हेल्दी मॅस्क्युलिनिटी : चांगला पुरुष असणं म्हणजे नेमकं काय?

प्रतिकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

पुरुषांनी कसं दिसावं, काय करावं, काय करू नये? कदाचित जगाची निर्मिती झाल्यापासूनच याविषयी एक मत तयार झालं आहे.

जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्मांच्या आधारावर यात काही फरक असू शकतात, पण पुरुषांची प्रतिमा कमी-अधिक प्रमाणात सारखीच राहिली आहे.

आपण आपल्या घरात, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलत असताना, मीडिया, चित्रपटातून किंवा अनेक पिढ्यांपासून काही गोष्टी ऐकत आलो आहोत. जसं की, जसं पुरुषांना वेदना होत नाहीत, तो पुरुष असूनही रडतो, तो कसला पुरुष आहे तो मार खाऊन परत आला, त्यानं बांगड्या भरल्या आहेत इत्यादी.

खरं तर अशा प्रकारचा विचार हा आपल्या पुरुषप्रधान समाजाचा आरसा आहे.

पैसा कमावणं आणि घर चालवणं ही पुरुषांची जबाबदारी आहे, सर्व कष्टाची काम फक्त पुरुषच करू शकतात, घरातील सर्व बाबतीत अंतिम निर्णय पुरुषच घेतील इत्यादी विचारसरणी आपल्या सामाजिक विचारांचा एक भाग बनलीय.

पंजाब युनिव्हर्सिटीच्या वुमन स्टडीज विभागाच्या प्रोफेसर डॉ. अमीर सुल्ताना सांगतात की, हा एक 'सोशल कन्स्ट्रक्ट' आहे, म्हणजेच ते समाजानं तयार केलं आहे.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "पुरुषांबद्दल अशा प्रकारची विचारसरणी समाजानं निर्माण केली आहे आणि त्याचा निसर्गाशी काहीही संबंध नाही."

त्या पुढे सांगतात की, "म्हणूनच आपण हे देखील पाहतो की वेगवेगळ्या समाजांमध्ये पुरुषत्वाच्या वेगवेगळ्या व्याख्या असू शकतात, परंतु त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे पुरुष अधिक शक्तिशाली आहे आणि म्हणून तो अंतिम निर्णय घेईल."

पुरुषांसाठी एका विशेष शब्दाचा वापर

2018 मध्ये जेव्हा जगभरात #MeToo मोहीम सुरू झाली तेव्हा पुरुषांबद्दल अशा प्रकारच्या मानसिकतेसाठी एक विशेष शब्द वापरला जाऊ लागला आणि तो विशिष्ट शब्द होता 'टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी'.

याला आपण असं समजू या की, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पुरुष आहात तर तुम्हाला ते एका विशिष्ट पद्धतीनं प्रदर्शित करावं लागेल.

पुरूष बलवान आहे आणि स्त्री कमकुवत आहे, हे फक्त तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं नाही तर हे तुमच्या वागण्यातूनही दिसून आलं पाहिजे.

जर तुमची ही विचारसरणी असेल तर ते प्रत्यक्षात पुरुषत्व नसून ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ आहे.

मग पुढचा प्रश्न असा पडला की शतकानुशतकं चालत आलेली पुरुषांची विचारसरणी जर पुरुषत्व नसून ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी' असेल तर खरं पुरुषत्व म्हणजे काय?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात एक नवीन शब्द पुढे आला आणि त्याला 'हेल्दी मॅस्क्युलिनिटी' किंवा 'पॉझिटिव्ह मॅस्क्युलिनिटी' असं म्हणतात.

प्रतिकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

गॅरी बार्कर हे 'इक्युमुंडो सेंटर फॉर मॅस्क्युलिनिटीज अँड सोशल जस्टिस'चे सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. ते ‘मेनकेअर’ आणि ‘मेनएंगेज’ नावाच्या संस्थांचे सह-संस्थापक देखील आहेत.

मेनकेअर ही 50 हून अधिक देशांमध्ये चालणारी एक जागतिक मोहीम आहे ज्याचा मुख्य उद्देश पुरुषांना 'केअरगिवर' (काळजी घेणारा) ची भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहित करणं आहे.

