श्रद्धा वालकर हत्याकांड : क्रूर गुन्हे करण्यामागची मानसिकता काय असते?

फोटो स्रोत, ANI
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, नवी दिल्ली
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झाल्यास कठोरात-कठोर शिक्षेची तरतूद असावी की, या प्रकरणात 'दुर्मिळात दुर्मिळ' म्हणून कारवाई व्हावी, याबाबत कायद्याचे अभ्यासक आणि या क्षेत्रातील लोकांमध्ये चर्चा सुरू आहेत.
त्याचवेळी ट्विटरवर #DelhiMurder, #AaftabPoonawala आणि #ShraddhaWalkar असे ट्रेंड पाहायला मिळत आहे.
याशिवाय सर्वांना धक्का देणारी आणखी एक बाब म्हणजे, एवढा निर्घृण गुन्हा कोणीही कशाप्रकारे करू शकतं? अशा व्यक्तीच्या मनात असं नेमकं काय सुरू होतं की, त्यानं हत्येनंतर गुन्हा लपवण्यासाठी एवढं क्रूर पाऊल उचललं?
दुसरीकडं सोशल मीडियावर या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नदेखील केला जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याचवर्षी मे महिन्यात श्रद्धा वालकर या 27 वर्षीय तरुणीची आफताब पुनावालानं आधी हत्या केली आणि नंतर तिचे 35 तुकडे करून जंगलामध्ये वेगवेगळ्या भागांत फेकून दिले. ते दोघं 'लिव्ह-इन' म्हणजे लग्न न करता एकत्र राहत होते. पोलिसांनी आफताबला अटक केलं असून, त्याची चौकशी केली जात आहे.
चौकशीदरम्यान पोलिस आफताबला त्यानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात ज्या ठिकाणी फेकले होते, त्याठिकाणी घेऊनही गेले होते.
श्रद्धा मूळची महाराष्ट्रातल्या पालघरची राहणारी होती. तिचे कुटुंबीय तिच्या या नात्यावर नाराज होते. त्यामुळं दोघांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आणि एकत्र राहू लागले, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
पोलिसांच्या माहितीनुसार, आफताबनं 18 मे पूर्वीदेखील त्याच्या प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न केला होता. दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वादही झाला होता. आफताब आणि त्याच्या प्रेयसीमध्ये हत्येच्या दिवशीही वाद झाला होता.
अशा व्यक्ती कशा ओळखाव्या?
अशा प्रकारच्या अपराधांमागे अनेक कारणं असतात, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर समीर मल्होत्रा सांगतात.
त्यांच्या मते, "गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचं पालन पोषण कशा प्रकारच्या वातावरणात झालंय. तसंच लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्या व्यक्तीची विचारसरणी कशी राहिली आणि त्याच्या वर्तनावर त्याचा कसा परिणाम झाला, याचा विचार करणं याठिकाणी गरजेचं आहे."
डॉक्टर समीर मल्होत्रा हे, दिल्लीमधील मॅक्स रुग्णालयात मानसिक आरोग्य आणि वर्तन शास्त्र (मेंटल हेल्थ अँड बिहेवियरल सायंसेस) चे संचालक आहेत.
त्यांच्या मते, "असे गुन्हे करणाऱ्यांमध्ये लहानपणापासून मोठे होईपर्यंत अनेक लक्षणं आढळतात. राग अनावर झाल्यानं ते अशा प्रकारचे गुन्हे करतात."
डॉक्टरांच्या मते, आफताब प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचा गुन्हा करण्याची मानसिकता ही एका दिवसात विकसित होत नसते, तर त्याची लक्षणं किंवा संकेत स्वभावात आधीच दिसायला लागतात.

फोटो स्रोत, ANI
अशा लोकांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या गोष्टीवर नियंत्रण मिळवणं हे सर्वाधिक महत्त्वाचं बनतं आणि बरोबर किंवा चूक याची जाणीव असूनही ते तार्किक विचार करणं मात्र बंद करतात.
मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर पूजा शिवम आणि डॉक्टर समीर मल्होत्रा यांच्या मते, एखादी व्यक्ती गुन्हा करू शकते का? हे काही लक्षणांवरून समजतं :-
- रागावर नियंत्रण नसणे (लहान-सहान गोष्टींवर राग अनावर होणे, त्यातून स्वतःला किंवा इतरांना शारीरिक नुकसान पोहोचवणे)
- इतरांना वेदना किंवा त्रास देण्यात आनंदाची भावना निर्माण होणे
- नात्यात एकमेकांबाबत आदर नसणे.
- एखादं नातं, एकाच व्यक्तीच्या गरजांनुसार सुरू असणे आणि त्यात इतरांचे मत, इच्छा यांना काहीही स्थान नसणे.
- नात्यात एका व्यक्तीचे दुसऱ्यावर नियंत्रण असणे
- वर्तनात अनियमितता किंवा मूड स्विंग असणं, म्हणजे अत्याधिक प्रेम, प्रचंड राग आणि तेही केवळ पार्टनरबरोबर नव्हे तर इतर लोकांबरोबरही.
