'एका माकडाचा उच्छाद,' श्रीलंकेत वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मंत्र्याने माकडालाच धरले जबाबदार

    • Author, जॉर्ज राईट आणि केली एनजी
    • Role, बीबीसी न्यूज

श्रीलंकेत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानं देशभरात जनजीवन विस्कळीत झाला असून एका माकडाला यासाठी कारणीभूत ठरलंय जातंय. ऐकून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरं आहे.

कोलंबोच्या दक्षिणेकडील एका वीज केंद्रात ही घटना घडलीय. या वीजकेंद्रात घुसलेल्या माकडामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्र्यांनी याबाबत माहिती दिलीय.

ही घटना रविवारी (9 फेब्रुवारी) सकाळी 11 दरम्यान घडली.

2.2 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा, जलशुद्धीकरण प्रकल्पासह जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांना जनरेटरचा आसरा घ्यावा लागला. मात्र, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिकाऱ्यांच्या मते वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात. श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कुमारा जयकोडी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "एक माकड ग्रीड ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आले, ज्यामुळे संपूर्ण विद्युतप्रणाली ठप्प झाली."

मात्र, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या घटनेचा चांगलाच समाचार घेतलाय. अनेकांनी अधिकाऱ्यांवर टीका करत वीज वितरण विभागाची खिल्ली उडवलीय. नेटकऱ्यांनी यावर विविध मीम्सच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले.

सोशल मीडिया एक्सवर मारिओ नाफल या युझरनं लिहिलं की, "एका माकडाने कोलंबोतील वीज केंद्रात धुमाकूळ घातला अन् श्रीलंकेची संपूर्ण वीज प्रणाली ठप्प केली."

"एक माकड = गोंधळच गोंधळ. पायाभूत सुविधांबद्दल पुनर्विचार करण्याची ही योग्य वेळ आहे असे नाही वाटत का?" असा प्रश्न त्याने उपस्थित केला.

डेली मिरर या स्थानिक वृत्तपत्राच्या मुख्य संपादक जमीला हुसेन यांनी लिहिलं की, "वीज केंद्रात भांडणाऱ्या माकडांच्या टोळीमुळं संपूर्ण बेटाचा वीजपुरवठा खंडित होतो, अशी घटना फक्त श्रीलंकेतच घडू शकते."

सोमवारी प्रकाशित झालेल्या वृत्तात, डेली मिररनं म्हटलंय की, अभियंते मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकारला पॉवर ग्रीड अपग्रेड करण्याचा इशारा देत आहेत, पण यावर तोडगा निघू शकलेला नाही. हे असंच सुरू राहिलं तर वारंवार देशाला वारंवार ब्लॅकआउटचा सामना करावा लागण्याची वेळ येईल.

एका वरिष्ठ अभियंत्यानं नाव न देण्याच्या अटीवर डेली मिररला सांगितलं, "राष्ट्रीय वीज प्रणाली इतकी कमकुवत झाली आहे की, जर आमच्या कोणत्याही वीजवाहिनीत अडथळा आल्यास संपूर्ण देशभरातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे."

दरम्यान श्रीलंकेत देशपातळीवर वीजपुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2022 च्या आर्थिक संकटादरम्यान श्रीलंकेतील जनतेला मोठ्या प्रमाणात वीज कपातीचा सामना करावा लागला होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.