मेनएंगेज ही जगभरातील सातशेहून अधिक अशासकीय संस्थांची जागतिक संघटना आहे.

गॅरी बार्कर हे इंटरनेशनल मेन एंड जेंडर इक्वॅलिटी सर्वे (IMAGES) चे सह-संस्थापक आहेत.

पुरुषांची वर्तणूक, वडिलांची जबाबदारी, हिंसा आणि लैंगिक समानता याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन याबाबत आतापर्यंत केलेलं हे जगातील सर्वात मोठं सर्वेक्षण आहे.

गॅरी बार्कर यांनी बीबीसी रीलकडे त्यांचे विचार व्यक्त केले.

चांगला मुलगा असणं म्हणजे काय?

बीबीसी रील्सशी बोलताना ते म्हणाले की, चांगला मुलगा किंवा पुरुष असणं म्हणजे नेमकं काय याविषयी अनेक मुलं आणि पुरुष खूप गोंधळलेले असतात.

बार्कर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना त्यांच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, जेव्हा पुरुष कुटुंबात एकमेकांची काळजी घेतात तेव्हा संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो.

त्यांच्या मते, हेल्दी पुरुषत्व ही स्त्रीविरोधी 'टॉक्सिक' विचारसरणी कमी करण्यासाठी एक इलाज किंवा लस आहे.

ते म्हणाले की, सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुरुषांना जाणीव करून देणं हा आहे की, लैंगिक छळ किंवा महिलाविरोधी कोणताही विनोद ऐकल्यावर त्यांनी त्याविरोधात ताबडतोब आवाज उठवला पाहिजे.

प्रतिकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे म्हणतात की जेव्हा एखाद्या पुरुषाला कळतं की त्याच्या ऑफिसमध्ये किंवा त्याच्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या वर्तुळात कोणीतरी लैंगिक हिंसाचार करत आहे, तेव्हा त्यानं त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

पंजाब युनिव्हर्सिटीच्या डॉ. अमीर सुलतानाही म्हणतात की, समाजात महिला आणि मुलींसोबत काही चुकीचं घडत असेल तर पुरुषांनी त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

डॉ. सुलताना यांच्या मते ही 'पॉजिटिव्ह मॅस्क्युलिनिटी' आहे.

याचे उदाहरण देताना त्या सांगतात की, "जर पुरुष म्हणून तुम्हाला घरचे निर्णय घेण्याचा अधिकार असेल, तर मुलगा हुंडा न घेता लग्न करणार आहे, असं म्हटल्यास ते 'पॉझिटिव्ह मॅस्क्युलिनिटी ' (सकारात्मक पुरुषत्व) उदाहरण ठरेल."

टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बार्कर यांच्या मते, महिला सक्षमीकरण आणि संपूर्ण लैंगिक समानतेच्या प्रवासात पुरुषांची भूमिका महत्त्वाची आहे.

मुंबईतील हरीश अय्यर, जे भारतात समलिंगी हक्कांसाठी वर्षानुवर्षे लढत आहेत, ते असं मानतात की हेल्दी मॅस्क्युलिनिटी म्हणजे अशी मानसिकता असणं ज्यामध्ये सर्व जेंडरसाठी समान स्थान आहे आणि सर्वांना समान संधी आहे.

बीबीसी हिंदीच्या फातिमा फरहीन यांच्याशी बोलताना हरीश अय्यर म्हणाले की, हेल्दी मॅस्क्युलिनिटीच्या विचारधारेच्या मुळाशी स्त्रीवाद किंवा फेमिनिझम आहे.

स्त्रीवादाचा असा विश्वास आहे की समाज पुरुषांच्या दृष्टिकोनाला प्राधान्य देतो आणि पुरुषप्रधान समाजात महिलांना भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागतो.

हरीश अय्यर म्हणतात की हेल्दी पुरुषत्व ही देखील तीच कल्पना आहे परंतु फरक एवढाच आहे की फक्त महिलांनाच नाही तर सर्व लिंगांसाठी समान संधी असायला हवी.

