You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राना लियाकत अली : कुमाऊंमधली बंडखोर मुलगी जी पाकिस्तानची फर्स्ट लेडी बनली
अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत जमशीद मार्कर असं म्हणायचे की, राना लियाकत अली एखाद्या खोलीत गेल्या तर ती खोली आपोआप उजळून निघायची.
एकदा ब्रिजच्या एका गेमनंतर लियाकत अलींना मोहम्मद अली जिन्नांनी विचारलं होतं की, तुम्ही तुमचा एकटेपणा दूर करण्यासाठी दुसरं लग्न का करत नाही. त्यावर त्यांनी लगेचच उत्तर दिलं होतं, "मला दुसरी राना आणून द्या, मी लगेचच लग्न करतो."
राना लियाकत अली यांचा का जन्म 13 फेब्रुवारी 1905 मध्ये अल्मोडा इथं झाला होता. जन्माच्या वेळी त्यांचं नाव आयरीन रूथ पंत असं होतं.
त्या एका कुमाऊं ब्राह्मण कुटुंबातील होत्या आणि नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता.
"त्या जराही दबून राहणाऱ्यांपैकी नव्हत्या. अत्यंत स्वतंत्र विचारसरणीच्या आणि आत्मविश्वासू होत्या. त्यांच्या जवळपास 86 वर्षांच्या जीवनकाळात त्यांनी 43 वर्षे भारतात आणि जवळपास तेवढीच पाकिस्तानात घालवली. त्यांनी केवळ डोळ्यासमोर इतिहास घडताना पाहिलाच नाही, तर इतिहासाचा त्या भागही बनल्या," असं राना लियाकत अली यांच्या 'द बेगम' या आत्मचरित्राच्या सहलेखिका दीपा अग्रवाल सांगतात.
"जिन्नांपासून ते जनरल जिया उल हक सर्वांसमोर त्या कधीही स्वतःचा मुद्दा मांडण्यात कचरल्या नाहीत. एमएच्या वर्गात त्या एकमेव मुलगी होत्या. मुलं त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या सायकलची हवा सोडायचे. मुळात 1927 मध्ये त्या मुलगी असून सायकल चालवायच्या, हीच एक खास बाब होती."
अल्मोडाच्या पंत कुटुंबावर समाजाचा बहिष्कार
1874 मध्ये आयरीन पंत यांचे आजोबा तारादत्त पंत यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तेव्हा संपूर्ण कुमाऊंमध्ये एकच खळबळ उडाली होती.
त्यांच्या समुदायाला या गोष्टीचा एवढा राग आला होता की, त्यांनी 'घटाश्राद्ध' पद्धतीनुसार त्यांना मृत जाहीर केलं होतं.
आयरीन रुथ पंत यांचं कुटुंब राहत होतं, त्याचठिकाणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक राहिलेल्या पुष्पेश पंत यांचं आजोळही होतं.
"मी 60 वर्षांपूर्वी माझ्या आजोळी असलेल्या घरी 8-10 वर्षांचा असताना राहत होतो. तेव्हा लोक त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा करायचे, हे नॉरमन पंत साहेबांचं घर असल्याचं सांगायचे" असं पुष्पेश पंत यांनी सांगितलं.
"यांच्या बहिणीचं पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्याशी लग्न झालं आहे. नॉरमन पंत हे स्वतः अत्यंत कर्तबगार आणि चांगले व्यक्ती असतील, पण लोक त्यांना आयरीन पंत यांचे भाऊ म्हणूनच ओळखत होते."
"त्यांचे आजोबा अल्मोडामधील उच्च ब्राह्मण कुटुंबातील होते आणि त्याठिकाणचे प्रसिद्ध वैद्यही होते. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तेव्हा संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. कारण हे धर्मांतर अनुसुचित जातीतील लोकांच्या धर्मांतरासारखं नव्हतं."
"ते उच्च ब्राह्मण कुटुंबातील होते. हा धक्का सहन करण्यातच अल्मोडावासीयांच्या दोन पिढ्या गेल्या. त्यात त्यांची बहीण पुन्हा एक धर्मांतर करत मुस्लीम बनल्या तेव्हा आणखी एक धक्का बसला."
"त्यांच्याबाबत अनेक मजेदार कथा प्रसिद्ध होत्या. ते गोरे साहेब फक्त बीबीसी ऐकायचे. इंग्रजांप्रमाणे ते टोस्ट बटरचा नाश्ता करायचे. फिरायला एकटे जायचे कारण त्यांना कदाचित माहिती होतं की, अल्मोड्यातील ब्राह्मण त्यांना ब्राह्मण समजणार नाहीत कारण ते दोन पिढ्यांपासून ख्रिश्चन बनले होते."
