हिप्पी ट्रेल : 'दम मारो दम' म्हणत जगभर फिरत हिंडणाऱ्या या बंडखोरांचं काय झालं?

    • Author, मुस्तफ्फा वकार
    • Role, पत्रकार आणि संशोधक

सत्तरीचं दशक आहे. भारतात गाण्याच्या तालावर झुलत झीनत अमान 'दम मारो दम' गातेय, याचवेळी पाकिस्तानच्या एका गुहेत, हातात सिगारेट घेतलेली शबनम 'दम, दमा, दम मस्त, पिके जरा देखो...' गातेय.

पहिलं गाणं आशा भोसले यांनी 1971 च्या 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपटासाठी गायलं होतं आणि दुसरं गाणं नीरा नूर यांनी 1974 च्या 'मिस हिप्पी' चित्रपटासाठी गायलं होतं.

अनोळख्या ठिकाणी चित्रित झालेल्या दोन्ही गाण्यांमध्ये बहुतेक चेहरे तरुणांचे आहेत. त्यांचा पेहराव आणि वागण्यात स्वातंत्र्य आहेत. हे सर्वजण हिप्पी आहेत.

1960 च्या दशकात अमेरिकन प्रसारमाध्यमांनी भौतिकवादाच्या विरोधात असणा-या तरूणांना हिप्पी म्हटलं जाई ज्याला 'बीटनिक' उत्क्रांती असं म्हटलं गेलं.

बीटनिकांनी 1950 आणि 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस अमेरिकन संस्कृती नाकारली आणि साहित्य, कविता, संगीत आणि चित्रकलेद्वारे स्वतःला व्यक्त करायला सुरूवात केली.

व्हिएतनाम युद्ध आणि त्यात सामील होण्याला विरोध करत या तरुणांनी गांजा, लैंगिक स्वातंत्र्य आणि केस न कापण्याचं ठरवलं.

आझाद बंडखोरांचा 'हिप्पी ट्रेल'

1965 ते 1980 या काळात युरोप ते अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि नेपाळ (किंवा हिवाळ्यात गोवा) ड्रग्जच्या शोधात असेलेल्या देशोदेशींच्या 'हिप्पीं'च्या प्रवासाला ब्रिटनमध्ये 'हिप्पी ट्रेल' असं म्हणतात.

यालाच अमेरिकन मीडियाने 'चरस ट्रेल' म्हटलं होतं. असं असताना, 1967 पर्यंत 'बीटनिक' शब्दाची जागा 'हिप्पी' ने घेतली होती.

1968 मध्ये जेव्हा बीटल्सने भारताचा दौरा केला तेव्हा पश्चिम युरोपमधील तरुणांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली. काहींना फक्त जग बघायचं होतं.

हिप्पी ट्रेलच्या दिवसात एखाद्या व्यक्तीने किती रोख रक्कम बाळगावी यावर बंधनं होती. यूकेमध्ये 1974 मध्ये ही मर्यादा 25 पौंड इतकी होती. त्याऐवजी प्रत्येकाला कमिशन देऊन ट्रॅव्हलर्सचे चेक बँकेतून विकत घ्यावे लागायचे. प्रवासी अमेरिकन डॉलर्सची तस्करीही करत असत.

गांजा (मारिजुआना) हिप्पी जीवनाची एक बाजू आहे. बहुसंख्य हिप्पी तरुण वयाचे होते. त्यांचा पोशाख आणि वर्तन मुक्त असायचं. ते शांत वृत्तीचे आणि संयमाने विचार करणारे होते.

