प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा बिहार निवडणुकीत पराभव का झाला? वाचा

    • Author, संजय कुमार
    • Role, प्राध्यापक आणि निवडणूक विश्लेषक
    • Author, विभा अत्री
    • Role, सार्वजनिक धोरणातील संशोधक

2025 ची बिहार विधानसभा निवडणूक ही प्रशांत किशोर आणि त्यांच्या जन सुराज पक्षासाठी पहिली मोठी निवडणूक परीक्षा होती.

निवडणुकीआधी पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं की 'त्यांचा पक्ष एकतर शिखरावर जाईल नाही तर तळ गाठेल'. आणि त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांनी भाकित केल्याप्रमाणेच हा निकाल लागला.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या प्रतिमेवर आधारित आक्रमक आणि व्यापक प्रचार करूनही, जन सुराज पक्ष सुरुवातीच्या उत्साहाचं मतांमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरला.

243 पैकी 238 जागा लढवून पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

एका सर्वेक्षणाचे निकाल हे समजून घेण्यास मदत करू शकतो की पक्ष मतदारांशी कितपत जोडला गेला तसेच निवडणुकीत तो यश का मिळवू शकला नाही.

मर्यादित प्रभाव

निवडणुकीच्या रिंगणात जन सुराज दिसलाच नाही असं अजिबात नव्हतं, म्हणूनच हा निकाल आश्चर्यकारक आहे.

प्रशांत किशोर यांच्या पदयात्रेमुळे राज्यभरात पक्षाची उपस्थिती जाणवली होती आणि मतदारांशी संपर्क साधण्यासाठी पक्षानं विविध पद्धती अवलंबल्या होत्या.

दहापैकी चार मतदारांनी (39 टक्के) फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियाद्वारे पक्षाकडून किमान एक राजकीय संदेश त्यांना मिळाला असल्याचं सांगितलं, सर्वाधिक संदेश पाठवणाऱ्या पक्षात भाजप अग्रेसर आहे.

त्याचप्रमाणे, 43 टक्के लोकांनी सांगितले की त्यांच्याशी घरी येऊन संपर्क साधण्यात आला. मतदारांशी अशा पद्धतीनं संपर्क साधण्याच्या बाबतीत जन सुराज तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला.

या प्रकारच्या कामगिरीमुळे जन सुराज पक्ष बिहारमधील अनेक प्रस्थापित पक्षांच्या बरोबरीला आलेला. परंतु, तरीही त्याला मिळालेला पाठिंबा हा मर्यादितच राहिला.

फक्त 18 टक्के मतदारांनी सांगितलं की पक्षाच्या पहिल्या 100 दिवसांत दिलेल्या आश्वासनांचा त्यांच्या मतांवर 'खूप' परिणाम झाला, तर 23 टक्के लोकांनी सांगितलं की ते 'काही प्रमाणात' प्रभावित झाले.

त्याच वेळी, बहुतेक लोकांना असं वाटलं की त्या आश्वासनांना काही अर्थ नाही किंवा त्यांना त्याबद्दल माहितीच नव्हती.

प्रशांत किशोर यांनी त्यांची प्रचार मोहीम विकासकेंद्रित ठेवली आणि जनसंपर्क वाढवला. तरीही, जन सुराज पक्ष लोकांची मतं मिळवू शकला नाही.

पक्षाला व्यापक सामाजिक किंवा ओळख-आधारित पाठिंबा मिळवण्यात अपयश आलं, आणि याचा बिहारमधील निवडणूक निकालांवर अनेकदा परिणाम होतो.

पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाभोवती संदिग्धता

जन सुराजपुढं आणखी एक आव्हान होतं आणि ते म्हणजे त्याची ओळख आणि उद्देश याबद्दल लोकांमध्ये अनिश्चितता होती.

हा पक्ष एक विश्वासार्ह नवीन पर्याय आहे की फक्त दुसरी राजकीय संघटना असं विचारलं असता, यावर मतदारांमध्ये मतभेद होते.

47 टक्के लोकांनी याकडे एक खरा पर्याय म्हणून पाहिलं, 30 टक्के लोकांनी याला नकार दिला, तर 23 टक्के लोकांनी याबाबतीत त्याचं कोणतंही मत दिलं नाही.

