रकारच्या भूत किंवा देवतेच्या पूजनाशी जवळून संबंधित आहे.

कर्नाटकातील यक्षगणमवर याचा प्रभाव आहे.

भूता कोला म्हणजे काय?

कोला म्हणजे कामगिरी, उत्सव आणि रुप, तर भूत या शब्दाचा अर्थ फक्त तेलगू आणि हिंदी भाषेत भूत असा होत नाही. तर संस्कृत भाषेत त्याचे आत्मा, प्राचीन, दिव्य, पंचमहाभूतं, शुद्ध आणि सत्य असे अनेक अर्थ आहेत.

याकडे तीन प्रकारे पाहिलं जातं. ते म्हणजे पूर्वजांची पूजा, निसर्गातील शक्तींची पूजा आणि देवतेची पूजा.

म्हणजेच कांतारा चित्रपटात ज्याप्रमाणे दाखवण्यात आलं आहे, त्याप्रमाणे गावातील विशिष्ट देवतेची पूजा करण्याचा हा विधी असतो. तो गावातील किंवा त्या भागातील लोक दरवर्षी करतात. हे सादर करणाऱ्या कलावंताचा ताबा गावातील देवता घेते आणि भक्तांना आशिर्वाद देते, असं मानलं जातं.

तुळू परंपरेनुसार, या जगाची विभागणी 3 भागात झाली आहे.

  • ग्रामीण म्हणजे शेती
  • जंगलं किवा वनं
  • तर भूत म्हणजे अशी गोष्ट, शक्ती ज्याची पूजा केली जाते आणि जे गाव आणि जंगलात सुसंवाद घडवून आणतं.

इतकंच काय, ही भूतं आणि देवता, गावचा प्रमुख किंवा शासकदेखील ठरवतात.

तुळूनाडूतील काही जातींमध्ये, भूता कोला सादर करण्याचा वारसा मुलाऐवजी पुतण्या किंवा भाच्याकडे जातो, दयानंदा यांच्याबरोबर त्यांचा पुतण्या देवतेच्या पूजनाचा विधी सादर करत आहेत
फोटो कॅप्शन, तुळूनाडूतील काही जातींमध्ये, भूता कोला सादर करण्याचा वारसा मुलाऐवजी पुतण्या किंवा भाच्याकडे जातो, दयानंदा यांच्याबरोबर त्यांचा पुतण्या देवतेच्या पूजनाचा विधी सादर करत आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भक्त या उत्सवाच्या वेळेस देवतेला गावातील समस्या सांगतात, आपसातील वैयक्तिक वादांबद्दल सांगतात. भूता कोलामध्ये हे भूत किंवा देवता गावातील समस्या, वादांवर निवाडादेखील देतात. लोकांचा असा विश्वास आहे की, या विधीमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभतं.

इतरांना हे एकप्रकारचं सोंग घेऊन किंवा रूप धारण करून सादर केलेली गोष्ट वाटू शकते. मात्र तुळू लोकांसाठी हे दैवी रूप आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या भागाबाहेर या गोष्टीचं प्रदर्शन करायला किंवा दाखवायला आवडत नाही. जर वेशात बदल करण्यात आला, तर ते सहन करत नाहीत.

याच्या मागचा उद्देश भक्तीबरोबरच भीती निर्माण करण्याचा आहे, असं मानलं जातं.

"प्रत्येक उद्देशासाठी वेगवेगळ्या देवतेची पूजा केली जाते. अशा अनेक देवता आहेत. उदाहरणार्थ, निसर्ग देवता, देवता झालेले (ज्यांना देवत्व प्राप्त झालं आहे) पूर्वज. तुळुनाडूमध्ये याप्रकारे देवतेची पूजा मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळवण्यासाठी केली जाते," असं दयानंदा जी कट्टालसर यांनी बीबीसीला सांगितलं. ते भूताकोलाचं सादरीकरण करणारे कलावंत आहेत. त्यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या हा वारसा चालत आला आहे.

अनेक लोकांसाठी 'भूत' या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. मात्र 'दैवी किंवा देवतेची पूजा' हा शब्द ते बऱ्याच वेळा वापरतात.

कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

याप्रकारच्या पूजेमध्ये डझनभर देवतांची पूजा केली जाते. गावांसाठी, काही भागातील ठराविक गावांसाठी, जातींसाठी आणि अगदी कुटुंबासाठीदेखील विशिष्ट देवता आहेत.

