'सखाराम बाईंडर' हे नाटक इतकं वादग्रस्त का ठरलं? बाळासाहेब ठाकरेंना नाटक दाखवण्यावरून आक्षेप का घेण्यात आला?

- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी
- सखाराम बाइंडर- तेंडुलकरांनी नाटकाचा वेगळा फॉर्म बनवला आहे. नाटकात सेक्स प्रभावी
- जीवनदर्शनाचे विलक्षण सामर्थ्य असलेली तेंडुलकरांची नाट्यकृती
- मराठी रंगभूमीवरील गिधाड-झेप- तेंडुलकरांचा सखाराम बाइंडर
- नाट्य परीक्षण मंडळाने बंद केला मराठी रंगभूमीवरील एक धाडसी प्रयोग
- एका क्रूर आणि व्याभिचारी जीवनाची अंगावर शहारे आणणारी कहाणी
- सखाराम बाइंडर- पहिले प्रौढ मराठी नाटक
- सखाराम बाइंडरला तडीपार करणारे हे हुकूमशहा कोण?

एका नाटकाच्या परीक्षणाचे हे मथळे.
नाटकाच्या बाजूने तर काही विरोधातले लेख, सेन्सॉरने सुचवलेले 33 कट्स, त्याविरोधात कोर्टात दिलेला लढा, विधानसभेत गाजलेला मुद्दा, राजकीय पक्षांची झुंडशाही आणि या सगळ्याला पुरून उरलेलं नाटक...सखाराम बाइंडर.
विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं सखाराम बाइंडर हे नाटक 1972 साली पहिल्यांदा रंगभूमीवर आलं. पहिल्या तेरा प्रयोगांनंतरच हे नाटक अश्लील आहे, विवाहसंस्था धोक्यात आणणारं आहे म्हणत त्यावर टीका झाली. त्यातल्या भाषेला, काही दृश्यांना विरोध करत सेन्सॉरने (त्या काळी नाट्य परीक्षण मंडळाला सेन्सॉरच म्हणत) आक्षेप घेतले आणि त्याविरोधात दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी कायदेशीर लढा दिला.
कोर्टकचेऱ्यातून सुटून सखाराम रंगभूमीवर आला, पण त्याला तथाकथित संस्कृती रक्षकांच्या, राजकीय पक्षांच्या दबावाला, झुंडशाहीलाही सामोर जावं लागलं.
या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेलं हे नाटक श्लील-अश्लीलतेच्या वादापलीकडे जात अभिजात ठरलं. नवीन नाटकारांना सखाराम खुणावत राहिला. वेगवेगळ्या भाषेत त्याचे प्रयोग झाले. सखाराम-लक्ष्मी-चंपा या पात्रांच्या नातेसंबंधांचे अर्थ आपापल्या परीने लावत राहिले.

फोटो स्रोत, Instagram/Sayaji Shinde
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे मराठी रंगभूमीवर सखाराम बाइंडर पुन्हा आलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे हे सखाराम बाइंडर साकारत आहेत. नेहा जोशी या लक्ष्मीच्या तर अनुष्का विश्वास या चंपाच्या भूमिकेत आहेत. अभिजीत झुंझारराव यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.
सयाजी शिंदे यांनी यापूर्वीही सखाराम साकारला आहे. अभिनेता संदीप पाठक आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनीही सखाराम बाइंडरचे काही प्रयोग केले होते. प्रायोगिक रंगभूमीवरही या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत.
बाइंडरचा हा वारसा चालत राहिला याचं एक महत्त्वाचं कारण दिग्दर्शक कमलाकर सारंग, विजय तेंडुलकर यांनी दिलेला लढा, अनेक समविचारी कलाकार-साहित्यिक-विचारवंतांनी त्यांना दिलेलं पाठबळ हे आहे. आणि म्हणूनच हा सगळा खटला काय होता? तो एकूणच मराठी रंगभूमीसाठीही का महत्त्वाचा होता? हे समजून घेऊ.
नीती-अनितीच्या कल्पनांना आव्हान देणारा सखाराम
विजय तेंडुलकरांच्या या नाटकात तीन मुख्य पात्रं आहेत- सखाराम, लक्ष्मी आणि चंपा. सखाराम हा समाजाच्या रुढ चौकटीत न बसणारा...शारीरिक संबंधांबद्दलचा त्याचा व्यवहार एकदम आदिम. तो आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या बायकांचा व्यवहार एकदम रोकडा...एकमेकांची शारीरिक गरज भागेपर्यंतचाच. पण त्याच्या आयुष्यात लक्ष्मी आणि नंतर चंपा येतात आणि सगळीच गणितं बदलतात.
