अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली, कोणते बंडखोर लढण्यावर ठाम? लढतींचं आता चित्र काय?

फोटो स्रोत, Facebook/SameerMBhujbal/GopalShetty.Official
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी झाल्या आहेत. विशेष म्हणजे बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनीच अर्ज मागे घेतल्याने राजकीय पेच निर्माण झालेला पाहायला मिळाला.
स्वतःच्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत दंड थोपटले. यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून बंडखोरांची नाराजी काढण्यासाठी आणि त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले.
4 नोव्हेंबर अखेरीस आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. यासह राज्यात नेमक्या कोणत्या बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत? कोणते बंडखोर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत? कोणत्या मतदारसंघात युती-आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनीच अर्ज मागे घेतला? हे सर्व जाणून घेऊयात.
निवडणुकीतील महत्त्वाचे बंडखोर
सुरुवातीला या निवडणुकीत प्रमुख आणि चर्चेतील बंडखोरांच्या यादीमध्ये, बोरीवलीमध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी अधिकृत उमेदवार असलेल्या संजय उपाध्याय यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. शेट्टी यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. तर, छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात बंडखोरी केली होती.
भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी केली, तर पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी आणि पर्वतीमध्ये आबा बागुल यांनीही बंडखोरी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही विरोधात बंडखोरी झाली. त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी दिलेली असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कुटुंबातील असलेल्या ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पुसदमधून उमेदवारी न मिळालेल्या नाईक यांनी कारंजा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील बंडखोर
पर्वती: आबा बागुल, काँग्रेस
कसबा: कमल व्यवहारे, काँग्रेस
शिवाजीनगर: मनीष आनंद, काँग्रेस
इंदापूर: प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पुरंदर: संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
मावळ: बापू भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
जुन्नर: आशा बुचके, भाजप; शरद सोनवणे, शिवसेना शिंदे गट
खेड आळंदी: अतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
भोर: किरण दगडे पाटील, भाजप; कुलदीप कोंडे शिवसेना शिंदे गट


युती-आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी कुठे माघार घेतली?
निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे यामध्ये केवळ अपक्ष बंडखोर नेत्यांचाच समावेश नाही, तर महायुती आणि महाविकासआघाडीच्या अधिकृत उमेदवारांचाही समावेश आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदासंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदार संघात आता महायुतीचा अधिकृत उमेदवारच नाही. प्रतिभा पाचपुते यांनी विक्रम बबनराव पाचपुते या आपल्या मुलाला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले आणि स्वतः भाजपची उमेदवारी नाकारली.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली आहे. कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहूमहाराज छत्रपती यांनी माध्यमांना याबाबत सांगितलं की, नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागतेय.
शाहू महाराज पुढे म्हणाले, "राजेश लाटकर काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी माघार घेतली नाही, म्हणून मधुरिमाराजेंनी माघार घेतली. कारण अशा परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही, असं आम्ही ठरवलं."
काँग्रेसनं इथून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, नंतरच्या यादीत लाटकरांची उमेदवारी रद्द करून, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र, लाटकरांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अर्ज मागे घेतला नाही. आता मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर नाना पटोले यांनी राजेश लाटकरांना पाठिंबा देऊन निवडून आणू असं म्हटलं आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही तिकीट न स्वीकारणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते अनिल देशमुख यांचा समावेश आहे. यानंतर सचिन सावंत यांच्या जागेवर काँग्रेसने नव्या उमेदवाराची घोषणा केली. तर अनिल देशमुख यांनी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे सलील देशमुखांनी उमेदवारी अर्ज भरला.
माघार घेतलेल्या महत्त्वाच्या बंडखोरांची यादी
गोपाळ शेट्टी - बोरिवली
स्वीकृती शर्मा - अंधेरी पूर्व
अंकुश पवार - नाशिक मध्य (मनसे)
रंजन ठाकरे - नाशिक मध्य
बाबुराव माने - धारावी (ठाकरे गट)
नरेंद्र पवार - कल्याण पश्चिम
कुणाल सरमळकर - वांद्रे पूर्व (शिंदे गट)
संगीता तलमले - नागपूर पूर्व
मधू चव्हाण - भायखळा (काँग्रेस)
रमेश बंग - हिंगणा
किशोर समुद्रे - नागपूर मध्य (भाजप)
तनुजा घोलप - देवळाली (ठाकरे गट)
अमित घोडा - पालघर (भाजप)
मदन भरगड - अकोला पश्चिम (काँग्रेस)
कोल्हापूर उत्तर - मधुरिमा राजे छत्रपती