शिवानी यांची आठवण
त्या काळच्या रुढीवादी समाजामध्ये तथाकथिक मॉडर्न असलेल्या पंत बहिणींची संपूर्ण शहरात चर्चा असायची आणि लोकांना त्यांचा हेवादेखील वाटायचा.
"माझ्या आजोबांच्या शेजारचं घर डॅनियल पंत यांचं होतं. ते ख्रिश्चन होते. पण एकेकाळी ते माझ्या आईकडून आमचे नातेवाईक होते," असं प्रसिद्ध कादंबरीकार शिवानी यांची मुलगी इरा पांडे यांनी त्यांच्या 'दिद्दी' या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
"आमच्या जुन्या विचारांच्या आजोबांनी त्यांचं आणि आमचं जग वेगळं करण्यासाठी आमच्या घरांच्या मध्ये एक भिंत तयार केली होती. आम्ही त्याबाजूला पाहायचंही नाही, अशी ताकिद आम्हाला देण्यात आलेली होती.
"माझी आई शिवानी यांनी लिहिलं होतं की, त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरातून चवदार मांस शिजण्याचा वेड लावणारा सुगंध आमच्या 'बोअरिंग' ब्राह्मण स्वयंपाकघरात पोहोचायचा आणि आमच्या डाळ, बटाट्याची भाजी आणि भात धाराशाही व्हायचे."
"हेनरी पंत हे त्या 'बर्लिन वॉल'च्या पलिकडे असलेल्या मुलांपैकी माझे चांगले मित्र होते. त्यांच्या बहिणी ओल्गा आणि मुरियल (जिला आम्ही मरियल म्हणायचो) जेव्हा जॉर्जेटची साडी नेसून अल्मोडाच्या बाजारात फिरायच्या, तेव्हा लोकांना त्यांचा प्रचंड हेवा वाटत असायचा."
लखनऊच्या आयटी कॉलेजमध्ये शिक्षण
आयरीन पंत यांचं शिक्षण आधी लखनऊच्या लाल बाग शाळेत आणि नंतर त्याठिकाणच्या प्रसिद्ध आय-टी कॉलेजमध्ये झालं होतं.
इस्मत चुगताई, कुरतुलैन हैदर, राशीद जहाँ आणि अतिया होसैन अशी मोठ्या लेखिकांची संपूर्ण पिढी याच कॉलेजमधून शिकलेली होती.
हे कॉलेज विद्यार्थिनीना खूप स्वातंत्र्य देत होतं. त्या काळात महाविद्यालयातील मुली या नेहमी फिरायला हजरतगंजला जायच्या. त्याला 'गंजिंग' म्हटलं जात होतं.
"त्या जिथे असतील त्याच्या आजुबाजुला उत्साहाचं वातावरण असायचं. त्यांनी लखनऊ विद्यापीठात एमएमध्ये प्रवेश घेतला तेव्हा, मुलं फळ्यावर त्यांची चित्रं काढायची. पण आयरीन यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नव्हता," असं आयरीन यांच्या बालपणीच्या मैत्रीण के माइल्स यांनी त्यांच्या 'अ डायनेमो इन सिल्क' या पुस्तकात लिहिलं आहे.
लियाकत अलींशी पहिली भेट
मुस्लीम लीगचे नेते लियाकत अली यांच्याशी त्यांच्या भेटीची कथाही अत्यंत रंजक आहे.
"त्यावेळी बिहारमध्ये पूर आलेला होता. त्यामुळं लखनऊ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम करून काही रक्कम जमा करण्याचं ठरवलं होतं," असं दीपा अग्रवाल सांगतात.
"आयरीन पंत या कार्यक्रमाची तिकिटं विकण्यासाठी लखनऊ विधानसभेत गेल्या. त्याठिकाणी त्यांनी पहिलं दार वाजवलं ते लियाकत अली खान यांनी उघडलं. लियाकत तिकिट खरेदी करायला कचरत होते. फार प्रयत्नांनंतर ते एक तिकिट खरेदी करण्यासाठी राजी झाले."
"आयरीन त्यांना म्हणाल्या, किमान दोन तिकिटं तर खरेदी करा. कुणाला तरी सोबत घेऊन आमचा शो पाहायला या. त्यावर लियाकत यांनी शोमध्ये घेऊन यायला मी कोणाला ओळखत नाही," असं उत्तर दिल्याचं दीपा अग्रवाल सांगतात.
