You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅनडामध्ये शिकायला जायचंय, तर आधी सरकारच्या 'या' 4 निर्णयांची माहिती असायलाच हवी
- Author, सरबजित सिंह धालीवाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कॅनडाचे स्थलांतर, निर्वासित आणि नागरिकत्व मंत्री मार्क मिलर म्हणाले की, “यापुढच्या काळात आम्ही आंततराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं खुल्या मनाने स्वागत करू शकणार नाही.”
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना उद्देशून मार्क मिलर यांनी एक्स( ट्विटर) वर लिहिलं, “लोकांनी इथं यावं, शिकावं, कौशल्यं आत्मसात करावीत आणि आपल्या देशात निघून जावं.”
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी नुकतंच पोस्ट ग्रॅज्युएशन आणि कामाचा परवान्याचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून या ट्विटकडे पाहिलं जात आहे.
इतकंच नाही, या मुद्दयावरून इथल्या विद्यार्थ्यांनी कॅनडाच्या विविध भागातील रस्त्यांवर या मागणीसाठी आंदोलनंही केली होती.
कॅनडामधील यूथ सपोर्ट ऑर्गनायझेशनने मार्क मिलर यांना टॅग करून कॅनडाची अर्थव्यवस्था, कोरोनाच्या काळात या विद्यार्थ्यांनी केलेलं काम, विद्यार्थ्यांना इथं बोलावण्यासाठी कॅनडा सरकारनं दिलेलं वचन आदी गोष्टींचा उल्लेख करून एक ट्विट केलं.
त्यावर प्रतिसाद म्हणून मार्क मिलर यांनी एक्सवर (ट्विटर) हा युक्तिवाद मांडला आहे.
आपल्या शिक्षणानुसार नोकऱ्या शोधा
कॅनडामध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिथे तीन वर्षं काम करण्याचा परवाना मिळतो. त्या काळात विद्यार्थी कॅनडाच्या नागरिकत्वासाठीही अर्ज करू शकतात.
बहुतांश केसेसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडाचं नागरिकत्व मिळतं.
पण आता कॅनडाने पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिटचा कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. या विद्यार्थ्यांना कायमचं नागरिकत्व देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांना मायदेशी परत पाठवतील की काय अशी भीती वाटत आहे.
कॅनडातील प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, कोणत्या उद्योगात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हवे आहेत याचा अभ्यास केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना कॅनडात ठेवण्यात येईल आणि इतरांना परत पाठवण्यात येईल.
फायनान्शिअल पोस्ट या वर्तमानपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत मार्क मिलर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणानुसार आणि त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार नोकऱ्या शोधाव्यात.
मार्क मिलर यांच्या मते पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिटची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये देशात 1 लाख 32 हजार पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिट होल्डर होते. चार वर्षांत या आकडेवारीत 78 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी टोरांटो, विनिपेग, ब्रिटिश कोलंबिया, आणि प्रिंस एडवर्ड आयलँड येथे निदर्शनं करत आहेत. कॅनडा सरकारने गेल्या काही महिन्यात नियमावलीत खूप बदल केले आहेत.
या बदलांमुळे कॅनडाला जाणं अतिशय कठीण झालं आहे, तिथे नागरिकत्व मिळवणंही अतिशय अवघड होऊन बसलं आहे.
कॅनडात राहण्यासाठी आता बराच खर्च येतो त्यामुळे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. तिथं घरं आणि नोकऱ्या दोन्हींची वानवा आहे.
या अडचणी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना परवाने देण्याची संख्या प्रचंड रोडावली आहे.
कॅनडाने यावर्षी फक्त तीन लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना परवानगी दिली आहे. मागच्या वर्षीचा आकडा यापेक्षा कैकपटीने अधिक होता.
1. पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिट
कॅनडात शिक्षण घेतल्यानंतर तिथे कामाचा परवाना घ्यावा लागतो. तो घेतल्यावर काही काळ तिथे काम करता येतं. कॅनडा सरकारने यासंबंधीचे नियम बदलले आहेत.
कोरोना काळात कामगार उद्योगात वाढ व्हावी या उद्देशाने वर्क परमिटचा कालावधी 18 महिन्यांनी वाढवला होता.
मात्र आता गेल्या काही काळात या नियमात बदल करण्यात आले आहेत.
एखादा विद्यार्थी कॅनडात दोन वर्षं शिकला तर त्याला तिथे पुढील तीन वर्षं काम करता येतं.
2. 'जीआयसी'मध्ये वाढ
स्टडी व्हिसावर जे विद्यार्थी येतात त्यांचा तिथला राहण्याचा खर्च जो येतो त्याला गॅरेंटेड इन्वेस्टमेंट सर्टिफिकेट (GIC) असं म्हणतात. ही योजना सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी आणली.
यासंबंधीचे नवीन नियम 1 जानेवारी 2024 पासून अंमलात आले. या योजनेसाठी पैसै दिले की विद्यार्थ्याला तिथे राहण्यासाठी आणि इतर खर्चासाठी पुरेसा पैसा आहे हे स्पष्ट होतं.
त्यात ट्युशन फीचा समावेश असतो. ती विद्यार्थ्यांना विविध हप्त्यांमध्ये परत केली जाते.
आता नवीन नियमांप्रमाणे GIC $20365 इतकी झाली आहे. आधी ती $10000 होती.
3. जोडीदाराच्या व्हिसामध्ये बदल
कॅनडा सरकारने जोडीदाराच्या व्हिसामध्येही बदल केले आहेत. आता जे विद्यार्थी मास्टर्स करणार आहेत किंवा पीएचडी करणार आहे त्यांच्याच जोडीदाराला व्हिसा मिळणार आहे.
याशिवाय कोणतेही निम्न स्तरातील कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जोडीदाराला व्हिसा मिळणार नाही. याआधी अगदी डिप्लोमा करायला जरी कोणी विद्यार्थी आलं तर त्याच्या जोडीदाराला व्हिसा मिळत असे.
जोडीदाराचा व्हिसा हा डिपेंडंट व्हिसा असतो. ज्या लोकांना परदेशात त्यांच्या कुटुंबाबरोबर रहायचं आहे ते या व्हिसाचा वापर करतात.
4. कामाच्या तासामध्ये कपात
काही विद्यार्थी तिथे शिकण्याबरोबर नोकरीसुद्धा करतात. गेल्या काही महिन्यात कॅनडाने या कामाचे तासही कमी केले आहेत.
कॅनडा सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना आठवड्यातून फक्त 24 तास काम करण्याची परवानगी आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं आणि जेव्हा गरज आहे तेव्हाच नोकरी करावी, असा या निर्णयामागे सरकारचा उद्देश आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना दिवसाला 8 तास काम करण्याची परवानगी दिली होती.