You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुष्मिता सेननं जेव्हा ऐश्वर्यासोबत स्पर्धा नको म्हणून 'मिस इंडिया'मधून माघार घेतली होती
अभिनेत्री सुष्मिता सेनच्या 'आर्या' सीरीजचा तिसरा सीझन आजपासून (3 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. डिझ्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आधीच्या दोन सीझनप्रमाणेच तिसरा सीझन पाहायला मिळणार आहे.
क्राईम थ्रिलर असलेल्या या सीरीजनं पहिल्या दोन सीझनमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 'आर्या'च्या तिसऱ्या सीझनमध्ये चार एपिसोड्स आहेत.
या सीरीजच्या पहिल्या सीझनवेळी अभिनेत्री सुष्मिता सेनच्या दमदार कमबॅकचं आणि तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं.
काही महिन्यांपूर्वी सुष्मिता सेनचे ललित मोदींसोबतचे फोटो प्रसिद्ध झाले होते. या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या.
चित्रपट असो की वैयक्तिक नातेसंबंध सुष्मिता अनेकदा तिच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिली होती.
सुष्मिताचा मिस इंडिया, मिस युनिव्हर्स ते बॉलिवूड अभिनेत्री हा सगळा प्रवास कसा होता?
'मिस इंडिया'साठी अशी झाली विचारणा
कडक शिस्तीच्या बंगाली वातावरणात वाढलेली सुष्मिता ग्लॅमरच्या दुनियेत अपघातानेच आली.
आपल्या मुलीनं आयएएस बनावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्याच दृष्टिनं ते तिला वाढवत होते. पॉकेटमनीही अगदी मोजून मिळायचा. त्यावेळी टीन एजर सुष्मितानं पॉकेटमनीसाठी उन्हाळ्याच्या सुटीत सेल्स गर्ल म्हणूनही काम केलं. त्यावेळीही तिला अनेक जण तू मॉडेलिंग का करत नाहीस, असं विचारायचे.
पण तिनं ते फारसं मनावर घेतलं नाही.
एकदा ती मित्र-मैत्रिणींसोबत नाइट क्लबमध्ये गेली होती. वडिलांना मात्र मी मैत्रिणीकडे अभ्यासाला जातीये, असं सांगितलं होतं.
तिथे एक गृहस्थ तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला म्हटलं की, तू 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी व्हायला हवंस.
तिचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. पण त्यांनी तिला स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड देऊन भेटायला बोलावलं. ते टाइम्स ऑफ इंडियाचे रंजन बक्षी होते.
आता हे सगळं घरी, वडिलांना कसं सांगायचं हा प्रश्न होता. सुष्मितानं घाबरत घाबरत आईला सांगितलं... तेव्हा आईची प्रतिक्रिया होती, 'तू हे करायला हवंस.'
आईच्या प्रोत्साहनामुळे सुष्मितानं 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
ऐश्वर्यासोबत स्पर्धा नको म्हणून मागे घेतलं होतं नाव
1994 साली सुष्मिताने मिस इंडिया स्पर्धेसाठी फॉर्म भरला होता. त्याच वर्षी ऐश्वर्या राय हीसुद्धा स्पर्धेत सहभागी झाली होती. ऐश्वर्या या सौंदर्यस्पर्धेत येण्याआधी काही जाहिरातींमध्ये झळकली होती आणि मॉडेलिंग विश्वात तिच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
त्यावेळी केवळ ऐश्वर्या सहभागी होतीये म्हणून 25 मुलींनी आपलं नाव मागे घेतलं होतं. सुष्मितालाही जेव्हा हे कळल तेव्हा तिने पण आयोजकांना माझा फॉर्म परत करा, मलाही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं म्हटलं होतं.
हा सगळा किस्सा स्वतः सुष्मिता सेनने दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्या जीना इसी का नाम है या कार्यक्रमात सांगितला होता.
"ऐश्वर्या कमालीची सुंदर आहे आणि सगळ्यांनाच हे माहीत आहे. त्यामुळे मला वाटलं आपण तिच्यासोबत सहभागी व्हायला नको. मी घरी आल्यावर जेव्हा आईला हे सांगितलं. तेव्हा तिनं माझी चांगलीच खरडपट्टी काढली. माझ्या आईनं म्हटलं की, तू प्रयत्नसुद्धा न करता हार मानत आहेस. ऐश्वर्या जर जगातील सर्वांत सुंदर मुलगी आहे असं तुला वाटत असेल तर इतर कोणापेक्षाही तिच्याकडून पराभूत झालेलं काय वाईट? पण आधी तुझं सर्वोत्तम देऊन तर पाहा."
हा किस्सा आपण नंतर ऐश्वर्याला सांगितल्याचंही सुष्मितानं म्हटलं होतं.
आईनं समजावल्यानंतर सुष्मिता या स्पर्धेत केवळ सहभागीच झाली नाही तर ‘मिस इंडिया’चा किताबही तिनं पटकावला.
त्याच वर्षी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं आणि मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी ती पहिली भारतीय होती. त्याच वर्षी ऐश्वर्या राय ही मिस वर्ल्ड ठरली होती.
