You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलकडे नेमकी किती अण्वस्त्रं आहेत? इस्रायलच्या अणुकार्यक्रमांबद्दल काय माहिती उपलब्ध आहे?
- Author, ॲलिसिया हर्नान्डेझ
- Role, बीबीसी न्यूज
हे एक उघड गुपित आहे. इस्रायलकडे 1960 च्या दशकापासून अण्वस्त्रं आहेत.
मात्र ही बाब इस्रायलनं जाहीरपणे मान्य केलेली नाही.
गेल्या आठवड्यात इस्रायलनं इराणविरोधात हल्ला सुरू केला होता. त्यासाठी कारण देताना इस्रायलनं इराण 'अणुबॉम्ब बनवण्याच्या फार जवळ पोहोचला आहे' असा दावा केला होता.
इस्रायलच्या हल्ल्याला इराणनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष आता वाढला आहे.
"इस्रायल हा पश्चिम आशियातील एकमेव देश आहे, ज्याच्याकडे अण्वस्त्रं आहेत," असं झेवियर बोहिगास यांनी बीबीसीला सांगितलं.
ते भौतिकशास्त्रातील डॉक्टर असून डेलास सेंटर फॉर पीस स्टडीजमध्ये संशोधक आहेत. शांतता, सुरक्षा, संरक्षण आणि शस्त्रास्त्रं यांचं विश्लेषण करणारी ही एक स्वतंत्र संस्था आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं (आयएईए) मार्चमध्ये म्हटलं होतं की इराणनं युरेनियमला 60 टक्के शुद्ध करण्यात यश मिळवलं आहे. मात्र बोहिगास म्हणतात की "अणुबॉम्ब तयार करण्यासाठी 90 टक्के शुद्ध युरेनियमची आवश्यकता असते."
त्याशिवाय, ज्याप्रमाणे इराण, अमेरिका आणि रशिया या देशांनी अण्वस्त्रं प्रसार विरोधी करारावर (एनपीटी) सही केलेली आहे. तसं इस्रायलनं कधीही केलेलं नाही.
याचा अर्थ असा की या करारावर सही करणाऱ्या इतर देशांना ज्याप्रमाणे नियमितपणे त्यांच्या अणुकेंद्राची तपासणी करणं बंधनकारक आहे. तसं बंधन इस्रायलवर नाही.
इस्रायल आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा (आयएईए) सदस्य आहे. मात्र या संस्थेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तपासणी बंधनकारक नाही.
त्यामुळे, अमेरिकेच्या संरक्षण आणि ऊर्जा विभागाचे अहवाल, त्यांच्याकडून लीक होणारी माहिती आणि अणुऊर्जेच्या प्रश्नावर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या ढोबळ अभ्यासातून जी माहिती समोर येते, तितकंच इस्रायलच्या अणुकार्यक्रमाबद्दल माहीत आहे.
तसंच एकाच थेट स्रोताकडून यासंदर्भातील माहिती समोर आली होती. ती म्हणजे इस्रायलच्या अणु प्रकल्पात काम केलेले अणु अभियंता मोर्चेचाई वानुनू यांना नोकरीवरून काढून टाकल्यानंतर, 1986 मध्ये ते 'द संडे टाइम्स'शी बोलले होते. त्यातून इस्रायलच्या अणुकार्यक्रमाबद्दलची माहिती समोर आली होती.
त्यांनी त्यावेळेस जगाला सांगितलं होतं की इस्रायलचा अणुकार्यक्रम सुरू आहे. त्यांनी ही माहिती उघड केल्यामुळे त्यांना अनेक वर्षांचा तुरुंगवास सहन करावा लागला.
इस्रायलचं 'अमिमुत' धोरण
इस्रायलचं अण्वस्त्रं बाळगण्याबद्दलचं जे अधिकृत धोरण आहे, त्याला 'अमिमुत' असं म्हणतात. त्याचा अर्थ "जाणीवपूर्वक निर्माण केलेली अस्पष्टता" असा होतो. कारण इस्रायलजवळ कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रं असल्याचं ते मान्य करत नाही किंवा त्याला नकार देखील देत नाही.
