पोप आणि कॅथलिक चर्चचा जागतिक स्तरावर किती प्रभाव आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लेबो डिसेको
- Role, ग्लोबल रिलिजन रिपोर्टर
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानं कॅथलिक धर्मातील एक पर्व संपले आहे. ते केवळ धार्मिक गुरू नव्हते तर सामाजिक न्याय, गरिबी निर्मूलन, लोकशाही आणि पर्यावरण संवर्धनासाठी झगडणारे एक दूत होते. त्यांनी केलेल्या धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातही त्यांचा आणि चर्चचा प्रभाव जाणवत होता.
व्हॅटिकनने अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात 1.4 अब्जांहून अधिक लोक कॅथलिक आहेत. हे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 17% इतके आहे.
त्यामुळं पोप फ्रान्सिस यांच्या 2024 मधील आशिया दौर्यात प्रचंड गर्दी झाल्याचे पाहून आश्चर्य वाटलं नव्हतं. ईस्ट तिमोरमध्ये तर उघड्या मैदानात झालेल्या मासमध्ये संपूर्ण लोकसंख्येच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येने हजेरी लावली होती.
त्याच्या आधीच्या वर्षी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील किन्शासा विमानतळावर झालेल्या माससाठी लाखो लोकांनी तळपत्या उन्हात सहभाग नोंदवला होता. हा कार्यक्रम त्यांच्या दोन देशांच्या आफ्रिका दौर्याचा भाग होता.
पोप आणि कॅथलिक चर्च यांचा जगभरातील टिकून राहिलेला प्रभाव दाखवणारा हा फक्त एक संकेत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आणि इतक्या उत्साहानं लोकांना आकर्षित करण्याची त्यांची ती क्षमता आहे.
पोप एकाचवेळी धार्मिक नेते आणि राष्ट्रप्रमुखही
पोप केवळ कॅथलिक श्रद्धाळूंचेच नेतृत्व करत नाहीत, तर ते व्हॅटिकन सिटी राज्य आणि त्याच्या प्रशासकीय मंडळाचे म्हणजेच 'होली सी'चेही प्रमुख असतात.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार 'होली सी' ही एक सार्वभौम संस्था मानली जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये अधिकृत सहभाग आहे. त्यांचे 184 देशांशी आणि युरोपियन युनियनसोबतही पूर्ण राजनैतिक संबंध आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पोप हे एकाच वेळी राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख आणि एक अब्जांहून अधिक श्रद्धाळूंचे धार्मिक नेते असल्यामुळे ते संपूर्ण जगातील सर्वात प्रभावशाली आध्यात्मिक नेत्यांपैकी एक मानले जातात.
संयुक्त राष्ट्रसंघात महत्त्वाची भूमिका
'होली सी'कडे संयुक्त राष्ट्रांमध्ये स्थायी निरीक्षक (पर्मनंट ऑब्झर्वर) दर्जा आहे, ज्यामुळं त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली मंचांपैकी एकावर बसण्याचा मान मिळतो.
पूर्ण मतदानाचा हक्क नसला तरी, ते बैठकांमध्ये भाग घेऊ शकतात आणि चर्चांचे स्वरूप आकारण्यासाठी त्यांचा प्रभाव वापरू शकतात. यामुळे 'होली सी' ला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येते, विशेषतः मानवी हक्क, शांती आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर.
उदाहरणार्थ, 2015 मध्ये पॅरिस हवामान कराराच्या मंजुरीपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी काही लोकांनी पृथ्वी वाचवण्याच्या प्रयत्नांपेक्षा आर्थिक स्वार्थाला प्राधान्य दिल्याबद्दल 'अहंकारी उदासीनता' असा आरोप करत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याची वेळ आणि भाषा ही विशेषतः ग्लोबल साउथमधील (विकसनशील देशांतील) देशांसाठी मदत करणारी ठरली, असं त्यावेळी मानलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदे दरम्यान समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर विषयांवर वाद निर्माण झाल्यानंतर होली सीने महिलांच्या हक्कांवरील चर्चा रोखली. या प्रस्तावित करारामध्ये हवामान बदलाच्या अग्रभागी असलेल्या महिलांना आर्थिक मदत दिली जाणार होती.
व्हॅटिकन, सौदी अरेबिया, रशिया, इराण आणि इजिप्त या देशांनी चिंता व्यक्त केली होती की, कोणत्याही करारात ट्रान्सजेंडर महिलांचा समावेश असू शकतो आणि त्यांनी मजकुरातून समलैंगिक महिलांचा उल्लेख काढून टाकण्याची मागणी केली होती.
