लाईफबॉय साबण, खिडक्यांना जाड पडदे आणि खास कार; दिग्गज सोव्हिएत नेत्याच्या भारत दौऱ्यावेळी या मागण्या का करण्यात आल्या होत्या?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

लियोनिद ब्रेझनेव्ह 15 डिसेंबर 1961 ला पहिल्यांदा भारतात आले, तेव्हा ते सुप्रीम सोव्हिएत प्रेसीडियमचे अध्यक्ष होते. ते अधिकृतपणे राष्ट्राध्यक्ष नव्हते. मात्र त्यांचं पद राष्ट्रप्रमुखासारखंच होतं. हा दौरा अचानक, फक्त एक आठवड्याच्या पूर्वसूचनेवर आयोजित करण्यात आला होता.

भारतात येण्याआधी ब्रेझनेव्ह यांनी दोन इच्छा व्यक्त केल्या होत्या. एक म्हणजे त्यांना भारताच्या संसदेत भाषण करायचं होतं. दुसरं म्हणजे त्यांना विशाखापट्टणमला जायचं होतं, जिथल्या बंदरावर भारताच्या प्रकल्पांसाठी सोव्हिएत युनियनमधून आलेली उपकरणं उतरवण्यात येत होती. मात्र ब्रेझनेव्ह यांच्या या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत.

त्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू नव्हतं आणि संसद फेब्रुवारी 1962 पर्यंत स्थगित करण्यात आलेली होती. ब्रेझनेव्ह यांना विशाखापट्टणमला जाऊ देण्यास भारत सरकार तयार झालं नाही, कारण त्यावेळेस तिथे एखाद्या राष्ट्रप्रमुखाला राहण्यायोग्य व्यवस्था नव्हती.

राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयाच्या कागदपत्रांनुसार, "आंध्रप्रदेशच्या मुख्य सचिवांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केली की, ब्रेझनेव्ह यांचा मुक्काम विशाखापट्टणममध्ये होऊ देऊ नये."

ब्रेझनेव्ह इल्यूशन-18 विमानातून दिल्लीत आले होते. दिल्लीपासून 50 मैल आधी भारतीय हवाई दलाच्या 8 लढाऊ विमानांनी ब्रेझनेव्हच्या विमानाला एस्कॉर्ट करत दिल्लीच्या पालम विमानतळापर्यंत आणलं होतं. ब्रेझनेव्ह पालम विमानतळावर उतरताच त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली होती.

सोव्हिएत युनियनच्या नेत्याचं स्वागत करण्याची जबाबदारी उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर सोपवण्यात आली होती. कारण त्यावेळेस राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आजारी होते.

भारतातील अनेक शहरांना भेट

टाइम्स ऑफ इंडियानं 16 डिसेंबर 1961 च्या अंकात लिहिलं होतं, "पालम विमानतळाहून राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सर्वसामान्य लोक ब्रेझनेव्ह यांच्या स्वागतासाठी उभे होते. लोकांनी ब्रेझनेव्ह यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. ब्रेझनेव्ह यांनी या स्वागताला नमस्कार करत प्रतिसाद दिला."

"ब्रेझनेव्ह यांच्या गाड्यांच्या ताफा विजय चौकात पोहोचल्यानंतर राष्ट्रपतींच्या घोडेस्वार अंगरक्षकांनी ब्रेझनेव्ह यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते ब्रेझनेव्ह यांना एस्कॉर्ट करत राष्ट्रपती भवनात घेऊन गेले होते."

ब्रेझनेव्ह यांना राष्ट्रपती भवनाच्या द्वारका स्वीटमध्ये उतरवण्यात आलं होतं. ब्रेझनेव्ह यांच्यासोबत त्यांचा स्वयंपाकीदेखील भारतात आला होता. त्यानं राष्ट्रपती भवनातील स्वयंपाक्यांसोबत ब्रेझनेव्ह यांच्यासाठी जेवण तयार केलं होतं.

रात्रीच्या जेवणानंतर साँग अँड डान्स डिव्हिजनच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. दुसऱ्या दिवशी तीन मूर्ती भवनात ब्रेझनेव्ह यांची जवाहरलाल नेहरूंबरोबर भेट झाली. तिथे या दोन्ही नेत्यांनी निशस्त्रीकरण, जर्मनी, वसाहतवाद आणि जागतिक शांतता यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

संध्याकाळी ते भारतीय उद्योग मेळावा पाहण्यासाठी गेले. तिथे मेळाव्याच्या आयोजकांनी त्यांना भेटवस्तू म्हणून एक हस्तीदंताचा टेबल लँप आणि त्यांच्या पत्नीला बनारसी सिल्कचा एक स्कार्फ दिला.

