You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्लायोसोर: डायनासोर सारख्या महाकाय सागरी प्राण्याचे सापडले अवशेष, कसा होता हा प्राणी ?
- Author, जोनाथन आमोस आणि अॅलिसन फ्रान्सिस
- Role, बीबीसी न्यूज सायन्स
दक्षिण इंग्लंडच्या ज्युरासिक कोस्टवरील खडकांमधून एका महाकाय सागरी प्राण्याची कवटी बाहेर काढण्यात आली आहे.
सुमारे15 कोटी वर्षांपूर्वी महासागरांमध्ये धुमाकूळ घातलेल्या प्लायोसोरचे हे अवशेष आहेत. प्लायोसोर हा एक प्रचंड मोठ्या आकाराचा सरपटणारा प्राणी होता.
2 मीटर म्हणजेच 6 फूट 5 इंचाचे हे अवशेष आजपर्यंत सापडलेल्या अवशेषांपैकी सगळ्यांत मोठे प्लायोसोरचे अवशेष आहेत. या नवीन शोधामुळे प्राचीन काळातील या शिकारी प्राण्याबद्दलच्या ज्ञानात वाढ होईल हे नक्की.
नवीन वर्षाच्या दिवशी बीबीसी वनवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या डेव्हिड अॅटनबरो यांच्या विशेष कार्यक्रमात ही कवटी दाखवली जाईल.
"अरे वाह!"
ज्यांनी ज्यांनी हे जीवाश्म पहिल्यांदा बघितलं त्यांच्या तोंडी आलेले असे उद्गार आले असतील.
या कवटीच्या आकारावरूनच प्लायोसोर किती मोठा व अजस्त्र असेल याची कल्पना येऊ शकेल. त्यामुळे त्याचं अतिशय सुंदरपणे जतन केलं गेलं आहे.
स्थानिक जीवाश्मशास्त्रज्ञ स्टीव्ह एचेस यांचा असा विश्वास आहे की यासारखा दुसरा नमुना आजवर कुठेही सापडलेला नाही.
त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, "मी आतापर्यंत काम केलेल्या सर्वोत्तम जीवाश्मांपैकी हा एक आहे. याला अद्वितीय बनवणारी गोष्ट म्हणजे ही कवटी पूर्णावस्थेत आहे.
हा प्राणी जिवंत असताना ज्याप्रमाणे त्याची रचना असेल अगदी तसंच खालचा जबडा आणि वरची कवटी यामध्ये एकत्र जोडलेली दिसून येत आहे. प्लायोसोरचा एवढे सविस्तर आणि मोठे अवशेष आजवर कुठेही सापडले नाहीत.
याआधी जिथं जिथे या प्राण्याचे अवशेष सापडले त्यातील बरेचसे भाग गहाळ झाले होते. याही जीवाश्माचा आकार थोडासा बिघडला असला तरी त्यातील प्रत्येक हाड अजूनही शाबूत आहे."
एका माणसाच्या सरासरी उंचीपेक्षा लांब आकाराच्या या कवटीवरून हा प्राणी किती मोठा असावा याची कल्पना येऊ शकते.
या कवटीतले 130 दात लगेचच तुमचं लक्ष वेधून घेतात, विशेषतः यातील समोरचे दात खूप मोठे आणि आकर्षक आहेत.
हे दात अतिशय लांब आणि एखाद्या वस्तऱ्यासारखे धारदार आहेत. ज्याच्या एकाच चाव्यात कुणाचाही सहज जीव जाईल असा तो जबडा आहे. पण तुम्ही थोडी हिंमत करून जवळून पाहिलं तर लक्षात येईल की आणि प्रत्येक दाताच्या मागील बाजूस बारीक कड्या आहेत.
या कड्यांमुळे प्लायोसोरला त्याची शिकार करण्यास मदत होते. एखादा खंजीर खुपसल्याप्रमाणे प्राण्याच्या मांसाचा लचका तोडून लगेच दुसरा प्रहार करता येण्यासाठी त्याच्या दातांची ही विशिष्ट रचना त्याला मदत करत असावी.