"त्यावर आयरीन म्हणाल्या. मी तुमच्याबरोबर येण्यासाठी कुणाची तरी व्यवस्था करते. कुणी भेटलं नाही, तर मीच तुमच्या शेजारी बसून शो पाहीन. त्यानंतर ही विनंती लियाकत टाळू करू शकले नाहीत."
"त्याच सायंकाळी राज्यपालांनी विधान परिषदेच्या सर्व सदस्यांसाठी भोजनाचं आयोजन केलं होतं. म्हणजे आयरीन यांनी लॉरेन्स होप यांनी लिहिलेलं प्रसिद्ध 'पेल हँड्स आय लव्हड बिसाइड द शालीमार' गायलं तेव्हा ते ऐकण्यासाठी लियाकत अली उपस्थित नव्हते. पण मध्यांतरानंतर लियाकत त्यांचे सहकारी मुस्तफा रझा यांच्याबरोबर शो पाहत असल्याचं त्यांनी पाहिलं."
दिल्लीच्या मेडेंस हॉटेलमध्ये निकाह
यादरम्यान आयरीन दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये अर्थशास्त्राच्या लेक्चरर बनल्या.
एक दिवस वृत्तपत्रात लियाकत अली यांची उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी आली. आयरीन यांनी पत्र लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यावर लियाकत यांनी पत्राला उत्तर दिलं. "तुम्ही दिल्लीत आहात याचा मला आनंद झाला. कारण ते माझ्या करनाल शहराच्या अगदी जवळ आहे. जेव्हा मी लखनऊला जाताना दिल्लीवरून जाईल तेव्हा माझ्याबरोबर वेंगर रेस्तरॉमध्ये चहा घ्यायला तुम्हाला आवडेल का?" असं त्यांनी लिहिलं.
आयरीन यांनी लियाकत यांची विनंती मान्य केली. तेव्हापासून दोघांमध्ये भेटी गाठी सुरू झाल्या आणि 16 एप्रिल 1933 ला त्यांच्या लग्नापर्यंत हे प्रकरण पोहोचलं.
लियाकत अली त्यांच्यापेक्षा वयानं 10 वर्ष मोठे तर होतेच पण त्याचबरोबर ते आधीच विवाहितदेखील होते. त्यांनी चुलत बहीण जहाँआरा बेगमबरोबर लग्न केलेलं होतं. त्यांना विलायत अली खान नावाचा एक मुलगाही होता.
त्यांचा निकाह दिल्लीच्या प्रसिद्ध 'मेडेंस हॉटेल' मध्ये झाला होता. जामा मशिदीच्या इमामांनी हा निकाह लावला होता. आयरीन यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांचं नवं नाव गुल-ए-राना ठेवण्यात आलं.
दोघांना संगीताची आवड
लियाकत अली त्यावेळी मुस्लीम लीगचे रायझिंग स्टार आणि मोहम्मद अली जिन्ना यांचे सर्वात निकटवर्तीय होते, यात काहीही शंका नव्हती.
"लियाकत अली यांना फोटोग्राफीचा छंद होता आणि यांत्रिक गोष्टींमध्येही त्यांना कायम रस असायचा. ते कायम त्यांच्या कारच्या इंजिनाशी काहीतरी करत असायचे," असं दीपा अग्रवाल सांगतात.
"ते संगीत शिकलेले होते. चांगले गायक होते आणि पियानो, तबला वाजवायचे. रानादेखील पियानो आणि गिटार वाजवायच्या. त्यांच्या डिनर पार्ट्यांमध्ये गझलांबरोबरच इंग्रजी गाणीही ऐकायला मिळायची."
"पती-पत्नी दोघांनाही ब्रिज खेळायची आवड होती. लियाकत बुद्धिबळही खेळायचे. तर राना 'स्क्रॅबल' चांगलं खेळायच्या. पाच फूट उंची असलेल्या राना यांना दागिन्यांची आवड नव्हती किंवा कपड्यांची. मात्र त्यांना एक परफ्युम खूप आवडायचा तो म्हणजे जॉय. "
"लियाकत यांना पेरू खूप आवडायाचे. यामुळं रक्त शुद्ध होतं, असं ते म्हणायचे."
बंगला पाकिस्तानला दान केला
जाण्यापूर्वी जिन्ना यांनी औरंगजेब रोडवरचा बंगला रामकृष्ण डालमिया यांना विकला. पण लियाकत अली यांनी त्यांचा बंगला पाकिस्तानला दान दिला.
त्याला आज 'पाकिस्तान हाऊस' नावानं ओळखलं जातं. आजही त्याठिकाणी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त राहतात. 8, तिलक मार्ग, हा त्याचा नवीन पत्ता आहे.