- काही गोष्टी लपवण्याची सवय
- खोटे बोलणे, इतरांच्या संवेदना न समजणे.
वर्तनामध्ये अशी लक्षणं दिसलं तर ती धोक्याची घंटा ठरू शकते. पण असं वर्तन करणारी व्यक्ती निर्घृण अपराधच करेल, असाही त्याचा अर्थ होत नाही.
'गुन्हेगारी शो पाहायचा'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना आफताबला 'डेक्सटर' ही टीव्ही सिरीज पाहून सुचली होती. डेक्सटर ही एक अमेरिकन टीव्ही सिरीज असून ती 2006 ते 2013 दरम्यान प्रसारित झाली होती.
या सीरिजची कथा डेक्सटर मॉर्गनच्या भोवती फिरणारी आहे. ते फॉरेन्सिक टेक्निशियन (न्यायवैद्यक तंत्रज्ञ) आणि सीरियल किलर असं दुहेरी जीवन ते जगत असतात. या सीरिजमध्ये ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणाऱ्यांची हत्या करतात, असं दाखवण्यात आलं आहे.
पोलिसांसमोर हत्येचं कारण सांगताना आफताबनं श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती, असं सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
डॉक्टर पूजा शिवम जेटली यांच्या मते, "बहुतांश लोकांना असा कंटेंट पाहायचा असतो, जे पाहिल्यानंतर त्यांना रोमांचक अनुभव येईल. सामान्य लोकांनीही जर अशा प्रकारचा कंटेंट जर जास्त काळ पाहिला तर त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो, यावरून याचा अंदाज येईल."
त्यांच्या मते, "काही लोक असेही असतात जे अशा प्रकारचा कंटेंट पाहिल्यानंतर एवढे भ्रमिष्ट होतात की, त्यांच्या मनावर किंवा मेंदूवर त्याचा प्रचंड परिणाम होतो आणि ते विचार करण्याची क्षमताच गमावून बसतात.
अंतर्मग्न किंवा समाजापासून दूर असलेले लोक जेव्हा अशा प्रकारचं उत्तेजक काहीतरी पाहतात, तेव्हा त्यांची विचार करण्याची शक्ती जणू संपुष्टात येत असते."
कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांवर परिणाम
प्रसिद्ध घटनांचा विचार करता, आरुषी हत्याकांड सर्वांना माहितीच आहे. त्यात 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनी आक्षेपार्ह स्थितीत मृत अवस्थेत आढळली होती. तसंच निठारी हत्याकांडाचं प्रकरणही सर्वांच्या स्मरणात आहे.
नीरज ग्रोव्हर प्रकरण सर्वात बीभस्त किंवा निर्घृण प्रकरणांपैकी एक आहे. त्यात नीरजच्या शरीराचे तुकडे करून तीन सुटकेसमध्ये भरुन जंगलात नेण्यात आले आणि जंगलात नेऊन ते जाळण्यात आले.
काही ताज्या प्रकरणांचा विचार करता, मध्यप्रदेशातील एका व्यक्तीनं त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानं सोशल मीडियावर याबाबत पोस्टही केली होती. त्यानं, "बेवफाई नहीं करने का" म्हणजे दगा द्यायचा नाही, असं त्यात म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एका पत्नीनं पतीची हत्या केल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला या प्रकरणात अटक केली. आरोपींनी हत्या करून मृतदेह घरातच पुरला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
बातम्यांच्या माध्यमातून अनेकदा अशा निर्घृण अपराधांच्या घटनांबाबत आपल्याला माहिती मिळत असते. नात्यांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांच्या अशा घटना समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जातायत? असे प्रश्नही त्यातून उपस्थित होतात.
डॉक्टर समीर मल्होत्रा यांच्या मते, "याला अनेक सामाजिक पैलू आहेत. पूर्वी नात्यांमध्ये कौटुंबिक मुल्यांना महत्त्वं होतं, प्रेमही असायचं आणि भौतिक गोष्टींपेक्षा कुटुंबाला किंवा नात्यांना अधिक महत्त्वं दिलं जायचं. पण आता त्यात घट होत असल्याचं, पाहायला मिळत आहे."
"लोक आता माणुसकी आणि संवेदनशीलता याऐवजी भौतिक गोष्टींच्या मागे धावत आहेत. त्यामुळं कौटुंबिक मूल्यं जणू संपुष्टात येत आहेत.
लोकांना सर्वकाही लगेचच हवं आहे. भावनिक नाती जुळणं कठीण झालं आहे. केवळ इच्छा पूर्ण करण्याच्या विचारातून अशा प्रकारचे अपराध घडतात.
त्याचप्रमाणे अपुरं शिक्षण, नशा (व्यसन) आणि तणावात गेलेलं बालपण हीदेखील यामागची कारणं ठरू शकतात," असंही समीर मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