देशभर भटकंती केलेले प्रवासी आणि लेखक फारुख सोहेल गोईंदी लिहितात की, म

संपत्ती आणि भांडवलशाही जीवनशैलीच्या विरोधात असलेले हे बंडखोर जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपली छाप सोडली. कृत्रिम अन्न म्हणजेच प्रिझर्व्हेटिव्ह आणि रसायनांचा वापर करून जतन केलेल्या अन्नाला स्पर्श करणं हे त्यांच्यासाठी पाप होतं, आंघोळ करणंही दुर्मिळ होतं. ते शक्य तितके कमी कपडे घालायचे. या बंडखोरांमध्ये केस कापणं फार वाईट मानलं जायचं.'

त्यांनी पुढे लिहिलंय की, 'बंडखोरांची ही एक विचित्र चळवळ होती, ज्याला नेता नव्हता. कोणतंही कार्यालय नव्हतं, सचिवालय नव्हतं, गुप्त घोषणापत्र नव्हतं, अधिकारी नव्हते, किंवा सदस्यत्वही नव्हतं.

ती पूर्णपणे मुक्त आणि स्वतंत्र चळवळ होती. शीतयुद्धाच्या काळात जन्मलेल्या या बंडखोरांनी जागतिक राजकारण आणि संस्कृतीवर असा प्रभाव पाडला जो जागतिक महासत्ता त्यांच्याकडील साधनसंपत्ती आणि प्रचाराने करू शकल्या नाहीत.

काही हिप्पी ट्रेल प्रवासी अफगाणिस्तानमध्ये का थांबले?

रिचर्ड ग्रेगरी स्वतः किशोरवयात हिप्पी ट्रेलमध्ये सामील झालेले. ते लिहितात की हिप्पी ट्रेल इस्तंबूलमध्ये सुरू होतो जिथे युरोपचे सर्व रस्ते एकत्र येतात.

इस्तंबूलमधील गुल्हाने, तेहरानमधील अमीर कबीर, काबुलमधील मुस्तफा, पेशावरमधील रेम्बो, लाहोरमधील एशिया हॉटेल, दिल्लीतील क्राउन आणि बॉम्बेमधील रेक्स अँड स्टिफल्स ही हिप्पी ट्रेलवरील प्रसिद्ध हॉटेल्स होती. ग्रेगरी म्हणतात की हे पर्याय बरेचदा चांगलं असंत (आणि सहसा स्वस्त).

"मला कंदाहारमधील न्यू टुरिस्ट, काबूलमधील पीस आणि पोखरा (नेपाळ) मधील व्हाईट हाऊसची नावं आठवतात. श्रीनगरमध्ये हाऊसबोटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता, तर गोव्यात लोक स्थानिक घरे भाड्याने घेतात. पेशावर आणि लाहोरमध्ये आधुनिक उच्चभ्रू हॉटेल्स वापरतात.'

"जेव्हा मी इस्तंबूलमधून जात होतो, तेव्हा पोलिसांच्या छाप्यांसाठी गुल्हाने कुप्रसिद्ध होतं आणि जवळपास इतर अनेक पर्याय उपलब्ध होते (त्यापैकी एक मी वापरला होता)," असं ते पुढे म्हणाले.

इस्तंबूलच्या सुलतानमेट मधील 1957 साली सुरू झालेलं लेले रेस्टॉरंट जगभरात पुडिंग शॉप म्हणून ओळखलं जातं.

ब्लू मस्जिद आणि हागिया सोफिया जवळील जागा अतिशय योग्य होत्या. जवळजवळ प्रत्येकजण काठमांडूला जाताना इस्तंबूलमधून जायचा आणि ओव्हरलँड बस स्वस्त हॉटेल्सजवळ थांबायच्या.

ग्रेगरीच्या मते, इस्तंबूलमध्ये अनेक आकर्षणं आहेत, परंतु ती युरोपात आहेत. 'जोपर्यंत तुम्ही हे सर्व मागे सोडत नाही तोपर्यंत हिप्पी ट्रेलवरील तुमचा साहसी प्रवास सुरू होत नाही.'

