जिनांच्या पत्नीने जेव्हा भर कोर्टात सांगितलेलं, मि. जिनांनी माझं नाही; मी त्यांचं अपहरण केलं

    • Author, अकील अब्बास जाफरी
    • Role, संशोधक आणि इतिहास अभ्यासक
    • Reporting from, कराची, पाकिस्तान

'कायदे आझम' मोहम्मद अली जिना आणि रती जिना यांच्या लग्नाला शंभरहून अधिक वर्षे लोटली असतील. पण त्यांच्या लग्नाचा विषय लोकांमध्ये आजही चर्चिला जातो. या विषयावर निरनिराळे खुलासे होतच असतात.

या विषयावर खूप सारी पुस्तकं देखील लिहिली गेली. यात कांजी द्वारकादास, ख्वाजा रझी हैदर, शगुफ्ता यास्मिन आणि रकीम अल-हरुफ यांची पुस्तकंही आहेत.

पण मागच्या काही वर्षात या विषयावर शीला रेड्डी यांचं 'मिस्टर अँड मिसेस जिना: अ सरप्राइजिंग मॅरेज ऑफ हिंदुस्तान' आणि डॉ. साद खान यांचं 'कायद-ए-आझम' ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. यातून त्यांच्या विवाहाविषयी नवी माहिती समोर आली आहे.

डॉ. साद खान लिहितात की, 1916 च्या सुमारास रतनबाईंनी जिनांसमोर आपलं प्रेम व्यक्त केल्यावर जिना म्हणाले होते की, तू इस्लामचा स्वीकार केलास तरच आपला विवाह शक्य आहे.

यावर रतनबाईंनी जिनांना इस्लाम विषयीचं साहित्य पुरवण्यास सांगितलं.

जिना यांनी प्रथम त्यांचे पत्रकार मित्र सय्यद अब्दुल्ला बरीलवी आणि नंतर त्यांची बहीण शिरीन यांच्यामार्फत इस्लामशी संबंधित काही पुस्तके रतनबाईंकडे पाठवली. रतनबाईंनी ही पुस्तकं वाचून इस्लाम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

शीला रेड्डी लिहितात की, 1916 मध्ये रतनबाईंच्या कुटुंबासोबत जिना दार्जिलिंगला गेले होते. रतनबाईंचे वडील सर दिनशॉ पेटिट हे भारतातील सर्वात श्रीमंत पुरुषांपैकी एक होते.

सर दिनशॉ पेटिट आणि जिना यांच्या वयात फक्त तीन वर्षांचं अंतर होतं. म्हणजे जिना रतनबाईंपेक्षा 24 वर्षांनी मोठे होते. या प्रवासात रतनबाई जिनांच्या प्रेमात पडतील याची कोणालाच कल्पना नव्हती.

रतनबाईंचा स्वभाव लहानपणापासूनच वेगळा होता. मोठ्या लाडाकोडात त्यांचं बालपण गेलं. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. त्या पुस्तकावर लिहिलं होतं, 'प्रेमळ पापा कडून प्रिय रतीस' पुस्तकावर तारीख होती 14 डिसेंबर 1911.

रती जिनांना भेटल्या, तोपर्यंत त्यांनी शेली, कीट्स, ब्राउनिंग, बर्न्स आणि इतर असंख्य कवींचा आणि अनेक नाटकांचा, कादंबऱ्यांचा सखोल अभ्यास केला होता. साहजिकच रतनबाईंचा त्यांच्यावर प्रभाव पडणारच होता.

आणि रतनबाईंना देखील त्यांच्या स्वप्नांचा राजकुमार भेटला. तोपर्यंत राजकारण आणि कायदा या क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या निश्चयी आणि धाडसी जिनांकडे त्या आकर्षित झाल्या.

दार्जिलिंगमध्ये रतनबाईंनी मोहम्मद अली जिना यांचं व्यक्तिमत्त्व, सवयी आणि राजकीय तत्त्वज्ञान जवळून पाहण्याची संधी मिळाली. दिसायला कठोर, अहंकार, स्थिर आणि दृढनिश्चयाची मूर्ती असलेले मोहम्मद अली जिना पहिल्या लग्नानंतर ब्रह्मचारी जीवन जगत होते.