चर्चच्या या भूमिकेवर जोरदार टीका झाली असली तरी, यामधून आंतरराष्ट्रीय करारांवर प्रभाव टाकण्याची त्याची क्षमता यातून स्पष्टपणे दिसून येते. अशी क्षमता जी संपूर्ण जगभरातील लोकांच्या आयुष्यावर परिणाम करू शकते.
ओबामा-कॅस्ट्रो यांच्यात मध्यस्थी
2014 मध्ये अमेरिका आणि क्युबा यांच्यातील संबंध सामान्य करण्याचा करार हा पोप यांच्या मध्यस्थीचे आणखी एक उदाहरण ठरेल.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि राऊल कॅस्ट्रो या दोघांनीही पोप फ्रान्सिस यांचे जाहीररीत्या आभार मानले होते.
कारण त्यांनी या संवाद प्रक्रियेत महत्त्वाची मध्यस्थी करून दोन दशकांहून अधिक काळ तणावाखाली असलेले संबंध सुधारण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

फोटो स्रोत, Getty Images
पोप फ्रान्सिस यांनी त्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांना पत्रं लिहिली होती आणि व्हॅटिकनमध्ये एक गुप्त शिखर परिषदही आयोजित केली होती. या परिषदेतून या ऐतिहासिक करारासाठी मार्ग मोकळा होईल, हा त्यांचा उद्देश होता.
त्यांच्या या प्रयत्नांमुळेच अमेरिका आणि क्युबामधील दशकांपासून ताणलेल्या संबंधांमध्ये सकारात्मक बदल घडून आला होता. परंतु, नंतर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने या करारातील अनेक अटी मागे घेतल्या आणि त्यामुळं संबंध पुन्हा काही अंशी तणावपूर्ण झाले.
'लोकशाहीसाठी पुढाकार'
गेल्या 25 वर्षांत लोकशाहीसाठी चर्चने दिलेले योगदान हेच त्यांचे सर्वात मोठं यश आहे, असं अमेरिकेतील बर्कले सेंटर फॉर रिलिजन, पीस अँड वर्ल्ड अफेअर्सचे प्रा. डेव्हिड हॉलेनबॅक यांनी म्हटलं आहे.
1960 च्या दशकातील दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिल दरम्यान चर्चने आपल्या मुख्य शिकवणुकींचा आणि भविष्यातील दिशेचा गंभीरपणे पुनर्विचार केला.
या ऐतिहासिक परिषदेत चर्चने मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची भूमिका स्पष्टपणे स्वीकारली. प्रा. डेव्हिड हॉलेनबॅक यांच्या मते, ही एक 'महत्त्वपूर्ण क्रांती' होती.

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. हॉलेनबॅक यांनी अमेरिकेतील राजकीय शास्त्रज्ञ सॅम्युअल हंटिंग्टन यांच्या अभ्यासाकडे लक्ष वेधलं. ज्यामध्ये असं आढळून आलं की, 'पोप जॉन पॉल दुसरे यांच्या काळापासून ते पोप फ्रान्सिस यांच्या सुरुवातीच्या काळापर्यंत जे देश हुकूमशाहीतून लोकशाहीकडे वळले, त्यातील तीन चतुर्थांश देश हे मजबूत कॅथलिक प्रभाव असलेले देश होते.'
"ही प्रक्रिया स्पेन आणि पोर्तुगालमध्ये फ्रँको आणि सालाझारपासून दूर गेल्याने झाली. त्यानंतर ती लॅटिन अमेरिका खंडात पसरली. लॅटिन अमेरिकेनंतर ही लाट फिलिपिन्स आणि दक्षिण कोरियासारख्या कॅथलिक प्रभाव असलेल्या देशांपर्यंत पसरली," असं प्रा. हॉलेनबॅक सॅम्युअल हंटिंग्टन यांचे विचार मांडताना सांगतात.
पोप जॉन पॉल दुसरे यांच्या कार्यामुळे पोलंड या त्यांच्या मूळ देशात लोकशाही सुरू होण्यास मदत झाली, असं प्रोफेसर हॉलेनबॅक सांगतात. त्यांच्या मते " या घटनाक्रमाने शेवटी सोव्हिएत युनियनच्या पतनाला आणि पूर्वीच्या सोव्हिएत साम्राज्याच्या अनेक भागांमध्ये लोकशाहीच्या प्रसाराला चालना मिळाली."