"या प्रकारचं वर्तन म्हणजे अमिमुत, हे अण्वस्त्रांच्या युगात इस्रायलचं इतर देशांपेक्षा स्पष्टपणे वेगळं दिसणारं योगदान आहे," असं ॲवनर कोहेन यांनी युकेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे वरिष्ठ सभागृहाला दिलेल्या अहवालात स्पष्ट केलं होतं.
कोहेन हे अण्वस्त्र प्रसारविरोधी अभ्यासाचे प्राध्यापक आहेत आणि इस्रायलच्या अण्वस्त्रं मुद्दयावरील तज्ज्ञ आहेत. आणि हे काही नवं धोरण नाही.
इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल सांगितलं आहे.
"आमच्या लक्षात आलं की याप्रकारच्या अस्पष्टतेमध्ये प्रचंड शक्ती (...)असते. ज्यांना दुसरा होलोकॉस्ट (ज्यूंची कत्तल किंवा विनाश) घडवायचा होता, अण्वस्त्रांबद्दलची शंका हा त्यांच्याविरोधातील शक्तिशाली बचाव किंवा प्रतिबंध होता."
"अणुकार्यक्रमाबद्दलची अपारदर्शकतेचं धोरण हे इस्रायलचं सर्वात मोठं व्यूहरचनात्मक आणि मुत्सद्देगिरीचं यश आहे," असं कोहेन नमूद करतात.
आंतरराष्ट्रीय समुदायानं अप्रत्यक्षरीत्या दिलेल्या मान्यतेमुळे, इस्रायलला अण्वस्त्रधारी आणि अण्वस्त्र नसलेल्या "अशा दोन्ही जगांमधील सर्वोत्तम गोष्टी" मिळवता येतात, असं तज्ज्ञ सांगतात.
"इस्रायल याबाबतीत स्वत:च्या इच्छेनंच अपारदर्शक आहे. हे तसंच आहे. इस्रायल कधीही एनपीटीचा भाग नव्हता आणि त्यामुळे त्याला नियमितपणे अणुकेंद्रांच्या तपासणीला सामोरं जाण्याची आवश्यकता नाही," असं बोहिगास यांनी बीबीसीला सांगितलं.
"अर्थात सर्व प्रकारच्या लष्करी बाबींमध्ये इस्रायल आणि बहुतांश देश पारदर्शक नाहीत. मात्र अण्वस्त्रांच्या बाबतीत तर इस्रायल आणखीच कमी पारदर्शक आहे," असं बोहिगास म्हणतात.
"याप्रकारे, इस्रायल स्वत:च्या हितांचं रक्षण करतो आहे, असं दिसतं. आपल्याला माहीत आहे की इस्रायल अणुकार्यक्रम चालवतो आहे. त्यांच्याकडे अनेक अणुबॉम्ब आहेत आणि आपल्याला माहीत आहे की इस्रायल त्याचा वापर करू शकतो," असं झेवियर बोहिगास म्हणतात.
ते पुढे म्हणतात, "त्यामुळेच इस्रायलनं अणुकार्यक्रमाबद्दल राखलेली अस्पष्टता फक्त बाहेरून समोर आलेल्या माहितीमुळे दूर झाली आहे. इस्रायलनं त्यांच्या हेतूबद्दल काहीही जाहीर केल्यामुळे किंवा जाहीर करण्यास नकार दिल्यामुळे ते समोर आलेलं नाही."
कोहेन यांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट केलं आहे की अण्वस्त्रांबद्दलच्या अस्पष्टतेमुळे इस्रायलला "त्याच्या अस्तित्वासाठी असलेल्या धोक्यांपासून तसंच अण्वस्त्रांशी निगडीत राजकीय प्रतिष्ठेपासून स्वत:चं रक्षण करता येतं."