त्यांना रतनबाईंमध्ये एक वेगळी व्यक्ती दिसली. अशी व्यक्ती जी स्वभावाने खूप प्रेमळ, मनाने खूप हळवी होती.

दार्जिलिंगच्या त्या वातावरणात जिना आणि रतीबाई आणखीन जवळ आले. ते तासनतास घोड्यावर स्वार व्हायचे. याच ठिकाणी त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

सरोजिनी नायडू यांची मुलगी पद्मजा नायडू या रतनबाईंची जवळची मैत्रिण होती. त्या दोघी त्यांच्या मनातलं काहीएक एकमेकींपासून लपवून ठेवत नव्हत्या. पण इतक्या जवळ असूनही रतनबाईंनी हे रहस्य मात्र त्यांना कळू दिलं नाही.

दार्जिलिंगहून परतल्यावर जिना आपल्या राजकीय जीवनात व्यस्त झाले. मात्र ते रतनबाईंना विसरले नाहीत. या लग्नासाठी रतनबाईंच्या वडिलांना तयार कसं करायचं हा त्यांच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता.

जिनांच्या हाताखाली काम केलेले आणि त्यांचे मित्र असलेले एम सी छागला, जे नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले, आपल्या 'रोसेस इन डिसेंबर, अॅन ऑटोबायोग्राफी' या पुस्तकात लिहितात की, दार्जिलिंगहून परतल्यानंतर एका संध्याकाळी मोहम्मद अली जिना सर दिनशॉ पेटिट यांच्या घरी गेले. बोलता बोलता त्यांनी पेटिट यांना विचारलं की, 'आंतरजातीय विवाहांबद्दल तुमचं काय मत आहे?'

परिस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या सर पेटिट म्हणाले की, 'अशा विवाहांमुळे राष्ट्रीय एकता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि हा जातीय द्वेषावर अंतिम उपाय ठरेल.'

सर पेटिट यांनी आपलं मत अतिशय ठामपणे मांडलं.

जिनांना यापेक्षा चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करता आली नसती. वादविवादात आणखी एकही शब्दही वाया न घालवता त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं, 'मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे'

हे ऐकून सर पेटिट स्तब्ध झाले. आपल्या मताचा आपल्यावरच काय परिणाम होईल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. ते खूप चिडले आणि अशा हास्यास्पद गोष्टीवर विचार करण्यासही नकार दिला.

शीला रेड्डी लिहितात की, या दोघांमधील संभाषण कितपत खरं होतं याची निश्चितपणे पुष्टी कधी झालीच नाही. ना जिना कधी यावर बोलले ना सर दिनशॉ यांनी याबद्दल कोणाला काही सांगितलं.

सर दिनशॉ पेटिट हे पारशी होते. त्या काळात आंतरजातीय विवाह करण्याच्या विरोधात होते. दुसरीकडे रतनबाई 17 वर्षांच्या झाल्या होत्या. वडिलांनी नकार देऊनही त्यांनी जिनांना भेटणं सोडलं नव्हतं. आता तर त्या उघडपणे जिनांना भेटू लागल्या होत्या.

रतनबाईंनी आपल्या पालकांना सांगून टाकलं होतं की त्यांना मोहम्मद अली जिना यांच्याशीच लग्न करायचं आहे.

सर दिनशॉ आणि लेडी पेटिट यांना वाटत होतं की, हे एकतर्फी प्रेम असून मोहम्मद अली जिना रतनबाईंच्या प्रेमात आहेत. पण रतनबाईंचा निर्णय ऐकून त्यांचा हा गैरसमज दूर झाला.

आधी वयाच्या फरकाच्या आडून त्यांनी रतनला थांबवण्याचा प्रयत्न केला. मग धर्म आणि चालीरीती यांचा फरक सांगून पाहिला. पण रतनचा निर्णय अटळ होता. जगातील कोणतीही ताकद आपला निर्णय बदलू शकत नाही असा निर्धार त्यांनी केला होता.