प्लायोसोर हा एक अत्यंत हिंसक जीव होता. त्याची लांबी सुमारे 10-12 मीटर होती आणि या भल्यामोठ्या शरीराभोवती असणारे अजस्त्र पंखासारखे अवयव महासागरात अतिशय उच्च वेगाने पुढे जाण्यात त्याला मदत करत असत. प्लायोसोर हा समुद्रातला एक प्रचंड आक्रमक शिकारी प्राणी होता.
ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे डॉ आंद्रे रो म्हणतात की, "मला असं वाटतं की हा प्राणी इतका मोठा असेल की त्याच्या परिघात आलेल्या कोणत्याही प्राण्याची शिकार करणं त्याला अगदी सहज शक्य होत असेल, त्याच्या आसपास आलेला एकही प्राणी जिवंत राहत नसेल."
"पाण्याखालच्या टायनोसॉरस रेक्ससारखाच हा प्राणी असेल यात मला अजिबात शंका नाहीये."
प्लायोसोर त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या प्लेसिओसॉर आणि डॉल्फिनसारख्या इचथियोसॉर अशा सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करत असेल. प्लायोसरोच्या जीवाश्मांवरून तो इतर प्लायोसोरचाही फडशा पाडत असावा असा अंदाज लावला जाऊ शकतो.
जीवाश्म कवटी कशी सापडली याची गोष्टही विलक्षण आहे.
इंग्लंडच्या दक्षिणेकडे असलेल्या ज्युरासिक कोस्ट या जगप्रसिद्ध जागतिक वारसा स्थळावरच्या किमरिज बे या समुद्रकिनाऱ्यावर ही शोधमोहीम राबवली गेली.
स्टीव्ह एचेस यांचे मित्र आणि सहकारी फिल जेकब्स यांना सगळ्यांत पहिल्यांदा प्लायोसोरच्या थुंकीचे टोक सापडले होते. एका माणसाला वाहून नेण्यासाठी तो अवशेष खूप जड असल्याने ते स्टीव्ह एचेस यांना बोलवायला गेले आणि मग जीवाश्मांवर संशोधन करणाऱ्या या जोडीने हा तुकडा सुरक्षितपणे नेण्यासाठी तात्पुरते स्ट्रेचर बनवलं.
पण या प्राण्याचा उर्वरित भाग कुठे आहे असा प्रश्न निर्माण झाला? या भागाच्या ड्रोन सर्वेक्षणाने आधीच या जीवाश्माचे संभाव्य स्थान निश्चित केलं होतं. पण या उंच खडकाचे वरून खालपर्यंत उत्खनन करण्याचं आव्हान संशोधकांसमोर होतं.
अशा खडकातून जीवाश्म काढणं हे नेहमीच कष्टप्रद आणि अतिशय नाजूक काम असतं. मात्र त्यातही दोरीवर लटकून समुद्रकिनाऱ्याच्यावर 15 मीटर उंचीवर असणाऱ्या खडकातील गुहेतून हे जीवाष्म काढणं हे जास्त आव्हानात्मक आहे.
याकामी लागणारं धाडस आणि समर्पण तर खास आहेच पण ही कवटी स्वच्छ करण्यासाठी घालवलेला काळ देखील खूप महत्त्वाचा होता.
हा अतिविशाल सरपटणारा प्राणी नेमका कसा जगला आणि या प्लायोसोरने जीवसृष्टीवर कसं राज्य केलं याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ हे जीवाष्म पहायला नक्की येतील.
जीवाश्मशास्त्रज्ञ प्राध्यापक एमिली रेफील्ड यांनी या कवटीच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या वर्तुळाकार छिद्राचं परीक्षण केलं आहे. यावरून त्यांना प्लायोसोरच्या जबड्यांतील स्नायूंच्या आकाराचा आणि त्या जबड्याच्या ताकदीचा अंदाज लावण्यात मदत झाली.
प्लायोसोरच्या जबड्यात जास्तीत जास्त 33,000 न्यूटनचा दाब तयार होत असेल असं संशोधकांना लक्षात आलं आहे.
