संत तुकाराम : 57 आठवडे चाललेल्या आणि सातासमुद्रापार गाजलेल्या या चित्रपटाने तुकोबांची प्रतिमा कशी रुजवली?

फोटो स्रोत, SANT TUKARAM - PRABHAT FILM COMPANY
ज्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीनं नुकतंच बाळसं धरलं होतं, त्या काळात जागतिक पटलावर मोठी कामगिरी करणारा मराठी चित्रपट म्हणजे 'संत तुकाराम'.
प्रभात फिल्म कंपनीच्या 1936 साली आलेल्या या कृष्णधवल 'संत तुकारामा'ने पाचव्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक मिळवलं होतं.
भारतात एकाच चित्रपटगृहात वर्षभराहून अधिक काळ हा चित्रपट सुरू होता, हाही एक वेगळा उच्चांक म्हणावा लागेल.
खरं तर या चित्रपटात रंगवण्यात आलेली तुकोबांची प्रतिमा याबाबत अनेकांचे आक्षेप आहेत.
पण, एकंदरीत काळाच्या मर्यादा पाहता तंत्रज्ञानाच्या दृष्टीने काळाच्या पुढे असलेला चित्रपट, असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल.
या चित्रपटाचा इतका प्रभाव का पडला? त्याची आजही चर्चा का होते, या चित्रपटाने रुजवलेल्या 'तुकाराम प्रतिमे'मुळे नक्की काय घडलं तसेच या चित्रपटाच्या निर्मितीबाबतचे किस्से आणि त्याची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
चित्रपटाच्या निर्मितीमागची गोष्ट
या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं ते दामले-फत्तेलाल यांनी.
दिग्दर्शक म्हणून या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट होता. त्याआधी त्यांनी प्रभातमध्ये व्ही. शांताराम यांच्यासाठी छायालेखन, कलादिग्दर्शन, ध्वनीलेखन अशीच कामे केली होती.
तेव्हा नुकतंच चित्रपटांनी मूकपटांची कात टाकून बोलपटांची वाट धरली होती. प्रभातचा 'रजपूतरमणी' हा बोलपट फ्लॉप झाल्याने दामले आणि फत्तेलाल दोघेही 'संत तुकाराम' या बोलपटाचं शिवधनुष्य उचलायला तयार नव्हते.

फोटो स्रोत, ftii.ac.in
पण व्ही. शांताराम यांच्या आग्रहानंतर त्यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते पेललं सुद्धा!
खरं तर 1936 च्या 'संत तुकाराम' चित्रपट हा तुकोबांवरचा पहिला चित्रपट आहे, असं अनेकांना वाटतं.
मात्र, तसं नाही. त्याआधीही तुकोबांवर तीन चित्रपट येऊन गेले होते. ते फारसे चालले नव्हते. त्यातला एक मूकपट होता, तर दुसरा बोलपट होता. तिसरा, एका नाटकाचंच पडद्यावरचं चित्रण म्हणावं, असा होता.
प्रभातच्या 'संत तुकाराम'ने मात्र अशी तुफान कामगिरी बजावली की आज 89 वर्षांनंतरही हा चित्रपट लोकांच्या लक्षात राहिलेला आहे. त्याची कारणंही तशीच आहेत.

फोटो स्रोत, Sant Tukaram
त्या काळात हा सिनेमा मुंबईतील सेंट्रल सिनेमा थिएटरमध्ये सलग 57 आठवडे सुरू होता. या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिलाच मराठी सिनेमा होता.
याशिवाय, व्हेनिस या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील तीन सर्वश्रेष्ठ चित्रपटांपैकी एक म्हणून या चित्रपटाची निवड झाली होती.