शीला रेड्डी लिहितात की, जून 1917 च्या उत्तरार्धात सर पेटिट कोणाशीही सल्लामसलत न करता जिनांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयात गेले.

कोर्ट केसेस ही सर दिनशॉ यांची वाईट सवय होती.

क्षुल्लक घरगुती वाद असो की व्यावसायिक प्रकरणे, त्यांनी उच्च पदस्थ ब्रिटीश अधिकार्‍यांपासून ते घरकाम करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना न्यायालयाची पायरी चढायला लावलं होतं.

पण तोपर्यंत देशातील आघाडीचे वकील बनलेल्या जिनांच्या विरोधात न्यायालयात जाणं मूर्खपणाचं होतं.

त्यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका आज अस्तित्वात नाही. मात्र कांजी द्वारकादास सारख्या समकालीनांचा असा दावा आहे की सर दिनशॉ यांनी याचिकेत असं म्हटलं होतं की, जिना यांचा रतनच्या संपत्तीवर डोळा आहे.

पण न्यायालयाला हे एकतर्फी प्रेमप्रकरण नसल्याचं समजलं होतं. तरीही न्यायालयाने निर्णय देताना म्हटलं की, 20 फेब्रुवारी 1918 पर्यंत, म्हणजेच रतनबाई 18 वर्षांच्या होईपर्यंत त्या स्वतःच्या इच्छेने लग्न करू शकत नाही.

सर दिनशॉ पेटिट यांना वाटलं की, एक वर्ष दूर राहिल्याने हे प्रेमप्रकरण थंडावेल. पण तसं घडलंच नाही. रिजवान अहमद यांच्या म्हणण्यानुसार, सर दिनशॉ पेटिट यांनी जिनांना कळवलं की, कोणतेही धार्मिक विधी न करता म्हणजेच नागरी पद्धतीने तुम्ही विवाह करण्यास तयार असाल तर आम्ही या लग्नाला संमती देऊ.

पण हे जिना यासाठी तयार झाले नाहीत कारण त्यांना कायदा माहीत होता. ते मुस्लिम होते आणि नागरी विवाहासाठी पक्षकार कोणत्याही धर्माचे नाहीत अशी शपथ घ्यावी लागते. जिना संसदेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत होते. आणि जर त्यांनी अशा अटीवर लग्न केलं असतं तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संपली असती.

20 फेब्रुवारी 1918 रोजी रतनबाई 18 वर्षांच्या झाल्या. आता स्वतःचे निर्णय घेण्यास त्या मोकळ्या होत्या. त्यांनी जिनांना सांगितलं की त्या मुस्लिम बनण्यास तयार आहेत.

डॉ. साद खान लिहितात की, पण जिनांसमोर आता मोठा पेच होता. 1901 मध्ये मुस्लिम धर्मातील इस्माइली जमातीला खैरबाद घोषित केल्यापासून त्यांच्यावर कोणत्याही जमातीचा शिक्का नव्हता. 1918 च्या आधी त्यांनी त्यांच्या बहिणींची लग्न लावून देताना वर पक्षाचे कुटुंब शिया, सुन्नी किंवा इस्माइली आहेत का? याची काळजी घेतली नव्हती.

जिना यांची एक बहीण रहमत बाई हिचा विवाह कलकत्ता येथील सुन्नी मुस्लिम कासिम भाई जमाल यांच्याशी झाला होता. दुसरी बहीण मरियम बाई हिचा विवाह ख्वाजा अझना अशरी अबीदिन भाई यांच्याशी झाला होता. आणि तिसरी बहीण शिरीन बाई हिचा विवाह मुंबईतील इस्माईल व्यापारी जाफर भाईशी झाला होता.

जिना यांचा एकुलता एक भाऊ अहमद जिना यांनी एमिली या स्विस महिलेशी विवाह केला होता.

इस्लाम मध्ये असलेल्या धार्मिक भेदांना जिनांचा विरोध होता. पण आता रतनबाईंना इस्लाममध्ये आणण्यासाठी त्यांना एक जमात निवडावी लागणार होती.

