You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग, उपचारांना सुरुवात
- Author, शॉन कफ़लान
- Role, राजघराण्याचे प्रतिनिधी
किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
प्रोस्टेट ग्रंथीसंदर्भातील तक्रारीसाठी तपासणी करताना त्यांना कर्करोग असल्याचे समजले. अर्थात, त्यांचा कर्करोग प्रोस्टेटशी संबंधित नाही.
त्यांना कोणता कर्करोग आहे आणि शरीरातल्या कोणत्या भागात आहे याची स्पष्ट माहिती दिलेली नाही, मात्र त्यांच्यावर कर्करोगावर केले जाणारे उपचार सुरू आहेत असं सांगितलं गेलं आहे.
किंग चार्ल्स तृतीय यांची तब्येत कशी आहे?
राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी किंग चार्ल्स 'पूर्णपणे सकारात्मक' असून 'ते लवकरच आपलं राजकीय काम पुन्हा सुरू करतील' असं म्हटलं आहे.
आता ते काही काळासाठी राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहातील. त्यांच्या जागी राजघराण्यातील इतर ज्येष्ठ सदस्य त्यांचं कर्तव्य पूर्ण करतील, असं सांगण्यात आलं आहे.
त्यांना या आजाराच्या सध्याच्या स्थितीतून बरं व्हायला किती वेळ लागेल याची माहिती जाहीर केलेली नाही.
ते 75 वर्षांचे असून ते रुग्णालयात दाखल झालेले नाहीत. त्यांच्यावर 'आऊटडोअर पेशंट' म्हणूनच उपचार सुरू आहेत.
राजकीय कामकाज करत राहातील
या काळात ते आपलं राजकीय कामकाज करत राहातील. यात कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करणे तसेच राजवाड्यात लहान खासगी बैठकांत सहभागी होणं अशी कामं आहेत.
किंग चार्ल्स यांनी आपल्या प्रोस्टेटसंदर्भातील उपचारांची माहिती जाणूनबुजून जाहीर केली, कारण यामुळे जागरुकता वाढेल, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
या आजाराची माहिती किंग चार्ल्स यांनी स्वतः आपले दोन्ही पुत्र प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम्स यांना दिली आहे.
प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम्स सतत त्यांचा संपर्कात आहेत असं सांगण्य़ात येत आहे.
ड्युक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी अमेरिकेत राहातात. ते आपल्या वडिलांना भेटण्यासाठी येत्या काही काळात ब्रिटनमध्ये येतील असं त्यांनी सांगितलं आहे.
किंग चार्ल्स हे सोमवार 5 फेब्रुवारी रोजी नॉफॉकमधून लंडनला आहे. बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार चार्ल्स यांच्यावर आऊटपेशंठ रुपात उपचार होतील म्हणजे ते रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार नाहीत.
जर लोकांपासून दूर राहाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला नाही तर ते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी दर आठवड्याला होणारी भेट सुरू ठेवतील.
ऋषी सुनक यांनी किंग चार्ल्स यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या असून, किंग चार्ल्स पूर्ण तंदुरुस्त होऊन लवकरच परत रुजू होतील आणि सगळा देश त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहे, हे मला माहिती आहे. असं त्यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे.
किंग चार्ल्स यांच्यावर प्रतिक्रिया
जर किंग चार्ल्स आपल्या कामकाजाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ असले तर त्यासाठी घटनेत व्यवस्था आहे. अशा स्थितीत त्यांच्या जागी काँँन्सिलर्स ऑफ स्टेटला ही जबाबदारी दिली जाते.
सध्या यात क्विन कॅमिला, प्रिन्स विल्यम्स, प्रिन्सेस रॉयल आणि प्रिन्स एडवर्ड आहेत.
किंग चार्ल्स यांचे माजी सल्लागार ज्युलियन पेन बीबीसीला म्हणाले., लोकांना भेटता येणार नाही या कल्पनेमुळे राजे अतिशय निराश झाले असणार.
ब्रिटनमधील वर्तमानपत्रांत किंग चार्ल्स यांना कॅन्सर असल्याची बातमी पहिल्या पानांवर आहे.
राजेशाहीला विरोध करणाऱ्या रिपब्लिक समुहानेही त्यांना बरं वाटावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. हा समूह किंग चार्ल्स यांच्यावर टीका करत आला आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथन अल्बानिज यांनीही किंग चार्ल्स यांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली असून ते लवकरच बकिंगहॅम पॅलेसला पत्र लिहिणार आहेत असं ते म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी किंग चार्ल्स य़ांना कर्करोग झाल्यावर एक पोस्ट लिहून त्यांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली. बायडन यांच्या मुलाचा वयाच्या 46 व्या वर्षी ब्रेन कॅन्सरने मृत्यू झाला होता.
बीबीसीचे मेडिकल एडिटर फरगस वाल्श यांच्यानुसार, ब्रिटनमध्ये दररोज 1000 लोकांना कर्करोग झाल्याचं समजतं. कर्करोग होण्याचं एक मुख्य कारण (वाढतं) वयही असतं.