पूर्वजांच्या रुपातील देवताही आहेत. प्राणी देवता आहेत, तसंच ग्रामदेवता आहेत. वीर किंवा शूर व्यक्तींच्या आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या देवता आहेत.

हे दैवी कार्य करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्याभोवती जे लोक असतात त्यांना पत्री म्हणतात
फोटो कॅप्शन, हे दैवी कार्य करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्याभोवती जे लोक असतात त्यांना पत्री म्हणतात

जैनदेखील या देवतेची पूजा करतात. त्यांच्यामध्ये देखील देवतांची विशेष रुपं आहेत. उदाहरणार्थ, पुरुषाचं डोकं आणि मादीचं शरीर असलेली देवता, डुकराचं डोकं आणि मादीचं शरीर असलेली देवता. तसंच पिकांचं रक्षण करणारी देवता, समुद्र देवता आणि वनदेवता अशी ही विविध रुपं आहेत.

या देवतांची इतर देवांप्रमाणे घरांमध्ये नियमितपणे पूजा केली जात नाही. या देवतांची पूजा गावच्या वार्षिक उत्सवात एकत्रितपणे पूजा केली जाते. मात्र देवतांचे दागिने, त्यांच्याशी संबंधित वस्तू यांची पूजा नियमितपणे केली जाते.

देवतांचे एकूण 3 प्रकार

या देवतांचे तसे एकूण 3 प्रकार आहेत, म्हणजे त्यांची विभागणी 3 प्रकारात होते.

निसर्गाची शक्ती, प्राणी देवता : उदाहरणार्थ पंजुर्ली, गुलिगा, मल्लाराया, जुमादी

ऐतिहासिक, शूर पुरुष, आदिवासी रक्षक देवता : कधीकाळी पृथ्वीवर वास्तव्यं केलेले आणि अलौकिक किंवा दिव्य शक्ती प्राप्त केलेले पुरुष. शक्तीशाली, शूरवीर पुरुष उदाहरणार्थ, कोरागज्जा, कोरदब्बू, अन्नप्पा.

मृत्यू झालेले पूर्वज :

जरी या देवतांचा हिंदू वैदिक आणि पुराणातील परंपरेशी थेट संबंध नसला, तरी देखील अशा अनेक देवतांच्या कथा हिंदू पौरोणिक कथांमध्ये गुंफण्यात आलेल्या आहेत.

उदाहरणार्थ, इथल्या लोकांचा विश्वास आहे की, भगवान शिवानं पंजुर्ली नावाचा देव पृथ्वीवर पाठवला. पंजुर्ली हे वराहाचं रूप आहे. मात्र तो हिंदू पुराणातील देवाच्या 10 अवतारांमध्ये असलेला वराह अवतार नाही. तो वेगळा आहे. त्याच्यामागे एक कथा आहे.

भूता कोला सादर करण्यासाठी कलावंताला सजवलं जातं, चेहऱ्यावर नैसर्गिक रंग लावले जातात, यासाठी कित्येक तास लागतात
फोटो कॅप्शन, भूता कोला सादर करण्यासाठी कलावंताला सजवलं जातं, चेहऱ्यावर नैसर्गिक रंग लावले जातात, यासाठी कित्येक तास लागतात

भगवान शिवाच्या कैलास पर्वतावरील बागेत एक रानडुक्कर मरतं. त्यानंतर देवी पार्वती त्याच्या पिल्लाचं संगोपन करते. मात्र ते पिल्लू मोठं झाल्यावर भगवान शिवाच्या बागेतील वनस्पती आणि झाडं नष्ट करतं. त्यामुळे भगवान शिव त्याला मारण्याचं ठरवतात.

मात्र देवी पार्वती पुढे येते आणि त्यांना त्या डुकराला माफ करण्यास सांगते. मग भगवान शिव त्यांच्या गणांच्या अधिपत्याखाली या रानडुकराला पृथ्वीवर पाठवतात आणि त्याला रक्षण करणाऱ्या देवतेचा दर्जा देतात. ही देवता म्हणजेच पंजुर्ली. पंजुर्लीला शिव संभूत म्हणतात.

रानडुकारांपासून शेतकऱ्याच्या पिकांचं रक्षण व्हावं म्हणून या पंजुर्लीची पूजा केली जाते.

पूर्वजांची पूजा म्हणजे भूताची किंवा आत्म्याची पूजा आहे का?