हा चित्रपट इतका लोकप्रिय का ठरला, याबाबत लेखक दि. पु. चित्रे यांनी आपल्या 'तुकोबांचे वैकुंठगमन' या पुस्तकात लिहिलंय की, "त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक शैलीमुळे आणि माध्यमांच्या कलात्मक, कौशल्यपूर्ण हाताळणीमुळे हा चित्रपट तेव्हा जगभर गाजला आणि आजही तो चित्रपटरसिक कौतुकाने पाहतात.
पागनीसांनी रंगवलेले तुकोबा नव्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या माध्यमाच्या प्रभावामुळे जनमानसावर इतके ठसले की, 'संत तुकाराम'मधले तुकोबा हेच सर्वांना प्रमाण तुकोबा वाटू लागले."
तुकाराम भूमिकेतून बाहेर न आलेले विष्णुपंत पागनीस
या चित्रपटात संत तुकारामाची भूमिका विष्णुपंत पागनीस यांनी केली होती. खरं तर ते स्त्री-पार्टी नट म्हणून ख्यात होते. तर, वास्तविक जीवनात ते एक सराफ होते.
त्यांना ही भूमिका देण्याबाबत व्ही. शांताराम यांनी आपल्या 'शांतारामा' या आत्मचरित्रात लिहिलंय की, "त्यांची भजनं गाण्याची पद्धत फार रसाळ आहे, असं मला कोणीतरी सांगितलं. मी विष्णुपंतांना पुण्याला बोलावून घेतलं.
हा माणूस भजनं गाताना अगदी तल्लीन होत असे. त्यांच्या भजनात भावनेचा ओलावा होता. मला विष्णुपंत पागनीस हे तुकारामाच्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत असं वाटलं. याउलट पागनीसांची नाटकातील स्त्री-भूमिका दामले-फत्तेलाल यांनी पाहिलेली असल्यामुळे, तुकाराम या पुरुषपात्राचं काम त्यांच्याकडून चांगल्या रीतीने वठवून घेणं अवघड आहे, असं त्या दोघांचं म्हणणं पडलं.
दामले व फत्तेलाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असल्यामुळे, त्या दोघांच्या कलाने घ्यावं या विचाराने आणखी दोनचार माणसांची चाचणी घेतली. परंतु त्यांपैकी एकही माणूस माझ्या नजरेत भरला नाही. शेवटी, विष्णुपंत पागनीसच तुकारामाच्या भूमिकेसाठी योग्य आहेत, असा आग्रह मी धरला."
त्यांच्या निवडीला सुरुवातील विरोध दर्शवण्यात आला असला तरी नंतर त्यांना लोकांनी तुकोबांच्या भूमिकेत इतकं स्वीकारलं की, आज जिथं जिथं तुकोबांचे फोटो, चित्रे, मूर्ती दिसून येतात, तिथे पागनीसांनी रंगवलेल्या तुकारामाचाच प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
खरं तर, संत तुकाराम वास्तविक जीवनात कसे दिसत होते, याचं अस्सल छायाचित्र कुठेही उपलब्ध नाही.

फोटो स्रोत, Sant Tukaram
मात्र, आता डोक्यावर पागोटं, अंगात बाराबंदी, अंगापिंडांने मजबूत, गोलसर फुगीर चेहरा आणि ओठावर रेळणाऱ्या झुपकेदार मिशा ही जणू तुकोबांची ओळखच बनली आहे.
खरं तर तुकोबा असेच दिसत असतील, असं काही सांगता येत नाही. मात्र, विष्णुपंत पागनीसांच्या या भूमिकेमुळे तुकोबांची जनमानसातील प्रतिमा अशीच ठासली गेली, हे वेगळं सांगायला नको.
यासंदर्भात दि. पु. चित्रे म्हणतात की, "पोस्टरा-कॅलेंडरापासून ते थेट मंदिरांमध्ये उभ्या केलेल्या तुकोबांच्या आधुनिक मूर्तींमध्ये जे आपल्याला दिसतात, ते वस्तुत: तुकोबांच्या भूमिकेतले विष्णुपंत पागनीसच असतात, हे बरेचदा आपल्या लक्षातही येत नाही."