काहीजण मध्य पूर्वेतील प्रमुख चरस उत्पादक देश असेलल्या दक्षिणेकडच्या लेबनॉनच्या दिशेने जात. किंवा तुर्कीच्या मार्गाने, नंतर शाह [रेझा शाह पहलवी] शासित धर्मनिरपेक्ष देशातून इराणमार्गे अफगाणिस्तानात जायची.

अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये अशी काही हॉटेल्स, कॅफे आणि रेस्टॉरंट होते ज्यांचे ग्राहक केवळ 'हिप्पी ट्रेलर' होते.

ग्रेगरीच्या म्हणण्यानुसार, जगातील सर्वोत्तम हॅश-स्मोकिंग प्रवासी एकमेकांना कथा सांगत आणि पुढील शहरात कुठे जायचं याबद्दल सल्ला देत. प्रत्येक जागेचं वैशिष्ट्य म्हणजे लायब्ररी, जिथे जगभरातील प्रवाशांनी मागे सोडलेल्या अनेक भाषांमधील पेपरबॅक पुस्तकांचा संग्रह असे.

'हिरात (अफगाणिस्तानातील शहर)) हा हिप्पी मार्गावरील पहिला खरा मुक्काम होता,' असं ग्रेगरी म्हणाले.

'इथे सर्वकाही निवांतपणे सुरू असायचं. मोटार वाहतूक फारच कमी होती. मुख्य रस्त्यांवर घोडे, गाढव, उंटाच्या गाड्या आणि टांगे असत.'

हिप्पी ट्रेलवरील आणखी एक लोकप्रिय रेस्टॉरंट म्हणजे काबुलमधील एक जर्मन - सिग्गी हॉटेल, जिथे 'चांगलं अन्न आणि तांदळाची खीर' तसंच आयुर्वेदिक पानांचा कोरा चहा आणि बुद्धिबळाचा पट मिळायचा.

रिचर्ड नेव्हिल यांनी त्यांच्या 1966 च्या लेखात काबुलमधील खैबर रेस्टॉरंटचा संदर्भ दिला आहे. त्या काळात पाश्चात्य पद्धतीचे जेवण देणारे हे एकमेव ठिकाण होते.

अफगाणिस्तानमधील हॉटेलच्या आजूबाजूला, बरेच व्यापारी हाताने तयार केलेले कापड, चामड्याच्या वस्तू आणि कार्पेट विकत आणि बहुतेक व्यापार्‍यांकडे स्वतःसाठी आणि विक्रीसाठीही चरस असायचं.

कदाचित त्यामुळेच काही लोक अफगाणिस्तानच्या पलिकडे जात नसत.

पाकिस्तानातील सोफियाचे मंदिर 'हिप्पींचे अड्डे बनले'

अफगाणिस्ताननंतर अनेक चढ-उतार आले. पाकिस्तानात प्रवेश केल्यावर उत्तरेकडे स्वात आणि चित्रालकडे जाता येतं.

लेखक नदीम फारुख पराचा यांच्या मते, जेव्हा पाकिस्तान हिप्पींसाठी एक मध्यवर्ती ठिकाण बनलं तेव्हा पेशावर, स्वात, लाहोर आणि कराची ही हिप्पींसाठी महत्त्वाची ठिकाणं झाली.

ते म्हणतात की 'हिप्पी खैबर खिंडीमार्गे रावळपिंडीला यायचे, तिथून लाहोर आणि मग बसने भारतात यायचे. अनेक हिप्पी कराचीच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटायला जायचे.'

पाकिस्तानमध्ये त्यांचा आणखी एक लोकप्रिय अड्डा म्हणजे लाहोर आणि कराचीची सुफी मंदिरं. त्याच वेळी, मध्यमवर्गीय तरुणांनीही अधिकाधिक मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली - विशेषत: गुरुवारी रात्री जेव्हा अनेक मंदिरांमध्ये पारंपारिक सुफी संगीत, कव्वाली सादर केली जाई.

