सुब्रत रॉय यांचं निधन; स्कूटरवरुन केली उद्योगाची सुरुवात पण बेकायदेशीर बाँडमुळे आले अडचणीत

फोटो स्रोत, TWITTER
प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय (75) यांचं मंगळवारी रात्री मुंबईत निधन झालं आहे. रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
सुब्रत रॉय यांनी 2009 साली त्यांच्या दोन कंपन्यांमार्फत बेकायदेशीर बाँडद्वारे सुमारे 240 अब्ज रुपये उभे केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही ते गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यात आली होती.
सहारा समूहाची संपत्ती 682 अब्ज रुपयांची होती. अर्थक्षेत्रात करिअरची सुरुवात करून त्यांनी उत्पादन, हवाई वाहतूक आणि माध्यम व्यवसायातही आपलं अस्तित्व उभं केलं होतं.

फोटो स्रोत, TWITTER
परदेशात व्यवसाय
भारतातील आघाडीचे उद्योगपती आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक म्हणून त्यांना देशभर 'सहराश्री' म्हणूनही ओळखलं जातं.
त्यांचा व्यवसाय परदेशातही पसरला होता. न्यूयॉर्कमधील लँडमार्क प्लाझा हॉटेल आणि लंडनमधील ग्रोसव्हेनॉर हाऊसही त्यांच्या मालकीचे आहेत.
कधी काळी सहारा इंडिया भारतीय हॉकी संघाचा प्रायोजक होता. फोर्स इंडिया नावाच्या फॉर्म्युला वन रेसमध्येही त्यांची गुंतवणूक होती. आयपीएल संघाची मालकी आणि एअरलाइन्सही त्यांच्या समुहात होती.
11 लाखांहून अधिक कर्मचार्यांना रोजगार देणारी सहारा इंडिया ही देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील कंपनी होती.
आलिशान जीवनशैली आणि राजकीय नेत्यांशी संबंध यामुळे सुब्रत रॉय अनेकदा चर्चेत राहायचे.