बॉलिवूडमध्ये पदार्पण
मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुष्मिता सेनसाठी बॉलिवूडचे दरवाजेही खुले झाले.
1996 साली विक्रम भट्टनं दिग्दर्शित केलेल्या दस्तक चित्रपटातून सुष्मितानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं मिस युनिव्हर्स ठरलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती, जिला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून त्रास दिला जात असतो. मुकुल देव आणि शरद कपूर हे दोघं चित्रपटाचे नायक होते. सुष्मिताचा हा बॉलिवूड डेब्यू बॉक्स ऑफिसवर मात्र यशस्वी ठरला नव्हता.
त्यानंतर तिने एका तमीळ चित्रपटात काम केलं.
1999 मध्ये ती डेव्हिड धवनच्या बिवी नंबर 1 सिनेमात झळकली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्याच वर्षी तिनं 'सिर्फ तुम'सारखा वेगळ्या धाटणीचा सिनेमाही केला.
सुष्मितानं आँखे, मैं हूँ ना, मैंने प्यार क्यूं किया, समय, मैं ऐसा ही हूं, तुमको भूला ना पायेंगे, फिलहाल सारख्या चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यातील काही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही ठरले. पण सुष्मिता स्वतंत्रपणे, केवळ आपल्या जीवावर चित्रपट यशस्वी करू शकणारी अभिनेत्री ठरली नाही.
2006 मध्ये सुष्मितानं दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांच्या 'चिंगारी' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. कल्पना लाजमी या प्रयोगशील आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखल्या जात. पण सुष्मिताचा हा प्रयोगही फारसा यशस्वी ठरला नाही.
2020 मध्ये सुष्मिता सेननं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. तिने डिस्ने प्लस हॉटस्टारवरील 'आर्या' या सीरिजमध्ये अपघातानं आपल्या नवऱ्याचं ड्रग्ज व्यवसायाचं साम्राज्य सांभाळावं लागलेल्या स्त्रीची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली.
आपल्या बॉलिवूडमधील करिअरबद्दल बोलताना एकदा सुष्मितानं म्हटलं होतं, "मी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा स्वतःलाच एक अट घातली होती. मी जेव्हा या इंडस्ट्रीतून बाहेर पडेन, तेव्हा स्वतःची एक जागा बनवून जाईन. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा माझी स्वतःची ही इंडस्ट्री सोडण्याची तयारी झाली असेल, तेव्हाच मी जाईन. त्याआधी नाही."
मुलींना दत्तक घेण्यासाठी कायदेशीर लढाई
सुष्मिता ही दोन मुलींची आई आहे. ती सिंगल मदर आहे. रिनी आणि अलिसा या दोन मुलींना तिने दत्तक घेतलं आहे.
पण अविवाहित असताना, वयाच्या विशीत मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे सुष्मितासाठी तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला कायदेशीर लढाईही लढावी लागली होती.
काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना हिच्या 'द आयकॉन्स' या कार्यक्रमात बोलताना सुष्मितानं हा सगळा प्रवास सांगितला होता.
वयाच्या 19 व्या वर्षी मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिता एका अॅडॉप्शन सेंटरमध्ये गेली होती. तिथे गेल्यावर आपण इथे केवळ फोटोसेशन करतोय ही गोष्ट तिला खटकली. त्यावेळी तिच्या मनात मुल दत्तक घेण्याचा विचार आला.
वयाच्या 21 व्या वर्षी सुष्मितानं मुलगी दत्तक घेण्यासाठी अर्ज केला होता. कोर्टात ते प्रकरण सुनावणीला यायलाही तीन वर्षं लागली.
जजने तिला म्हटलं, " जर आज मी या ऑर्डरवर सही केली आणि तू ही जबाबदारी नीट पार पाडली नाहीस, तर जे परिणाम होतील त्याला दोन लोक उत्तरदायी असतील- तू आणि मी."
पण सुष्मिताला मुलीला दत्तक घेता आलं. या मुलीचं नाव रिनी.... सुष्मिताची ही थोरली लेक सध्या अभिनय क्षेत्रातच पाय रोवू पाहत आहे. सुट्टाबाज ही तिची शॉर्ट फिल्म काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती.
रिनीला दत्तक घेतल्यानंतर काही वर्षांनी सुष्मिताने दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं. यावेळी तिचा संघर्ष वेगळा होता.
मूल दत्तक घेण्याच्या नियमांनुसार जर तुम्ही एकाच लिंगाची दोन मुलं दत्तक घेता येत नव्हती. म्हणजे जर आधी मुलगी दत्तक घेतली असेल, तर दुसरा मुलगा दत्तक घ्यायला हवा.
दत्तक घेण्याचा विचार करणाऱ्या इतर पालकांसोबत सुष्मितानं या नियमाविरुद्ध एक कायदेशीर लढाई लढली. दहा वर्षांचा हा संघर्ष होता.
ज्यावेळी या संदर्भात उच्च न्यायालयाचा नवीन नियम आला, त्यानंतर तीन महिन्यांनी मुलीला दत्तक घेण्यासाठी सुष्मितानं अर्ज केला आणि अलिसा तिच्या आयुष्यात आली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)