हीच ती जागा जिथून 1946 च्या अर्थसंकल्पाची कागदपत्रं थेट संसदेत नेण्यात आली होती. त्यावेळी लियाकत अली अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
"लियाकत अली यांनी त्यांच्या घरातील एकूण एक वस्तू पाकिस्तानला दिली. ते फक्त काही वैयक्तिक वस्तू सोबत घेऊन पाकिस्तानला गेले, असं दीपा अग्रवाल सांगतात.
"त्यात एक सुटकेस होती, ज्यात सिगरेट लायटर भरलेले होते. त्यांना सिगारेटचे लायटर जमा करण्याचा छंद होता. सर्वकाही पॅक झाल्यानंतर राना म्हणाल्या की, मला एक गालिचा सोबत घेऊन जायचा आहे. कारण तो माझ्या आईचा आहे मी तो इथे सोडू शकत नाही.
ऑगस्ट 1947 मध्ये लियाकत अली आणि राना लियाकत अली यांनी अशरफ आणि अकबर या दोन मुलांसह दिल्लीच्या वेलिंगटन विमानतळावरून एका डकोटा विमानातून कराचीसाठी उड्डाण घेतलं.
लियाकत अलींची हत्या
लियाकत अली पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनले आणि राना त्याठिकाणच्या 'फर्स्ट लेडी'. लियाकत यांनी त्यांना मंत्रिमंडळात अल्पसंख्याक आणि महिला मंत्री म्हणून स्थान दिलं.
पण चारच वर्ष झाली असताना, रावळपिंडीमध्ये लियाकत अली एका सभेत भाषण करत असताना त्यांची हत्या करण्यात आली.
अनेकांना वाटत होतं की, राना आता भारतात परत येतील. पण त्यांनी पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला.
"सुरुवातीला त्या थोड्या तणावात होत्या. त्यांना भीतीही वाटली. कारण लियाकत कुठलीही संपत्ती सोडून गेले नव्हते," असं 'द बेगम' च्या सहलेखिका तहमिना अजिज अयूब यांनी सांगितलं.
"त्यांच्या बँक खात्यात केवळ 300 रुपये होते. त्यांच्यासमोर मुलांचं पालनपोषण आणि शिक्षण याची मोठी जबाबदारी होती. पण काही मित्रांनी पुढाकार घेत त्यांची मदत केली."
"पाकिस्तान सरकारनं त्यांना 2000 रुपये महिना स्टायपेंड दिला. तीन वर्षांनी त्यांना हॉलंडला पाकिस्तानच्या राजदूत म्हमून पाठवण्यात आलं. त्याचाही त्यांना काहीसा फायदा झाला."
"त्यांनी आधीच 1949 मध्ये ऑल पाकिस्तान वूमन असोसिएशनचा पाया रचला होता. त्या विदेशात असतानाही कायम त्याच्याशी संलग्न होत्या."
राजदूत पदी नियुक्ती
राना लियाकत अली यांना आधी हॉलंड आणि नंतर इटलीत पाकिस्तानच्या राजदूत बनवण्यात आलं.
"त्या खूप शिकलेल्या आणि समजदार होत्या. तसंच त्यांना अनेक मुद्दे समजत होते. पहिल्यांदा त्या 1950 मध्ये लियाकत अली खान यांच्याबरोबर अमेरिकेला गेल्या तेव्हा त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली होती," असं तहमिना अयूब म्हणाल्या.
"त्याच दरम्यान त्यांना खूप पुरस्कारही मिळाले. त्यांनी लवकरच स्वतःला या साच्यात बसवून घेतलं. हॉलंडवर त्याकाळी राणीचं राज्य होतं. त्यांच्याशी राना यांची चांगली मैत्री झाली होती. हॉलंडने त्यांना सर्वात मोठा नागरी सन्मान 'ऑरेंज अवॉर्ड' दिला."
"त्याठिकाणच्या राणीनं त्यांना अत्यंत आलिशान घर ऑफर केलं. ती एक 'हेरिटेज बिल्डिंग' होती. तुम्ही अगदी कमी किमतीत तुमच्या दुतावासासाठी याची खरेदी करा," असं राणीनं म्हटलं होतं.
"ते अगदी शहराच्या मध्यभागी आहे. तिथून राजमहल केवळ एक किलोमीटर दूर होता. ती इमारत आजही त्यांच्याकडे आहे. तिथं हॉलंडमधील पाकिस्तानचे राजदूत राहतात. त्या संपूर्ण हॉलंडमध्ये फिरायच्या."
"त्या योजनांची पाहणी करायच्या आणि घरात मोठ मोठ्या मेजवानी आयोजित करायच्या. जे एका राजदुतानं करायला हवं."
