समोसा, जिलबीवरील बातम्यांनंतर आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण, सरकारनं काय म्हटलं?

समोसा जिलबी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, नंदिनी वेल्लीसामी
    • Role, बीबीसी तमिळ

समोसा, जिलबी सारख्या पदार्थांमध्ये किती प्रमाणात तेल आणि साखर आहे याचे कँटीनमध्ये फलक लावावेत अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. कामाच्या ठिकाणी असलेल्या कँटीनमध्ये हे फलक लावावेत, असं आरोग्य मंत्रालयाने सुचवलं होतं. त्या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

या मार्गदर्शक सूचना आरोग्यदायी सवयी लागाव्यात या हेतूने जाहीर करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. खाद्यपदार्थांतील तेलाचे प्रमाण आणि साखरेचे प्रमाण किती आहे याची खाणाऱ्या व्यक्तीला कल्पना यावी यासाठी या सूचना दिल्याचे त्यांनी म्हटले.

कँटीनमध्ये फलकावर साखर आणि तेलाचे प्रमाण लिहावे. यामुळे खाणाऱ्या व्यक्तीला त्यात काय आहे याची आठवण राहील, असं सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे आणि त्यात त्यांनी हे स्पष्ट केले आहे की लाडू, जिलबी, समोसे यावर (पाकिट किंवा प्लेट) या सूचना नसतील.

आरोग्य मंत्रालयाने असं म्हटलं आहे की काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की समोसा, जिलबी, गुलाबजाम यावर इशारा देण्यात यावा. तसा इशारा या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर असण्यासंबंधी सूचना दिलेल्या नाहीत.

समोसा, गुलाबजाम, जिलबी आवडते मग हे वाचाच

फोटो स्रोत, Getty Images

कँटीनमध्ये फलक लावून जागरुकता निर्माण करावी असे हे निर्देश असल्याचे आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. भारतात 'स्ट्रीट फूड'ची वैभवशाली परंपरा आहे. त्या परंपरेला धक्का लागावा असे आदेश मंत्रालयाने दिलेले नाहीत ज्या माध्यमांनी या प्रकारचे वृत्त दिले आहे ते सर्वथा निराधार आहे असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या देशात स्थूलतेचे प्रमाण वेगाने वाढत आहे, तेव्हा अशा प्रकारच्या फलकांमधून एक जागरुकता निर्माण होईल आणि आपण आपल्या सवयी चांगल्या बनवू यासाठी हे फलक असतील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या मेस, डायनिंग रुम, इत्यादी ठिकाणी हे फलक लावण्यात यावेत, असे आरोग्य मंत्रालयाने सूचवले आहे.

याबरोबरच फळं, भाज्या आणि कमी स्निग्धाचे प्रमाण असलेले पदार्थ खावेत, असे फलक देखील लावावेत असं मंत्रालयाने सुचवले आहे. त्याचवेळी पायऱ्यांचा वापर करावा, कामाच्या मध्ये थोटी विश्रांती घेऊन व्यायाम करावा आणि नियमितपणे चालावे अशा सूचना देखील देण्यात यावे असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने अंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत या सूचना दिल्या आहेत. तेल आणि साखरेच्या अत्याधिक सेवनामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब आणि इतर आजारांना निमंत्रण मिळते, ते कमी व्हावे या हेतूने या सूचना देण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

'फलक लावून जागरूकता निर्माण करावी'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आपण नियमितपणे खाणाऱ्या गोड आणि तळलेल्या पदार्थांमुळे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतो, हे अनेकांना माहितीच नसतं. लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग अशा आजारांशी याचा थेट संबंध आहे.

त्यामुळे अशा अन्नपदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं आज गरजेचं झालं आहे.

पॅकबंद खाद्यपदार्थांवर त्यात कोणते पोषक घटक आहेत, ती किती प्रमाणात आहेत, आणि त्यात एकूण किती कॅलरीज आहेत, याची सर्व माहिती दिलेली असते.

परंतु, अनेक शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांमधील कँटिनमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थ आणि मिठाईंमध्ये किती कॅलरीज असतात, हे मात्र सांगितलेलं नसतं.

विशेषतः समोसासारखे पॅक न केलेले, प्लेटमध्ये थेट दिले जाणारे पदार्थ याबद्दल ग्राहकांना फारशी माहितीच नसते.