देवभोळी, पारंपरिक श्रद्धांना मानणारी लक्ष्मी, तर स्वतःच्या नवऱ्याला सोडलेली, फटकळ, बिनधास्त चंपा. या दोघींच्या आयुष्याच्याही वेगळ्याच कहाण्या.
या पात्रांच्या माध्यमातून तेंडुलकर विवाहसंस्था, स्त्री-पुरुष संबंध, त्यातली हिंसा, पौरुषाच्या कल्पना, स्त्री दुय्यम असल्याची पुरुषी मानसिकता याबद्दल बोलतात. नीती-अनितीच्या समाजमान्य कल्पनांनाच ते आव्हान देतात.
या नाटकाच्या विषयाला, सखारामच्या तोंडी असलेल्या भाषेला, त्यात स्त्री-पुरूष संबंधांबद्दल असलेल्या सूचकतेला, हिंसेला प्रचंड विरोध झाला...त्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली हे पाहूच. पण त्याआधी हे नाटक रंगभूमीवर आलं कसं हेही जाणून घेऊ.

फोटो स्रोत, YOUTUBE
विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं हे नाटक दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना दिलं. सारंग यांचं दिग्दर्शक म्हणून हे पहिलंच नाटक. सखारामची भूमिका तेंडुलकरांनी डॉ. काशिनाथ घाणेकरांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिलेली. पण जसंजसं नाटक पूर्ण झालं तसं ही भूमिका त्यांना शोभणार नाही हे तेंडुलकरांच्या लक्षात आलं. त्यानंतर सारंगांनी भूमिकेसाठी डॉ. श्रीराम लागूंचा विचार केला. मात्र, डॉक्टरांनी नकार दिला. त्यानंतर ही भूमिका त्यावेळी लोकनाट्यातून गाजत असलेल्या निळू फुलेंकडे आली.
"त्या नाटकातच एक ताकद होती," असं निळू फुले यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
"सखाराम हा ब्राह्मण होता, तोंडात शिव्या असल्या तरी त्याची भाषा ब्राह्मणी होती. त्याला व्यसनं होती. बाई आणि पुरूष यांच्यातलं नातं, लैंगिक व्यवहार याबद्दल विचार करण्याची त्याची विशिष्ट पद्धत होती. असा हा सखाराम दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी आपल्याकडून घोटून घेतला," असं निळू फुलेंनी म्हटलं होतं.
या नाटकात लक्ष्मीची भूमिका कुसुम कुलकर्णी करणार होत्या, तर चंपाची लालन सारंग.
नाट्य परीक्षण मंडळाचे आक्षेप
कलाकार आणि बाकी सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या आणि प्रयोगाच्या तारखाही ठरल्या.
पण...
चार महिने नाटक परीक्षणासाठी दिलेलं, नाटकाच्या तारखा ठरलेल्या. पण नाट्य परीक्षण मंडळाकडून नाटकासाठी प्रमाणपत्रच आलं नव्हतं. या सगळ्याबद्दल कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस' या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे.
त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोखले रजेवर होते. त्यांच्याऐवजी वामनराव चोरघडे काम पाहात होते. त्यांनी काही शिव्या, दारुचे संदर्भ आणि दारू पिण्याचे दृश्य, स्टेजवर साडी बदलण्याचे दृश्य याबद्दल काही अटी घालून ठराविक प्रयोगांसाठी परवानगी दिली. ही परवानगी 8 एप्रिलपर्यंतच होती.

फोटो स्रोत, YOUTUBE
10 मार्च 1972 ला सखाराम बाइंडरचा पहिला प्रयोग झाला...त्यानंतर चार-पाच प्रयोग झाले आणि 1 एप्रिलच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आली, 'सखाराम बाइंडर विरुद्ध युवक काँग्रेसची मोहीम.'
हे नाटक अश्लील असल्याने त्याचे प्रयोग रद्द करावेत अशी युवक काँग्रेसने मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नाटकाच्या प्रयोगाला बोलावलं. नाटक पाहिल्यानंतर त्यांचा विरोध मावळला.
एक अडचण टळली असं समजून सखारामचे पुढचे प्रयोग सुरू झाले.
'तुम्हाला कोर्टात जावं लागेल!'
