You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खोटं पोलीस स्टेशन उघडून तरुणांची फसवणूक झाल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
खोटे पोलीस ठाणे सुरू करून नोकरी देण्याच्या नावाखाली तरुण-तरुणींना फसवल्याचा प्रकार बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्यातून समोर आला आहे.
मोहनी ग्रामपंचायतीच्या भागात मुख्य पोलीस ठाण्याचं तात्पुरतं कॅम्प ऑफिस उघडलं असल्याचं सांगून तिथं तरुणांना प्रशिक्षण आणि नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप एका तरुणावर केला जात आहे.
बिहार ग्राम संरक्षण दल आणि गृहरक्षक दलात नोकरी मिळवण्यासाठी डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या काळात या पोलीस ठाण्यात खोटं प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
मात्र, यात खोट्या पोलीस ठाण्यासारखं कोणतंही प्रकरण नसल्याचं पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय के. शर्मा बीबीसीशी बोलताना म्हणालेत.
"पंचायत राज विभागाअंतर्गत ग्राम संरक्षण दलासाठी 30 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रकरणातले मुख्य आरोपी राहुल कुमार साह याच बिहार ग्राम संरक्षण दलाशी जोडलेले आहेत," असं शर्मा यांनी सांगितलं.
"राहुलनेच काही लोकांना नोकरी देण्याच्या नावाखाली फसवलं आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे अशा 25 तक्रारी आल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात सरपंचांचीही चौकशी केली जाणार आहे," असंही ते पुढे म्हणाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहनी ग्रामपंचायतीतील बेतौना या गावातल्या सरकारी शाळेत डिसेंबर 2024 मध्ये युवकांना एक महिन्याचं खोटं प्रशिक्षण दिलं गेलं. शाळेबाहेर 'बिहार राज्य दलपती आणि ग्राम संरक्षण दल' असा बॅनरही लावण्यात आला होता.
बिहारमधल्या ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत ग्राम संरक्षण दल काम करतं. यात 18 ते 30 वयोगटातल्या युवकांची निवड केली जाते.
आग, पूर, साथरोग नियंत्रण, शांतता प्रस्थापित करणे, गर्दी हाताळणे अशा कामांसाठी या दलाला तैनात केलं जातं.
त्यासाठी लागणारं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी नोकरीच्या नावाखाली त्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार केली होती.
अशा फसवणुकीत अडकलेल्या अनेकांशी बीबीसीने संवाद साधला. बी. कॉमचा अभ्यास करणारी 23 वर्षांची संजना कुमारी हिनेही या प्रकरणात कसबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
संजना सांगते, "जवळपास 9 महिन्यांपूर्वी आमच्याकडून 1500 रुपये घेतले गेले होते. आम्ही काही दिवस बेतौनच्या शाळेत प्रशिक्षणासाठीही गेलो होतो. ग्राम संरक्षण दलाला मान्यता मिळाली, तर आम्हा सगळ्यांना सरकारी नोकऱ्या मिळतील, असं राहुलने सांगितलं होतं. पण आता तोच फरार आहे."
संजना पुढे म्हणाली, "आम्ही त्याला एनसीसीच्या माध्यमातून ओळखत होतो आणि त्याला भाऊही मानलं होतं. गेल्या एका वर्षात त्याने जवळपास 300 लोकांना फसवलं आहे".
"त्याने सरकारी शाळेत पोलीस ठाणे उघडले आणि स्वतः पोलीस बनून फिरत होता. खरं तर त्याचं पदवी शिक्षणही पूर्ण झालेलं नाही," अशी माहिती आणखी एका महिलेने दिली.
"त्याने माझ्या आईलाही गणवेश दिला आणि म्हणाला की सरकारी नोकरी लागली आहे. पण आईला एकदाही पगार मिळाला नाही. गणवेशावर बीजीआरडी (बिहार ग्राम रक्षा दल) असं लिहिलं होतं."
"तो 10 ते 15 हजार रूपये मागत असे आणि 22 हजार रुपये पगार मिळेल, असं सांगत असे. त्याने मलाही त्यांच्यात सहभागी व्हायला सांगितलं होतं. मात्र, मला शंका आली होती," महिला पुढे म्हणाली.
राहुलने भागलपूर, सुपोल, पूर्णिया, कटिहार यासारख्या अनेक जिल्ह्यातल्या तरुणांना नोकरीच्या नावाखाली फसवलं आहे, असा दावा अनेकांनी केला आहे.
नरेश कुमार राय सांगतात, "बेरोजगारी इतकी होती की, मी विचार न करता ग्राम संरक्षण दलाचा अर्ज भरला. त्यानंतर राहुलचा फोन आला आणि माझी निवड झाली आहे, असं त्याने सांगितलं."
"आधी मी त्याला उधारी घेऊन 1500 रूपये आणि नंतर 2500 रूपये दिले. नोकरी मिळेल असं तो म्हणालेला. पण नंतर तो धमक्या देऊ लागला."
कसबा पोलीस ठाण्याचा 'मोहनी' विभाग
स्थानिक पत्रकार सैय्यद तहसीन अली सांगत होते, "बेतौनमधल्या उप-प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका इमारतीत शाळा चालवली जाते, तर दुसरी इमारत मोकळी आहे. राहुलने या मोकळ्या इमारतीलाच पोलीस ठाणे बनवले."
"ते ठाणे एकप्रकारे कसबा पोलीस ठाण्याचा मोहनी ग्रामपंचायत विभाग आहे, असं तो सांगत असे. त्यात पोलिसांच्या गणवेशात बसून तो बेरोजगार युवकांना फसवत होता."