इथे पूर्वजांची पूजा करण्यामागे एक भला मोठा विधी असतो. ज्या पूर्वजांच्या इच्छा पूर्ण न होताच त्यांच्या मृत्यू झाला अशा पूर्वजांशी निगडीत विधी किंवा कुळाचार केल्यानंतर काही विशेष विधी केले जातात.

जवळपास 12 वर्षांनी या पूर्वजांचं रुपांतर भुतामध्ये होतं. मग ते प्राचीन धर्मातील देवता होतात. त्यांना काले आणि कुले असं नाव देण्यात आलं आहे.

दैवी सादरीकरणासाठीची तयारी करताना
फोटो कॅप्शन, दैवी सादरीकरणासाठीची तयारी करताना

दयानंदा म्हणाले, "भूत म्हणजे शब्दश: भूत नाही. तर एक पूर्वज आहे, ज्यानं सर्व विधी पूर्ण केले आहेत आणि ज्याला देवत्व मिळालं आहे. ही भूतांची पूजा आहे. मात्र पंजुर्ली, गुलिगा, मैसंदयासारख्या निसर्गाची शक्ती म्हणजे भूतांची पूजा नाही. ती देवतेची पूजा आहे."

"अशाप्रकारे या परंपरेत निसर्ग, पूर्वज आणि ऐतिहासिक वीर किंवा नायकासारखे पुरुष आहेत. ही संपूर्ण भूत संस्कृती काही फक्त एका देवासाठी नाही."

दयानंदा मंगळूरचे रहिवासी आहेत आणि पोस्टखात्यात एक कनिष्ठ कर्मचारी आहेत. 50 वर्षांचे दयानंदा पंबाडा जातीचे आहेत. ते पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा विधी करत आहेत.

थोडक्यात सांगायचं तर, ही एक प्रक्रिया किंवा विधी आहे. यात तुळूनाडूची सर्व ऐतिहासिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि सामाजिक गुंतागुंत या सर्व गोष्टी एकत्रित होतात.

ही भूत पूजा नेमकी कधी सुरू झाली?

ही पूजा किंवा विधी नेमका कधी सुरू झाला हे कोणालाही माहीत नाही. मात्र या विधीच्या खुणा किंवा वर्णनं साधारण 700 वर्षांपूर्वी 14 व्या शतकातील एका शिलालेखात सापडल्या आहेत.

देवतेचं रूप कोण धारण करतं? ही कला कोण सादर करतं?

नलिके, पंबाडा आणि परवा यांच्यासारख्या दलित (एससी) जातीतील लोक या विधीमध्ये सहभागी होतात. सध्याच्या काळात या परिसरातील इतर जातीचे लोक देखील या देवतांची पूजा करतात.

गावांमध्ये आणि स्थानिक ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये हा विधी साधारणपणे वर्षातून एकदा केला जातो. तो एक वार्षिक उत्सव असतो.

हे करणारे लोक वेगवेगळे व्यवसाय करतात किंवा वेगवेगळी कामं करतात. यात मजूर असतात आणि सरकारी कर्मचारीही असतात. स्थानिक जमीनदार किंवा गावातील मातब्बर लोकांनी या विधीचा खर्च करण्याची परंपरादेखील आहे.

ही कला सादर करणाऱ्या कलावंतांना विशेष मानसन्मान असतो.

हे सादर करणारे तयार होत असताना, त्यांच्या कुटुंबातील किंवा त्यांच्या जातीतील तरुण त्यांना मदत करतात. त्यांच्याकडे पाहून ते शिकतात.

भाविक दैवी कोलाला नमन करत असताना
फोटो कॅप्शन, भाविक दैवी कोलाला नमन करत असताना

दयानंदा म्हणतात, "या देवाची पूजा करणारे सर्व दलित समुदायातील आहेत. या देवाची पूजा करत असताना, इथल्या सर्व 16 जातींचा सहभाग असतो आणि त्यांचा आदरदेखील केला जातो."

"जेव्हा एखादी व्यक्ती आमच्यासमोर नतमस्तक होतो किंवा आम्हाला नमन करतो, तेव्हा वैयक्तिकरित्या मला नमन करत नसतो, तर या देवतेला नमन करत असतो."

हा विधी पार पाडत असताना त्यात काही जातीनिहाय नियम आहेत.