तर दुसऱ्या बाजूला "त्यांना अण्वस्त्रं बाळगल्याबद्दल जवळपास कोणतीही राजकीय, राजनयिक किंवा अगदी नैतिक किंमत मोजावी लागत नाही."
'इस्रायल हायोम' हे मुक्त आणि नेतन्याहू समर्थक दैनिक आहे. ते इस्रायलमधील सर्वाधिक खपाचं वृत्तपत्रं आहे. या वृत्तपत्रानं, इस्रायल त्यांच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दल इतकी "गुप्तता" का बाळगतो आहे, यावर एक दीर्घ लेख छापला होता.
या वृत्तपत्रानुसार, "कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रं प्रसार रोखणं हे इस्रायलचं प्राथमिक उद्दिष्ट आहे." त्यामुळे अमिमुत धोरणाचे समर्थक "असा युक्तिवाद करतात की हे धोरण सोडल्यामुळे मध्यपूर्वेत अण्वस्त्रांचा प्रसार वाढू शकतो," आणि त्यातून अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू होऊ शकते.
सेंटर फॉर आर्म्स कंट्रोल अँड नॉनप्रॉलिफेरेशनचा युक्तिवाद आहे की अण्वस्त्रांबद्दल अस्पष्टता राखण्याचं इस्रायलचं धोरण, हे "पश्चिम आशियात प्रचंड विनाशाच्या शस्त्रास्त्रांपासून मुक्त क्षेत्र निर्माण करण्यातील एक प्रमुख अडथळा आहे."
आणि ते म्हणतात की हे एक सतत असणारं आव्हान आहे.
इस्रायलकडे अण्वस्त्रं आहेत हे कसं समोर आलं?
इस्रायलच्या अण्वस्त्र सज्जतेबद्दलची पहिली माहिती, अमेरिकच्या परराष्ट्र विभागाच्या 1962 च्या मेमोरँडम किंवा निवेदनातून मिळाली. यात फ्रान्स आणि इस्रायलमध्ये झालेल्या कराराबद्दल माहिती देण्यात आली होती. या करारामुळे 1950 च्या दशकात इस्रायलच्या दक्षिण भागातील डिमोनामध्ये अणुप्रकल्प बांधण्यात आला होता.
"फ्रान्सबरोबरचा करार किंवा सहकार्य हे प्लुटोनियम मिळवण्यासाठी अणुभट्टी बांधण्यासाठीचं होतं," असं बोहिगास सांगतात.
डिमोना शहरासाठीचा गुगल मॅप पाहताना असं दिसून येतं की नेगेव अणु संशोधन केंद्र शहरापासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर, वाळवंटाच्या मध्यभागी आहे.
सुरुवातीला, हे संकुल म्हणजे एक कापड कारखाना, धातू संशोधनासाठीचं एक केंद्र आणि एक कृषी संकुल असल्याचं सांगण्यात आलं होतं.
नंतर, 1960 च्या दशकात देखील, तत्कालीन इस्रायली पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन यांनी इस्रायलच्या अणुकार्यक्रमाविषयीचा एकमेव सार्वजनिक उल्लेख केला होता.
इस्रायलच्या संसदेसमोर (नेसेट) केलेल्या भाषणात हा उल्लेख करण्यात आला होता. बेन-गुरियन म्हणाले होते की अणु संशोधन केंद्र "शांततापूर्ण उद्दिष्टांसाठी" आहे.
बोहिगास सांगतात त्याप्रमाणे, अमेरिकेच्या संरक्षण आणि ऊर्जा विभागांच्या तपासातून हे दिसून येतं की "इस्रायलकडे अण्वस्त्रं आहेत, हे अगदी स्पष्ट आहे."
अमेरिकन सरकारच्या संवेदनशील किंवा गोपनीय कागदपत्रांना सार्वजनिक केल्यानंतर, त्यातून दिसून आलं की किमान 1975 पर्यंत, अमेरिकन सरकारला खात्री झाली होती की इस्रायलकडे अण्वस्त्रं आहेत.
