प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांना कर्करोगाचं निदान, प्राथमिक स्तरावरील उपचार सुरू

व्हीडिओ स्टेटमेंटमध्ये कॅन्सरविषयी बोलताना राजकुमारी कॅथरीन.

फोटो स्रोत, BBC Studios

फोटो कॅप्शन, व्हीडिओ स्टेटमेंटमध्ये कॅन्सरविषयी बोलताना राजकुमारी कॅथरीन.

"कॅन्सरच्या निदानानंतर मी त्यावरील उपचारांच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जात आहे," असं प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांनी माहिती दिलीय.

व्हीडिओद्वारे माहिती देताना कॅथरीन यांनी सांगितलं की, "अतिशय कठीण महिन्यांच्या कालावधीनंतर हा एक मोठा धक्का होता.”

"मी बरी आहे आणि कणखर सुद्धा आहे," असा सकारात्मक मेसेजही त्यांनी दिला आहे.

कॅथरीन यांना असलेल्या कॅन्सरचे तपशील उघड केले गेले नाहीत. पण त्या पूर्णपणे बऱ्या होतील, असा विश्वास आहे, असं केन्सिंग्टन पॅलेसनं म्हटलंय.

यंदा जानेवारीमध्ये जेव्हा कॅथरीन यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हा कर्करोगाविषयीची माहिती समोर आली नव्हती, असं त्यांनी त्यांच्या व्हीडिओ संदेशात स्पष्ट केलं आहे.

"पण, शस्त्रक्रियेनंतरच्या चाचण्यांमध्ये कर्करोग असल्याचं आढळलं. त्यामुळे माझ्या वैद्यकीय पथकानं मला प्रतिबंधात्मक केमोथेरपीचा कोर्स करावा असा सल्ला दिला आणि मी आता त्या उपचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे," असं त्यांनी सांगितलं.

कॅथरीन यांच्यावर फेब्रुवारीच्या अखेरीस केमोथेरपी उपचार सुरू झाले आहेत. कॅन्सरच्या प्रकारासह इतर कोणतीही खाजगी वैद्यकीय माहिती शेअर करणार नाही, असं पॅलेसनं म्हटलंय.

प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन (42) म्हणाल्या की, त्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या सर्वांचा विचार करत आहेत.

"या आजाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकानं कोणत्याही स्वरुपात कृपया आत्मविश्वास आणि आशा गमावू नका. तुम्ही एकटे नाही आहात."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

कॅथरीन यांनी सांगितलं की, जानेवारीमधील शस्त्रक्रियेनंतर कॅन्सरचा खुलासा होण्यासाठी वेळ लागला आणि आता त्यांचं प्राधान्य कुटुंबाला धीर देणं आहे.

"आमच्या तरुण कुटुंबाचा विचार करुन ही प्रक्रिया खासगीरित्या आणि व्यवस्थित पार करण्याकरता विलियम आणि मी सर्वकाही करत आहोत."

त्या पुढे म्हणाल्या, "जॉर्ज, शार्लोट आणि लुईस यांना सर्व काही योग्य आहे, हे समजावून सांगण्यासाठी आणि मी ठीक आहे याची त्यांना खात्री देण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आहे."

आमच्या कुटुंबाला आता काही वेळ, स्पेस आणि प्रायव्हसी आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या.

किंग चार्ल्स तृतीय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किंग चार्ल्स तृतीय
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कॅथरीन यांच्या कॅन्सरच्या निदानाबाबत शुक्रवारी घोषणा करण्यापूर्वी किंग चार्ल्स आणि क्वीन या दोघांना राजकुमारीच्या तब्येतीची बातमी कळवण्यात आली होती. किंग चार्ल्स देखील कर्करोगावर उपचार घेत आहेत.

किंग चार्ल्स आणि कॅथरीन यांच्यावर एकाच वेळी लंडन क्लिनिकच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. कॅथरीन यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया झाली आणि चार्ल्स यांना वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींमध्ये सुधारणा प्रक्रियेसाठी इथं दाखल करण्यात आलं होतं.

“कॅथरीननं ज्यापद्धतीनं याविषयी माहिती सांगितली त्यामुळे किंग चार्ल्स यांना तिचा खूप अभिमान आहे,” असं बकिंगहम पॅलेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

हॉस्पिटलमध्ये एकत्र उपचार घेत असताना, गेल्या आठवड्यांपासून ते सुनेच्या जवळून संपर्कात राहिले, असंही त्यांनी म्हटलं.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी एक संदेश पाठवत म्हटलंय की, "आम्ही केट आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे होण्याची इच्छा करतो. तसंच आशा करतो की, ते खासगीपणे आणि शांततेत यातून बाहेर पडण्यास सक्षम असतील."

