काहींकडून ट्रेडिंगपासून दूर राहण्याची शपथ, तर काहीजण तणावात; बाजारातील घसरणीचा नेमका परिणाम काय?

    • Author, सौतिक बिस्वास आणि निखिल इनामदार
    • Role, बीबीसी न्यूज

साधारण दोन वर्षांपूर्वी बँक सल्लागाराच्या सूचनेवरुन राजेश कुमार यांनी बँकेतील आपली सर्व बचत, मुदत ठेवी काढून घेतल्या. ती सर्व रक्कम त्यांनी म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स आणि बाँड्समध्ये गुंतवली.

मूळचे बिहारचे आणि व्यवसायानं इंजिनिअर असलेल्या राजेश कुमार यांनी भारतीय शेअर बाजारमध्ये सुरू असलेल्या तेजीचा फायदा घेण्याचं ठरवलं. लाखो गुंतवणूकदारांप्रमाणं त्यांनीही आपल्या बचतीचे पैसे ट्रेडिंग कंपन्यांमध्ये गुंतवले.

सहा वर्षांपूर्वी, प्रत्येक 14 भारतीय कुटुंबांपैकी केवळ एक कुटुंब आपली बचत स्टॉक मार्केटमध्ये गुंतवत असत. आता हेच प्रमाण 5 कुटुंबात एक झालं आहे.

पण परिस्थिती बदलली. आधी असलेल्या भरतीला ओहोटी लागली.

मागील सहा महिन्यांपासून भारतीय बाजारात घसरण सुरू झाली आहे. कारण परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत.

मूल्यांकन उच्च आणि नफा कमी झाला आहे. त्यातच जागतिक भांडवल चीनकडे वळले आहे. त्यामुळं सप्टेंबरच्या उच्चांकानंतर गुंतवणूकदारांचे $900 बिलियन बुडाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनेच्या घोषणेमुळं आणखी एक अडथळा निर्माण झाला.

शेअर बाजाराच्या घसरणीला हे एक मोठं निमित्त ठरलं आहे. याबाबत अधिक तपशील समोर आल्यानं त्याचा परिणाम अधिक गंभीर झाला आहे.

'सगळी बचत शेअर मार्केटमध्ये आता मुलाच्या फी ची चिंता'

भारताचा प्रमुख निफ्टी 50 शेअर निर्देशांक (Share Index), जो देशातील टॉप 50 सार्वजनिक कंपन्यांचा मागोवा घेतो. सध्या निफ्टी मागील 29 वर्षांत आपल्या सर्वात दीर्घकालीन तोट्यात आहे.

मागील पाच महिने सलग घसरण सुरू आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शेअर मार्केटपैकी एक असलेल्या बाजारातील ही एक लक्षणीय घसरण आहे. स्टॉक ब्रोकर्सनी तर त्यांचं काम एक तृतीयांशनं कमी झाल्याचं म्हटलं आहे.

"सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. माझी गुंतवणूक अजूनही रेडमध्ये म्हणजेच नुकसानीत आहे. शेअर बाजारातील गेल्या दहा वर्षांतील हा सर्वात वाईट अनुभव आहे," असं कुमार म्हणतात.

55 वर्षीय कुमार यांच्या बँकेत आता कमी पैसे आहेत. कारण त्यांनी आपली बहुतेक सर्व बचत ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रान्सफर केली आहे. त्यांचा मुलगा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याचे 1.8 दशलक्ष रुपये (20,650 डॉलर; 16,150 पाउंड) इतके शुल्क जुलैमध्ये भरावे लागणार आहेत.

आता त्यांना तोट्यात गुंतवणूक विकण्याची चिंता आहे. "एकदा का शेअर मार्केट सावरलं की, मी काही पैसे बँकेत ट्रान्सफर करण्याचा विचार करत आहे," असं ते म्हणाले.

ज्या भारतीयांनी लहान-मोठ्या शहरांमधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, अशा लाखो मध्यमवर्गीय भारतीयांच्या चिंता राजेश कुमार यांच्या चिंतेत दिसून येते. हा आर्थिक क्रांतीचा एक भागच आहे.