मात्र इस्रायलच्या इतिहासात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे मोर्देचाई वानूनू.
संडे टाइम्सला दिली अण्वस्त्रांबद्दलची गुप्त माहिती
1980 च्या दशकात इस्रायलच्या अणुकार्यक्रमाबद्दल अधिक तपशीलानं माहिती समोर आली.
वानूनू हे डिमोना अणुभट्टीत काम करायचे. त्यांनी 1985 पर्यंत तिथे नऊ वर्षे काम केलं होतं.
मात्र त्यापूर्वी, वानुनू यांनी गुप्तपणे, अणुभट्टीचे दोन रोल भरून फोटो काढले होते.
या फोटोंमध्ये अण्वस्त्रं निर्मितीसाठी आवश्यक असणारे किरणोत्सर्गी पदार्थ काढण्यासाठीची उपकरणं आणि थर्मोन्युक्लियर डिव्हाईस मॉडेल प्रयोगशाळा दिसत होती.
1986 मध्ये वानूनू, ऑस्ट्रेलियातील सिडनीतील अण्वस्त्रं-विरोधी गटात सामील झाले. तिथे त्यांची भेट कोलंबियातील मुक्त पत्रकार, ऑस्कर गुरेरो यांच्याशी झाली. ऑस्कर यांनी वानूनू यांना ते फोटो प्रकाशित करण्यासाठी राजी केलं.
त्यानंतर त्यांनी, द संडे टाइम्स, या ब्रिटिश वृत्तपत्राचे पत्रकार पीटर हौनम यांच्याशी संपर्क साधला.
हौनम यांनी बीबीसी विटनेस हिस्ट्री या कार्यक्रमात सांगितलं होतं की वानुनू यांना वाटत होतं की अणुभट्टीचे तपशील उघड केल्यावर, अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव येईल.
मात्र, तसं काहीही घडलं नाही.
बीबीसी विटनेस हिस्ट्री कार्यक्रमानुसार, त्यानंतर वानूनू यांना अंमली पदार्थ किंवा गुंगी आणणारं औषध देण्यात आलं आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं. तिथून त्यांना इस्रायलला आणण्यात आलं.
त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यांना देशाच्या अण्वस्त्रांची गुप्त माहिती उघड केल्याबद्दल देशद्रोह आणि हेरगिरीच्या आरोपाखाली 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
2004 मध्ये वानूनू यांची सुटका करण्यात आली. त्यावेळेस ते म्हणाले होते की "त्यांनी जे केलं आहे, त्याचा त्यांना अभिमान आणि आनंद आहे." सुटका झाल्यानंतर वानूनू यांना पुन्हा शिक्षा सुनावण्यात आली. आता त्यांना परदेशी नागरिकांशी संपर्क करण्यास किंवा इस्रायल सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
वानूनू यांनी केलेल्या खुलाशांमुळे, इस्रायलकडे अण्वस्त्रं आहेत, ही बाब उघडपणे स्वीकारण्यात आली.
इस्रायलकडे किती अण्वस्त्रं आहेत आणि त्याची मोजदाद कशी केली जाते?
वानूनू यांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळच्या तज्ज्ञांचा अंदाज होता की इस्रायलकडे 100 ते 200 अण्वस्त्रं आहेत.
सध्या, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या अणुकार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांचा अंदाज आहे की इस्रायलकडे जवळपास 90 अण्वस्त्रं आहेत.
शस्त्रास्त्रं दर्जाचं अण्वस्त्रं तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं प्लुटोनियम डिमोना जवळच्या नेगेव अणु संशोधन केंद्रातील आयआरआर-2 संशोधन अणुभट्टीत तयार केलं गेल्याचं मानलं जातं.