मुहम्मद अली जिना यांनी त्यांचे इस्माइली मित्र सर मुहम्मद करीम आणि सर फजलभाई करीम यांच्यामार्फत सर आगा खान यांच्या आई शम्स अलिशा यांच्याशी संपर्क साधला. आणि रतनबाईंना इस्माइली जमातीमध्ये कसं घेता येईल याची चौकशी केली.

लेडी शम्स अलीशा या इस्माइली समुदायाच्या आध्यात्मिक संरक्षक होत्या. त्यांना माता सलामत म्हणून ओळखलं जायचं. याच शम्स बाईंनी जिना यांचं नामकरण केलं होतं. पण त्यांनी रतनबाईंना इस्माइली जमातीमध्ये सामील होण्यास परवानगी दिली नाही.

त्या म्हणाल्या की, त्यांचा मुलगा सुलतान मुहम्मद शाह हे इमाम आहेत आणि जमातीच्या बाबतीत त्यांचं मत अंतिम आहे. शम्स बाईंनी यांनी सर आगा खान यांच्याशी पत्राद्वारे चर्चा केली. पण सर आगा खान यांनी मोहम्मद अली जिना यांच्या इस्माइली धर्माला बहिष्कृत करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत रतनबाईंना कोणत्याही परिस्थितीत इस्माईल जमातीत सामील करता येणार नाही असं उत्तर पाठवलं.

डॉ. साद खान यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर जिना यांनी रतनबाईंचा शिया पंथांत सामील होण्याच्या शक्यता तपासल्या. त्यांनी त्यांची बहीण मरियम पीरभाईची सून रजब अली भाई इब्राहिम बाटलीवाला यांच्यामार्फत मुंबईतील सॅम्युअल रोडवरील पाला स्ट्रीट मस्जिदच्या इमामाशी संपर्क साधला. पण तिथेही त्यांना नकारच मिळाला.

आता जिनांना सुन्नी पंथाकडे वळण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी त्यांचे मित्र उमर सोबानी यांच्यामार्फत सुन्नी धार्मिक विद्वान मौलाना नझीर अहमद खजुंडी यांच्याशी औपचारिकपणे संपर्क साधला. त्यांनी ही विनंती मान्य केली.

18 एप्रिल 1918 रोजी, उमर सोबानी हे रतनबाईंच्या घरी आले. त्यावेळी रतनबाईंचं संपूर्ण कुटुंब पारशी धर्माच्या वार्षिक उत्सवासाठी बाहेर गेलं होतं. रतनबाईंना घेऊन उमर सोबानी, मौलाना नजीर अहमद खजुंडी यांच्या मशिदीपर्यंत आले.

ही मशीद मौलाना अबुल कलाम यांचे वडील मौलाना खैरोद्दीन यांनी स्थापन केली होती.

जिना हाऊस

मौलाना खजुंडी यांनी रतनबाईंना कलमा तय्यबा वाचायला लावला आणि त्यांचं मरियम असं नामकरण केलं. त्यानंतर उमर सोबानी यांनी रतनबाईंना पुन्हा त्यांच्या घरी सोडलं. रतनबाईंचे कुटुंबीय अजूनही घरी परतले नव्हते. त्यामुळे त्या घरातून बाहेर होत्या हे कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं.

डॉ. साद खान लिहितात की, जेव्हा ही बातमी बॉम्बे ख्वाजा एथना अशरी जमातचे प्रमुख खान बहादूर सेठ बच्चू अली यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी रजब अली इब्राहिम यांच्यामार्फत जिना यांना तातडीचा संदेश पाठवला की ते त्यांच्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास तयार आहेत. आणि रतनबाईंना ख्वाजा एथना अशरी जमातमध्ये समाविष्ट करण्यास तयार आहेत.

19 एप्रिल 1918 रोजी शुक्रवारच्या दिवशी कायद-ए-आझम मोहमद अली जिना यांच्या माउंट प्लेझंट रोडवरील 'साउथ कोर्ट' या बंगल्यावर रतनबाई आणि जिना यांचा विवाह पार पडला.