सखारामच्या 8 एप्रिलपर्यंतच्या प्रयोगांनाच मान्यता मिळाली होती. 4 एप्रिलला नाट्य परीक्षण मंडळाची (ज्याला सेन्सॉरच म्हणायचे) बैठक होती. या बैठकीत सखाराम बाइंडरवर बंदी आणावी असं ठरलं...या ठरावाला कुमुद मेहता आणि सरोजिनी वैद्य या दोन सदस्यांनीच विरोध केला.
याबद्दल बाइंडरचे दिवसमध्ये कमलाकर सारंगांनी लिहिलं आहे, 'चार तारखेच्या संध्याकाळी कुमुद मेहतांच्या घरी जमायचं सात वाजण्याच्या सुमारास तिथे पोहोचलो. थोड्या वेळाने तेंडुलकर आले. आठच्या दरम्यान कुमुदबेन आल्या. सोबत सरोजिनी वैद्य. हे दोन सदस्य आमच्या बाजूचे. त्यांना पाहताच आम्ही पुढे सरसावलो. दोघीही समोर बसल्या. काही क्षण शांतता...तुम्हाला कोर्टात जावं लागेल! कुमुदबेननी शांतता भंग केली."

फोटो स्रोत, Granthali Prakashan
कमलाकर सारंग आणि विजय तेंडुलकर यांनी अशोक देसाई यांच्याकडे ही केस सोपवली.
त्यांनी आधी 8 एप्रिलचे प्रयोग निर्वेधपणे पार पडतील यासाठी कोर्टाकडून परवानगी मिळवली. 13 एप्रिलला सरकारने त्यांची बाजू मांडायची होती.
13 एप्रिलच्या सुनावणीत सरकारने म्हटलं की, 29 एप्रिलला नाट्य परीक्षण मंडळाची बैठक होईल, त्यात बंदीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हटलं.
या काळात प्रयोग सुरू ठेवण्यासाठी खाजगी प्रयोगांचा मार्ग अवलंबला...अभिरुची नावाच्या मासिकाच्या वर्गणीदारांसाठी प्रयोग. ही एक कायदेशीर पळवाट होती एवढंच.
सेन्सॉरने सुचवले 33 कट
दरम्यान, 29 एप्रिलला नाट्य परीक्षण मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंडळाने दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याच्या अटीवर नाटकाला परवानगी देऊ असं सांगण्यात आलं.
मात्र, या सगळ्या सूचना पाळून प्रयोग करणं अशक्य असल्याचं कमलाकर सारंग यांच्या लक्षात आलं. त्यांनी एक निवेदन करून मंडळाला आपली बाजू कळवली.
मात्र, 23 मे ला मंडळाकडून पत्र आलं. केवळ एक दृश्यं सोडलं, तर 32 ठिकाणी शब्द आणि दृश्य यांची काटछाट कायम ठेवली होती.
त्यामुळे ही लढाई कोर्टात जाणार हे निश्चित झालं.
कमलाकर सारंग यांनी लिहिलं की, तीस जूनला नानू होरमसजी अँड कंपनीतर्फे आमच्या वतीनं सरकारला नोटीस गेली- संपूर्ण सखाराम मान्य करा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.
विधानसभा- विधानपरिषदेत गाजलं सखाराम
16 जूनला सखाराम बाइंडरवर विधानसभेतही चर्चा झाली.
प्रश्नोत्तराच्या तासाला मृणाल गोरे, दि. बा. पाटील, कृष्णचंद्र भोईटे यांनी बाइंडरबद्दल प्रश्न विचारले.
प्रतिभाताई पाटील या तेव्हा राज्याच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्री होत्या. त्यांनी या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं की, या नाटकात काही ठिकाणी सभ्यतेची मूल्यं पाळली गेलेली नाहीत. विवाह संस्थेचे पावित्र्य झुगारून अनैतिक संबंध हेच नित्याचे असं दाखवलं गेलं आहे. हे सर्व वगळून नाटक दाखवावं असं सुचविण्यात आलं आहे.
यावर एका सदस्याने मग या नाटकात राहिलं काय, असा प्रश्न विचारला होता.

फोटो स्रोत, Getty Images
विधान परिषदेतही बाइंडरवर चर्चा झाली.