इस्रायलनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा एक 26-मेगावॅट क्षमतेचा थर्मल रिॲक्टर आहे. मात्र काहीजणांना वाटतं की या अणुभट्टीची क्षमता यापेक्षा अधिक आहे.
इस्रायलच्या अणुकार्यक्रमासंदर्भातील धोरणानुसार, ही अणुभट्टी आयएईएच्या सुरक्षा उपायांअंतर्गत नाही. या उपायांमध्ये तांत्रिक उपाययोजनांचा समावेश असतो.
त्यानुसार अणुकेंद्रांचा गैरवापर होत नाही आणि आण्विक सामग्री (किरणोत्सर्गी पदार्थ) शांततापूर्ण वापराऐवजी इतरत्र वळवली जात नाही, याची आयएईए स्वतंत्रपणे पडताळणी करते.
मात्र, इस्रायलनं जर त्याच्याकडील अण्वस्त्रांची माहिती दिली नाही, तर त्यांच्याकडे किती अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्रं आहेत याची संख्या आयएईएकडून कशी मोजली जाते?
"आंतरराष्ट्रीय संस्था या शस्त्रांस्त्रांवर देखरेख करतात आणि त्याचा दरवर्षी अंदाज लावतात," बोहिगास म्हणतात.
ते पुढे म्हणतात, "इस्रायल किंवा उत्तर कोरियासारखे, जे देश त्यांच्याकडील अण्वस्त्रांची माहिती देत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल फार थोडी माहिती असते, अशा देशांच्या बाबतीत आम्ही अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांचे युरेनियम किंवा प्लुटोनियमच्या उत्पादनाचा एक अंदाज बांधतो."
"इस्रायलच्या बाबतीत तसंच आहे. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे अंदाज बांधला जातो."
अशाप्रकारे, तज्ज्ञ आम्हाला सांगतात की ज्या अणुभट्ट्या किंवा अणुऊर्जा प्रकल्पाबाबत प्रश्न आहेत, ते कधीपासून कार्यरत आहेत, त्यांची कामगिरी कशी होते आहे. त्यानंतर ते त्याचा अंदाज बांधतात.
ही पद्धत नवी नाही किंवा ती फक्त इस्रायल किंवा उत्तर कोरियाच्या बाबतीतच लागू करण्यात आलेली नाही. या प्रकारच्या कॅल्क्युलेशननुसार, उत्तर कोरियाकडे जवळपास 50 अण्वस्त्रं असल्याचा अंदाज आहे.
बोहिगास म्हणतात की न्यू स्टार्ट ट्रिटी (2011) वर सह्या करण्याआधी, जेव्हा नियमित कालावधीनं होणाऱ्या तपासणीच्या बंधनकारक भेटी आणि त्यानंतरचे अहवाल दिले जात नव्हते, तेव्हा तत्कालीन सोविएत युनियन आणि अमेरिकेकडे किती अण्वस्त्रं आहेत याचं या संस्थांनी अंदाजे वाटप केलं होतं.
"नंतर या देशांकडील अण्वस्त्रांच्या माहितीची खातरजमा झाली आणि त्याच्याशी या संस्थांची माहिती सुसंगत आहे," असं ते नमूद करतात.
"त्यामुळे, यातून आपल्याला किमान अशी कल्पना येते की इस्रायलबद्दलचा हा अंदाज बराचसा योग्य असू इस्रायलनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा एक 26-मेगावॅट क्षमतेचा थर्मल रिॲक्टर आहे. मात्र काहीजणांना वाटतं की या अणुभट्टीची क्षमता यापेक्षा अधिक आहे.
इस्रायलच्या अणुकार्यक्रमासंदर्भातील धोरणानुसार, ही अणुभट्टी आयएईएच्या सुरक्षा उपायांअंतर्गत नाही. या उपायांमध्ये तांत्रिक उपाययोजनांचा समावेश असतो.