संत साहित्याचे अभ्यासक आणि तुकोबांचे वंशज सदानंद मोरे यांनी आपल्या 'तुकाराम दर्शन' या पुस्तकात म्हटलंय की, "पागनीस यांच्या भूमिकेचा परिणाम आमच्या चित्रकारांवरही झाला असल्यास नवल नाही.
अनेक चित्रांमधून तुकोबा ढिम्म वाटावे, एवढे शांत दिसतात. मार्दव आणि काठिण्य यांचा समतोल असलेला तुकोबांचा चेहरा कोठेच दिसत नाही."
पागनीस स्वत: गायक असल्याने या संतपटातील गाणीही त्यांनीच गायली होती. 'संत तुकाराम' चित्रपटातील तुकोबांच्या काही अभंगांना त्यांनीही चाली लावल्या होत्या.
संत तुकाराम चित्रपटाचे गीतकार शांताराम आठवले यांनी 'प्रभातकाल' या आपल्या पुस्तकात पागनीसांबाबत लिहिलंय की, "पागनीसांची भूमिका चित्रण चालू असता आम्हांला अनेक ठिकाणी सदोष वाटत होती.
पण त्यांचा अभिनय व त्यांचे अभंग यांनी प्रेक्षकांना एवढे वेड लावले की, मुंबईस त्यांच्या पागनीस-पेटकर मंडळीच्या दुकानी 'तुकाराम' म्हणून त्यांच्या पाया पडण्यासाठी रीघ लागू लागली."
या चित्रपटात तुकोबांच्या आवलीची भूमिका तानीबाई डवरी अर्थात गौरी या अभिनेत्रीने केली होती.

फोटो स्रोत, Sant Tukaram
या चित्रपटाचे छायालेखक व्ही. अवधूत होते तर ध्वनीलेखक शंकरराव दामले होते. कला दिग्दर्शन एस फत्तेलाल यांनी केलं होतं.
1936 च्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रसिद्ध झाला तेव्हा सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
हा चित्रपट जवळपास फ्लॉप ठरवण्यात आला होता.
मात्र, प्रेक्षकांचं या चित्रपटाकडे लक्ष वळवण्यासाठी एका जाहिरातीने कमालीची भूमिका वठवली होती, असं स्वत: 'प्रभात'चे संस्थापक व्ही शांताराम यांनी आपल्या 'शांतारामा' या आत्मचरित्रात लिहिलंय.
'संत तुकोब्बारायांचा झाडाखालचा लव्हसीन' अशी जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात आली आणि थिएटर्समध्ये एकच झुंबड उडाली होती.
अशा तऱ्हेची जाहिरात देण्यामध्ये मोठा धोका आहे, असं 'ज्ञानप्रकाश'चे व्यवस्थापक असलेल्या दातारांनी म्हटल्यावर "तो धोका पत्करण्याची माझी तयारी आहे." असं उत्तर आपण दिलं होतं, असं व्ही. शांताराम त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात.
त्यानंतर गाजलेल्या या चित्रपटानंतर पागनीस इतके प्रसिद्धीस आले की, त्यानंतर ते या भूमिकेतून बाहेरच येऊ शकले नाहीत, असं सांगितलं जातं.
या चित्रपटात नक्की काय आहे?
या चित्रपटाची कथा शिवराम वाशीकरांनी लिहिली आहे.
व्ही. शांताराम आपल्या आत्मचरित्रात लिहितात की, "त्यांनी इतर संत चित्रपटांप्रमाणेच चमत्कारांवर जास्तच भर दिला होता. संत चित्रपटांचा तो एक साचाच ठरून गेला होता. अशा तऱ्हेच्या चमत्कृतिजन्य संत चित्रपटांना लोक कंटाळले होते. मी वाशीकरांना, ती कथा बाजूला ठेवून, तुकारामाच्या जीवनावर आधारलेली, त्यांच्यातला माणूस प्रकर्षाने जाणवेल अशी कथा लिहिण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं."