गुंतवणुकीचा आणखी एक मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs), ज्यात फंड दर महिन्याला ठराविक योगदान गोळा करतात. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या 100 मिलियन्सच्या पुढे गेली आहे, जी पाच वर्षांपूर्वीच्या 34 मिलियन्सच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे.

यात अनेक जण प्रथमच गुंतवणूक करणारे, उच्च परताव्याच्या आश्वासनामुळे, मर्यादित जोखीम जागरुकतेसह प्रवेश करतात. अनेक जण इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरील सोशल मीडिया "इनफ्लुएंसर्स" च्या लाटेमुळं प्रभावित होतात. त्यात पुन्हा तज्ज्ञ आणि हौशी लोकांचा समावेश आहे.

सगळा रिटायरमेंट फंड शेअर मार्केटमध्ये आणि आता...

निवृत्त मार्केटिंग मॅनेजर तरुण सरकार यांना भेटा. आपल्याला त्यांच्यात भारतातील नवीन गुंतवणूकदाराची झलक पाहायला मिळेल.

जेव्हा त्यांची सरकारी करमुक्त गुंतवणूक असलेली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची रक्कम मॅच्युअर झाली. तेव्हा त्यांनी आपलं रिटायरमेंट नंतरचं जीवन सुरक्षित करण्यासाठी एक नवा मार्ग शोधला.

भूतकाळात स्टॉक मार्केटमध्ये सोसाव्या लागलेल्या तोट्यामुळे ते यावेळी म्युच्युअल फंड्सकडे वळले. यावेळी त्यांनी एका सल्लागाराची मदत घेतली आणि त्यांना शेअर बाजारातील उत्साहही दिसत होताच.

"मी माझ्या बचतीपैकी 80% रक्कम म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवली. फक्त 20% बँकेत ठेवले आहेत. आता माझ्या सल्लागारानं मला इशारा दिला आहे की, "तुम्हाला हृदयविकाराचा झटका नको असेल तर तुम्ही सहा महिने तुमच्या गुंतवणुकीकडे पाहू नका!'"

आपला रिटायरमेंट फंड शेअर बाजारात गुंतवण्याचा निर्णय योग्य होता का, याची तरुण सरकार यांना आताही खात्री नाही. "मी एकाचवेळी अनभिज्ञ आणि आत्मविश्वासाने भरलेला अशा दोन्ही मानसिकतेत आहे," असं ते म्हणतात.

"काय घडत आहे आणि बाजार अशा प्रकारे प्रतिक्रिया का देत आहे, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. तरीही आत्मविश्वास आहे; कारण, इन्स्टाग्रामवरील 'तज्ज्ञ' लाखो लोकांपर्यंत गुंतवणूक करणे हा एक जलद मार्ग असल्याचं सांगतात. त्याच वेळी, मला माहीत आहे की, मी फसवणूक आणि प्रचाराच्या जाळ्यात अडकला जाऊ शकतो."

सरकार पुढं म्हणतात की, त्यांना टीव्हीवरील शेअर्सचा प्रचार करणाऱ्या शोने शेअर मार्केटकडे आकर्षित केलं. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये होणारी उत्साही चर्चा पण याला कारणीभूत आहे.

"टीव्ही अँकर बाजारपेठेचं महत्त्व सांगतात आणि माझ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील लोक त्यांच्या शेअर बाजारातील नफ्याबद्दल गर्वानं सांगतात," असंही ते म्हणाले.

त्याच्या आलिशान अशा अपार्टमेंटमध्ये, महाविद्यालयीन मुलं देखील गुंतवणुकीबद्दल चर्चा करतात. खरंतर, एकदा बॅडमिंटन खेळताना, एका मुलानं त्यांना टेलिकॉम स्टॉकबद्दल एक चांगली टिप दिली होती.

"जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला हे सर्व ऐकता, तेव्हा तुम्ही विचार करू लागता की का नाही, एकदा प्रयत्न तर करून पाहू? मग मी केला, आणि नंतर बाजार कोसळला."