म्हणूनच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच एक सूचना दिली आहे की, समोसा, जिलबीसारखे पदार्थ विकणाऱ्या सरकारी ठिकाणी, जसं की एम्ससारख्या केंद्रीय संस्था, शाळा-कॉलेज, कार्यालयं तिथं साखर आणि तेलाबद्दल इशारा देणारे फलक लावून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असं सांगितलं आहे.

विशेष म्हणजे, मागील मे महिन्यात प्रत्येक सीबीएसई शाळेत अशाच प्रकारचे इशारा फलक लावण्याची सूचनाही देण्यात आली होती.

या इशारा फलकांवर काय असेल? हे लोकांसाठी खरंच उपयुक्त ठरेल का?

साखरेबाबतच्या इशारा फलकावर काय लिहिलेलं असावं?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) इशारा फलकांवर कोणती माहिती असावी हे स्पष्ट केलं आहे.

त्या सूचनेनुसार, साखरेबाबतच्या फलकावर हे लिहिलेलं असावं, प्रौढांनी दररोज दिवसभरात 25 ग्रॅमपेक्षा जास्त आणि मुलांनी 20 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये.

त्याचप्रमाणे, गुलाबजाम, गूळ, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट, पेस्ट्रीसारखे गोड पदार्थ ठराविक प्रमाणात खाल्ल्यास त्यामध्ये किती ग्रॅम साखर आणि किती कॅलरी असतात हेही नमूद केलेलं असावं.

उदाहरणार्थ, 62 ग्रॅम वजनाच्या एका गुलाबजाममध्ये 32 ग्रॅम साखर आणि 203 कॅलरीज असतात. म्हणजे एक गुलाबजाम खाल्ल्यावरच दिवसभरासाठी लागणारी साखरेची मर्यादा संपते. सामान्य लोकांना हे सहज समजू शकतं.

आणखी सविस्तर इशाऱ्यांसह भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनं (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

समोसा, गुलाबजाम, जिलबी आवडते मग हे वाचाच

फोटो स्रोत, Getty Images

त्या इशारा फलकांवर सुक्रॅलॉज, मॅनिटॉल, एरिथ्रिटॉल, झायलिटॉल आणि सॉर्बिटॉल यांसारख्या विविध प्रकारच्या साखरेबद्दल आणि गूळ, मध, खजूर सिरप, मॅपल सिरप, ब्राउन शुगर, कॅरमल, मोलॅसिस यांसारख्या साखरेच्या इतर स्वरुपांबद्दलही माहिती दिली पाहिजे.

साखरेत काहीही पौष्टिक नाही, असं आयसीएमआरनं आपल्या इशाऱ्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.

शिवाय, एका गोड पदार्थात किती चमचे साखर आहे, हेही यात सांगितलेलं आहे.

उदाहरणार्थ, 100 मिली कोल्ड्रिंक्समध्ये 6 चमचे साखर असते. त्यामुळे त्या कँटिनमध्ये रोज जे गोड पदार्थ विकले जातात, त्यात किती चमचे साखर आहे हेही स्पष्टपणे सांगायला हवं, असं या इशाऱ्यात म्हटलं आहे.

साखर खूप खाल्ल्यास दात खराब होणे, अकाली वृद्धत्व, हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना कारणीभूत ठरते, हेही त्या 'इशारा फलका'वर नमूद करायला हवं, असं आयसीएमआर म्हणतं.

तेलाबाबतच्या 'इशारा फलका'वर काय असावं?

एफएसएसएआयच्या मते, दररोज 27 ते 30 ग्रॅमपेक्षा जास्त तेल किंवा फॅट घेऊ नये, अशी शिफारस करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, एखाद्या विशिष्ट प्रमाणातील पदार्थात किती कॅलरीज आणि किती फॅट (तेल/चरबी) आहे, हेही लिहिलं पाहिजे.

समोसा, गुलाबजाम, जिलबी आवडते मग हे वाचाच

फोटो स्रोत, Getty Images

उदाहरणार्थ, 100 ग्रॅम वजनाच्या एका समोशामध्ये 362 कॅलरीज आणि 28 ग्रॅम फॅट असते.

या इशारा फलकांवर साखर आणि तेल कमी खाल्ल्यास दीर्घायुषी, आरोग्यदायी जीवन जगता येतं, अशा प्रकारची जागरूकता वाढवणारी वाक्यंही दिलेली आहेत.

