You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टायटॅनिक पाहायला निघालेल्या पाणबुडीत अडकलेले पाकिस्तानी अब्जाधीश दाऊद पितापुत्र कोण आहेत?
- Author, गॅरेथ इव्हान्स आणि लारा गुज्जी
- Role, बीबीसी न्यूज
अटलांटिक समुद्रात बुडालेलं टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन नामक पाणबुडी रविवारपासून (18 जून) बेपत्ता आहे. या पाणबुडीचा सध्या कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
त्यातही या पाणबुडीमध्ये बसलेल्या व्यक्तींची नावे पाहिल्यानंतर या प्रकरणाला मोठं वलय प्राप्त झाल्याचं दिसून येतं.
या पाणबुडीत स्वार झालेल्या पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट, तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश आहे.
8 दिवसांच्या या मोहिमेसाठीच्या तिकीटाची किंमत अडीच लाख डॉलर म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या टूरमध्ये टायटॅनिक जहाजाचे अवशेष समुद्रात 3800 मीटर खाली जाऊन पाहिले जातात.
युएस कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, रविवारी हा प्रवास सुरू झाल्यानंतर 1 तास 45 मिनिटांनी पाणबुडीचा संपर्क तुटला. त्यानंतर पाणबुडीच्या शोधमोहिमेसाठी एक सी-130 विमान पाठवण्यात आलं. तसंच सोनार यंत्रणेचीही मदत घेण्यात येत आहे.
या पाणबुडीत तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजन असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
युएस कोस्ट गार्डचे रिअर एडमिरल जॉन मॅगर यांनी म्हटलं, “ही शोधमोहीम पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे केवळ 70 ते 96 तासांचा वेळ उरला आहे. जिथे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, तो परिसर अतिशय दुर्गम आहे. त्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.”
शहजादा दाऊद कोण आहेत?
शहजादा दाऊद हे पाकिस्तानातील एका प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील सदस्य आहेत. ते ब्रिटनमध्ये प्रिन्स ट्रस्ट चॅरिटी बोर्डाचे सदस्यही आहेत.
पाणबुडीमध्ये शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद दोघेही स्वार झाले होते.
दाऊद 48 वर्षांचे आहेत आणि त्याचा मुलगा 19 वर्षांचा आहे.
पाकिस्तानी वंशाचे असलेले शहजादा दाऊद सध्या ब्रिटनमध्ये राहतात. त्यांचं कुटुंब ब्रिटनच्या सरे भागात राहतं.
दाऊद यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, “शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान यांच्या संपर्क तुटल्यानंतर त्यांच्याविषयी जास्त काही माहिती मिळू शकली नाही. सध्या तरी पाणबुडीशी पुन्हा संपर्क साधण्याचा आणि त्यांना सुरक्षितपणे परत घेऊन येण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक सरकारी संस्था आणि खोल समुद्रात शोधमोहिमा राबवणाऱ्या कंपन्यांची यासाठी मदत घेण्यात येत आहे.”
दाऊद परिवार हा पाकिस्तानातील धनाढ्य कुटुंबांपैकी एक आहे. पण ब्रिटनशी त्यांचं जवळचं नातं आहे.
शहजादा दाऊद हे अग्रो कॉर्पोरेशन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. ही कंपनी खते, अन्नधान्य आणि ऊर्जा क्षेत्रात काम करते.
ब्रिटिश माध्यमांच्या माहितीनुसार, शहजादा दाऊद यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण पुढे ते युकेत स्थायिक झाले.
तिथे त्यांनी बकिंगहॅम युनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेतलं. यानंतर फिलाडेल्फिया विद्यापीठातून ग्लोबल टेक्सटाईल मार्केटिंग विषयात एमएससी केलं.
शहजादा दाऊद हे ‘सेटी’ नामक अंतराळ संशोधन कंपनीचे ट्रस्टीही आहेत. त्यांच्याशी संबंधित काही माहिती या संस्थेच्या वेबसाईटवरही आहे.
शहजादा दाऊद हे आपली पत्नी क्रिस्टिन आणि मुले सुलेमान आणि अलिना यांच्यासोबत ब्रिटनमध्ये राहतात. त्यांना फोटोग्राफी करण्याचा छंद आहे. तसंच त्यांना भूतदयेसाठीही ओळखलं जातं.
शहदाजा दाऊद हे हेराक्लिज कॉर्पोरेशन कंपनीचेही व्हाईस चेअरमन आहेत.
शहजादा हे 1996 मध्ये आपल्या कौटुंबिक व्यवसायात उतरले. पाकिस्तानच्या औद्योगिक क्षेत्रातील आधुनिकीकरण यामध्ये त्यांना तज्ज्ञ मानलं जातं.
हेराक्लिज कॉर्पोरेशन कंपनी ही विविध कंपन्यांचं व्यवस्थापनाचं काम पाहते.
शहजादा हे ऊर्जा, कृषि, खाद्य, पेट्रोकेमिकल्स आणि कपड्यांच्या व्यवसायात आधुनिकीकरणाचं काम पाहत असतात.
तसंच शहजादा हे अग्रो कॉर्पोरेशन लिमिटेड आणि दाऊद लॉरेन्सपूर लिमिटेड कंपनीत शेअरहोल्डिंग संचालकही आहेत.
शोधमोहीम कुठेपर्यंत?
अटलांटिक महासागरात बेपत्ता झालेल्या पाणबुडीचा शोध सोमवारपासून सुरू झाला. पण अजूनपर्यंत त्याचा पत्ता लागू शकलेला नाही.
सध्या या अभियानाला वेग देण्यात आलेला आहे. कारण पाणबुडीतील ऑक्सिजनचा साठा लवकरच संपण्याचा अंदाज आहे.
ही मोहीम अमेरिकेसह कॅनडाची नौसेना आणि इतर कंपन्यांच्या मदतीने सुरू आहे.
पाणबुडीची टूर आयोजित करणाऱ्या ओशनगेट कंपनीने म्हटलं की पाणबुडीतील प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले जात आहेत.
या मोहिमेत दोन लष्करी विमाने, एक सोनार आणि एक पाणबुडी तैनात करण्यात आली आहे.
युएस कोस्ट गार्डच्या मते, पोलर प्रिन्स नामक जहाजाने सोमवारी सायंकाळी पाणबुडीला पृष्ठभागावर पाहिलं होतं.
सीबीएसचे रिपोर्टर डेव्हिड पोग यांनी गेल्या वर्षी याच पाणबुडीतून प्रवास केला होता. ते म्हणतात, पाणबुडीशी संपर्क करण्याचा कोणताच मार्ग नाही. कारण रेडिओ किंवा जीपीएस पाण्याच्या आतमध्ये काम करत नाहीत.
आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणबुडीचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याकडे इतर कोणताच मार्ग उपलब्ध नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)