तरुण सरकार यांना अजूनही आशा आहे "गोड बातमी येईल याची अजून मला खात्री आहे. बाजारात पुन्हा सुधारणा होईल आणि माझा फंड पुन्हा हिरव्या रंगात म्हणजेच नफ्यात येईल."

... आणि स्टॉक मार्केटपासून दूर राहण्याची शपथ घेतली

आपल्याकडे असेही काही लोक आहेत ज्यांनी अधिक धोका पत्करुन आधीच पैसे गमावले आहेत.

झटपट श्रीमंत होण्याच्या व्हीडिओंनी आकर्षित होऊन, रमेश (नाव बदललं आहे), पश्चिम भारतातील एका छोट्या औद्योगिक शहरात अकाऊंट क्लार्क म्हणून काम करतात. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे उसने घेतले.

यूट्यूब इन्फ्लुएन्सर्सच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी जोखीम असलेल्या पेनी स्टॉक्स आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली.

या महिन्यात, $1,800 पेक्षा अधिक (त्याच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त) पैसे गमावल्यानंतर, त्यांनी त्यांचं ब्रोकेरेज खातं बंद केलं आणि यापुढं स्टॉक मार्केटपासून दूर राहण्याची शपथ घेतली.

"मी हे पैसे उसने घेतले होते, आणि आता कर्जदार माझ्या मागे लागले आहेत," असं ते म्हणतात.

नियामकांनी पाऊल उचलण्यापूर्वीच फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडमध्ये एकत्रित $20 अब्ज गमावलेल्या 11 दशलक्ष भारतीय गुंतवणूकदारांपैकी रमेश हे एक आहेत.

'पुढं काय वाढून ठेवलंय, माहीत नाही'

आर्थिक सल्लागार समीर दोशी म्हणतात, "ही दुर्घटना कोविड साथीच्या काळात झालेल्या दुर्घटनेपेक्षा वेगळी आहे. "तेव्हा, आपल्याकडे लसींद्वारे पुनर्प्राप्तीसाठी एक मार्ग होता. परंतु ट्रम्प फॅक्टरमुळं अनिश्चितता वाढली आहे. पुढं काय वाढून ठेवलंय याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही."

डिजिटल प्लॅटफॉर्म, कमी खर्चाचे ब्रोकरेज आणि सरकारद्वारे चालवलेल्या आर्थिक समावेशनामुळं, गुंतवणूक करणं अधिक सोपं झालं आहे.

स्मार्टफोन आणि वापरण्यास सोप्या अ‍ॅप्समुळं मार्केटमधील सहभाग आणखी सुलभ झाला आहे. ज्यामुळं पारंपरिक मालमत्तांसाठी पर्याय शोधत असलेला एक व्यापक, तरुण प्रेक्षक वर्ग आकर्षित झाला आहे.

दुसरीकडे, अनेक नवीन भारतीय गुंतवणूकदारांना वास्तविकता तपासण्याची गरज आहे. "शेअर मार्केट हा जुगाराचा अड्डा नाही. तुम्ही तुमच्या अपेक्षांचे व्यवस्थापन केलं पाहिजे," असं लेखिका आणि आर्थिक शिक्षिका मोनिका हालन म्हणाल्या.

"इक्विटीमध्ये फक्त असे पैसे गुंतवा ज्याची तुम्हाला किमान सात वर्षे गरज भासणार नाही. जर तुम्ही जोखीम घेत असाल, तर त्या जोखमीच्या नकारात्मक परिणामांनाही समजून घ्या: मी किती रक्कम गमावू शकतो? मला तो तोटा परवडू शकतो का?"

'...तर लोक पुन्हा 'एफडी'कडे वळतील'

या बाजारातील घसरणीचा भारताच्या मध्यमवर्गाला यापेक्षा वाईट वेळी फटका बसू शकला नसता. आर्थिक वाढ मंदावली आहे, वेतन स्थिर आहे, खासगी गुंतवणूक वर्षानुवर्षे मंदावत चालली आहे आणि रोजगार निर्मिती आवश्यक त्या गतीनं होताना दिसत नाही.

