You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इलॉन मस्क यांना टेस्लाकडून विक्रमी वेतन मंजूर, भारतीय चलनात एवढा आहे आकडा
- Author, लिली जमाली
- Role, उत्तर अमेरिका टेक्नॉलॉजी करस्पाँडंट
- Author, ऑस्मंड चिया
- Role, बिझनेस रिपोर्टर
जगातील श्रीमंत व्यक्ती आणि व्यवसायातील आपल्या धाडसी निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेले इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. टेस्लाचे प्रमुख असलेल्या मस्क यांना विक्रमी वेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
टेस्लाच्या शेअर धारकांनी मस्क यांना जवळजवळ 1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनातील जवळपास 88 लाख कोटी रुपये इतके विक्रमी वेतन देण्याची योजना मंजूर केली आहे.
हा अभूतपूर्व करार 75 टक्के मतांनी मंजूर झाला आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
मस्क, हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना पुढील 10 वर्षांत टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचे बाजार मूल्य मोठ्या प्रमाणात वाढवावे लागणार आहे.
त्यांनी हे साध्य केलं आणि कंपनीचे महत्त्वकांक्षी उद्दिष्टंही पूर्ण केली, तर त्यांना लाखो शेअर्स बक्षीस म्हणूनही दिले जातील.
संभाव्य वेतनाच्या रकमेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. परंतु, टेस्लाच्या बोर्डाकडून सांगण्यात आलं की, हा करार मंजूर झाला नाही, तर मस्क कंपनी सोडू शकतात आणि कंपनीला त्यांना गमावणं परवडणारं नाही.
वेतनाची घोषणा झाल्यानंतर, मस्क हे ऑस्टिन, टेक्सास इथं मंचावर गेले आणि त्यांनी नृत्य केलं.
"आम्ही जे सुरू करणार आहोत, तो फक्त टेस्लाच्या भविष्याचा नवीन अध्याय नाही, तर एक संपूर्ण नवीन पर्व आहे," असं त्यांनी म्हटलं.
"इतर शेअरधारकांच्या सभांना लोक बोर (कंटाळा) होतात, पण आमच्या सभा धमाल असतात. हे पाहा! हे खूप छान आहे," असं त्यांनी पुढं म्हटलं.
मस्क यांना मोठं टार्गेट
पुढील 10 वर्षांत मस्क यांना जास्तीत जास्त वेतन मिळवण्यासाठी टेस्लाचा बाजारभाव सध्याच्या 1.4 ट्रिलियन डॉलरवरून वाढवून 8.5 ट्रिलियन डॉलर इतका करावा लागेल.
त्यांना 10 लाख स्वयंचलित रोबोटॅक्सी वाहनं व्यावसायिक ऑपरेशनमध्ये आणावे लागतील.
परंतु, गुरुवारी (6 नोव्हेंबर) मस्क यांनी जास्त लक्ष ऑप्टिमस रोबोटवर केंद्रित केलं. त्यामुळं काही जुने विश्लेषक आणि टेस्ला निरीक्षक निराशा झाले. कारण मस्क यांनी कार व्यवसाय सुधारण्यावर लक्ष द्यावं अशी अपेक्षा ते करत होते.
"पाहा मस्क यांच्या मनात काय चाललंय," असं डीपवॉटर ॲसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय भागीदार विश्लेषक जीन मन्स्टर यांनी एक्सवर लिहिलं.
"त्यांचं 'नवीन पुस्तक' हे ऑप्टिमस रोबोटपासून सुरू होतं. कार, एफएसडी आणि रोबोटॅक्सीचा त्यांनी अद्याप उल्लेखही केलेला नाही."
नंतर, मस्क यांनी एफएसडी (फुल सेल्फ-ड्रायव्हिंग) बद्दलही सांगितलं आणि ड्रायव्हर्सना 'टेक्स्ट करतानाही गाडी चालवता येईल,' यासाठी कंपनी आता जवळजवळ तयार आहे, असं त्यांनी म्हटलं.
अमेरिकेतील नियामक टेस्लाच्या सेल्फ-ड्रायव्हिंग फिचरची तपासणी करत आहेत. कारण अनेक वेळा गाड्या लाल दिव्यावरून तशाच पुढे गेल्या किंवा चुकीच्या बाजूने चालवल्या गेल्या, त्यामुळं काही अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
मस्क-ट्रम्प यांच्यात वितुष्ट आणि विक्रीत घट
टेस्लाचे शेअर्स आफ्टर-अवर्स ट्रेडिंगमध्ये किचिंतसे वाढले, पण गेल्या सहा महिन्यांत ते 62 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वितुष्ट आल्यापासून गेल्या वर्षभरात टेस्लाची विक्री घसरली आहे.
