जस्टिन ट्रुडो यांचा भारतावरील आरोपाचा पुनरुच्चार, आतापर्यंत काय काय झालं?

भारत आणि कॅनडामधील वाद वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकापाठोपाठ एक वक्तव्यं येत आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर लावलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “मी जसं सोमवारी (18 सप्टेंबर) म्हणालो तसं की एक कॅनडियन नागरिकाच्या हत्येत भारताच्या एजंटचा सहभाग होता. हे ठामपणे सांगण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणं आहेत.’

“कायद्याने चालणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय नियम कसोशीने पाळणाऱ्या देशासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आमच्या देशात स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे.”

जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेत भारतावर गंभीर आरोप लावले होते.

दरम्यान, कॅनडातीलभारतीय व्हिसा अप्लिकेशन सेंटरनं म्हटलं आहे की तांत्रिक कारणांमुळं पुढील सूचना मिळेपर्यंत व्हिसा सेवा स्थगित करण्यात आली आहे.

त्यामुळं आता कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा मिळणार नाही.

ही माहिती BLS या भारतातील व्हिसा अर्ज हाताळणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटवर टाकण्यात आली होती, परंतु त्यानंतर ती काढून घेण्यात आली आहे. मात्र आता हीच माहिती पुन्हा देण्यात आली आहे.

कॅनडातील भारतीय व्हिसा सेंटरनं आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. यात आवश्यक सूचना देण्यात आली आहे.

त्यात सांगितलं आहे की , "तांत्रिक कारणामुळं भारतीय व्हिसा सेवा 21 सप्टेंबर 2023 पासून पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कृपया अधिक माहिती मिळवण्यासाठी BLS वेबसाइट पहा.”

BLS इंटरनॅशनल कॅनडामध्ये भारतासाठी ऑनलाइन व्हिसा अर्ज केंद्र चालवतं.

कॅनडाच्या भारतीय वंशाच्या खासदारानं कोणतं आवाहन केलं?

कॅनडातील नेपियन, ओटारियो येथील खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

यासोबतच खलिस्तान समर्थक नेते कॅनडात हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

व्हीडिओ मध्ये त्यांनी आवाहन करत म्हटलं की, “काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तान चळवळीचे नेते आणि तथाकथित सार्वमताचं आयोजन करणाऱ्या शिख फॉर जस्टिसचे अध्यक्ष गुरपतवंत सिंग पन्नू यांनी आम्हाला इथल्या हिंदूना कॅनडा सोडून भारतात परत जाण्यास सांगून हिंदूंना लक्ष्य केलं आहे."

“मी कॅनडातील अनेक हिंदू लोकांकडून ऐकलं आहे की ते घाबरले आहेत. मी कॅनडातील हिंदूंना शांत आणि सतर्क राहण्याचं आवाहन करतो.”

"कॅनडातील बहुतेक शीख अनेक कारणांमुळे खलिस्तान चळवळीचा जाहीर निषेध करू शकत नाहीत. परंतु ते कॅनडातील हिंदू समुदायाशी जोडलेले आहेत,”असं चंद्र आर्य पुढे सांगतात.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप केला

खलिस्तानी कट्टरपंथी नेता हरदीपसिंग निज्जर याची काही महिन्यांपूर्वी कॅनडात हत्या करण्यात आली होती.

गेल्या सोमवारी ( 18 सप्टेंबर) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या प्रकरणात भारतीय एजन्सींचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

कॅनडाच्या संसदेत भाषण करताना त्यांनी भारतावर हे आरोप केले.

त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले जाऊ लागले. कॅनडानं एका राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.

त्यानंतर भारतानं कॅनडाच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करून प्रत्युत्तर दिलं.

संबंधामध्ये कटुता कशी आली?

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. भारत सरकारनं निज्जर याच्या हत्येचे आरोप फेटाळून लावले आहेत.

काही दिवसांपूर्वी ट्रूडो जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींनी ट्रूडो यांच्यासोबतच्या बैठकीत कॅनडातील फुटीरतावादी संघटना आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.

G20 नंतर कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो आपल्या देशात परतले आणि भारतासोबतचे संबंध ताणले गेले.

ट्रुडो कॅनडाला परतल्यानंतर लगेच, कॅनडाच्या वाणिज्य मंत्री मेरी एनजी यांच्या प्रवक्त्यानं शुक्रवारी (15 सप्टेंबर) सांगितलं की कॅनडानं द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावरील चर्चा स्थगित केली आहे.

2022 मध्ये भारत हा कॅनडाचा दहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. 2022-23 मध्ये भारतानं कॅनडात 4.10 अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली.

तर 2022-23 मध्ये कॅनडानं भारताला 4.05 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. 2021-22 मध्ये हा आकडा 3.13 अब्ज डॉलर होता.

कॅनडाच्या किमान 600 कंपन्या भारतात कार्यरत आहेत.

ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन या भारतीय थिंक टँकचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ हर्ष व्ही पंत यांनी बीबीसीला सांगितलं की, "ट्रूडो जोपर्यंत सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत गोष्टी सामान्य होणार नाहीत. मला वाटतं की ट्रूडो यांनी हा मुद्दा वैयक्तिक केला आहे. ट्रूडो यांना असं वाटतं की त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केलं जातंय."

ते पुढे सांगतात की , "भारतानं खलिस्तानच्या मुद्द्यावर आपली बाजू स्पष्ट केली आहे आणि व्यापारावरही चर्चा झाली. पण ट्रुडो यांच्या नव्या भूमिकेवरून ते बॅकफूटवर असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच ते भारतासोबतच्या तणावाबाबत खुलासा करत आहेत."

कॅनडा आणि शिख समुदाय

1985 मध्ये टोरंटोहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट झाला होता. ज्यामध्ये विमानातील सर्व 329 लोकांचा मृत्यू झाला. हा कॅनडामधील सर्वात भयंकर आणि प्राणघातक दहशतवादी हल्ला आणि नरसंहार मानला जातो.

ब्रिटिश कोलंबियातील दोन शिख कट्टरपंथीना 2005 मध्ये दीर्घ तपासानंतर सोडण्यात आलं. या प्रकरणातील अनेक साक्षीदार मरण पावले किंवा त्यांना मारहाण करण्यात आली किंवा त्यांना साक्ष देण्यापासून धमकावण्यात आलं.

या प्रकरणात बॉम्ब बनवणं आणि खून प्रकरणात तिसऱ्या शिख व्यक्तीनं खोटी साक्ष दिल्याचं निदर्शनास आलं.

2005 मध्ये या प्रकरणात निर्दोष सुटलेला रिपुदमन सिंग मलिक याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. पण या हत्येनं ब्रिटिश कोलंबियातील शिख समुदायाला अस्वस्थ केलं.

भारत खलिस्तान चळवळीला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानतो. पण या चळवळीबद्दल सहानुभूती असलेले शीख जगभर असल्याचं मानलं जातं. ज्यामध्ये विशेषत करून कॅनडा आणि ब्रिटनमधील खलिस्तानी कारवायांवर भारताचा तीव्र आक्षेप आहे.

2021 च्या जनगणनेनुसार, कॅनडात 7,70,000 शीख आहेत.

2015 मध्ये ट्रुडो पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण चार शिख होते.

सेंटर-लेफ्ट न्यू डेमोक्रेटिक पक्षाचे जगमीत सिंग हे देखील शीख आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, पक्षाचे नेते बनण्यापूर्वी जगमीत सिंह खलिस्तानमधील रॅलींमध्ये सहभागी होत असत.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.