या दौऱ्यात ब्रेझनेव्ह यांनी आग्रा, मुंबई, अंकलेश्वर, बडोदा, कलकत्ता, मद्रास, जयपूर आणि महाबलिपूरम या शहरांना भेट दिली.

या दौऱ्यात 19 डिसेंबरला अंकलेश्वरला त्यांनी त्यांचा 55 वा वाढदिवसदेखील साजरा केला. जयपूरमध्ये हत्तीच्या स्वारी केल्यानंतर ब्रेझनेव्ह यांनी हिंदीत लोकांना 'शुक्रिया' म्हणत आश्चर्यचकित केलं होतं.

लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या नागरी सन्मान कार्यक्रमात जवाहरलाल नेहरूंनी गोवा ऑपरेशनमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल ब्रेझनेव्ह यांचे आभार मानले. जाण्यापूर्वी ब्रेझनेव्ह यांनी आकाशवाणीवरून भारतीय लोकांना उद्देशून भाषण केलं.

1971 च्या युद्धानंतर दोन वर्षांनी पुन्हा भारत दौरा

1973 मध्ये, ब्रेझनेव्ह दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले. हा दौरा महत्त्वाचा कारण 1971 च्या युद्धाला अजून दोन वर्षेदेखील पूर्ण झाली नव्हती. ब्रेझनेव्ह त्यावेळेस सोव्हिएत युनियनचे सर्वात मोठे नेते होते, मात्र त्यांना शासनप्रमुखाचा दर्जा नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉलचं पालन करत विमानतळावर ब्रेझनेव्ह यांचं स्वागत राष्ट्रपतींनी नाही, तर पंतप्रधान इंदिरा गांधींनी केलं होतं.

स्टेट्समन या इंग्रजी वृत्तपत्रानं 17 नोव्हेंबर 1973 च्या अंकात लिहिलं होतं, "रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनी कॉम्रेड ब्रेझनेव्हचा द्रूजबा (कॉम्रेड ब्रेझनेव्ह मित्र) म्हणत त्यांचं स्वागत केलं. विमानतळावरील संपूर्ण स्वागत कार्यक्रमादरम्यान ब्रेझनेव्ह यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं."

टाइम्स ऑफ इंडियानं रंजक मथळा देत वृत्त दिलं होतं. त्यात लिहिलं होतं, 'स्माईल दॅट ब्रोक ऑल रेकॉर्ड्स'. ब्रेझनेव्ह यांना सहा दरवाजे असलेल्या बुलेटप्रूफ मर्सिडिज कारमधून 32 कारच्या ताफ्यानं राष्ट्रपती भवनात आणण्यात आलं. रस्त्यात अनेक ठिकाणी मुलांनी भांगडा नृत्य करून ब्रेझनेव्ह यांचं स्वागत केलं.

ते दिल्लीत येण्याआधी राष्ट्रपती भवनाला सोव्हिएत दूतावासाकडून दोन विचित्र विनंती करण्यात आल्या. पहिली म्हणजे सोव्हिएत पाहुण्यांसाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रत्येक बाथरूममध्ये 'लाईफबॉय' साबण ठेवण्यात यावा.

भारताच्या राष्ट्रपतींच्या सचिवालयातील रेकॉर्ड्सनुसार फाईल क्रमांक 30 नुसार त्यावेळेस ही विनंती ऐकून राष्ट्रपती भवनाच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं.

कारण परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपती भवनाच्या बाथरूममध्ये जगातील सर्वोत्तम साबणांची व्यवस्था केली जाते. लाईफबॉय साबण त्यावेळेस भारतीय बाजारपेठेत मिळणारा सर्वात स्वस्त साबण होता.

मात्र राष्ट्रपती भवनाच्या हाऊसहोल्ड कंट्रोलरनं प्रत्येक बाथरूममध्ये एका लाईफबॉय साबणासोबत साबणांचे टॉप ब्रँड्सदेखील ठेवले होते.

भोजनाआधी अन्नाची तपासणी

सोव्हिएत युनियनकडून दुसरी मागणी अशी करण्यात आली होती की ज्या द्वारका स्वीटमध्ये ब्रेझनेव्ह यांचा मुक्काम होता, तिथल्या खिडक्यांवर जाड पडदे लावण्यात यावेत. या मागणीमुळे देखील राष्ट्रपती भवनाच्या कर्मचाऱ्यांना थोडं आश्चर्य वाटलं.

