पुण्यात 200 जागांसाठी हजारो तरुणांची अक्षरश: झुंबड, IT मध्ये नोकरीसाठी वणवण का?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

एकेकाळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अर्थात IT चा जो काही बोलबाला होता, तो ओसरला की काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती काल-परवा पुण्यात दिसून आली.

पुण्यातील हडपसरमध्ये एका कंपनीमध्ये 200 जागांसाठी मुलाखती सुरू होत्या. या 200 जागांसाठी तब्बल एक हजारहून अधिक तरुण-तरुणींनी झुंबड केली होती.

एरव्ही इतर क्षेत्रांमध्ये दिसणारं हे चित्र आता आयटीमध्येही दिसायला लागलं आहे.

200 जागांसाठी हजारहून अधिक उमेदवार, याचा अर्थ आयटी क्षेत्राचं वैभव कमी झालंय, असा घ्यायचा का? किंवा हे नोकऱ्या कमी झाल्याचं लक्षण आहे का? की आणखी काही कारणं आहेत?

याच प्रश्नांचा आढावा बीबीसी मराठीनं या बातमीतून घेतला आहे.

अहिल्यानगरच्या (पूर्वीचं अहमदनगर) 21 वर्षीय स्नेहाचं (नाव बदललेलं आहे) इंजिनिअरिंगचं हे शेवटचं वर्ष आहे.

शेतकरी कुटुंबातील स्नेहा इंजिनिअरिंग आणि त्यातही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आली, ते त्यातली नोकऱ्यांची उपलब्धता आणि आपला कल पाहून.

आपल्याला नोकरी लागली तर घरी परिस्थिती बदलेल, अशी स्नेहाची अपेक्षा होती. शेवटचं सत्र सुरू झालं, तसं तिने वेगवेगळ्या कंपन्यांना नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली. मात्र, अजून एकाही कंपनीकडून उत्तर आलं नसल्याचं ती सांगते.

बीबीसी मराठीशी बोलताना स्नेहा म्हणाली, "आमच्या महाविद्यालयात यंदा एकही कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आली नाही. त्यामुळे आम्ही मग ऑफ-कॅम्पस नोकरीसाठी प्रयत्न करत आहोत. अनेक कंपन्यांना बायोडेटा पाठवला. मात्र, अजून कुणी उत्तरही दिलं नाही. मुलाखतीला तर बोलावलं जाणं लांबच. वर्गातील मुलांसोबत आता मी इतर कोर्सेस करत आहे."

स्नेहा फ्रेशर आहे, तर थोडा अनुभव असलेल्या अमोलची परिस्थितीही वेगळी नाही.

अमोलचं (नाव बदललं आहे) 2022 मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं. या क्षेत्रातील प्रगती आणि स्वत:चा इंटरेस्ट लक्षात घेऊन त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

अर्थातच स्वप्न होतं ते मोठ्या आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचं. अपेक्षेप्रमाणे त्याला नोकरी मिळालीही. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर मिळालेल्या अनुभवानंतर त्याने दुसरी नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला.

आपला अनुभव लक्षात घेता प्रगती आणि सिनिअर पदावर काम करण्यासाठी जाणं यासाठी त्याने पर्यायांचा शोध सुरू केला.

पण तीन वर्षाच्या अनुभवानंतर या क्षेत्रात अपेक्षित असलेली वाढ मिळत नसल्याचं अमोल सांगतो.

बीबीसी मराठीशी बोलताना अमोल म्हणाला, "मी वेगवेगळ्या मार्गांनी नोकरी शोधत आहे. पण बहुतांश ठिकाणी ज्युनिअर पदांवरचेच ऑप्शन येत आहेत. आणि त्यात मी जिथे अर्ज करतो, त्या ठिकाणी एका एका पदासाठी पाच ते सहा हजार अर्जदार असतात. त्यामुळे मनासारखी नोकरी शोधणं कठीण झालं आहे. उपलब्ध संधीमध्ये पगार मनासारखा मिळत नाही."

यातही बहुतांश तरुणांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलेलं असताना नोकरी मिळाल्यावर मात्र सपोर्टमध्ये काम करावं लागत असल्याचं तो नोंदवतो. म्हणजेच प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उपलब्ध काम यात अंतर असल्याचं त्याचं मत आहे.

आकडेवारी काय सांगते?

अनुभव असलेल्या अमोलला ही अडचण येत आहे. तर नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी तर ही परिस्थिती आणखी बिकट असल्याचं आकडेवारी सांगते.

फाऊंडईट या नोकरीची माहिती देणाऱ्या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वार्षिक अहवालानुसार नोकरी देणाऱ्या 14 क्षेत्रांचा त्यांनी अभ्यास केला.

त्यापैकी आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची उपलब्धता सर्वांत कमी आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये उपलब्ध नोकऱ्यांची संख्या 5 टक्क्यांनी कमी झाली आहे. या आकडेवारीनुसार आयटी मधल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचं प्रमाण 18 टक्क्यांनी कमी झालं आहे.

यात वयोगटाचा विचार केला तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार 20 ते 24 वयोगटासाठी उपलब्ध नोकऱ्यांमध्ये फक्त 0.84 टक्क्यांचा फरक पडला आहे. ही आकडेवारी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यानची आहे. तर 25 ते 29 वयोगटातल्या तरुणांच्या बरोजगारीचं प्रमाण13.35 टक्क्यांवरुन 14.33 टक्क्यांवर गेलं आहे.