या चर्चेत सुरुवातीला प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं की, या नाटकाचे आतापर्य़ंत 13 प्रयोग झाले आहेत. त्यांपैकी पहिल्या दहा प्रयोगांनंतर प्रयोग ओंगळ, सभ्यतेची प्रतिष्ठा न पाळणारा, विवाह संस्थेचे पावित्र्य न मानणारा असल्यामुळे नंतर प्रयोग रद्द करण्यात आले. पण हायकोर्टाच्या आदेशामुळे पुढचे तीन प्रयोग झाले.
यावर प्रा. एन.डी.पाटील यांनी दहा प्रयोग होईपर्यंत तो ओंगळ, अश्लील वगैरे वाटला नाही का, असा प्रश्न उपस्थित केला.
शिवसेना नेते मनोहर जोशी, ग. दि. माडगूळकर, नरूभाऊ लिमये, अप्पासाहेब जाधव या नेत्यांनीही याविषषयी प्रश्न विचारले.
कोर्टात खटला, न्यायाधीशांसाठीचा प्रयोग
याच दरम्यान 4 सप्टेंबरला या नाटकाविषयीचा अंतिम अर्ज हाय कोर्टात दाखल झाला. जस्टिस कनिया यांच्या कोर्टात ही सुनावणी चालणार होती.
कोर्टात युक्तिवाद सुरूच होते. या दरम्यानच एकदा जस्टिस कनियांनी सखाराम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. हा प्रयोग केवळ जस्टिस कनियांसाठी न ठेवता आमंत्रितांसाठीचा केला गेला. सेन्सॉरचे सदस्य, कोर्टातले मराठी-अमराठी वकील अशी यादी वाढत गेली.
प्रयोगाची तारीख ठरली 21 नोव्हेंबर.
मात्र, प्रयोगाच्या आधी शंका व्यक्त करण्यात आली की, नाटक पाहात असताना मंडळाने कापायला सांगितलेला भाग कोणता हे आपल्याला कसं कळणार? स्क्रिप्ट हातात घेऊन प्रयोग पाहू शकत नाही.
त्यावर एक छोटा शून्य पॉवरचा लाल दिवा लावायचा आणि मंडळाने कापायला सांगितलेला भाग आला की, तो लावायचा असं ठरल्याचं कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस'मध्ये म्हटलं आहे.
प्रयोग सुरू झाला...
पाचव्याच पानावरचं वाक्य-
लाल दिवा लागला
सहाव्या पानावर- एक शिवी
लाल दिवा लागला.
सातवं पान- एक ओळीचा संवाद (लाल दिवा लागला)
आठवं पान- एक ओळ (लाल दिवा लागला)
नववं पान- (लाल दिवा लागला)
हे असं सुरू होतं...तेवढ्यात सारंग यांना मागून कोणीतरी हाक मारली. ते जस्टिस कानिया होते.
त्यांनी म्हटलं की, प्लीज स्टॉप दॅट. लेट मी एन्जॉय द प्ले.
प्रयोग संपला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
या प्रयोगानंतर दोन-तीन दिवस सुनावणी चालली.
कोर्टानं 28 डिसेंबरला जाहीर केलं की, 29 डिसेंबरला निकाल वाचला जाईल.
निकाल जाहीर झाला- सखाराम बाइंडरवरची बंदी उठवली गेली.
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा या निकालात मांडला गेला- केवळ नाट्य परीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र नाही, म्हणून सरकारला नाटकाच्या प्रयोगात हस्तक्षेप करता येणार नाही आणि दुसरं म्हणजे या निकालाने नाट्य परीक्षण मंडळाचं अस्तित्व संपुष्टात आणलं.
कमलाकर सारंग यांनी म्हटलं की, दरवर्षी भरणाऱ्या नाट्यसंमेलनात वर्षानुवर्षे सेन्सॉर रद्दचा ठराव पास होत होता, पण सेन्सॉर आपल्या जागेवर घट्ट होतं. त्याच सेन्सॉरला सखारामने आज सुरूंग लावला होता. ते मुळासकट उद्ध्वस्त केलं होतं.
शिवसेनेचा विरोध, बाळासाहेबांनी पाहिला प्रयोग
कोर्टाने बंदी उठवल्यानंतरही या नाटकाचे प्रयोग निर्वेधपणे सुरू झाले नाहीत. अनेक ठिकाणी नाटकाला त्यातल्या आशय-विषयामुळे विरोध होतच होता.
4 मार्च 1973 ला सखारामचा पुण्यातला प्रयोग बंद पाडला गेला. 11 मार्चला मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात प्रयोग होता. या प्रयोगाला शिवसेनेचा मोर्चा आला.