तरुण मतदार पक्षाला अधिक पाठिंबा देत होते, 18-25 वयोगटातील 55 टक्के मतदार पक्षाला एक विश्वासार्ह पर्याय मानत होते, परंतु इतर मतदारांमध्ये हा विश्वास दिसून आला नाही.

44 टक्के मतदारांना असं वाटलं होतं की ते बिहारमध्ये अर्थपूर्ण बदल घडवून आणू शकतात, तर 36 टक्के लोकांना असं वाटलं की त्यांच्याकडं तसं करण्यासाठी राजकीय अनुभव नाही.

तरुण मतदारांमध्ये (वय 18-25), 59 टक्के लोकांनी त्यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला, तर 56 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मतदारांमध्ये हे प्रमाण फक्त 40 टक्के होतं.

शिवाय, 243 मतदारसंघांपैकी 238 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभं करण्याचा पक्षाचा महत्त्वाकांक्षी निर्णयही त्यांच्या बाजूनं यशस्वी ठरू शकला नाही.

एकाच वेळी अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवल्यानं मतदारांना त्यांच्या उमेदवारांना जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळे वैयक्तिक संबंध मर्यादित राहिले, आणि याच अनेकदा मतदारांच्या पाठिंब्यावर परिणाम होतो.

बदलाची मागणी, पण विखुरलेला पाठिंबा

राजकीय वातावरणाचाही जन सुराजवर परिणाम झाला. जेव्हा मतदारांना विचारण्यात आलं की बिहारला नवीन राजकीय पर्यायाची आवश्यकता आहे का किंवा विद्यमान आघाड्या पुरेशा आहेत का, तेव्हा मतदारांमध्ये मतभेद होते.

42 टक्के लोकांनी नवीन पर्यायाला पाठिंबा दिला, तर तितक्याच टक्के लोकांनी सांगितलं की ते विद्यमान आघाड्यांसोबत जातील.

नवीन पर्याय हवा असलेल्यांकडूनही जन सुराजला निर्णायक पाठिंबा मिळाला नाही. या गटाकडून पक्षाला सुमारे सहा टक्के मतं मिळाली, जी बदलाला अनुकूल नसलेल्यांपेक्षा एक टक्का जास्त होती.

परंतु तरीही एका महत्त्वपूर्ण गटानं दोन प्रमुख आघाड्यांपैकी एका पक्षाला मतदान केले.

बदलाची इच्छा नवीन पक्षाच्या समर्थनात रूपांतरित झाली नाही. परिणामी, पक्षाचा पाठिंबा मुख्यत्वे मतांमध्ये नाही तर इच्छांमध्येच राहिला.

तरुण मतदारांनी जन सुराजला पसंती दिली, परंतु एकूण निकालात लक्षणीय बदल करण्यासाठी तेवढं पुरेसं नव्हतं. तरुण मतदारांमध्ये पक्षाला मतदान करण्याचा वाटा वृद्ध मतदारांपेक्षा थोडा जास्त होता.

जन सुराजच्या पदार्पणानं एक स्पष्ट पॅटर्न दिसून येतो. पक्षानं उत्सुकता निर्माण केली, तरुणांचं लक्ष वेधून घेतलं आणि बिहारच्या राजकारणात स्वतःला एक नवीन खेळाडू म्हणून सादर केलं.

तरीही, मतदारांच्या एका महत्त्वपूर्ण गटाला प्रशासनासाठी आपला पक्ष एक विश्वासार्ह पर्याय आहे हे पटवून देण्यात तो अपयशी ठरला.

एका अशा राज्यात जिथं पारंपारिक निष्ठा, जाती-आधारित युती आणि केडर-आधारित कार्यपद्धती महत्त्वाची भूमिका बजावते, तिथं इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवार उभं केल्यानं मतदारांना उमेदवारांना जाणून घेण्याची संधी मिळाली नाही आणि पक्षाला आपली उपस्थिती दाखवूनही निवडणुकीत विजय मिळवता आला नाही.

(या लेखात व्यक्त केलेले विचार लेखकांचे वैयक्तिक विचार आहेत. त्यांचा कोणत्याही संस्थेच्या विचारांशी कोणताही संबंध नाही.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.