...पोप यांनाही विरोध झाला
व्हॅटिकनला नेहमीच जागतिक नेत्यांवर प्रभाव टाकता येतोच असं नाही. उदाहरण सांगायचं तर, जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स (जे स्वतः कॅथलिक आहेत) यांनी त्यांच्या सरकारच्या स्थलांतरविरोधी धोरणाला धर्मशास्त्राच्या आधारे योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोप फ्रान्सिस यांनी एक ठाम आणि युक्तिवाद करणारे प्रभावी पत्र लिहिले.
अमेरिकेचे "बॉर्डर झार" (सीमा सुरक्षेचे प्रमुख) टॉम होमन (हेही कॅथलिक आहेत) यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिलं. "पोपनी आधी कॅथलिक चर्च सुधारायला पाहिजे," अशा शब्दांत पोप यांना उत्तर दिलं होतं.
आणि 2020 मध्ये ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनीही पोप फ्रान्सिस यांच्यावर निशाणा साधला होता. पोप यांनी अॅमेझॉनच्या संरक्षणासाठी सार्वजनिक आवाहन केलं, त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
"पोप अर्जेन्टिनाचे असू शकतात, पण देव ब्राझिलियन आहे," असं बोल्सोनारो म्हणाले होते.

फोटो स्रोत, Reuters
युरोपमध्ये कॅथलिक चर्चचा सामाजिक प्रभाव गेल्या काही दशकांत कमी झाला आहे. अनेकजण असा युक्तिवाद करतात की, एलजीबीटीक्यू हक्क, गर्भनिरोधकांचा वापर आणि गर्भपातासारख्या सामाजिक मुद्द्यांवर चर्चची पारंपरिक आणि पुराणमतवादी भूमिका 21व्या शतकाच्या मूल्यांशी सुसंगत नाही.
पोप फ्रान्सिस यांनी महिलांना काही प्रमुख धार्मिक पदांवर, जसं की प्रिस्ट (पुरोहित) किंवा डिकन म्हणून नेमण्यास नकार दिला आहे. त्यामुळं चर्चमधील लिंग समानतेच्या अभावावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.
कॅथलिक चर्चचा प्रभाव ओसरतोय?
कॅथलिक चर्च अजूनही लॅटिन अमेरिकेमध्ये एक मोठी प्रभावशाली शक्ती आहे. परंतु, त्यांची पूर्वी इतकी शक्ती राहिलेली नाही.
एकेकाळी संपूर्ण लॅटिन अमेरिका खंडात कठोर गर्भपातविरोधी कायदे घडवण्यात आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात चर्चची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, गेल्या 20 वर्षांत उरुग्वे, मेक्सिको, अर्जेंटिना आणि कोलंबिया या देशांनी कॅथलिक शिकवणीला झुगारून गर्भपात अधिक सुलभ आणि कायदेशीर केला आहे.
इव्हँजेलिकल ख्रिश्चन धर्म देखील या प्रदेशात संख्येने आणि राजकीय ताकदीने दोन्ही बाजूंनी जोर धरत आहे. विशेषतः जगातील सर्वाधिक कॅथलिक लोकसंख्या असलेल्या ब्राझीलमध्ये. येत्या पाच वर्षांत कॅथोलिक धर्म हा ब्राझीलमध्ये बहुसंख्य धर्म म्हणून ओळखला जाणार नाही, असं भाकीत तिथल्या काही विश्लेषकांनी केलं आहे.
कॅथलिक चर्चमधील पाद्रींकडून लैंगिक शोषणाच्या सातत्यानं समोर येणाऱ्या नवीन खुलाशांमुळं आणि चर्चच्या या घटनांना लपवण्याच्या भूमिकेमुळे, चर्चची जागतिक पातळीवरची प्रतिष्ठा कमी झाली आहे.
तरीही, कॅथलिक चर्चचे प्रमुख कोणीही असो, त्यांच्याकडे असा प्रभाव असतो, जो फार थोड्या इतर नेत्यांकडे असतो. हा प्रभाव दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आधारित असतो. एक म्हणजे पोप हे ख्रिश्चन धर्माच्या सर्वात मोठ्या शाखेचे सर्वोच्च नेता आहेत आणि दुसरे म्हणजे ते स्वतः एका सार्वभौम राष्ट्राचे, म्हणजेच व्हॅटिकन सिटीचे प्रमुख देखील आहेत.
दक्षिण सूदानमध्ये युद्धग्रस्त नेत्यांच्या पायांचे चुंबन असो किंवा ग्रीसमधील निर्वासित छावणीत स्थलांतरितांना धीर देणं असो पोपच्या या कृती जागतिक पातळीवर संदेश देणारी आणि चर्चा घडवणारी ठरते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