या विधीबद्दल दयानंदा पुढे म्हणाले, "आमच्या जातीमध्ये, हे सादर करणारे लोक त्यांच्या हातात मुद्रा, पायात जोडवे, डोक्यावर केस आणि हातात बांगड्या घालतात. जर भात खात असताना दिवा विझला, तर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून पूजा करेपर्यंत आम्ही भात खात नाही."

"जे लोक आजारी असतात त्यांना आम्ही स्पर्श करत नाही. आम्ही गोमांस आणि डुकराचं मांस खात नाही. इतर मांस खाऊ शकतो. मी व्यक्तिश: मांस खाणं बंद केलं आहे. मद्यपानाला मनाई नाही, मात्र मी मद्यपान करत नाही."

"काही गावं अशी आहेत की, जिथे हे वंशपरंपरागतरित्या चालत आलं आहे. तिथे फक्त तीच कुटुंब हा विधी करतात. हा विधी फक्त तुळूनाडूमध्ये केला पाहिजे. काही लोक हे बाहेरच्या भागात करतात. मी बाहेर करत नाही. माझ्या वडिलांनी मला तसं सांगितलं होतं," असं ते पुढे नमूद करतात.

दैवी नृत्याची सुरुवात करण्यापूर्वी तुळू भाषेत प्रार्थना केली जाते
फोटो कॅप्शन, दैवी नृत्याची सुरुवात करण्यापूर्वी तुळू भाषेत प्रार्थना केली जाते

या विधीसाठीचे नियम इतर जातींमध्ये थोडेफार वेगळे असू शकतात. या भागातील काही जातींमध्ये प्राचीन मातृसत्ताक व्यवस्थेच्या खुणा आढळतात. त्यामुळे काही वारसा काकांकडून येण्याऐवजी मामांकडून येतो.

हा विधी करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो. कारण देवतेचं रूप धारण करण्यासाठी लागणारा पोशाख, कपडे आणि सजावटीचं सामान यासाठी खर्च होतो. काही ठिकाणी, यासाठी पुरेसा पैसा असतो, तर काही ठिकाणी पुरेसे पैसे उपलब्ध नसतात. मात्र हा खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नसले, तरीदेखील हा विधी पार पाडला जातो.

स्वत:च्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि या कलेचं सादरीकरण यासंदर्भात दयानंदा म्हणतात, "आम्ही फक्त संसारी दुनियेतील कलावंत नाही. आम्ही अध्यात्मिक कलावंत आहोत. माझ्या वडिलांनी हा वारसा श्रद्धेनं सांभाळला आहे, ते झोपडीत राहायचे."

"ते एखाद्या रोजंदारीसारखं काम करायचे तेदेखील एकही पैसा न घेता. त्यांना फारसे पैसे मिळत नव्हते. मला शिकायचं होतं आणि नोकरी करायची होती. मात्र तरीदेखील मी ही परंपरा सोडली नाही."

देवतेच्या परिसरात काय केलं जातं?

हे रूप धारण करणारा किंवा ही कला सादर करणारी व्यक्ती त्या देवतेच्या मंदिरात किंवा जिथे ती देवता आहे असं मानलं जातं, अशा परिसरात जाते. तिथे ते तुळू भाषेमध्ये त्या देवतेला नमन करत गातात किंवा इतिहासाबद्दल गातात. याला पद्दना म्हणतात.

हे एकप्रकारचं इतिहास कथन किंवा कथाकथन असतं. मान्यतेनुसार, काहीवेळा भूत किंवा देवता ज्या कलावंतामध्ये असते ती व्यक्ती स्वत:च एक लहान ढोल वाजवते आणि देवतेचं रूप धारण करण्यापूर्वी थोडा वेळ गाते.

ते कलावंत ज्या देवतेचं रूप धारण करतात, त्या देवतेच्या रुपाशी जुळणारा मुखवटा किंवा अलंकार घालतात. उदाहरणार्थ, जो कलावंत राकेतश्वरीचं रूप धारण करणार असतो, तो पुरुष असला तरी शरीरावर अनेक साड्या नेसतो. त्यानंतर तो त्या देवतेचं रूप धारण करतो.

ही खूप विशेष प्रक्रिया असते. कलावंत यासाठी लागणारे रंग स्वत: तयार करतात. हे रंग सर्व नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असतात. काहीवेळा कलावंत देवतेशी संबंधित अलंकार किंवा दागिने घालतात.