ते लिहितात की 'हिप्पी कपडे तरुण पाकिस्तानींमध्येही लोकप्रिय झाले. ज्या तरुण पुरुषांचे केस साठच्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत लहान होते ते सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला लांब (जटाधारी) वाढू लागले. महिलांचे कपडे आखूड होऊ लागले.'

फारुख सोहेल गोईंदी म्हणतात: 'माझ्या प्रवासात मी अनेक हिप्पींशी मैत्री केली. अनेकवेळा ते अप्पर मॉल (लाहोर) येथील इंटरनॅशनल हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटत असत, तिथे त्यांच्या प्रसिद्ध डबलडेकर बस येऊन थांबत.

तो काळ असा होता जेव्हा परदेशी लोक इथे यायला घाबरत नसत, पण स्वतःला खूप सुरक्षित मानत.

'मी लाहोर कॅन्टोन्मेंटमधील माझ्या घराजवळील एका उद्यानात सलग चार दिवस एक हिप्पी पडलेला पाहिला. पाचव्या दिवशी मी त्याच्या जवळ गेलो तेव्हा तो भुकेने अर्धमेला झालेला. हा तरुण हिप्पी पूर्वीच्या युगोस्लाव्हियाचा होता. तो अनेक दिवस माझ्यासोबत खात-पित, झोपत असे, पण मी त्याला अंघोळ आणि कपडे धुण्यास भाग पाडलं. मग तो माझा असा मित्र झाला की जग बदललं पण आमच्या मैत्रीत काहीच फरक पडला नाही.

या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी अनेक स्वस्त हॉटेल्स उभी राहिली आणि पेशावर, लाहोर आणि कराचीमध्ये पर्यटन उद्योग भरभराटीला आला.

ग्रेगरीच्या मते, पेशावरमधील रेम्बो गेस्ट हाऊस हे एक लोकप्रिय 'फ्रीक हँगआउट' होतं. लाहोरमधील रेल्वे स्टेशनजवळील आशिया हॉटेल हे पाश्चिमात्य लोकांसाठी एक लोकप्रिय पर्याय होता.

बस नसल्यामुळे काही हिप्पींनी चित्रालला भेट दिली, परंतु तिथे एक माऊंटन इन नावाचे हॉटेल होते जे 1968 सालापासून हैदर अली शाह चालवायचे.

'भारतात कधीच दारू प्यायलो नाही, लस्सी हे आवडतं शीतपेय होतं'

बहुसंख्य पाकिस्तानमार्गे भारतात येत असत, जिथे ड्रगच्या शोधात असणारे काश्मीरला जात. चरस लागवडीचं दुसरे केंद्र असलेलं उत्तर भारतातील कुल्लू आणि मनाली देखील हिप्पींसाठी आणखी एक लोकप्रिय ठिकाण होतं.

थंडीच्या महिन्यांत बहुतेक हिप्पी दक्षिणेकडे गोव्याच्या समुद्रकिनारी जात असत जिथे चरस नेहमी उपलब्ध असायचं (तिथे त्याचं उत्पादन होत नसलं तरीही.).

रिचर्ड ग्रेगरी म्हणतात, 'बीडी स्वस्त होती जी तो अनेकदा प्यायचो. चालण्याच्या अंतराच्या पलिकडे कुठेही जाण्यासाठी मी बहुतेक सायकल टॅक्सी किंवा स्थानिक लोक चालवत असलेल्या तीन चाकी खुल्या वाहनांचा वापर करत असे.'

काही हिप्पी भारतात जिथे मंदिरात मोफत झोपण्याची परवानगी आहे आणि दानधर्मात अन्न दिलं जाई, त्या संधींचाही फायदा घेत.

ग्रेगरी दिल्लीतील पहाडगंज येथील 'विकास' येथे राहिले. दिल्लीतील हॉटेल क्राउनबद्दलही बरंच ऐकलं आहे. विल्को जॉन्सन (ब्रिटिश गिटारवादक आणि कवी) 1970 च्या दशकात तिथे राहायचे.