मात्र, या चित्रपटात दिसणारे तुकाराम हे थेट संतपदाला पोहोचलेले तुकाराम दिसतात. त्यांचं बालपण वा त्यांच्या पूर्वायुष्याचं चित्रण यात दिसत नाही किंवा ज्याला 'द मेकींग ऑफ तुकोबा' म्हणता येईल, असं चित्रण आपल्याला या चित्रपटात दिसत नाही.
मात्र, तुकोबांच्या विरोधात कुरघोड्या करणारा आणि त्यांच्या कविता स्वत:च्या नावे खपवणारा 'सालोमालो' हे एक विनोदी तरीही खलनायकी पात्र दिसून येतं.
या सालोमालोची भूमिका काका भागवत यांनी केली होती. बोलपटातील ही भूमिका मिळण्यापूर्वी त्यांनी रंगभूमिवरील 'शारदा' नाटकात शारदेची भूमिका केली होती.
सालोमालो भूमिकेमुळे तेही गाजले. या चित्रपटानंतर ते 'सालोमालो भागवत' म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
गायत्री चॅटर्जी या चित्रपट अभ्यासक असून त्या पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये दिग्दर्शन विभागात प्राध्यापक राहिलेल्या आहेत.

फोटो स्रोत, किरण शांताराम
त्यांचं 'संत तुकाराम' या चित्रपटावरचं एक पुस्तक प्रकाशनाधीन आहे. आम्ही या चित्रपटासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "एक चित्रपट म्हणून या चित्रपटाची सिनोमॅटोग्राफी ही काळाच्या पुढची होती."
"संत तुकाराम चित्रपटाची सुरुवातच विठ्ठल, रखुमाई आणि तुकाराम यांच्या स्थिर प्रतिमांनी होते. जरी त्या स्थिर असल्या तरी, सुरु असलेला अभंग प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. ही शैली सिनेमाला भक्ती परंपरांशी थेट जोडण्यास मदत करते.
ती देव, संत आणि प्रेक्षक यांना एका त्रिकोणात आणून ठेवते. त्यामुळे, चित्रपटाची सुरुवात शांत, ध्यानस्थ आणि आध्यात्मिक पद्धतीने होताना दिसते," असं त्या सांगतात.
महाराष्ट्रातील भक्ती परंपरेवर आलेला 'संत तुकाराम' हा काही एकमेव चित्रपट नव्हता.
संत एकनाथ यांच्या जीवनावरचा 1935 साली आलेला 'धर्मात्मा', 1940 सालचा 'संत ज्ञानेश्वर', चोखोबांवरचा 1950 सालचा 'ही वाट पंढरीची' असे काही सिनेमे त्या काळात आलेले आहेत.
विशेष म्हणजे, 'ही वाट पंढरीची' हा सिनेमा सोडला तर उर्वरित दोन हे 'प्रभात'चेच चित्रपट होते. तरीही यामध्ये 'संत तुकाराम' हाच चित्रपट अधिक गाजलेला दिसून येतो.
यासंदर्भात आम्ही सिने अभ्यासक गायत्री चॅटर्जी यांच्याशी चर्चा केली.

फोटो स्रोत, Sant Tukaram
त्या म्हणतात की, "इतर भक्ती चित्रपटांनी लोकांना अशा प्रकारे भावनिकरीत्या स्पर्श केलेला दिसत नाही. या चित्रपटाच्या आधीही 1932 मध्ये आलेला तुकोबांवरचा एक चित्रपट अयशस्वी ठरला होता. तो एका प्रसिद्ध नाटकाचं चित्रण होता.