टेस्लाचे शेअरहोल्डर रॉस गर्बर यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, मस्क यांचा वेतन करार हा "व्यवसायात आपण पाहत असलेल्या अविश्वसनीय गोष्टींपैकी आणखी एक आहे."
मस्क यांनी टेस्लासाठी आपली उद्दिष्टं स्पष्ट केली आहेत, पण कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यात आर्थिक कामगिरीच्या समस्येचा देखील समावेश आहे, असं रॉस गर्बर यांनी सांगितलं. रॉस गर्बर हे गर्बर कावासाकी या गुंतवणूक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीही (सीईओ) आहेत.
ह्युमनॉइड रोबोट्सला (मानवासारखे रोबोट्स) किती मागणी असेल हे अद्याप स्पष्ट नाही. त्याचबरोबर, टेस्लाला रोबोटॅक्सी उद्योगात वेमोसारख्या स्पर्धकांकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावं लागेल, असंही रॉस गर्बर यांनी सांगितलं.
मस्क यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे ब्रँडची किंमत खूप कमी झाली आहे, त्यामुळे त्यांच्या कंपनीने अलीकडेच टेस्लामधील आपला हिस्सा कमी केल्याची माहिती रॉस गर्बर यांनी दिली.
"इलॉन यांची लोकप्रियता पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहे, हे कदाचित त्यांच्या लक्षात आलेलं नसाव," असंही त्यांनी म्हटलं.
वेडबश सिक्युरिटीजचे डॅन आयव्हस, हे मस्क यांच्या नेतृत्वाचे दीर्घकाळापासूनचे समर्थक आहेत. त्यांनी मतदानानंतर प्रकाशित केलेल्या एका नोटमध्ये मस्क यांना 'टेस्लाची सर्वात मोठी संपत्ती' असं म्हटलं आहे.
"आम्हाला वाटतं की, एआयमुळे टेस्लाचं मूल्य वाढत आहे, आणि पुढील 6 ते 9 महिन्यांत टेस्लाचा एआय-आधारित वाढीचा प्रवास सुरू झालेला असेल," असं आयव्हस यांनी पुढं म्हटलं.
नवीन वेतन कराराला विरोधही
मस्क यांच्याकडे आधीच टेस्लाचे 13 टक्के शेअर्स होते. शेअरधारकांनी त्यांच्या वेतनाचा करार दोनदा मंजूर केला होता. त्यात कंपनीचे मूल्य दहा पट वाढवले तर त्यांना अब्जावधी डॉलर मिळणार होते आणि त्यांनी हे साध्यही केलं.
टेस्ला बोर्डमधील सदस्य मस्क यांचे निकटवर्तीय असल्याचे कारण देत डेलावेअरच्या न्यायाधीशांनी तो वेतनाचा करार नाकारला होता.
टेस्लाने नोंदणी डेलावेअरमधून टेक्सासमध्ये हलवली.
नवीन वेतनाचा हा करार काही मोठ्या गुंतवणूकदारांनी नाकारला आहे. त्यात जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय संपत्ती कोष असलेला नॉर्वेचा सार्वभौम संपत्ती कोष आणि अमेरिकेतील सर्वात मोठा सार्वजनिक पेन्शन फंड कॅलिफोर्नियातील सार्वजनिक कर्मचाऱ्यांचा निवृत्ती निधी (सीएएलपीइआरएस) यांचा समावेश आहे.
यामुळे मस्क यांना टेस्लाच्या मोठ्या संख्येने असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांवर अवलंबून राहावं लागलं.
मस्क आणि टेस्लाच्या बोर्डवर असलेला त्यांचा भाऊ किम्बल यांनाही गुरुवारच्या बैठकीत मतदान करण्याची परवानगी मिळाली होती.
अलीकडच्या आठवड्यांत, टेस्ला बोर्डातील सदस्यांनी मस्क यांच्या नवीन वेतन पॅकेजसाठी प्रचार (लॉबिंग) केला, ज्यामुळे काही कॉर्पोरेट व्यवस्थापन तज्ज्ञ संतापले.
व्होटटेस्ला डॉट कॉमवर पोस्ट केलेल्या व्हीडिओत बोर्डचे अध्यक्ष रॉबिन डेनहोल्म आणि संचालिका कॅथलीन विल्सन-थॉम्पसन हे मस्क यांचं कौतुक करताना दिसले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)