फोटो स्रोत, TWITTER
लखनौमधील प्रत्येकजण सुब्रत रॉय यांना ओळखत होता कारण ते हजरतगंजमध्ये त्यांच्या काळातील सर्वात मोठ्या चित्रपट कलाकारांसोबत खुल्या कारमध्ये खरेदीसाठी जायचे.
तत्कालीन पंतप्रधान त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना येत असत.
याशिवाय, 370 एकरची सहारा सिटी ही एक दंतकथा होती, जिथे शपथ घेतल्यानंतर उत्तर प्रदेशचं सरकार नाश्त्यासाठी जायचं.
आता सहारा सिटीच्या दुर्लक्षित बागांमध्ये उंचच उंच गवत वाढलंय, त्यामुळे अनेक प्राणी चरण्यासाठी या सिटी मध्ये येत असतात. कंपनी बंद पडण्याच्या आधी दीड वर्ष कर्मचारी तात्पुरत्या पगारावर काम करत होते. त्यांना हा अॅडव्हान्सही अनेक महिन्यांनी मिळायचा.
त्याकाळात कंपनीचे पगारी नोकर कंपनी मालकाच्या कंपनी गुंडाळण्याचे आणि पळून जाण्याचे किस्से सांगण्यात आपले दिवस ढकलायचे.
सुब्रत रॉय यांच्या जवळचे लोक आणि कर्मचारी म्हणतात त्याप्रमाणे, त्यांचा शेवट केवळ त्यांच्या अहंकारामुळे झाला.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि न्यायालयाकडून सूचना आल्या की, सहाराश्री यांच्यावतीने लाखो रुपयांच्या जाहिराती वृत्तपत्रांत दिल्या जात असत. यात ते म्हणायचे की , आम्हाला कायदा शिकवू नये, कट्टर देशभक्त असूनही त्यांचा नाहक छळ केला जातोय.
खटला अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाही रॉय सबबी सांगून न्यायालयात हजर राहण्याचे टाळत. वादविवादात ते स्वतः न्यायाधीशांना पराभूत करू शकतात असं कित्येक वेळा त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे.
या सर्व कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्यावर कारवाई करणे भाग पडले.
सुब्रत रॉय हा असा एकमेवाद्वितीय माणूस होता की ज्यांनी लोकशाही आणि कायद्याच्या छेदातून जाणार्या व्यावहारिक सत्यांच्या साहाय्याने एक प्रचंड आर्थिक साम्राज्य तर उभं तर केलंच पण त्याभोवती राष्ट्रवाद, देशभक्ती आणि भावभावना यांचा स्पर्श करून नैतिक आभा निर्माण करण्यातही ते यशस्वी झाले.
सर्व काही माहीत असूनही, देशातील सर्वात मोठा अर्थतज्ज्ञही त्यांच्या यशाचं रहस्य लिखित स्वरूपात सांगू शकत नाही.
2005 मध्ये ते बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. एड्समुळे त्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. कार्यक्रमांमध्ये त्यांचा डमी वापरला जातो असं म्हटलं गेलं.
याचा परिणाम असा झाला की गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत मागायला सुरुवात केली, काही संकलन केंद्रांवर दगडफेक करण्यात आली.
कंपनीवर आपले अस्तित्व आणि नियंत्रण सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक दिवस फोटो सेशन आयोजित केले. योगा करताना, गोल्फ खेळताना आणि धावताना दाखवण्यात आले.
सुब्रत रॉय यांनी ही मुलाखत प्रायोजित केली होती. ती मुलाखत कधीच प्रकाशित झाली नाही, कारण कंपनीच्या सक्षम अधिकाऱ्यांनी ती वाचली आणि शेवटी नव्या जाहिरातीसह प्रकाशनासाठी देण्यात आली.
कंपनीच्या आर्थिक स्थितीवर खटला आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे ते नाराज होते.
ते म्हणाले, "आज अशा अनेक माध्यम कंपन्या निर्माण झाल्या आहेत की त्यांना केवळ साक्षर लोकांनाच काम देऊन व्यवसाय चालवावा लागतो. त्यामुळेच अशा गॉसिप्स प्रसिद्ध होतात."
त्यानंतर सुब्रत रॉय यांनी सविस्तरपणे सांगितलं की, दिवसातील 20 तास काम केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत झोपू शकत नव्हते. वेळेची कमतरता होती.
ते सांगत होते की, त्यांची मुले मोठी झाली आहेत आणि ते निवृत्ती घेऊन हिमालयात जाऊ शकतात. पण त्याचवेळी अंदाजे 2 लाख कोटी रुपये खर्चाच्या 25 नवीन प्रकल्पांची माहिती देताना ते दुसरी इनिंग खेळण्याच्या मन:स्थितीत पण होते.
त्यांना सुंदरबनला श्रीमंत पर्यटकांसाठी नंदनवन बनवायचे होते आणि ते अनिवासी भारतीयांनी मागे सोडलेल्या पालकांसाठी एक सेवा सुरू करणार होते.
सहारा एअरलाइन्सच्या अपयशावर ते म्हणाले, "आम्ही सरकारला सांगितलं होतं की, "आम्हाला जावई म्हणा, आमचे पाय ओढू नका, आम्ही भारताला विमान वाहतूक क्षेत्रात अग्रेसर करू. पण राजकारण्यांमध्ये हिंमत नाही, ते असमर्थ आहेत."
त्यांचे अनेक प्रकल्प पर्यावरणाला घातक असल्याचे बोलले जात होते, त्यामुळे पर्यावरणवाद्यांमध्येही नाराजी होती.
यावर रॉय म्हणाले होते, "पर्यावरणासाठी ओरडणाऱ्यांना बाहेरून पैसे मिळतात. ते दुकाने चालवण्यासाठी काहीही लिहू शकतात, त्यांना फाशी झाली पाहिजे."
मध्येमध्ये त्यांना त्यांच्या प्रसिद्ध विश्वासू मित्रांची आठवण यायची. सहारा ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी रवीना टंडनने तिच्या आधीच्या कंपनीचा राजीनामा दिला होता याविषयी त्यांनी सांगितलं होतं.
ते म्हणायचे, "इतकं ग्लॅमर सगळ्यांनाच सहन होत नाही. कोणताही व्यावसायिक प्रतिस्पर्धी असू नये. मी मुलांना अशा प्रकारे काम करण्यास सांगितले आहे की रायव्हल नाही तर फॉलोवर तयार व्हावेत. आम्ही थोडा अहंकार, गुणवत्ता आणि क्लास मेन्टेन करतो."
ते सांगायचे, "मी जेव्हा पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये होतो तेव्हा माझ्याकडे चार गाड्या होत्या. टाटा बिर्ला घरी जेवायला यायचे. माझ्या वडिलांना ताटाला थोडा जरी तडा दिसला तरी ते संपूर्ण डिनर सेट फोडायचे. "
सहाराची सुरुवात गोरखपूरमधील एका खोलीत, टेबल, लॅम्ब्रेटा स्कूटर आणि 2,000 रुपयांच्या भांडवलाने सुरू झाली. या दंतकथेवर विश्वास ठेवण्यासाठी, कंपनीने ती स्कूटर आणि टेबल आजपर्यंत शो केसमध्ये ठेवलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