शिवसेना नेते मनोहर जोशी, दत्ता प्रधान आले होते. नाटक अश्लील आहे, त्यात स्त्रियांची विटंबना आहे असं म्हणत नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं.
बाहेर आरडाओरडा सुरू होता. रंगमंचावर स्त्री सैनिकांचं भजन सुरू होतं आणि त्यात बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेही होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसैनिकांनी माइक, टेपरेकॉर्डरची तोडफोडही केली.
जोशी, प्रधान नेत्यांशी चर्चा निष्फळ झाली आणि बाइंडरचा प्रयोग रद्द झाला.
या सर्व प्रकाराबद्दल बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा करण्यातं ठरलं. बाळासाहेबांनी नाटक पाहिलं नव्हतं. त्यांनी या नाटकाचा प्रयोग पाहायचं कबूल केलं.
प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलं- 'सुंदर आहे हे नाटक. का लोकांनी याच्याविरुद्ध एवढा ओरडा केला.'
एकाने सखारामच्या तोंडी असलेल्या शिव्यांचाही उल्लेख केला. त्याबद्दल बाळासाहेबांनी म्हटलं की, त्या असणारच. कारण तो सखाराम आहे. त्याची भाषा तीच असणार!
ठाकरेंना प्रयोग दाखवण्यावर नाराजी
सखाराम बाइंडरचा प्रयोग बाळासाहेब ठाकरेंना दाखवण्यावरून टीकाही झाली.
ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, बाळासाहेब ठाकरेंना प्रयोग दाखवणं हे तेंडुलकरांना पटलं नव्हतं. पण कमलाकर सारंगांवर त्यांचा स्नेह होता आणि सारंगांनी बाइंडरसाठी जो लढा दिला होता, त्यामुळे त्यांच्यावर विश्वासही होता.
डॉ. श्रीराम लागू यांनी तेंडुलकरांना पत्र लिहून म्हटलं की, "बाळ ठाकरेंसाठी स्पेशल प्रयोग? ही सेन्सॉरशिप स्वतःवर लादून घेण्याची प्रवृत्ती कशाकरता? आम्ही नाटक करण्यात खूप पैसा ओतलेला आहे, कष्ट केले आहेत वगैरे वगैरे मी एखाद्या सामान्य नाटकाच्या बाबतीत हा युक्तिवाद हिरीरीने केला असता. पण 'सखाराम'च्या बाबतीत नाही. तिथे एक तात्विक स्टँड घेऊन ठामपणे उभं राहण्याची जरुर होती. कारण हे नाटक एका व्यापक चळवळीचा भाग आहे, असं मी मानत होतो."
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनीही बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, "मला हे कळल्यानंतर मी कमलाकरला फोन केला. त्याला म्हटलं की असा प्रघात पाडू नकोस. एका सेन्सॉर बोर्डविरुद्ध आपण लढतोय. त्यापलीकडे आणखी काहीतरी एक शक्ती उभी करायची. त्या शक्तीकडून तू वरदहस्त मिळवतोयस. तसं करू नकोस."
या सगळ्याबद्दल कमलाकर सारंग यांनी पत्र लिहून डॉ. लागूंना उत्तर दिलं होतं.
कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस'मध्ये लिहिलं आहे- "मी एक कलावंत आहे. माझं नाटक कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ नये हीच माझी इच्छा. हुतात्मा होऊन एखाद्या चौकात खांब होऊन बसण्यापेक्षा जोपर्यंत अंगात त्राण आहे, तोपर्यंत प्रेक्षकांना रिझवणं, विचार करायला लावणं हा माझा धर्म आणि मी तो पाळला होता."
एका नाटकावरची बंदी आणि त्यासाठीचा न्यायालयीन लढा एवढ्यापुरताच बाइंडरचा लढा मर्यादित नव्हता. तो कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समाज म्हणून आपली एखाद्या कलाकृतीकडे पाहण्याची समज, श्लील-अश्लीलतेच्या आपल्या कल्पना यांच्यावरही भाष्य करणारा होता. या लढाईने त्यावेळी बाइंडरच्या प्रयोगांचा मार्ग मोकळा केलाच, पण त्याबरोबरच भविष्यात नवीन कलाकारांना स्वतःचा सखाराम बाइंडर शोधण्याची संधीही दिली.
संदर्भ- बाइंडरचे दिवस- कमलाकर सारंग
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