हा विवाह मौलाना हसन नजफी यांनी लावून दिला होता. या विवाहात रतनबाईंच्या बाजूने शरियत मदार हाजी शेख अबुल कासिम नजफी होते तर जिना यांच्या बाजूने महमूदाबादचे राजे मोहम्मद अली खान होते. तर गुलाम अली, शरीफभाई देवजी आणि उमर सोबानी यांनी साक्षीदार म्हणून विवाह प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केल्या.

या विवाह प्रमाणपत्रानुसार हुंड्याची रक्कम 1,001 रुपये निश्चित करण्यात आली होती. पण जिना यांनी आपल्या नववधूला 1,200 रुपये भेट म्हणून दिले होते.

आता तो संस्मरणीय क्षण आला जेव्हा वराने वधूला अंगठी घालायची होती. पण आपल्या व्यस्त वेळापत्रकात जिना अंगठी विकत घ्यायला विसरले होते. त्यावेळी महमूदाबादचे राजे मोहम्मद अली खान यांनी आपल्या हातातील हिऱ्याची अंगठी जिनांच्या नववधुसाठी काढून दिली.

विवाह प्रमाणपत्रावर जिना हे ख्वाजा एथना अशरी या पंथाचे असल्याचं नमूद केलं होतं. जिनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू झाला तेव्हा त्यांचा पंथ काय होता हे न्यायालयाला ठरवता आलं नाही.

जिनांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती फातिमा जिना यांना देण्यात आली. फातिमा जिना यांच्या मृत्यूनंतर शिरीन जिना पाकिस्तानात आल्या आणि शिया धर्म स्वीकारला तेव्हा जिनांच्या काही नातेवाईकांनी जिनांची संपत्ती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

खालिद अहमद यांच्या 'कायद-ए-आझम्स फॅमिली डिस्प्युट्स' या पुस्तकानुसार जिनांच्या धर्माचं हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.

शीला रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, जिना यांनी लग्नासाठी 19 एप्रिल ही तारीख अतिशय विचारपूर्वक निवडली होती. कारण त्या दिवशी शुक्रवार होतं. पुढचे दोन दिवस न्यायालय बंद असणार होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जिना आणि रतनबाई हनिमूनसाठी लखनौला पोहोचले. तिथे त्यांनी महमूदाबादच्या राजवाड्यात एक दिवस घालवला.

महाराजा सर मुहम्मद अली मुहम्मद खान यांचे पुत्र राजा मुहम्मद अमीर अहमद खान यांनी सांगितलं होतं की, "लग्नानंतर जिना साहेब त्यांच्या बेगमसह लखनौला आले होते. त्यावेळी मी खूप लहान होतो. माझे वडील जिनांचे मित्र होते. जिनासाहेब त्यांच्या बेगमसह काही दिवस लखनौमध्ये राहिले आणि नंतर नैनितालला गेले."

त्यांनी पुढे सांगितलं की, "मला आजही आठवतंय रती जिना यांनी मला प्रेमाने उचलून त्यांच्या मांडीवर बसवलं होतं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. मला त्या एखाद्या परीकथेतील परीप्रमाणे दिसत होत्या."

यावेळी रतनबाई जिना यांनी प्रथेप्रमाणे आपल्या पर्समधून शंभर रुपये काढल्याचेही राजा अमीर अहमद खान सांगतात.

शीला रेड्डी यांनी त्यांच्या मिस्टर अँड मिसेस जिना या पुस्तकात लिहिलंय की, 'सर दिनशॉ पेटिट यांनी नाश्त्याच्या वेळी आपलं आवडतं वृत्तपत्र बॉम्बे क्रॉनिकल उघडलं.'

बॉम्बे क्रॉनिकलच्या पान आठ वर दोन स्तंभांमध्ये काही बातम्या होत्या. या बातम्या काही आठवडे किंवा काही महिने लोकांच्या चर्चेचा विषय ठरणार होत्या.

यातील एक बातमी होती, 'काल संध्याकाळी माननीय एम ए जिना यांचा विवाह माननीय सर दिनशॉ पेटिट आणि लेडी पेटिट यांच्या कन्या श्रीमती रती पेटिट यांच्यासोबत पार पडला.'

