सद्दाम हुसेनच्या सैन्याने बुडवलं सर्वात मोठं जहाज, जे भारतात आणून भंगारात काढलं गेलं

फोटो स्रोत, AUKEVISSER
'सीवाइझ जायंट’चं आपल्या तीस वर्षांच्या आयुष्यात, 'जगातील सर्वात मोठं जहाज', 'मानवनिर्मित सर्वात मोठं जहाज' आणि ‘सर्वाधिक तेल वाहून नेण्याची क्षमता असलेलं जहाज' अशा विशेषणांनी वर्णन केलं गेलं.
‘हॅप्पी जायंट’, ‘जाहरे वायकिंग’, ‘नोक नोव्हिस’ आणि ‘मॉन्ट’ या नावांनी देखील हे जहाज ओळखलं जात असे. त्याला ‘सुपर टँकर’ असंही म्हटलं जायचं.

फोटो स्रोत, AUKEVISSER/TOBY YOUNG
एकीकडे या जहाजामध्ये लाखो लीटर तेल वाहून नेण्याची क्षमता होती, तर दुसरीकडे आपल्या प्रचंड आकारामानामुळे ते अनेक बंदरांमध्ये नांगरता येत नसे. इतक्या मोठ्या आकारमानामुळे त्याला सुएझ कालवा आणि पनामा कालव्यासारखे अनेक महत्त्वाचे सागरी मार्ग ओलांडणंसुद्धा शक्य नव्हतं.
सद्दाम हुसेनच्या सैन्याने या जहाजावर हल्ला करून आग लावली होती, ज्यामुळे त्याला जलसमाधी प्राप्त झालेली.
परंतु प्रत्येक मोठ्या सागरी कथेप्रमाणे ही विनाशकारी घटना ही त्या जहाजाची शेवटची गोष्ट नव्हती.
जगातील सर्वात मोठ्या जहाजाची बांधणी कोणत्या देशात झालेली?
या सुपर टँकरची बांधणी सुरुवातीला 1979 साली जपानमधील ओपामा येथील सुमितोमो हेवी इंडस्ट्रीज शिपयार्डमध्ये झालेली.
विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे जहाज बांधण्याचा आदेश एका ग्रीक व्यावसायिकाने दिला होता, परंतु ते बांधून तयार झाल्यावर त्याने ते विकत घेतलं नाही.
नंतर 1981 साली हाँगकाँगचा एक व्यावसायिक टिंग चाओ यिंग याने ते विकत घेतलं. ओरिएंट ओव्हरसीज कंटेनर लाइन या सागरी शिपिंग कंपनीचे ते मालक होते.

फोटो स्रोत, UKEVISSER/TOBY YOUNG
हाँगकाँगच्या सागरी संग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार, जहाज खरेदी केल्यानंतर नवीन मालकाला असं वाटलं की त्याचा आकार आणखी मोठा असायला हवा. त्यामुळे नवीन भाग जोडून त्याचा आकार वाढवण्यात आला, त्यानंतर त्याची तेल वाहून नेण्याची क्षमता एक लाख चाळीस हजार टनांनी वाढली.
या सुपर टँकरची विक्रमी लांबी 458.45 मीटर होती. मलेशियाचा 'पेट्रोनास टॉवर' आणि न्यूयॉर्कच्या एम्पायर इस्टेट बिल्डिंगच्या उंचीपेक्षा त्याची लांबी अधिक होती.
किती तेल वाहून नेण्याची क्षमता होती?
या जहाजात अंदाजे चार अब्ज बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता होती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एवढ्या तेलात एक साधी गाडी दहावेळा सूर्यापर्यंत जाऊन परत येऊ शकेल.
हे जहाज जगातील आत्ताचं सर्वात मोठं क्रूझ जहाज असलेलं 'आयकॉन ऑफ द सी' पेक्षा अंदाजे 100 मीटर लांब आणि प्रसिद्ध टायटॅनिक जहाजापेक्षा 200 मीटर लांब आहे.