काही लोक म्हणतात की, संत तुकाराम हा चित्रपट त्यातील भक्ती किंवा त्याच्या साध्या शैलीमुळे इतका गाजला असावा. पण हे स्पष्टीकरण पुरेसं नाही. हा सिनेमा भक्ती परंपरा आणि सिनेमा या तंत्राला एका प्रभावशाली पद्धतीने एकमेकांत मिसळून टाकतो, म्हणून हा चित्रपट खास आहे."
'तुकाराम दर्शन' या पुस्तकात सदानंद मोरे यांनी या चित्रपटावर भाष्य करताना म्हटलंय की, " 'प्रभात'चा 'संत तुकाराम' हा चित्रपट अतिशय चांगला आहे, यात वाद होण्याचे कारण नाही. प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद हाच याचा पुरावा आहे.
मात्र, या चित्रपटाची सुरुवातच मूळी तुकोबा संत पदवीला पोहोचल्यापासून झालेली आहे. तुकोबा कसे घडत गेले हे पूर्वार्धातील दर्शन त्यात होत नाही."

फोटो स्रोत, Shabdalaya Publications, Shrirampur
व्ही. शांताराम यांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांना तुकारामातला माणूस अधोरेखित करणारी कथा अपेक्षित होती, असं लिहिलेलं असलं तरीही या चित्रपटामध्ये संत तुकोबांबद्दल प्रचलित असणाऱ्या अनेक चमत्कार कथांचं चित्रण दिसून येतं.
खासकरुन, चित्रपटाचा शेवट तुकोबा गरुडविमानात बसून वैकुंठगमनाला जातात, या दृश्यांनी होतो.
सुप्रसिद्ध लेखक दि. पु. चित्रे आपल्या 'तुकोबांचे वैकुंठगमन' या पुस्तकात म्हणतात की, "वह्या बुडवण्याचा आणि तरण्याचा नाट्यपूर्ण प्रसंग आणि वैकुंठगमनाचा देखावा उभारुन घवडलेला फिल्मी चमत्कार हाच 'संत तुकाराम' चित्रपटाचा गाभा होता.
शिवाय, त्यात तुकोबांचे कीर्तन ऐकावयास आलेल्या तरुण शिवाजीची धरपकड करावयाला आलेल्या मुसलमानी सैन्याचा मसालेदार प्रसंग आणि तुकोबांच्या खातर पांडुरंगाने आणखी एक चमत्कार घडवून प्रत्येक श्रोत्याला शिवाजीचे रुप देऊन धरपकड करणाऱ्याला गोंधळून टाकणे, हा मसालेदार प्रकारही या चित्रपटाचा तितकाच लोकप्रिय भाग होता."
वैकुंठगमन, चमत्कार आणि प्रतिमेबाबतचे आक्षेप
या चित्रपटातून उभी राहिलेली तुकोबांची प्रतिमा जनमानसावर कशी रुजली, ते आपण पाहिलं. मात्र, फक्त प्रतिमाच नव्हे तर तुकोबांचं 'असणं'ही या चित्रपटानं बरंचसं जनमानसावर ठसवलं, असं दिसून येतं.
भोळेभाबडे, टाळकुटे अशी ती तुकोबांची प्रतिमा आहे. ते 'असणं' कसं होतं, याचं दि. पु. चित्रे यांनी यथार्थ वर्णन केलेलं आहे.
ते म्हणतात की, "पागनीसांनी चित्रपटांत रंगवलेले तुकोबा कायमच आपल्या भक्तीच्या तंद्रीत असणारे, हळुवार आणि एकसुरी आवाजात सतत पांडुरंगाचे कळवळून नाव घेणारे, अत्यंत अव्यवहारी आणि वास्तवात वावरण्याची सवयच नसलेले एक व्यक्तिमत्त्व वाटतात.
लेखक-दिग्दर्शकांनी आणि अभिनेता पागनीसांनी तुकोबांना फार सोपे, बाळबोध, जवळपास बावळट ध्यानाच्या पातळीवरले पात्र बनवले आहे."