कॅथरीन आणि प्रिन्स विल्यम यावेळी इस्टर संडेला रॉयल फॅमिलीसोबत दिसण्याची शक्यता कमी आहे. तसंच, त्या राजकुमारीच्या अधिकृत कर्तव्यावर लवकर परत येणार नाही.

केन्सिंग्टन पॅलेसनं असंही म्हटलंय की, प्रिन्स विल्यम यांची 27 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या स्मारक सेवेच्या कार्यक्रमाला असलेली अचानक अनुपस्थिती कॅथरीन यांना कर्करोगाचे निदान झाल्यामुळे होती.

जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया झाल्यापासून या जोडप्याला कॅथरीन यांच्या आरोग्याबद्दल तीव्र अशा शंका-कुशंकांचा तसंच सोशल मीडिया उन्मादाचा सामना करावा लागला आहे. कॅथरीन यांनी ख्रिसमसपासून कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही.

व्हीडिओ स्टेटमेंटमध्ये त्यांनी कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सांगितलं की, "विल्यम माझ्यासोबत असणे अत्यंत आश्वासक आणि दिलासादायक गोष्ट आहे.

"तुमच्यापैकी अनेकांनी दाखवलेलं प्रेम, पाठिंबा आणि दयाळूपणा हे आमच्या दोघांसाठी खूप काही आहे."

बीबीसी न्यूजनं एका निवेदनात म्हटलंय की, "इतर माध्यमांसह बीबीसी न्यूजला केन्सिंग्टन पॅलेसनं आज दुपारी या घोषणेबद्दल माहिती दिली."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शुक्रवारी म्हटलं की, “कॅथरीन यांनी त्यांच्या स्टेटमेंटमधून प्रचंड शौर्य दाखवलं आहे आणि त्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे.”

सुनक पुढे म्हणाले, "अलीकडच्या काही आठवड्यांत जगभरातील आणि सोशल मीडियावरच्या काही घटकांनी त्यांना अन्यायकारक वागणूक दिली आहे.

"जेव्हा आरोग्याच्या बाबींचा विचार केला जातो, तेव्हा इतर सर्वांप्रमाणे तिला तिच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तिच्या प्रेमळ कुटुंबासोबत राहण्यासाठी गोपनीयता दिली पाहिजे."

लेबर पक्षाचे नेते सर कीर स्टारमर म्हणाले की, कॅथरीन यांचे आशावादी स्वर काळजाला हात घालणारे आहेत.

ते म्हणाले, "कर्करोगाचे कोणतेही निदान धक्कादायक असते. पण अलीकडच्या आठवड्यात आम्ही पाहिलेल्या भयानक अनुमानांच्या दरम्यान ही बातमी मिळाल्यानं वाढलेल्या तणावाची मी फक्त कल्पना करू शकतो."

"विल्यम आणि कॅथरीन गोपनीयतेचे हक्कदार आहेत आणि कोणत्याही पालकांप्रमाणे, त्यांनी आपल्या मुलांना याची माहिती सांगण्यासाठी योग्य क्षण निवडण्याची वाट पाहिली असेल," असंही ते म्हणाले.

राजकुमारी कॅथरीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजकुमारी कॅथरीन

कॅच अप विथ कॅन्सर मोहिमेचे संस्थापक आणि प्राध्यापक पॅट प्राइस यांनी ‘खूप मोकळेपणाने आणि स्पष्टपणे’ बोलल्याबद्दल राजकुमारीचं कौतुक केलं आहे.

"किंग चार्ल्स यांच्या निदानाप्रमाणेच तिनं असं केल्यानं निःसंशयपणे अनेक लोक स्वतःची तपासणी करून घेण्यास प्रवृत्त होतील आणि कर्करोगाने बाधित इतरांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलण्यास अधिक आत्मविश्वास मिळेल.

"राजकुमारीची ही घोषणा म्हणजे कॅन्सर वय किवा सोशल स्टेटस पाहून होत नाही, याबाबतचा आपल्या सगळ्यांसाठीचा एक अलार्म आहे."

(जेम्मा क्रू यांनी दिलेल्या अतिरिक्त इनपुटसह)