हल्ली 'पॉजिटिव्ह मॅस्क्युलिनिटी'बद्दल जास्त का बोललं जातं या प्रश्नाचं उत्तर देताना हरीश अय्यर म्हणतात की, समाजात 'टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी'बद्दल बोललं जात असताना अशा

पुरोगामी विचारसरणीच्या विरोधातही बोललं जाणं स्वाभाविक आहे.

हरीश अय्यर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की टॉक्सिक मॅस्क्युलिनिटीचा संबंध फक्त पुरुषांशीच नसतो, काही स्त्रियाही 'टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी'ला प्रोत्साहन देतात.

'बांगड्या निषेधाचं प्रतीक बनल्या'

डॉ.अमीर सुल्ताना या तेच मानतात, त्या म्हणतात की, "स्त्रिया देखील त्याच समाजाचा एक भाग आहेत जिथं आपण पुरुषत्वाला जास्त महत्त्व देतो. स्त्रिया स्वतः कधी कधी राजकीय आंदोलनात सहभागी होतात आणि मग जाऊन त्यांच्या बांगड्या कुठल्यातरी अधिकारी किंवा राजकारण्याला देतात.ते बांगड्यांना निषेधाचे प्रतीक बनवतात.”

गेल्या काही वर्षांत पुरुषांच्या विचारसरणीतही बदल होताना दिसत असल्याचं गॅरी बार्कर यांचं मत आहे.

ते म्हणाले की, पुरुषांनाही याची जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं आहे. जर हे जग स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करत असेल तर पुरुषांसाठीही हा एक फायदेशीर करार आहे.

स्त्री-पुरुष समानतेच्या या लढ्यात पुरुषांनी महिलांच्या पाठीशी उभे राहिल्यास, या संपूर्ण प्रक्रियेत ते एक चांगले व्यक्ती बनतील.

प्रतिकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

क्विअर फेमिनिस्ट ग्रुप 'नझरिया'चे सीनियर प्रोग्राम कॉर्डिनेटर झयान म्हणतात की हेल्दी मॅस्क्युलिनिटी म्हणजे समाजाच्या प्रस्थापित नियमांना आणि दृष्टीकोनाला आव्हान देऊ शकते.

बीबीसीच्या फातिमा फरहीन यांच्याशी बोलताना ते म्हणतात की, "जसं समाजात घरगुती हिंसाचार वाढू लागला आणि त्याची चर्चा होऊ लागली, तेव्हा लोकांना असं वाटलं की या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅस्क्युलिनिटीच्या बाबत पुरुषांशी थेट बोलणं होय."

त्यांच्या मते पुरुषांना सांगितलं जाऊ लागलं की पुरुषत्वाची जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती योग्य नाही.

दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे

झयान सांगतात की, सध्या ज्या प्रकारच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोललं जात आहे, त्यात पारंपारिक पुरुषत्वाचा (मॅस्क्युलिनिटी) विचारसुद्धा कार्यरत आहे.

ते म्हणतात, “भारतात 'वेल्दी मॅस्क्युलिनिटी'बद्दल बोललं जात आहे, परंतु त्याबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज आहे. "आपल्या मुलांचं संगोपन कसं करावं, त्यांचं पालनपोषण कसं करावं हे संस्था लोकांना सांगत आहेत."

यात लोकांची विचारसरणी आणि पालक काय भूमिका बजावू शकतात?

याबाबत डॉ. अमीर सुल्ताना सांगतात की, “ मुलगा आणि मुलगी दोघंही समान आहेत हे आपण मुलांना सुरुवातीपासून शिकवलं तरच अशा प्रकारची विचारसरणी बदलू शकते.

एक चांगला पुरुष तेव्हाच बनू शकतो जेव्हा तो प्रथम चांगला माणूस बनेल.

डॉ. सुल्ताना म्हणतात की, आता हे फक्त स्त्री-पुरुषांबद्दल नाही, तर आता एलजीबीटीआयक्यू यांनाही लागू होतं.

त्यांच्या मते संपूर्ण समाज बदलला पाहिजे तरच समाजाची प्रगती होऊ शकते

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)