भूता कोलाच्या सादरीकरणाच्या वेळेस त्यांच्या हातात तलवारीसारखं शस्त्र असतं
फोटो कॅप्शन, भूता कोलाच्या सादरीकरणाच्या वेळेस त्यांच्या हातात तलवारीसारखं शस्त्र असतं

हे कलावंत लाल रंगाचे कपडे घालतात आणि त्यांचा चेहरा पिवळ्या रंगानं रंगवतात. शेवटी त्यांना स्थानिक परंपरेनुसार, एक तलवार, एक मोठं भांडं आणि एक घंटा दिली जाते.

याचबरोबर चांदीचे दागिने, नारळ किंवा ताडाच्या पानांपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तूदेखील असतात. पोका झाडाची फुलं आणि बांबूचा देखील वापर केला जातो.

हे सर्व परिधान करून तयार होत देवतेचं रूप धारण करण्यासाठी कलावंतांना काही तास लागतात. फक्त चेहऱ्याची सजावट, रंगरंगोटीसाठीच दीड तास लागतो. प्रत्येक देवतेनुसार पोशाख आणि ही सर्व सजावट बदलते.

देवतेनं म्हणजे देवतेचं रूप धारण केलेल्या कलावंतानं घातलेला सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे पायातील साखळी. ते घातल्यानंतर तो आत्मा किंवा देवता ते ताब्यात घेतं. सर्व रूप धारण करून झाल्यानंतर ही पायातील साखळी किंवा पायल त्या कलावंताच्या हातावर ठेवली जाते. मग तो कलावंत ती पायल त्याच्या पायात बांधतो.

भूता कोलाशी संबंधित मंदिर
फोटो कॅप्शन, भूता कोलाशी संबंधित मंदिर

या लोकांचा असा विश्वास आहे की, एकदा त्या कलावंतानं नृत्याला सुरुवात केली की देव किंवा भूत त्याच्यावर नियंत्रण मिळवतात.

देवतेचं रूप धारण केलेल्या कलावंताच्या दोन्ही बाजूला 2 सहाय्यक असतात. हळूहळू नृत्य अधिक तीव्र होत जातं. नृत्य करताना काही शब्दांचा उच्चार अतिशय मोठ्या आवाजात केला जातो. हे नृत्य काही तास चालतं. ते पूनाकमसारखं असतं.

भाविक देवतेला विविध वस्तू अर्पण करतात. यात काहीवेळा मांस, तर काहीवेळा काजू, नारळाचे तुकडे, केळी, विड्याची पानं, फुलं यांचा समावेश असतो.

जरी देवता काही सेकंदांसाठीच त्यांच्याशी बोलत असली, तरी उर्वरित वेळ त्यांच्या मनात तीच भावना कायम असते.

'आम्ही देवतेच्या नियंत्रणाखाली असतो, आमच्यात अतिरिक्त शक्ती येते'

ही देवता गावकरी आणि गावप्रमुखाशी बोलते. मग प्रत्येक भाविक देवतेला त्यांच्या समस्या आणि वाद याबद्दल सांगतो.

काहीवेळा देवता वादांवर निवाडादेखील करते. हे सर्व संध्याकाळपासून पहाटेपर्यंत चालतं.

दयानंदा म्हणतात, "भूता कोला सादर करताना, आम्ही काय करत आहोत, याबद्दल आम्हाला थोडंसंच आठवतं. त्यावेळेस कोणती तरी शक्ती आमचा ताबा घेते. माझं वजन 60 किलो आहे. मी जवळपास 100 किलो वजनाच्या वस्तू, सजावटीच्या गोष्टी आणि दागिने, अलंकार साधारण 13 तास घातलेले असतात."

"मी त्या स्थितीत काहीही न खाता रात्रीपासून पहाटेपर्यंत तसाच राहतो. ही शक्ती कुठून येते? आम्ही देवता नाही. मात्र त्या क्षणी आम्ही देवतेच्या नियंत्रणाखाली असतो, आमच्यात अतिरिक्त शक्ती संचारलेली असते. ज्याप्रमाणे निसर्गात वारा वाहत असतो (तो दिसत नसला तरी) तसंच. निव्वळ त्या शक्तीमुळे आम्ही लोकांना न्याय देऊ शकतो."