"गावकरी आणि लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी पोलिसांसोबत सेल्फी घेऊन तो सोशल मीडियावर टाकत होता."
25 वर्षांच्या राहुल कुमार साह एनसीसीचा विद्यार्थी होता आणि त्याला बहुतेकजण त्या माध्यमातूनच ओळखत होते.
राहुलने डिसेंबर 2024 ला बेतौनच्या शाळेत 'बिहार राज्य दलपति आणि ग्राम रक्षा दल' अस बॅनर लावला होता. या बॅनरचे फोटो उपलब्ध आहेत. त्यावर खाली कसबा स्टेशन लिहिल्याचं दिसतं.
मोकळ्या पडलेल्या शाळेत राहुलने एक महिना प्रशिक्षण भरवलं आणि 26 जानेवारी 2025 ला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहनीचे सरपंच श्यामसुंदर उरांव यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं होतं.
श्यामसुंदर उरांव यांनी हे खोटं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींचा सन्मान केला. राहुल कुमार साहने या प्रशिक्षणानंतर बनावट ओळखपत्रांचंही वाटप केलं.
श्यामसुंदर उरांव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मला काहीही माहीत नव्हतं. राहुल आला आणि त्याने प्रशिक्षण दिलं. पोलीस ठाण्यात याची माहिती असेल, असा आमचा समज झाला."
"तो मुला-मुलींकडून तीन तास प्रशिक्षण करून घेत होता. मी सरपंच आहे. कोणीही कोणत्याही समारंभासाठी बोलावलं तर मला जावं लागतं."
अशा पद्धतीचं काम शाळेत करण्यासाठी परवानगी घेतली होती का? त्यावर उरांव म्हणाले, "गावातले शिक्षक त्याला कॅम्पचं सरकारी पत्र वारंवार मागत होते. पण राहुलने कधी दिलं नाही. पत्र पाटणावरून येत आहे, असं म्हणून तो सतत टाळत राहिला. ते सोडता शंका येईल असं काहीही प्रशिक्षण सुरू असताना झालं नाही."
सध्या राहुल कुमार साह फरार झाला आहे आणि सरपंच श्यामसुंदर उरांव यांची पोलीस चौकशी करत आहेत.
'जत्रेत ड्युटी आणि वाहनांची तपासणी'
राहुलने प्रशिक्षण दिल्यानंतर काही तरुणांना एका जत्रेत ड्युटीवरही पाठवलं होतं. अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यासाठीही त्याने तरुणांना सांगितलं होतं.
स्थानिक पत्रकार पंकज यादव सांगतात, "राहुल तरुणांत मोहनी ग्रामपंचायतीच्या भागातल्या वाहनांची, दारूची तपासणी, चौकीदारी अशी कामं लावत असे. हेल्मेट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या वाहनचालकांकडून 400 रूपयांचा दंड घेत असे.
अवैध दारू सापडल्यास ती पकडून ठाण्यात आणली जात असे. कसबा पोलीस ठाणे बेतौनापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असताना हे सगळं सुरू होतं."
पीडित संजीव कुमार याने राहुलकडून मिळालेलं ओळखपत्र घेऊन दोन दिवस जत्रेत ड्युटीही केली होती.
"राहुल एनसीसीत आमच्यापेक्षा वरिष्ठ तुकडीत होता. ग्राम संरक्षण दलाची भरती निघाली आहे, असं त्यानेच मला सांगितलं. कोणतीही परिक्षा न घेता थेट भरती होणार आहे आणि जातीवरून मला सवलत मिळेल असंही तो म्हणाला," संजीव सांगत होता.
"आम्ही आधी त्याला दीड हजार रूपये दिले. मग आयकार्डसाठी 200 रुपये दिले. आम्ही गणवेशही शिवून घेतले. त्याने दोन दिवस जत्रेत ड्युटीही करून घेतली. पण कोणतंही अधिकृत पत्र न देता तो फरार झाला."
तो ज्यांना नोकरी देणार होता त्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुपही त्याने तयार केला होता.
पीडित अनिल कुमार सांगतो, "त्याने आम्हा सगळ्यांकडून 10 हजार रुपये घेतले होते आणि 15 ते 20 लाखाला फसवलं. आम्हाला सत्य कळालं तेव्हा आम्ही त्याच्या घरी जाऊन पैसे परत मागू लागलो. पण तो पळून गेला आहे."
पण पूर्णियाचे एसपी कार्तिकेय शर्मा या गोष्टींना नकार देतात.
"जत्रेत ड्युटी कशी लागू शकते? वाहन किंवा दारू तपासणी केल्याचंही अजून समोर आलेलं नाही," असं ते म्हणाले.
आत्तापर्यंत झालेल्या तपासामधून राहुलने नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांकडून दोन ते अडीच हजार रूपये घेतले आहेत, असं शर्मा यांनी सांगितलं.
दुसरीकडे, बिहारच्या ग्राम संरक्षण दलात खरोखर काम करणारे युवक अनेक वर्षांपासून सरकारी नोकरीची मागणी करत आहेत.
"सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही. पण ग्राम संरक्षण दल आणि दलपतीत भरतीच्या नावाखाली सगळ्या बिहारमध्ये फसवणूक सुरू आहे," दलपती संघाचे महासचिव रवी रंजन म्हणाले.
खोट्या पोलीस ठाण्याची ही बिहारमधली पहिली घटना नाही. याआधी 2022 मध्ये बांका जिल्ह्यातही एक असंच प्रकरण समोर आलं होतं. त्यात पोलीस निरीक्षकापासून हवालदारापर्यंत सगळे खोटे होते.
2024 ला जमुईच्या सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अशाच एका खोट्या आयपीएसला अटक करण्यात आली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.