या आव्हानांच्या दरम्यान, वाढत्या बाजारामुळं आकर्षित झालेले अनेक नवीन गुंतवणूकदार आता अनपेक्षित तोट्याशी झगडत आहेत.

"साधारण परिस्थितीत, बचत करणारे छोट्या-मोठ्या अडचणींना सहन करू शकतात. कारण त्यांच्याकडे स्थिर उत्पन्न असतं, ज्यामुळं त्यांच्या बचतीत भर पडत असते," असं आर्थिक विश्लेषक अनिंद्यो चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.

"आता, आपण मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या आर्थिक संकटाच्या मध्यभागी आहोत. एकीकडे, पांढरपेशा नोकरीच्या संधी कमी होत आहेत आणि वाढही संथ गतीनं होत आहे.

दुसऱ्या बाजूला, मध्यमवर्गीय कुटुंबांना तोंड द्यावं लागणाऱ्या वास्तविक महागाईचा अनुभव. सरकारनं संकलित केलेल्या सरासरी किरकोळ चलनवाढीच्या तुलनेत अलीकडील काळातील ही महागाई सर्वात जास्त आहे. अशावेळी शेअर बाजाराचा परिणाम मध्यमवर्गीय घरांच्या आर्थिक स्थितीसाठी विध्वंसक ठरतो."

जयदीप मराठे यांच्यासारख्या आर्थिक सल्लागारांचा विश्वास आहे की, आणखी सहा ते आठ महिने अस्थिरता कायम राहिल्यास काही लोक बाजारातून पैसे काढून ते सुरक्षित बँक ठेवींमध्ये ठेवतील.

"आम्ही ग्राहकांना त्यांचे पोर्टफोलिओ रद्द करू नका असं सांगत आहोत. याकडे एक चक्रीय घटना म्हणजे ठराविक काळानंतर येणारी स्थिती म्हणून पाहण्याचे सांगत आहोत."

परंतु स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर सर्वांनी आशा गमावलेल्या नाहीत. बहुतेकांचा असा विश्वास आहे की, बाजार मागील उच्चांकापासून स्वतःमध्ये सुधारणा करत आहे.

'हा तर वेक-अप कॉल'

फेब्रुवारीपासून परकीय गुंतवणूकदारांची विक्री कमी झाली आहे. ज्यामुळे बाजारातील घसरण संपण्याच्या मार्गावर असल्याचं सूचित होतं, असं अनुभवी शेअर मार्केट तज्ज्ञ अजय बग्गा म्हणतात.

करेक्शननंतर, अनेक स्टॉक मार्केट इंडेक्सची मूल्यांकनं त्यांच्या 10 वर्षांच्या सरासरीच्या खाली गेले आहेत, ज्यामुळं त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

बग्गा यांना जीडीपी आणि कॉर्पोरेट कमाई सुधारण्याची अपेक्षा आहे. फेडरल बजेटमधील $12 बिलियन्सची आयकर सवलत आणि कमी होत असलेले व्याज दर यामुळं मदत होईल. परंतु, भू-राजकीय धोके, मध्यपूर्व आणि युक्रेनमधील संघर्ष आणि ट्रम्प यांची टॅरिफ योजना गुंतवणूकदारांना सतर्क ठेवतील.

शेवटी, बाजारातील पडझड नवीन गुंतवणूकदारांसाठी एक कठीण धडा ठरू शकते.

"जे गुंतवणूकदार तीन वर्षांपूर्वी बाजारात आले होते आणि 25 टक्के परतावा मिळवत होते, त्यांच्यासाठी शेअर मार्केटमधील हे करेक्शन एक आवश्यक वेक-अप कॉल आहे. ही सामान्य घटना नाही," असं मोनिका हालन यांनी म्हटलं आहे.

"जर तुम्हाला शेअर बाजार समजत नसेल, तर बँक ठेवी आणि सोन्याशीच चिकटून राहा. किमान त्यावर तुमचं नियंत्रण असेल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)