जगत मेहताच्या मुलांना स्वतः अंघोळ घातली
राजदूत असतानाच त्या स्वित्झर्लंडची राजधानी बर्नमध्ये गेल्या. त्याठिकाणी त्या भारताचे माजी परराष्ट्र सचिव जगत मेहता यांच्या फ्लॅटमध्ये थांबल्या. त्यावेळी ते स्वित्झर्लंडमधील भारताचे ज्युनियर राजदूत होते.
"ब्रिटनचे राजदूत जे पाकिस्तानच्या दुताचं कामही पाहत होते, त्यांनी राना यांना त्यांच्या घरी राहण्याचं आमंत्रण दिलं होतं. तरीही त्या आमच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये त्यांची दोन मुलं आणि माइल्स यांच्यासह थांबल्या होत्या," असं जगत मेहता यांनी नंतर त्यांच्या 'निगोशिएटिंग फॉर इंडिया: रिझॉल्व्हींग प्रॉब्लेम्स थ्रू डिप्लोमसी' मध्ये लिहिलं होतं.
"येताच त्या संकोच न करता थेट आमच्या स्वयंपाकघरात शिरल्या. त्यांनी माझ्या लहान मुलांना अंघोळही घातली होती. द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींमध्ये अशाप्रकारच्या मैत्रीचं उदाहरण क्वाचितच आढळेल."
राना आणि अयूब यांच्यातील मतभेद
कुटनितीचं काम करताना मोठं नाव कमावल्यानंतरही पाकिस्तानचे हुकूमशहा अयूब खान आणि राना यांचं कधीही एकमेकांशी जमलं नाही. अयूब खान यांनी त्यांना त्रास देण्यात जराही कसर सोडली नाही.
"त्यांना फातिमा जिन्ना यांच्या विरोधात प्रचारात सहभागी व्हावं यासाठी अयूब खान यांनी त्यांना खूप त्रास दिला. पण त्यांनी मी पाकिस्तानची राजदूत आहे असं सांगत स्पष्ट नकार दिला होता," असं तहमिना अयूब सांगतात.
मी कशी तुमच्या बाजूनं प्रचार करू शकते असं त्या म्हणाल्या. त्यावर बदला म्हणून अयूब खान यांनी त्यांना इटलीहून परत बोलावलं.
जनरल जिया यांच्याशीही मतभेद
राना लियाकत अली यांना त्यांच्या सेवांसाठी पाकिस्तानातील सर्वात मोठा नागरी सन्मान 'निशान-ए-इम्तियाज'नं गौरवण्यात आलं. तसंच त्यांचा 'मादरे-पाकिस्तान'हा किताबही मिळाला.
राना लियाकत अली पाकिस्तानमधील महिला सबलीकरणासाठी कायम लक्षात राहतील. पाकिस्तानातील आणखी एक हुकूमशहा जनरल जियाउल हक यांच्यासमोरही त्या उभ्या ठाकल्या होत्या.
"जनरल जिया उल हक यांनी भुत्तो यांना फासावर लटकावलं, तेव्हा त्यांनी लष्करी सरकारच्या विरोधात प्रचाराचं नेतृत्व केलं. त्यांनी जनरल जिया यांच्या इस्लामी कायदा लागू करण्याच्या निर्णयालाही विरोध केला," असं तहमिना सांगतात.
"'कानून-ए-शहादत' नुसार दोन महिलांची साक्ष ही एका पुरुषाच्या साक्षीसमान मानली जात होती. जनरल जियाचं त्यांना अटक करण्याचं धाडस झालं नाही. मात्र, त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं."
30 जून, 1990 ला राना लियाकत अली यांनी अखेरचा श्वास घेतला.
1947 नंतर पाकिस्तानला गेलेल्या राना लियाकल अली त्यानंतर तीन वेळा भारतात आल्या. पण त्या परत कधीही अल्मोडाला गेल्या नाहीत.
मात्र, अल्मोडाला कधीही त्यांचा विसर पडला नाही. त्याच्या आठवणीत त्या कायम राहिल्या.
दीपा अग्रवाल यांच्या मते, "त्यांना कुमाऊंमध्ये खाल्ली जाणारी नाचणीची भाकर, भाताबरोबर मसूरची डाळ आणि दादीम (रानातील डाळींबाची चटणी) कायम आवडायची. पाकिस्तानला गेल्यानंतरही भारतातूनच त्यांचे कपडे शिवून जायचे. एकदा त्यांनी भाऊ नॉरमनला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवताना केलेल्या टेलिग्राममध्ये, आय मिस अल्मोडा, असं लिहिलं होतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)