ते म्हणाले, 'एका रात्री मी जुन्या दिल्लीतील क्राऊन हॉटेलमध्ये डुक्कर बर्थडे क्रीम केक ओढून नेत असल्याचं पाहिलं.'

बॉम्बे हे राहण्यासाठी महाग शहर होतं. विल्को म्हणतात की बॉम्बेमध्ये ते व्हिक्टोरिया टर्मिनसवर झोपले होते.

आणखी एक लोकप्रिय हिप्पी ट्रेल हँगआउट म्हणजे बॉम्बे आणि मिस्टन रोडवरील दिप्ती हाऊस ऑफ प्युअर ड्रिंक्स हे होय.

ग्रेगरी म्हणतात: 'शाकाहारी म्हणून मला भारत हे एक अद्भुत ठिकाण वाटलं. बॉम्बेच्या चर्चगेट स्थानकावरील रेस्टॉरंट कदाचित माझं सर्वात आवडतं ठिकाण होतं, जिथे चविष्ट डोसे आणि थाळी द्यायचे. शिवाय कळंगुटमधील भेल पुरीचा स्टॉल देखील मला चांगलाच लक्षात आहे.

'रात्रीच्या जेवणात सहसा भाजी, चपाती किंवा पुरी असायची. नेहमीचे स्नॅक्सचे पदार्थ म्हणजे भजी, समोसे, कचोरी आणि चाट. मी भाजलेली डाळ आणि चिवडा चघळत असे. मला मिठाई आवडायची - हलवा, बर्फी, लाडू, गुलाब जामुन आणि काला जामुन मिळायचं. लस्सी हे माझे आवडतं शीतपेय होतं पण मी सहसा जेवणासोबत फक्त एक ग्लास पाणी प्यायचो. मी भारतात कधीच दारू प्यायलो नाही.'

'माझ्या नंतरच्या गोव्याच्या प्रवासात मी भेळ पुरी, डोसा आणि थाळीचा आस्वाद घेतला,' ते सांगतात. कुल्फी, श्रीखंड, फालुदा आणि रोझ मिल्क या पदार्थांचीही तेव्हाच ओळख झाली. आणि बॉम्बेतील एका रस्त्यावर उसाच्या ताज्या रसाचा आस्वाद घेतलाय.'

'आणि अर्थातच मी भरपूर चहा प्यायचो'

ते म्हणाले की, कानपूरमध्ये रेल्वे स्टेशनजवळ चहाची टपरी आहे. चहा जगभरात अनेक प्रकारे तयार केला जातो पण माझा आवडता चहा म्हणजे भारतीय ट्रक चालकांचा फक्त दुधात बनवला जाणारा चहा होय. चहाची पानं, हिरवी वेलची आणि लवंगा दुधात उकळत आणि ते मिश्रण एका ग्लासमध्ये भरपूर साखरेसह गरम गरम सर्व्ह केलं जाई.

'स्टेशनसमोर पगडी घातलेल्या एका म्हातार्‍याने मला इशारे करून चिलिम काढली. आम्ही तिथे बसलो आणि धूम्रपान केलं, आमचा हा तमाशा पाहण्यासाठी मोठा जमाव जमला होता. इंग्रज ज्याला बनारस म्हणून ओळखत त्या वाराणसीत आम्ही काही दिवस राहिलो.'

'दुसऱ्या दिवशी आम्हाला गांजाचे एक सरकारी दुकान सापडलं - वाराणसीमध्ये काही खास व्यवस्था होती आणि कायदेशीररित्या चरख विकत घेता येईल अशा ठिकाणांपैकी ती एक जागा होती,' हे त्यांनी स्पष्ट केलं. अशा काही ठिकाणी अनेकदा कायद्याकडे दुर्लक्ष केलं जाई.