शीला रेड्डी पुढे लिहितात की, रतनबाई घरातून दोन दिवस गायब आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं. पहिल्यांदा 18 एप्रिल रोजी धर्मांतर करण्यासाठी त्या जामा मशिदीत गेल्या. त्यानंतर 19 एप्रिल रोजी संध्याकाळी आई वडिलांची नजर चुकवून माउंट प्लीझन रोडवरील जिना यांच्या बंगल्याकडे चालत गेल्या. तिथे त्या एका मौलानासोबत जिनांची वाट पाहत उभ्या होत्या.

रात्रभर त्या गायबच होत्या. सकाळच्या बॉम्बे क्रॉनिकल या वर्तमानपत्रातून त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या लग्नाची बातमी कळली.

पुढच्या दोन-तीन दिवसांत टाईम्स ऑफ इंडिया, स्टेट्समन, पायोनियर आणि सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेटमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली. 24 एप्रिल 1918 रोजी लाहोरच्या पैसा या वृत्तपत्रात 'ए पारसी बॅरन्स गर्ल ॲक्सेप्ट इस्लाम' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती.

जिना यांच्या लग्नाची बातमी संपूर्ण भारतभर वणव्यासारखी पसरली विशेषत: बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये. कारण या भागात बहुसंख्य पारशी लोक राहत होते आणि या बातम्यांवर टीका होणं स्वाभाविक होतं.

या घटनेनंतर सर पेटिट जवळजवळ एकांतवासात गेले. या विषयावर होणारी कोणतीही चर्चा त्यांना सहन होणार नव्हती. ते खूप अस्वस्थ आणि रागावले होते. त्यांनी पुन्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी जिना यांच्यावर संपत्तीसाठी मुलीचं अपहरण केल्याचा आरोप केला

ही गोष्ट जिनांच्या मनाला खूप लागली. त्यांनी स्वतःच्या जीवावर संपत्ती कमावली होती. आणि आता त्यांच्यावर होणारे असे आरोप त्यांना सहन होणारे नव्हते.

रतनबाईंना देखील हे आरोप सहन होणारे नव्हते. न्यायालयात खटला सुरू असताना न्यायाधीशांनी जिनांना विचारलं की, तुम्ही रतनबाईंचं त्यांच्या घरून अपहरण केलं का? यावर जिना काही बोलणार इतक्यात रतनबाई उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "सर, मिस्टर जिना यांनी माझं अपहरण केलेलं नाही, खरं तर मीच त्यांचं अपहरण केलंय."

रतनबाईंच्या या निर्भिड उत्तराने जिनाही थक्क झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं जे रतनबाईंना जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त अमूल्य होतं. सर पेटिट आपल्या मुलीचे शब्द आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव कधीच विसरू शकले नाहीत.

हे सगळं प्रकरण संपलं होतं आणि आता रतीला फक्त संपत्ती हक्कसोड पत्रावर सही करायची होती.

20 फेब्रुवारी 1929 रोजी रतनबाईंचं निधन झालं. हसन अली एम. जाफर यांनी त्यांच्या 'द एन्डेंजर्ड स्पीसीज' या पुस्तकात लिहिलंय की, रतनबाईंच्या मृत्यूनंतर बॉम्बे ख्वाजा एथना अशरी पंथाने त्यांना त्यांच्या आराम बाग या दफनभूमीत दफन करण्यास परवानगी नाकारली.

या स्मशानभूमीत ख्वाजा नसलेल्या व्यक्तीला दफन करता येणार नाही, अशी पंथाची भूमिका होती. जिना यांनी पंथाच्या भूमिकेला आव्हान दिलं आणि सांगितलं की जर त्यांनी आपला निर्णय बदलला नाही तर ते न्यायालयात जातील.

जिनांच्या या भूमिकेवर पक्षाचे अध्यक्ष हुसेनभाई लालजी यांनी रतनबाईंना आरामबाग कब्रस्तानमध्ये दफन करण्यास परवानगी दिली. आजही त्यांची कबर याठिकाणी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)