कारण राष्ट्रपती भवनाचा विस्तार काहीशे एकरांमध्ये झालेला आहे. त्याच्यासमोर कोणताही रस्ता नाही, ज्याच्यामुळे ट्रॅफिकचा आवाज ब्रेझनेव्ह यांच्या बेडरूमध्ये पोहोचला असता. तसंही कोणत्याही परदेशी पाहुण्यांच्या दौऱ्याच्या वेळेस तिथली सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली जाते.

दरम्यान सोव्हिएत युनियनकडून करण्यात आलेल्या या मागणीला देखील पूर्ण करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात राहणाऱ्या लोकांना सूचना देण्यात आल्या की त्यांनी त्यांच्या खिडक्यांमधून बाहेर वाकून पाहू नये आणि कोणताही आवाजदेखील करू नये.

आणखी एक मजेशीर मागणी करण्यात आली. ती म्हणजे ब्रेझनेव्ह यांच्या खोलीत विजेवर चालणाऱ्या दोन उत्तम इस्त्री आणि आयर्न बोर्डची व्यवस्थादेखील करण्यात आली.

जेवणाचा विचार करता, प्रत्येक खोलीतील फ्रिजमध्ये अननस, पेरू आणि द्राक्षाचे रस ठेवण्यात आले. अशीही मागणी करण्यात आली की ब्रेझनेव्ह यांना वाढण्यात येणारं मांस, चिकन शिजवण्यापूर्वी डॉक्टर त्याच्या गुणवत्तेची तपासणी करतील.

ब्रेझनेव्ह यांच्या शिष्टमंडळातील एक सदस्याला विशेषकरून याची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली.

राष्ट्रपती भवनाच्या स्टाफला सांगण्यात आलं होतं की ब्रेझनेव्ह यांना उकडलेल्या बटाट्यांसोबत हिल्सा मासे खायला आवडतात. याव्यतिरिक्त नाश्ता म्हणून मेयोनीज आणि मसाल्याशिवाय सॅलड खायला आवडतं. याशिवाय त्यांना कोबीचं सूपदेखील आवडतं.

ही माहिती देखील देण्यात आली की ब्रेझनेव्ह फक्त 'सिनांडली' आणि 'मुकुजानी' ड्राय वाईन पितात. तसंच ते 'बोरजोमी' आणि 'नर्जान' मिनरल वॉटरचा वापर करतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीनं राष्ट्रपती भवनात या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली.

लाल किल्ल्यावर ब्रेझनेव्ह यांचा नागरी सन्मान

त्याकाळी संपूर्ण जगात लेटर बॉम्बच्या घटना दिसत असत. त्यामुळे राष्ट्रपती भवनाच्या पोस्ट मास्टरला सूचना देण्यात आल्या की सोव्हिएत पाहुण्यांसाठी येणारी पत्रं थेट त्यांना न पाठवता सोव्हिएत दूतावासात पाठवण्यात यावी.

ब्रेझनेव्ह यांच्या दौऱ्यासाठी एक वेगळी कम्युनिकेशन यंत्रणा उभारण्यात आली. यासाठी खास सोव्हिएत युनियनमधून उपकरण मागवण्यात आले. जवळपास 20 टन वजनाची उपकरणं सात ट्रकांमधून राष्ट्रपती भवनात आणण्यात आली.

ब्रेझनेव्ह यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी सोव्हिएत युनियनमधून डॉक्टरांची एक टीमदेखील आली. दुसऱ्या दिवशी ब्रेझनेव्ह, इंदिरा गांधींची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. 35 मिनिटं भेट झाल्यानंतर साऊथ ब्लॉकच्या कॉन्फरन्स रूममध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची भेट झाली.

संध्याकाळी इंदिरा गांधी यांनी ब्रेझनेव्ह यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात मेजवानी दिली. स्टेटसमननं या मेजवानीचं वृत्त देताना लिहिलं, "मेजवानीत क्रीम डोडियू, कबाबबरोबर तंदूरी चिकन, नान, कोबीची भजी. त्यासोबत भरलेले टोमॅटो, हिरवे वाटाणे, सॅलड, पापड, फळं आणि कॉफीदेखील होती."

"जेवणानंतर गडद पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या इंदिरा गांधींनी हिंदीत भाषण केलं. त्या म्हणाल्या की 1971 मध्ये झालेला भारत-सोव्हिएत मैत्रीकरार कोणत्याही देशाच्या विरोधात नाही."

