You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्ताननंतर इस्रायलकडूनही नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस; विजेत्यांची निवड कशी होते?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं आहे.
आपल्याला नोबेल मिळावं, ही ट्रम्प यांची दीर्घकाळापासून इच्छाही आहे.
मात्र, त्यांना नोबेल पारितोषिक मिळू शकतं का? नोबेलसाठी असं नॉमिनेशन करता येतं का? आणि पारितोषिक विजेत्याची निवड कशी होते? हे जाणून घेऊयात.
नोबेल कमिटीला पाठवलेलं पत्र नेतन्याहूंनी जारी केलंय.
त्यात म्हटलं आहे, "जगभरात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याचा पुरस्कार करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी खंबीर आणि असामान्य निष्ठा दाखवलेली आहे."
इस्रायल - इराणमधल्या संघर्षादरम्यान अमेरिकेने हस्तक्षेप केला होता. इस्रायल - गाझा युद्धबंदी घडवून आणण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.
तर भारत - पाकिस्तानदरम्यान झालेला संघर्ष थांबवून आपण युद्धबंदी घडवून आणल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं.
हा वाद सोडवण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस नोबेलसाठी करणार असल्याचं पाकिस्ताननंही जून महिन्यात म्हटलं होतं.
नेतान्याहू डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड्ट यांनी एक्सवर म्हटलंय.
नोबेल पारितोषिक कुणाला मिळू शकतं?
सर्व जिवंत व्यक्ती किंवा कार्यरत संस्था या पुरस्कारासाठी पात्र असतात.
डायनामाईटचा शोध लावणारे स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांची 26.5 कोटी डॉलर्सची संपत्ती मृत्यूपत्राद्वारे या पुरस्कारांसाठी दान केली होती.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात.
या प्रत्येक क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जावा, याचे निकषही नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले आहेत.
शांतता पुरस्काराबद्दल आपल्या मृत्यूपत्रात त्यांनी म्हटलंय, "ज्या व्यक्तीनं देशांमधल्या बंधुत्वासाठी, सैन्य संपुष्टात आणण्यासाठी वा कमी करण्यासाठी आणि शांतता संघटनांची स्थापना आणि प्रसार करण्यासाठी सर्वाधिक वा उत्तम काम केलेलं आहे अशा व्यक्तीला एक पुरस्कार देण्यात यावा."
या पुरस्कारांसाठी कोण नावं नामांकित करू शकतं?
तर हा अधिकार अनेक व्यक्तींना आहे.
नोबेलच्या अधिकृत वेबसाईटनुसार विद्यापीठांचे कुलगुरू, राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, कायदा आणि समाजशास्त्रांचे प्राध्यापक, शांतता विषयक संशोधन करणाऱ्या वा परराष्ट्र विषयक संस्थांचे प्रमुख करू शकतात.
देशांच्या संसदेचे सदस्य, सरकारं, आंतरराष्ट्रीय न्यायालयं पुरस्कारासाठी नामांकनं करू शकतात.
या सोबतच यापूर्वीचे नोबेल पुरस्कार विजेते, ज्या संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य, नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे आजी-माजी सदस्य आणि नॉर्वेजियन नोबेल इन्स्टिट्यूटचे माजी सल्लागारही पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करू शकतात.
पण अशाप्रकारे नावाची शिफारस समितीकडे पाठवलं जाणं - यामुळे त्या व्यक्तीचा वा संस्थेचा पुरस्काराशी वा संस्थेशी कोणत्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित होत नाही.
एखाद्या वर्षीची विविध पुरस्कारांसाठीची नामांकनं नोबेल समिती पुढची 50 वर्षं जाहीर करू शकत नाही. समितीकडून कोणत्याही नामांकनांना दुजोराही दिला जात नाही वा ती फेटाळलीही जात नाहीत.
शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिक विजेत्याची निवड नॉर्वेजियन नोबेल कमिटीकडून केली जाते.
Storting म्हणजे नॉर्वेची संसद पाच सदस्यांची ही समिती नेमते.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्यासाठीचं नोबेल आणि अर्थशास्त्रासाठीचा पुरस्कार हे स्टॉकहोम, स्वीडनमध्ये दिले जातात.
तर शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक ओस्लो, नॉर्वेमध्ये दिलं जातं.
शांततेसाठीच्या नोबेल विजेत्याची निवड कशी केली जाते?
या पुरस्कारांची घोषणा ऑक्टोबरमध्ये होत असली, तरी नामांकन दाखल करण्याची डेडलाईन असते ती आधीच्या वर्षीच्या सप्टेंबरपासून त्या वर्षीच्या 31 जानेवारीपर्यंत.
म्हणजे नेतन्याहूंनी पाठवलेलं ट्रम्प यांचं नामांकन यावर्षीसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही.
मार्चपर्यंत नावांची शॉर्टलिस्ट तयार केली जाते, एप्रिल ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान सल्लागार या सगळ्या व्यक्ती - संस्थांच्या कामाचा आढावा घेतात.
यावर मतदान घेतल्यानंतर बहुमत मिळालेल्या व्यक्तीचं नाव ऑक्टोबर महिन्यात पुरस्कार विजेते म्हणून जाहीर केलं जातं.
डिसेंबर महिन्यात पुरस्कार सोहळा होतो.
नोबेल पुरस्कारांच्या वेबसाईटनुसार 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारांसाठी एकूण 338 जणांचं नामांकन करण्यात आलेलं आहे. 244 व्यक्ती आणि 94 संस्था.
2024 मध्ये नामांकनांची संख्या होती 286. नामांकनांचा आकडा सर्वाधिक होता 2016 साली जेव्हा 376 जणांचं नाव शांतता पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं.
त्यावर्षी हा पुरस्कार कोलंबियाचे अध्यक्ष हुआन मॅन्युएल सांतोस यांना देशातलं 50 वर्षांपासूनचं गृहयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी देण्यात आला होता.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला, तर ते हा पुरस्कार मिळणारे पाचवे अमेरिकन अध्यक्ष असतील. याआधी थिओडोर रुझवेल्ट, वुड्रो विल्सन, जिमी कार्टर आणि बराक ओबामा या अमेरिकेच्या अध्यक्षांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेले आहे.
शांततेच्या नोबेल पुरस्कारावरून आत्तापर्यंत झालेले वाद
ट्रम्प यांना शांततेचं नोबेल मिळणं काहीसं वादग्रस्तही ठरू शकेल.
पण यापूर्वीही शांततेच्या नोबेलवरून वाद झालेले आहेत.
बराक ओबामांना 2009 मध्ये शांतता पुरस्कार देण्यात आला, तेव्हा ते राष्ट्राध्यक्षपदावर येऊन फक्त 9 महिने झाले होते.
गंमत म्हणजे आपल्याला हा पुरस्कार कशाबद्दल देण्यात येतोय, हाच विचार पहिल्यांदा मनात आल्याचं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही म्हटलंय.
पॅलेस्टिनी नेते यासिर अराफत, अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट हेन्री किसिंजर, इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद, म्यानमारच्या लष्करी राजवटीविरोधात निदर्शनं करणाऱ्या आँग सान सू की यांना देण्यात आलेल्या शांतता पुरस्कारांवरूनही टीका करण्यात आली होती.
नोबेल शांतता पुरस्कारांवर होणारी सगळ्यात मोठी टीका म्हणजे महात्मा गांधींना पुरस्कार न देणं.
पाच वेळा गांधींचं नाव नामांकित होऊनही त्यांना शांततेसाठीचं नोबेल कधीच जाहीर झालं नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)