'एका दुकानातून भांग विकत घेतली होती. एका स्थानिक तरुणाने दह्यामध्ये मिसळून एक मिश्रण तयार केलं आणि आम्हाला भांग लस्सी दिली.'

'मी भाषेशिवाय संवाद साधायला शिकलो'

क्लासिक हिप्पी ट्रेल काठमांडू येथे संपले. इथपर्यंतच तुम्ही गाडी चालवू शकता - तिबेट आणि यारकंद हे दुर्गम प्रदेश होते, बर्मामार्गे जाणारा रस्ता बंद होता. अशा प्रकारे, एकतर बँकॉकला उड्डाण केलं जाऊ शकायचं किंवा माघारी घरी परतावं लागायचं.

काठमांडू हे सुंदर शहर होतं, जिथे मुख्यतः लाकडापासून सुशोभित केलेल्या सुंदर इमारती होत्या.

काठमांडूमधील विद्यमान ‘कॅफे द ग्लोब’ आणि द कॅम्प हे 'बीटनिक' द्वारे वापरले जाणारं पहिले कायमस्वरूपी अतिथीगृह झालं. पण 1969 मध्ये सर्वकाही बदललं.

ओरिएंटल लॉज हे फ्रीक स्ट्रीटवरील पहिलं हॉटेल होतं आणि त्यानंतर लगेचच इतर इमारतींनी त्याची जागा घेतली, असं नेपाळचे तज्ज्ञ मार्क लिच्टी त्यांच्या फॉर आउट या पुस्तकात नमूद करतात.

फ्रीक स्ट्रीट नावाच्या गल्लीचे मूळ नाव 'जोच्चन टोले' होते. त्यात अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स होती जिथे हिप्पी ट्रेलर्स वारंवार येत असत. "1973 पर्यंत इथे गांजाची अनेक दुकानं कायदेशीररित्या कार्यरत होती, त्यामुळे जगातील सर्वोत्तम गांजा मिळणं अवघड गोष्ट नव्हती."

हिप्पींनी पारंपारिक पर्यटकांपेक्षा स्थानिक लोकांशी संवाद साधण्यात अधिक वेळ घालवायचे. त्यांना आलिशान निवासस्थानं (ज्यांना परवडायची) परवडत असली तरी त्यांना त्यात रस नसायचा.

ग्रेगरी म्हणतात: 'मी भाषेशिवाय संवाद कसा साधायचा हे शिकलो. माझा काही चांगला वेळ अशा लोकांसोबत घालवला जे मुख्यतः हातवारे आणि हावभाव करत आणि त्यामध्ये नेपाळमधील तिबेटी निर्वासित होते, ज्यांना इंग्रजी यायचं नाही परंतु त्यांची संगत चांगली होती.'

जॉन बटसारखे हिप्पी इथून आले

1986 मध्ये फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजला गोव्यात अटक करण्यात आली होती.

शोभराजने 1975 मध्ये काठमांडूमध्ये दोन पर्यटकांना मारल्याबद्दल नेपाळच्या तुरुंगात 19 वर्षे घालवली होती, परंतु 1970 च्या दशकात इतर पर्यटकांच्या हत्येशी देखील त्याचा संबंध होता आणि फ्रेंच पर्यटकांना विषबाधा केल्याबद्दल भारतात खटला चालवला गेला होता. त्याने 20 वर्षे तुरुंगात घालवली.

तो 1972 आणि 1982 दरम्यान 20 हून अधिक खूनांशी त्याचा संबंध होता आणि त्यामध्ये बहुतेक भारत आणि थायलंडमधील हिप्पी ट्रेलवरील तरुण पाश्चात्य बॅकपॅकर्सचा समावेश होता. त्याव्यतिरिक्तही काही खून त्याने केले.

ग्रेगरी लिहितात की निरोगी राहणं कठीण होतं, विशेषत: अफगाणिस्तानमध्ये आणि हिप्पींना देखील तिथल्या संस्कृतीचा धक्का बसला असेल.

