You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलचा मध्य गाझामधील मशीद आणि शाळेवर हल्ला, 26 जणांचा मृत्यू
इस्रायल-हमास संघर्षाला उद्या (7 ऑक्टोबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात मध्य पूर्वेचा भाग अक्षरश: संघर्षाची रणभूमी झालीय.
काही दिवसांपूर्वी इराणनं इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे तर या भागात युद्धजन्य स्थिती निर्माण झालीय. त्यातच इस्रायलनं पुन्हा एकदा गाझामधील हल्ले सुरू केले आहेत.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी मध्य गाझामधील दैर-अल-बालाहमधील मशीद आणि विस्थापितांना आश्रय देणाऱ्या शाळेवर हल्ला केला असून, यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हमसच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
या हल्ल्यात किमान 20 जण जखमीही झाल्याचे डॉक्टर आणि हमासच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितलं. या मशिदीत विस्थापित लोक राहत होते.
इस्रायलने मात्र हमास कमांडच्या तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
पॅलेस्टिनी माध्यमांचे म्हणणे आहे की, उत्तर गाझामधील जबालियाजवळील बैत लाहिया शहरात इस्त्रायलने जोरदार बॉम्बहल्ला केला, यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
इस्त्रायली सैन्यानं म्हटलं आहे की, शनिवारी (6 ऑक्टोबर) जबालिया येथील यूएन कंपाउंडमधील हमासच्या तळांना लक्ष्य केलं.
‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, इस्रायलच्या पंतप्रधानांचा फ्रान्सवर हल्लाबोल
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला शस्त्र पुरवठ्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी निषेध केला आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्याला 'ढोंगी' म्हटलं. तसंच, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असंही नेतन्याहू म्हणाले.
इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवावा आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम व्हावा, असं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं होते.
यानंतर नेतन्याहू यांनी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. नेतन्याहू म्हणाले की, “आज इस्रायल संस्कृतीच्या शत्रूंविरुद्ध सात आघाड्यांवर लढत स्वतःचं संरक्षण करत आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या, बलात्कार आणि लोकांना जिवंत जाळणाऱ्या हमासविरोधात आम्ही लढत आहोत.”
नेतन्याहू पुढे म्हणाले की, “आम्ही लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरोधात लढतोय. हिजबुल्लाह जगातील सर्वात सशस्त्र दहशतवादी संघटना आहे. ही संघटना उत्तरेकडील सीमेवर 7 ऑक्टोबर 2023 पेक्षाही मोठ्या नरसंहाराचा कट आखत होती.
"आम्ही येमेनमधील हुथींविरुद्ध, सीरिया आणि इराकमधील शिया कट्टरतावाद्यांविरुद्ध लढत आहोत. इस्रायलवर 200 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागणाऱ्या इराणविरुद्ध लढत आहोत. इराणच्या नेतृत्वातील शक्तींशी इस्रायल लढत असताना, सर्व देशांनी आमच्या पाठीशी खंबरीपणे उभं राहिलं पाहिजे. तरीही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि इतर पाश्चिमात्य नेते आता इस्रायलविरुद्ध शस्त्रसंधीची मागणी करत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.