आयसीएमआरच्या तेलासंबंधी इशारा फलकांवर लोकांना आरोग्याशी संबंधित जागरूक करणारी वाक्यं लिहिलेली आहेत,

  • तेल थेट अन्नामध्ये घालू नये, चमच्याने मोजूनच वापरावं.
  • तळलेले पदार्थ न खाता, थोडं तेल वापरुन शिजवलेले पदार्थ खा.
  • जेवणासाठी अशा हॉटेलमध्ये जा, जिथं वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरत नाहीत.
  • घरगुती वापरासाठी तेल थोड्या प्रमाणातच विकत घ्यावं.
  • शरीराला लागणारे सगळे चांगले फॅट्स (चरबी) मिळण्यासाठी नियमित अंतरानं वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरावं.

फलकावर आणखी काय माहिती द्यायला हवी?

अशा इशारा फलकांवर अजून काय माहिती द्यायला हवी, याबद्दल आम्ही चेन्नईतील स्टॅनली सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. एस. चंद्रशेखर यांना विचारलं.

"अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये बहुतांश वेळा पोषणमूल्यच नसतं. त्यामुळे त्यामध्ये प्रोटिन किंवा प्रथिनांसारखी गरजेचे घटक किती आहेत, हेही दाखवायला हवं."

"ते तत्त्व (जसं की प्रोटीन) खूपच कमी असतं किंवा काही वेळा नसतंच. याचा स्पष्ट उल्लेख केल्यास, लोकांना ते अन्न गरजेचं नाही हे हळूहळू लक्षात यायला लागेल," असं ते म्हणाले.

प्रत्येक अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर त्यातील कॅलरीज कमी करायला आपल्याला किती वेळ चालावं लागेल, अशी माहिती दिली, तर ते लोकांना अजून सोपं आणि समजण्यासारखं वाटेल, असं ते म्हणतात.

समोशासारखे जास्त तळलेले पदार्थ सातत्याने खाल्ल्यास लठ्ठपणा आणि हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे अशा इशारा फलकांवर ही माहिती निश्चितपणे लिहायला हवी, असं आहारतज्ज्ञ भुवनेश्वरी सांगतात.

"सुरुवातीलाच अशा प्रकारचं खाणं टाळणं हेच आरोग्यासाठी चांगलं. पण लोकांमध्ये जागरूकता येईपर्यंत, समोशासारख्या पदार्थांना पर्याय म्हणून कँटीनमध्ये आरोग्यदायी पदार्थांचा प्रचार करायला हवा," असं त्या आवर्जुन सांगतात.

अशा इशारा फलकांना मोठ्या बॅनरसारखं, चित्रांसह आणि सोप्या भाषेत तयार करायला हवं, असं भुवनेश्वरी म्हणतात.

तसंच, ते स्थानिक भाषेत आणि सर्वांना समजेल अशा सामान्य भाषेत असतील, तर जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, असंही त्या सांगतात.

साखर आणि तेलकट पदार्थ धोकादायक का आहेत?

तेलकट आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यातून उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, स्ट्रोक यांसारखे अनेक जीवनशैलीचे आजार होऊ शकतात, असं त्या सांगतात.

"अति साखर आणि मैद्याचे (स्टार्च) पदार्थ काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांना, जसं की स्वादुपिंडाचा आणि स्तनांचा कर्करोग यास कारणीभूत ठरू शकतात.

"मधुमेह असलेल्या लोकांना काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. म्हणूनच साखर आणि तेल हे दोन्हीही धोकादायक घटक आहेत," असं डॉ. चंद्रशेखर सांगतात.

"प्रिझर्व म्हणजेच प्रक्रिया केलेले, तळलेले आणि पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलात बनवलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट (एक प्रकारची अपुरी चरबी) असते. यात जास्त प्रमाणात फॅटी अॅसिड्स असतात, ज्यामुळे फॅटी लिव्हर (चरबी जमा होणं) होण्याची शक्यता वाढते."

"अशी चरबी रक्तवाहिन्या, मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडामध्ये जमा होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे, मैद्याचे पदार्थ (कार्बोहायड्रेट्स) जास्त खाल्ल्यावर आणि ते खर्च न केल्यास, ती चरबी यकृतात आणि इतर टिश्यूंमध्ये ग्लायकोजेन म्हणून जमा होते. यामुळे शरीरात सूज निर्माण होऊन कर्करोगाचा धोका वाढू शकतो," असं डॉ. चंद्रशेखर सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)