'काही गंभीररित्या आजारी पडत किंवा काहींकडचे पैसे संपत, मग त्यांना घरी घेऊन जावं लागे. काही तुरुंगातही गेले. तरी बहुतेकजण वाचले असते.'

हिप्पी अनेकदा इतरांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास प्रोत्साहित करायचे. काहींनी स्वतःला आधार देण्याचे मार्ग शोधले आणि ते भारतात कायमचे स्थायिक झाले.

आणि याच ठिकाणी तुम्ही धार्मिक विद्वान आणि बीबीसी पत्रकार जॉन मुहम्मद बट यांची कथा वाचली असेल.

जॉन मायकेल बट या नावाने ते साठच्या दशकात हिप्पी ट्रेलचा भाग बनले. पाकिस्तानात इस्लामचा स्वीकार केला. नंतर भारतातून औपचारिक धार्मिक शिक्षण घेतलं. 'एक तालिब की कहानी: द लाइफ ऑफ अ पश्तून इंग्लिशमन' या नावाने त्यांच्या आठवणी असलेले पुस्तक प्रकाशित झालंय.

परीक्षक त्याला पश्तून जीवनाचं एक अनोखं आणि या गोष्टींवर प्रकाश टाकणारं उदाहरण मानतात. जॉन मुहम्मद बट यांच्या आठवणी वाचकांना इंग्लंडपासून पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यापर्यंत आणि कॅथलिक धर्मापासून इस्लामपर्यंतच्या प्रवासाला घेऊन जातात.

हिप्पी ट्रेल कसा संपला?

क्लासिक हिप्पी ट्रेल 1979 मध्ये संपला जेव्हा रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं आणि पाश्चात्य प्रवाशांसाठी सीमा बंद केली.

इराणमधील 1979 च्या इस्लामिक क्रांतीने हा भूमार्ग त्वरित बंद केला नाही, परंतु अनेक बस कंपन्या धोका पत्करण्यास तयार नव्हत्या.

1980 मध्ये इराकने इराणवर आक्रमण केल्यानंतर या सेवा लवकरच बंद करण्यात आल्या - बलुचिस्तानमधून दक्षिणेकडील मार्ग वापरणं आता व्यवहार्य राहिलेलं नव्हतं. लेबनॉन आधीच गृहयुद्धात गुरफटला होता, काश्मीरमध्येही तणाव वाढला आणि नेपाळनेही नंतर शांतता गमावली.

त्यामुळे ओव्हरलँड हिप्पी ट्रेलचा शेवट होता. हवाई प्रवास आता स्वस्त झाला होता आणि गोवा हिप्पींचे केंद्र बनलं होतं. त्यामुळे हिप्पी ट्रेल हवाई मार्गाने चालूच राहिला.

गोईंदी लिहितात की काही वर्षांपूर्वी एका हिप्पी जोडप्यासोबत मैत्री झालेली. 'हे इटालियन जोडपं इस्तंबूलमध्ये अया सोफियाच्या बाजूला एका गूढ पोशाखात दिसलं होतं. या इटालियन सुफी जोडप्याने लग्नाआधी ते हिप्पी असल्याचं सांगितलं.'

ते पुढे स्पष्ट करतात की 'रिकाम्या खिश्यांनी ते संपूर्ण जग फिरले. आम्ही दोघे आमच्या प्रवासात एकमेकांचे सोबती झालो आणि मग एके दिवशी हरे कृष्ण हरे राम म्हणत दम दम मस्त कलंदर गाणी गायली.

'आम्ही एके दिवशी मुस्लीम झालो. पण तरीही आम्ही एका देशातून दुसऱ्या देशात जातो. त्यांना वेळ मिळाला तर ते त्यांच्या मायदेशी इटलीला जातात. संपूर्ण जग आमचंच आहे.'

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)