जेवणानंतर, अशोक हॉलमध्ये संगीत कला अकादमीच्या कलाकारांनी पाहुण्यांसमोर कथक आणि मणिपूरी नृत्य केलं. दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधी त्यांची नात प्रियंकाला ब्रेझनेव्हला भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात घेऊन आल्या. लाल किल्ल्यात ब्रेझनेव्ह यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तिथे ब्रेझनेव्ह यांनी 90 मिनिटं भाषण केलं. एका दुभाषानं त्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं.

दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधी त्यांचा नातू राहुलला घेऊन ब्रेझनेव्हला भेटण्यासाठी आल्या. राहुलनं ब्रेझनेव्हना एक बोलणारी मैना भेट दिली. संध्याकाळी ब्रेझनेव्ह यांनी भारतीय संसदेत भाषण केलं. आधीच्या दौऱ्यात हे भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती.

अफगाणिस्तानबाबत मतभेद

ब्रेझनेव्ह यांचा तिसरा भारत दौरा सात वर्षांनी म्हणजे डिसेंबर 1980 मध्ये झाला. त्यावेळेस इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या होत्या. त्यावेळेपर्यंत ब्रेझनेव्ह चांगलेच वृद्ध झाले होते. त्यांचं आरोग्य उतरणीला लागल्याचं स्पष्ट दिसत होतं.

अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्य पाठवल्यामुळे ब्रेझनेव्ह यांच्या जीवनाला असलेला धोका वाढला होता. त्याबाबत काळजी घेण्यासाठी मॉस्कोहून एक विशेष कार ब्रेझनेव्ह यांच्या वापरासाठी आणण्यात आली.

ब्रेझनेव्ह यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी कारचा ड्रायव्हरदेखील सोव्हिएत युनियनमधून आणण्यात आला. फक्त एक सवलत देण्यात आली की सोव्हिएत गाड्यांच्या नंबर प्लेटवर भारताचं राष्ट्रीय चिन्हं लावण्यात आलं.

राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी दिलेल्या मेजवानीला पंतप्रधानांव्यतिरिक्त मनमोहन सिंहदेखील होते. त्यावेळेस ते योजना आयोगाचे सदस्य होते. नंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. इतर पाहुण्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी, भूपेश गुप्त आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते ईएमएस नंबूदरीपाद होते.

मेजवानीत ब्रेझनेव्ह यांना पॉमफ्रे मासे, हुसैनी कबाब, पनीर कटलेट, पनीर कोरमा आणि स्विस शालेत वाढण्यात आलं. जेवणानंतर दिलेल्या भाषणात संजीव रेड्डी यांनी अफगाणिस्तानचा उल्लेख केला नाही. दुसऱ्या दिवसी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इंदिरा गांधी आणि ब्रेझनेव्ह यांच्यात चर्चा झाली. मात्र या मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांची वेगवेगळी मतं होती.

जी के रेड्डी यांनी 10 डिसेंबर 1980 च्या 'द हिंदू'च्या अंकात लिहिलं, "इंदिरा गांधींनी ब्रेझनेव्ह यांना स्पष्ट केलं की अफगाणिस्तानातील सोव्हिएत कारवाईचा भारतावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. इंदिरा गांधींनी अफगाणिस्तानचं नाव न घेता म्हटलं की भारत कोणत्याही देशानं दुसऱ्या देशात हस्तक्षेप करण्याच्या विरुद्ध आहे."

न्यूयॉर्क टाइम्सनं अतिशय मजेशीर टिप्पणी केली की "ब्रेझनेव्ह ज्या 'बियर हग'च्या आशेनं भारतात आले होते, ते त्यांना मिळालं नाही." यावेळेस देखील ब्रेझनेव्ह यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम लाल किल्ल्याऐवजी विज्ञान भवनात करण्यात आला.

ब्रेझनेव्ह यांच्या दौऱ्याची सांगता, त्यांनी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सन्मानार्थ सोव्हिएत दूतावासात देण्यात आलेल्या मेजवानीद्वारे झाली. पालम विमानतळावर जाताना रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांनी 'लाल सलाम', 'हिंदी रूसी भाई भाई' अशा घोषणा देत ब्रेझनेव्ह यांना निरोप दिला.

त्यानंतर पुढील दोन वर्ष ब्रेझनेव्ह सोव्हिएत युनियनचं नेतृत्व करत होते. मात्र 10 नोव्हेंबर 1982 ला ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यावेळेस ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी व्हिक्टोरिया ब्रेझनेव्हा 1995 पर्यंत हयात होत्या.

(या लेखात ज्या अधिकृत माहितीचा उल्लेख आहे, ती भारताच्या राष्ट्रपती सचिवालयाच्या रेकॉर्ड्समधून घेण्यात आली आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)