कांतारा

फोटो स्रोत, X/Rishab Shetty

दयानंदा पुढे म्हणाले, "तो संपूर्ण शरीराचा कस पाहणारा अनुभव असतो. त्यानंतर काय होईल हे आम्हाला माहीत नसतं. हे सर्व आम्ही अंगावर प्रचंड वजन घेऊन करतो. आमच्या हातात आग असते. तिथे जे काही होत असतं त्यावर पूर्णपणे आमचं नियंत्रण नसतं."

"देवतेचे दागिने, अलंकार यांचं वजन किलोंमध्ये असतं. अंगावर कित्येक कपडे बांधलेले असतात. चेहऱ्यावर रंग लावलेला असतो. या सर्वांनिशी तयार व्हायला काही तास लागतात. हे सर्व कसं काय शक्य आहे?"

"त्यावेळेस, आम्हाला निसर्गाची शक्ती आणि देवतेची शक्ती दिशा दाखवत असते. आम्हाला मार्गदर्शन करत असते. मग आम्हाला हळूहळू काय घडलं ते आठवतं. हे सर्व जणूकाही एखाद्या लिलेसारखं असतं. भक्ती भीतीबरोबर येते. भीतीशिवाय भक्ती येत नाही. देवतेची भीती ही ज्ञानाची पहिली पायरी असते."

"अर्थात ही भीती म्हणजे एखाद्या शिक्षकाबद्दल, गुरुबद्दल आपल्याला वाटणाऱ्या भीतीसारखी असते. या भीतीचा अर्थ आपल्याला काहीतरी अपाय होईल किंवा आपण उद्ध्वस्त होऊ असा नाही."

कांतारा चित्रपटाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला?

मंगळूर भागातील लोकांचं कांतारा चित्रपटाबद्दल संमिश्र स्वरूपाचं मत आहे. त्यांची प्रादेशिक संस्कृती या चित्रपटाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचली याचा त्यांना खूप आनंद आहे.

मात्र त्याचवेळी, टीव्ही शो आणि इतर मंचांवर देवतेच्या रुपाचा वापर निव्वळ सादरीकरणासाठी, एखाद्या पोशाखाप्रमाणे करण्यात येत असल्याबद्दल ते नाराज, दु:खी आहेत.

जेव्हा भूता कोलाच्या सादरीकरणाच्या वेळी उपस्थित असलेल्या तरुणांना 'कांतारा'बद्दल विचारलं, तेव्हा त्यांचं मतदेखील असंच होतं. ते म्हणाले की, जिथे देवतांचं वास्तव्य नाही अशा मंचांवर याचं सादरीकरण करता कामा नये.

दयानंदा म्हणाले, "मला कांतारा चित्रपटाद्वारे माहीत झालं की, या भागातील जे लोक परदेशात गेले आहेत, त्यांच्या स्वत:च्या पद्धती आहेत. ते आता हे स्वीकारत आहेत. ही सकारात्मक बाब आहे. अर्थात याचं सादरीकरण सार्वजनिक मंचांवर करता कामा नये."

"यक्षगणम, नाटक किंवा चित्रपट याप्रमाणे ही काही कला नाही. हा देवतेच्या पूजनाचा विधी आहे. ते करण्यासाठी काही विशिष्ट पद्धती आहेत. ही काही सादर करायची कला नाही. ती एक प्रत्यक्षात अनुभवायची कला आहे."

ते पुढे म्हणाले, "तरुण याचं सादरीकरण कॉलेजच्या स्टेजवर करत आहेत आणि त्याचे रील्स बनवत आहेत, ही दु:खद बाब आहे. भक्ती आणि आवड यात फरक असतो. तरुणांनी हा फरक लक्षात घेतला पाहिजे. ते जे करत आहेत, ती निव्वळ एक आवड आहे. ती काही भक्ती नाही."

"ऋषी, नदी आणि देवाचं मूळ जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये. त्यांनी यामागची भावना स्वीकारली पाहिजे. याचा अनुभव घेतला पाहिजे. याबद्दल भक्ती असणारे आणि आवड असणारे तरुण वेगळे आहेत. काहीजण फक्त याचे व्हीडिओ बनवण्यासाठी येतात," असंही दयानंदा यांनी म्हटलं.

भूता कोलामधील पारंपारिक भावना, श्रद्धा बाजूला राहून त्याला व्यावसायिक रूप प्राप्त होत असल्याचं दु:ख दयानंद यांनी त्यांच्या म्हणण्यातून मांडलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)