आयटी क्षेत्रासाठीचं हब म्हणून ज्या शहरांची ओळख आहे त्या शहरांमध्ये उपलब्ध नोकऱ्यांचं प्रमाण पाहिलं तर फाऊंडइटचा अहवाल सांगतो की जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि कोईम्बत्तूर मध्ये नोकऱ्यांची उपलब्धता वाढली. मात्र चंदीगड मध्ये ती 33 टक्क्यांनी कमी झाली. तर मुंबईत 18 टक्क्यांनी आणि पुण्यात 10 टक्क्यांनी घट झाली आहे.

कारण काय?

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या परिस्थितीसाठी प्रामुख्याने तीन कारणं मांडली जातात. यातलं पहिलं म्हणजे अर्थातच आर्थिक चढउतारांचं. कोव्हिड, युद्ध परिस्थिती, युरोझोन क्रायसिस या सगळ्यांचा परिणाम या क्षेत्रावर झाला. यातला काही दीर्घकाळ टिकणारा ठरला तर काही अल्पकाळ. पण यामुळे नोकऱ्यांच्या उपलब्धतेवर झालेला परिणाम मात्र दृश्य स्वरूपात दिसत आहे.

दुसरा मुद्दा आहे तो तंत्रज्ञानातील प्रगतीचा. भारतात इन्फर्मेशन टेक्नालॉजी क्षेत्र प्रामुख्याने सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून कार्यरत आहे. यात ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग यामुळे नोकऱ्यांची उपलब्धता कमी झाली आहे. त्यातही तज्ज्ञ मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.

यासोबतच तिसरा मुद्दा मांडला जातो तो म्हणजे बदललेल्या व्यावसायिक गणितांचा. पारंपारिक ऑन कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर कडून आता कंपन्या या क्लाउड कम्प्युटिंगकडे वळल्या आहेत. सॉफ्टवेअर अज अ सर्व्हिस आणि इतर डिजिटल सोल्यूशन्स हे कंपन्यांचे प्रमुख काम झाले आहे. त्यामुळे त्यातल्या तज्ञ आणि अनुभवी मनुष्यबळाची मागणी होत आहे.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज ही संघटना चालवणारे पवनजीत माने याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "आता कुशल मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. सध्या असं चित्र दिसतंय की यापुर्वी ज्या लोकांना नोकऱ्या देण्यासाठी ऑफर लेटर दिली गेली त्यांचीच हायरींग प्रोसेस अजून झाली नाही. त्यामुळे कंपन्या नव्या लोकांना नोकरी देण्याचं टाळत आहेत. तसंच पदवी आणि अनुभव याची उपलब्धता असलेलं मनुष्यबळ सध्या उपलब्ध असल्याने नव्या पदवीधरांना संधी कमी मिळते आहे. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये महाविद्यालयांची संख्या देखील वाढली आहे. त्यात ज्या ठिकाणी महाविद्यालयं आहेत तिथं इंडस्ट्री मात्र नाही. पुर्वी इंजिनियर्सना नोकरी देऊन ट्रेनींग दिलं जायचं. आता मात्र तज्ञ मनुष्यबळ घेण्याकडे कल दिसत आहे."

आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या मते एकीकडे वाढलेली विद्यापीठांची संख्या आणि त्यातून बाहेर पडणारे पदवीधर यांचा मेळ बसत नसल्यामुळे ही परिस्थिती आली आहे. तसेच पदवीधर होणे आणि प्रत्यक्ष त्या कामाचे कौशल्य असणे यातही अंतर असल्याचं ते नमूद करतात.

बीबीसी मराठीशी बोलताना शिकारपूर म्हणाले, "आयटी क्षेत्र वाढते आहे. कंपन्यांचे वार्षिक अहवाल असं दाखवत नाही की त्यांचा परफॉर्मन्स कमी आहे. तसंच मध्यम स्तरावरच्या कंपन्यांची संख्या देखील वाढत आहे. मूलभूत प्रश्न हा आहे की प्रशिक्षण दिल्यानंतर ते बाहेर पडतात त्यांच्याकडे कौशल्य आहे का? जिथं कौशल्य मिळतं तिथं बेरोजगारीचा मुद्दा कमी आहे. मुलं पदवी घेऊन बाहेर पडतात पण त्यांना येत काहीच नसतं. त्याला कोणाला जबाबदार धरणार. विद्यार्थी की शिक्षण संस्था."

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी एकूण 4 कोटी 33 लाख विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदव्यांसाठी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला.

तर सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशनचे सेक्रेटरी विद्याधर पुरंदरे यांच्या मते, मात्र सध्या आयटी इंडस्ट्री मध्येच एकूण परिस्थिती वाईट आहे. गेलं वर्षभर आयटी क्षेत्रातील मार्केट स्लो असल्याचं ते नोंदवतात.

बीबीसी मराठीशी बोलताना पुरंदरे म्हणाले, "भारताची आयटी इंडस्ट्री ही बहुतांश प्रमाणात अमेरिकेवर अवलंबून आहे. आधी मागणी जास्त होती. त्यामुळे नोकऱ्यांची उपलब्धता होती. मात्र गेल्या काही काळात मार्केट वाईट आहे. त्यामुळे ही परिस्थिती दिसते. यंदा नव्या नोकऱ्याच नव्हे तर बहुतांश ठिकाणी कर्मचाऱ्यांनाही चांगली पगारवाढ मिळाली नाही."

तर अर्थतज्ज्ञ निरज हातेकर हे हा एकूणच वाढत्या बेरोजगारीचा भाग असल्याचं मांडतात. त्यांच्या मते "एकूणच नोकऱ्यांची उपलब्धता हा प्रश्न झाला आहे. तसंच आयटी इंजिनियर्सची उपलब्धताही वाढली आहे. त्यात पदवीपेक्षा तुमच्याकडे नेमके काय स्किल काय हे महत्त्वाचं ठरतं?"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)