सध्या पृथ्वीवर असणाऱ्या जिवंत प्राण्यांमध्ये खाऱ्या पाण्यातील मगरीच्या जबड्यात 16,000 न्यूटनचा दाब तयार होतो. खाऱ्या पाण्यातील मगरींचा जबडा यामुळेच सगळ्यात जास्त मजबूत मानला जातो.
ब्रिस्टॉलच्या संशोधकांनी याबाबत सांगितलं की, "जर एखादा शिकारी प्राणी एवढ्या जोराने चावा घेत असेल तर त्यातून शिकार सुटण्याची शक्यता खूप कमी होते. एवढ्या जोरात एखाद्या प्राण्याला चावलं तर त्याच्या हाडांना आणि ऊतींना अगदी सहज कुस्करून टाकता येईल."
"या मोठ्या प्राण्यांची खाण्याची पद्धत देखील विलक्षण आहे. उदाहरणार्थ मगरी जेव्हा एखादी शिकार करतात तेव्हा त्या त्यांचा जबडा शिकारीभोवती बंद करतात आणि नंतर फिरवतात, शिकार केलेल्या प्राण्याचे शरीर मुरडण्यासाठी मगरी तसं करतात. ज्या प्राण्यांचं डोकं मागच्या बाजूला पसरट असतं ते प्राणी अशा पद्धतीने शिकार खातात आणि तीच पद्धत प्लायोसोरमध्ये आढळून येते," संशोधक सांगतात.
या नव्याने सापडलेल्या जीवाश्मामध्ये अशी काही वैशिष्ट्यं आहेत ज्यावरून हे कळतं की प्लायोसोरला काही विशेष तीव्र आणि अतिशय उपयुक्त अशा संवेदना असतील.
प्लायोसोरच्या संभाव्य शिकारीमुळे पाण्याच्या दाबात काही बदल झाला असेल किंवा शिकार नेमकी कुठे दडून बसलेली आहे हे शोधण्यासाठी काही ग्रंथी असू शकतात हे त्याच्या थुंकीवर आढळलेल्या लहान लहान खड्ड्यांमुळे दिसून येतं. यासोबतच या कवटीच्या वरच्या भागात एक छिद्र आढळून आलं जिथे प्लायोसोरचा तिसरा डोळा असू शकतो.
काही सरडे, बेडूक आणि माशांना अशा पद्धतीचा अवयव अजूनही आहे. प्रकाशाला हा तिसरा डोळा संवेदनशील असल्याचं दिसून येतं. त्याचा उपयोग इतर प्राण्यांना शोधण्यात मदत करण्यासाठी प्लायोसोर करत असतील. विशेषतः खोल, गढूळ पाण्यात शिकार करताना या संवेदना किंवा ही ज्ञानेंद्रिय प्लायोसोरला मदत करत असतील.
पुढच्या वर्षी स्टीव्ह एचेस की कवटी किमरिजमधील त्यांच्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवतील. 'द एचेस कलेक्शन' असं त्या संग्रहालयाचं नाव आहे.
डोक्याच्या मागच्या बाजूस थोडासा भाग आलेला दिसतो पण काही हाडांनंतर तो हळूहळू कमी होतो. अजूनही या कड्यावर काही जीवाष्म असू शकतात, ज्यांचा अभ्यास व्हायला हवा आणि म्हणूनच अधिक स्टीव्ह त्यांनी सुरू केलेली ही मोहीम पूर्ण करण्यास उत्सुक आहेत.
स्टीव्ह एचेस यांनी बीबीसीला सांगितलं की, "मला अजूनही असं वाटतं की या प्राण्याचा उर्वरित सांगाडाही तिथे असेल."
"आणि त्याला लवकर बाहेर काढलं पाहिजे कारण त्या गुहेतील वातावरण अजिबात पोषक नाही. तिथे हे जीवाश्म लवकर क्षीण होऊ शकतं. या कड्याचा भाग दरवर्षी काही फुटांनी खचतो आहे. काही वर्षांनी प्लायोसोरचे हे अवशेष नामशेष होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशी संधी आयुष्यात पुन्हा कधीच मिळणार नाही."
(अतिरिक्त वार्तांकन : रेबेका मोरेल आणि टोनी जॉलिफ)
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)