त्यानुसार अणुकेंद्रांचा गैरवापर होत नाही आणि आण्विक सामग्री (किरणोत्सर्गी पदार्थ) शांततापूर्ण वापराऐवजी इतरत्र वळवली जात नाही, याची आयएईए स्वतंत्रपणे पडताळणी करते.
मात्र, इस्रायलनं जर त्याच्याकडील अण्वस्त्रांची माहिती दिली नाही, तर त्यांच्याकडे किती अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्रं आहेत याची संख्या आयएईएकडून कशी मोजली जाते?
"आंतरराष्ट्रीय संस्था या शस्त्रांस्त्रांवर देखरेख करतात आणि त्याचा दरवर्षी अंदाज लावतात," बोहिगास म्हणतात.
ते पुढे म्हणतात, "इस्रायल किंवा उत्तर कोरियासारखे, जे देश त्यांच्याकडील अण्वस्त्रांची माहिती देत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल फार थोडी माहिती असते, अशा देशांच्या बाबतीत आम्ही अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांचे युरेनियम किंवा प्लुटोनियमच्या उत्पादनाचं ढोबळमानानं किंवा अंदाजित कॅल्क्युलेशन करतो."
"इस्रायलच्या बाबतीत तसंच आहे. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे अंदाज बांधला जातो."
अशाप्रकारे, तज्ज्ञ आम्हाला सांगतात की ज्या अणुभट्ट्या किंवा अणुऊर्जा प्रकल्पाबाबत प्रश्न आहेत, ते कधीपासून कार्यरत आहेत, त्यांची कामगिरी कशी होते आहे. त्यानंतर ते त्याचा अंदाज बांधतात.शकतो, तो वास्तवाच्या अगदी जवळ जाणारा असू शकतो," असं ते पुढे म्हणतात.
अण्वस्त्रमुक्त पश्चिम आशिया?
2012 मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं एक ठराव मंजूर केला. त्यात इस्रायलनं त्यांच्या अणुकार्यक्रमाची तपासणी आंतरराष्ट्रीय संस्थांना करू द्यावी, असं आवाहन करण्यात आलं होतं.
स्वत: इस्रायल, अमेरिका आणि कॅनडा यांनी इस्रायलला एनपीटीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणाऱ्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं होतं.
1970 मध्ये इराणनं मात्र या करारावर सही केली आणि त्याला मान्यता दिली. मात्र या आठवड्यात, इस्रायलनं इराणवर हल्ला केला.
त्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी या गोष्टीला पुष्टी दिली की, इराणची संसद या करारातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं तयार करते आहे.
दुसऱ्या बाजूला, मध्यपूर्वेला अण्वस्त्रमुक्त प्रदेश घोषित करणाऱ्या ठरावासाठीच्या विनंत्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत नियमितपणे सादर केल्या जात आहेत.
"इस्रायलनं या नकार दिला आहे. ते याला त्यांच्या भूप्रदेशाच्या अखंडतेवरील हल्ला मानत आहेत," असं बोहिगास म्हणतात.
युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूट फॉर डिसआर्मामेंट रिसर्चच्या प्रसारमाध्यम संग्रहात संकलित केलेल्या वक्तव्यांनुसार, या प्रकारचे ठराव मध्यपूर्वेतील खऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधत नाहीत, असं इस्रायलचं यावरील स्पष्टीकरण आहे.
झेवियर बोहिगास नमूद करतात की "एखाद्या देशानं अण्वस्त्रं मिळवणं आणि ती बाळगणं ही चिंतेची बाब आहे. कारण अण्वस्त्रं असण्याशी संबंधित धोके असतात."
ते पुढे म्हणतात, "संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचं उल्लंघन करणाऱ्या, इस्रायलनं आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि त्यांच्याकडे अजूनही अण्वस्त्रं आहेत."
"इतर कोणताही देश इस्रायलला रोखण्यास, परिस्थितीतील तणाव कमी करण्यास आणि त्याला नवी दिशा देण्यास सक्षम नाही, ही खूपच चिंतेची बाब आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)