फोटो स्रोत, Facebook/AnkushPawarMNS
आधी बंडखोरी करून नंतर अनेक नेत्यांनी अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यातील चिंचवड मतदारसंघातील बंडखोर नेते नाना काटे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांनी भाजप उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा दिला आहे. ही बंडखोरी थांबवण्यासाठी अजित पवारांनी स्वतः नाना काटेंची भेट घेऊन मनधरणी केली होती.
नाशिक मध्य मतदारसंघातून हेमलता पाटील यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांच्यासमोरील बंडखोरीचं संकट टळलं आहे. दुसरीकडे मनसेच्या अंकुश पवार यांनी माघार घेतल्याने भाजप उमेदवार देवयानी फरांदे यांच्यासमोरील बंडखोरीचं आव्हानही संपलं आहे. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन तावरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु वेळेमध्ये ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. 3 मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे त्यांचा अर्ज माघार होऊ शकला नाही, पण सचिन तावरे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठिंबा आहे, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.


माघार न घेतलेल्या महत्त्वाच्या बंडखोरांची यादी
समीर भुजबळ - नांदगाव
हिना गावित - अक्कलकुवा
गीता जैन - मीरा रोड
गायत्री शिंगणे - सिंदखेड राजा
ज्योती मेटे - बीड
तौफिक शेख - सोलापूर शहर मध्य
राजा ठाकूर - श्रीवर्धन
अमोल देशमुख - सावनेर (काँग्रेस)
याज्ञवल्क्य जिचकार - काटोल
चंद्रपाल चौकसे - रामटेक
प्रमोद घरडे - उमरेड
नरेंद्र जिचकार - नागपूर पश्चिम
शोभा बनशेट्टी - सोलापूर शहर उत्तर

फोटो स्रोत, Facebook/DrHeenaGavit
छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. अखेरच्या दिवशीही त्यांनी अर्ज मागे न घेत उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे नांदगावमधील लढत चुरशीची झाली आहे.
भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. त्यांनी अर्ज कायम ठेवत निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही विरोधात बंडखोरी झाली. त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी दिलेली असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली.
वसंतराव नाईक यांचे चूलत नातू असलेल्या ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पूसदमधून उमेदवारी न मिळालेल्या नाईक यांनी कारंजा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात 2 मिनिटे उशिरा पोहचल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तौफिक शेख यांचा अर्ज कायम राहिला आहे. समाजातील बांधवांनी समजूत घातल्याने ते अर्ज मागे घेणार होते, मात्र पोहचायला उशीर झाला, असं त्यांनी सांगितलं. तसेच आता निवडणूक लढवणार असल्याचंही नमूद केलं.
बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्या गायत्री शिंगणे यांची बंडखोरी कायम आहे. त्यामुळे येथे राजेंद्र शिंगणे आणि गायत्री शिंगणे या काका-पुतणीत लढत होईल हे स्पष्ट आहे. येथे शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूरच्या हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) रमेश बंग यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घेण्यास जाऊ दिलं नाही, असं बंग यांनी म्हटलं. यानंतर अपक्ष उमेदवार उज्ज्वला बोदाडे आणि वृंदा नागपुरेंनी अर्ज मागे घेतले.
बंडखोरी पलीकडच्या चुरशीच्या लढती
महायुतीबाबत बंडखोरीच्या पलीकडे काही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. यातील प्रमुख नावं म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते सदा सरवणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक हे आहेत.
महायुतीत माहीमची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला आली. त्यांनी सदा सरवणकरांना एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यानंतर त्यांनी अर्जही भरला. मात्र, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनीही माहीममधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा मुद्दा उपस्थित करत अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं समर्थन केलं.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंनी भेट घेण्यास नकार दिल्याचं सांगत ते अर्ज मागे घेणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता माहीममधील निवडणूक प्रचंड चुरशीची झाली आहे. या परिस्थितीत भाजप कुणाला मदत करणार हेही पाहावं लागणार आहे.
दुसरीकडे मानखुर्दमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते सुरेश कृष्णराव पाटील असल्याचा दावा भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अधिकृत उमेदवार म्हणून नवाब मलिकांना तिकीट दिलं. त्यामुळे या मतदारसंघातही चुरस निर्माण झाली आहे.
माघारीअखेर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार?
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या एकूण 7 हजार 78 उमेदवारांपैकी सोमवारी (4 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