फोटो स्रोत, AUKEVISSER/TOBY YOUNG
हे जहाज जर पूर्ण क्षमतेनं भरलं गेलं तर त्याचं वजन 6 लाख 57 हजार टन होई आणि एवढं अवजड जहाज चालवण्यासाठी दररोज 220 टन इंधन लागत असे.
1998 मध्ये बीबीसीने या जहाजाला भेट दिलेली तेव्हा जहाजाचे कॅप्टन सुरेंद्र कुमार मोहन यांनी सांगितलेलं की, समुद्रात हे जहाज सुमारे 16 नॉट्स किंवा ताशी 30 किलोमीटर वेगानं मार्गक्रमण करू शकतं.
जगातील सर्वाधिक लांबीचं जहाज कसं चालायचं?
जहाजाच्या कॅप्टनच्या म्हणण्यानुसार, हे जहाज एखाद्या ठिकाणी थांबवायचं असेल तर किमान आठ किलोमीटर अगोदर ब्रेक लावावा लागत असे.
शिवाय जहाजाला विरुद्ध दिशेला वळवणं देखील अवघड काम होतं, कारण त्यासाठी तीन किलोमीटर जागेची आवश्यकता असायची.
परंतु बीबीसीने ज्या जहाजाला भेट दिलेली त्याची नंतर दुरुस्ती करून पुनर्बांधणी करण्यात आलेली.
जेव्हा मध्य पूर्व आणि पाश्चिमात्य देशांदरम्यान तेल व्यापार शिखरावर होता, तेव्हा या सुपर टँकरने जगभरात फक्त तेल वाहून नेलं नाही तर तरंगणा-या कोठाराची भूमिका देखील बजावली.
1988 साली इराणच्या लार्क बेटावर नांगरलेलं असताना या जहाजाने आपला शेवटचा प्रवास पूर्ण केला. त्यावेळी आखातात इराक आणि इराणमधील युद्ध अंतिम टप्प्यात होतं.
सद्दाम हुसेनच्या सैन्याने कोणतीही पूर्वसूचना न देता या जहाजावर बॉम्बने हल्ला केला होता. या हल्ल्यात जहाजाला आग लागली आणि त्याला जलसमाधी प्राप्त झाली.
युद्ध संपल्यानंतर नॉर्वेजियन कंपनी नॉर्मन इंटरनॅशनलने जहाज वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. 1991 मध्ये 3700 टन स्टीलचा वापर करून त्याची दुरुस्ती करण्यात आली आणि ते पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्यावर तरंगायला लागलं.
पण आता त्याचं नाव ‘सीवाइझ जायंट’ राहिलेलं नव्हतं. आता ते ‘हॅप्पी जायंट’ नावाने ओळखलं जात होतं.
महाकाय जहाजाचा शेवटचा मुक्काम
दुरुस्तीनंतर, हा सुपर टँकर पुन्हा एकदा सेवेत दाखल झाला, परंतु आता त्याची मालकी व्यापारी वाहतूक कंपनी ‘केएस’कडे होती आणि त्याचं नाव बदलून 'जाहरे वायकिंग' असं ठेवण्यात आलं होतं.
परंतु नव्वदच्या दशकात जहाज उद्योगात कमी इंधन वापरणाऱ्या टँकरचा वापर वाढू लागलेला आणि त्यामुळे याला फारशी पसंती दिली जात नव्हती.
याशिवाय त्याचं आकारमान त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. कारण प्रचंड आकारमानामुळे त्याला सुएझ कालवा आणि पनामा कालवा ओलांडणं शक्य नव्हतं.

फोटो स्रोत, AUKEVISSER/HONZA PLENER
2004 साली ‘नॉर्वेजियन फर्स्ट ऑलसन टँकर्स’ या नॉर्वेजियन कंपनीने हे जहाज विकत घेतलं आणि त्याला त्याचं रूपांतर एका तरंगणा-या तेलाच्या गोदामात केलं. 'नोक नोव्हिस' असं त्याचं नामकरण करण्यात आलं आणि त्याला कतारच्या किनाऱ्यावर नेण्यात आलं.
शेवटी 2009 मध्ये ते निवृत्त झालं. त्यावेळी पुन्हा एकदा त्याचं नाव बदलून 'मॉन्ट' असं ठेवण्यात आलं आणि त्याचे तुकडे (भंगार) करण्यासाठी त्याला भारतात आणण्यात आलं.
ज्या ठिकाणी त्याला जगातील सर्वात मोठ्या जहाजाचा सन्मान प्राप्त झालेला, त्या हाँगकाँगमधील बंदरातच ‘सीवाइझ जायंट’ हे शेवटी मुक्कामी गेलं. आता त्याचा फक्त 36 टनाचा सांगाडा शिल्लक आहे, जो हाँगकाँगमधील मेरीटाईम संग्रहालयात ठेवण्यात आलाय.