वास्तविक पाहता, तुकोबांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या अभंगांची रांगडी, आक्रमक आणि संघर्षाची भाषा पाहता त्यांचं असं 'बावळट ध्यानाच्या पातळीवरचं पात्र' त्यांच्या मूळ प्रतिमेशी अर्थातच विपर्यस्त वाटतं.
त्या तुलनेत 2012 साली आलेला 'तुकाराम' हा चित्रपट तुकोबांच्या अस्सल प्रतिमेला अधिक न्याय देणारा वाटतो.

फोटो स्रोत, सकाळ प्रकाशन
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि जितेंद्र जोशी यांची भूमिका असलेला हा तुकाराम अधिक बंडखोर वाटतो.
शिवाय, या चित्रपटाचं नावही फक्त 'तुकाराम' इतकंच आहे. त्याबरहुकूम या चित्रपटातील तुकारामाचं चित्रणही माणूसपणाच्या अधिक जवळचं दिसून येतं.
या नव्या चित्रपटाची जुन्या चित्रपटाशी तुलना करताना रिंगण या संतसाहित्यावरील वार्षिकाचे संपादक सचिन परब म्हणतात की, "वास्तविकत: या चित्रपटाचे लेखक अजित दळवी आणि प्रदीप दळवी यांच्या लिखाणाची ती कमाल आहे. 1936 सालच्या 'संत तुकाराम'मधे एक संत मांडायचा प्रयत्न आहे, तर 2012 सालच्या चित्रपटामध्ये फक्त 'तुकाराम' आहे.
पण खऱ्याला खरं म्हणायला न घाबरणारा तरुण. तुमच्या-आमच्यातलाच एकजण. पण आपल्या अनुभवांना जागण्याचा प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता असणारा. इथे त्यानं जगद्गुरू आणि संतश्रेष्ठ असण्याचं ओझं डोक्यावर घेतलेलं नाही. त्यामुळे इथे एकही चमत्कार सापडत नाही."

फोटो स्रोत, CHANDRAKANT KULKARNI
पण ते जुन्या चित्रपटाविषयी म्हणतात की, "प्रभातच्या चित्रपटावर काळाचा प्रभाव होता. अशी प्रतिमा दाखवण्यामागे दुष्ट हेतू असतील, असं मला वाटत नाही. पण, जे राजवाडे यांनी जे 'टाळकुटे' तुकोबा उभे केले होते, त्या प्रतिमेचा प्रभाव या चित्रपटावर होता. कारण, त्यांच्यासमोर उपलब्ध असलेले तुकोबा तेच होते. त्या प्रतिमेला नव्या तुकाराम (2012) चित्रपटाने बऱ्यापैकी छेद दिला."
या चित्रपटातून ठसणाऱ्या तुकोबांच्या प्रतिमेबद्दल सदानंद मोरे आपल्या 'तुकाराम दर्शन' या पुस्तकात म्हणतात की, "या भूमिकेतून तुकोबांच्या पूर्ण व्यक्तित्वाचे दर्शन होते, असे म्हणता येत नाही. तुकोबांची करुणा, वत्सलता, क्षमाशीलता, सोशिकता हे गुण त्यातून प्रकट होतात. पण तुकोबांची चीड, अस्वस्थता, संताप, तडफ व करारीपणा त्यात येत नाहीत आणि त्याशिवाय तर तुकोबांची भूमिका पूर्ण होऊ शकत नाही."
तर दुसऱ्या बाजूला दि. पु. चित्रे म्हणतात की, "वस्तुत: या चमत्कार दृश्यांनी आणि पागनीसांनी निर्माण केलेल्या ढोबळ पात्रामुळे तुकोबांची महत्ता दृगोच्चर होण्याऐवजी झाकोळून जाते. तुकोबांच्या कवितांची आणि संतत्वाची महत्ता कोणत्याही चमत्कारावर अवलंबून नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











