You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कापसाचे बाजारभाव यंदा जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंत जातील? जाणून घ्या
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सोयाबीन पाठोपाठ कापसाचा भाव हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ज्वलंत मुद्दा बनला आहे.
कापसाला खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव परवडत नसल्याची शेतकऱ्यांची प्रमुख खंत आहे.
या बातमीत आपण कापसाचे दर का पडलेत, त्यात काही सुधारणा होऊ शकते का, ती कधीपर्यंत होऊ शकते, याची माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रात कापसाला सध्या किती दर मिळतोय?
केंद्र सरकारनं 2024-25 च्या खरीप हंगामासाठी कापसाला प्रती क्विंटल 7, 521 रुपये हमीभाव जाहीर केलाय.
पण महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये कापसाला 6,900 ते 7,000 रुपये प्रती क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
याचा अर्थ नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कापसाला हमीभावापेक्षा प्रती क्विंटल जवळपास 500 रुपये इतका कमी दर मिळालाय.
कापसाचे भाव का पडलेत?
कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय घडामोडींशी जोडलेला असतो. त्यानुसार जागतिक मागणीही कमी-जास्त होत असते. एकूण जागतिक कापूस उत्पादनाच्या जवळपास 24% कापसाचं उत्पादन भारतात घेतलं जातं. कापसाचे भाव पडण्यामागचं कारण काय आहे?
या प्रश्नाचं उत्तर देताना कापूस क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. चारुदत्त मायी सांगतात, “कापूस हा असा उद्योग आहे ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम होतो. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन घेणारे जे देश आहेत यात अमेरिका, चायना, मिडल ईस्टमधील उझबेकिस्तान, पाकिस्तान यांचा जो काही एक दर ठरतो त्याप्रमाणे आपल्याकडील बाजारभावाची तुलना होते.
“आंतरराष्ट्रीय बाजारभाव आजघडीला 7 हजारापेक्षा कमी आहे. त्यामुळे आज आपल्या कापसाला भाव मिळत नाहीये.”
महाराष्ट्र राज्य कॉटन फेडरेशनचे सेवानिवृत्त महाप्रबंधक गोविंद वैराळे सांगतात, “आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी आहेत, त्यामुळे कापसाची आयात वाढलेली आहे. भारतात 30 लाख गाठींची आयात झालेली आहे. याशिवाय, कापसाला स्पर्धा करणारा कृत्रिम धागा स्वस्त आहे, या कारणांमुळे कापसाचे भाव पडले आहेत.”
यंदा कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो?
2024-25 मध्ये भारतात 112 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालीय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात तब्बल 10 लाख हेक्टरनं घट झालीय. त्यामुळे कापूस उत्पादन यंदा 7 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज Cotton Association of India (CAI) ने वर्तवला आहे. अशापरिस्थितीत यंदा कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो?
चारुदत्त मायी सांगतात, “पुढच्या काही महिन्यांमध्ये कापसाचे बाजारभाव 7,500 ते 7,800 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा माझा अंदाज आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीचा कापूस तयार होतो. त्याप्रमाणे रेट वाढण्याची शक्यता आहे.”
गोविंद वैराळे यांच्या मते, “कापसाला या हंगामात 7,500 रुपयांच्या आसपास भाव मिळू शकतो. कापसाचे भाव 7,200 ते 7,800 रुपयांदरम्यान राहू शकतात.”
शेतकऱ्यांनी कापूस कधी विकावा?
विदर्भ-मराठवाड्यातील बरेच शेतकरी कापसाचे भाव वाढतील या प्रतीक्षेत आहेत. यामुळे मग त्यांनी कापूस साठवून ठेवायला सुरुवात केली आहे. शेतकरी किती दिवस वाट पाहू शकतात?
डॉ. मायी सांगतात, “शेतकऱ्यांनी थोडासा धीर धरला तर त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. आज भाव कमी झालाय, त्यात विक्रीची घाई करू नये. कारण आपण आयात थोडीशी थांबवली तर आजही इथले भाव वाढणार आहेत. सरकारवर दबावही आहे की लगेच कापूस आयात करू नका. जरी स्वस्त असेल तरी आयात करू नका. नाहीतर मग आपल्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.”
गोविंद वैराळे सांगतात, “सध्या कापसात ओलावा जास्त आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो कमी होईल. त्यानंतर CCI म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मोठ्या प्रमाणावर कापसाची हमीभावानं खरेदी केली जाईल.”
CCI च्या माध्यमातून देशभरात हमीभावानं कापसाची खरेदी केली जाते. CCI च्या माध्यमातून देशात यंदा 500 केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी केली जाणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)