You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलींना 6 व्या वर्षीच मासिक पाळी? डॉक्टर काय म्हणाले?
- Author, दिपाली जगताप, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
“माझ्या सहा वर्षांच्या मुलीमध्ये अनेक बदल दिसत होते. ती सतत चिडचिड करू लागली होती. एवढ्या कमी वयात हे शारीरिक बदल पाहून मलाही भीती वाटू लागली.” साताऱ्यातल्या एका गावात राहणाऱ्या अर्चना (नाव बदललं आहे) सांगतात.
अर्चना यांचे पती शेतकरी आहेत. शेतातल्याच एका छोट्या घरात त्यांचं चौघांचं कुटुंब राहतं. पती, पत्नी आणि दोन मुलं - एक मुलगा आणि एक मुलगी.
त्यातली मुलगी थोरली. ती सहा वर्षांची असतानाच तिच्या वयापेक्षा खूप मोठी दिसू लागली. तेव्हा तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं त्यांनी ठरवलं.
दिल्लीत राहणाऱ्या राशी यांनाही त्यांच्या मुलीमध्ये अनेक शारीरिक बदल दिसत होते. पण त्यांना ते नैसर्गिकच वाटत होते.
त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीचं वजन 40 किलो होतं. ती ‘हेल्दी चाइल्ड’ असल्याचं त्यांना वाटायचं.
पण एक दिवस अचानक त्यांची मुलगी रक्त येत असल्याची तक्रार करू लागली. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर तिची मासिक पाळी सुरू झाली असल्याचं लक्षात आलं.
“आमच्यासाठी हे स्वीकारणं फार अवघड होतं”
“आमच्यासाठी हे स्वीकारणं फार अवघड होतं. तिच्यासोबत नेमकं काय होतंय हे माझ्या मुलीला समजतंही नव्हतं,” राशी सांगतात.
अर्चना यांनाही स्थानिक डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवण्याचा सल्ला दिला. “अर्चना त्यांच्या मुलीला घेऊन आमच्याकडे आल्या तेव्हा तपासणीनंतर त्यांच्या मुलीत पौगंडावस्थेची सगळी लक्षणं दिसत होती. तिचं शरीर 14-15 वर्षांच्या मुलीसारखं होतं आणि तिची मासिक पाळीही सुरू झाली होती,” पुण्याच्या मदरहुड हॉस्पिटलमधले डॉ. सुशील गरुड सांगतात.
मुलीच्या शरीरातले हार्मोन्स तिच्या वयापेक्षा तीनपटीने जास्त होते. असं होण्याची अनेक कारणं असू शकतात.
“त्यांच्या घरी कीटकनाशकांचे पाच-पाच किलोचे दोन कंटेनर असतात असं अर्चना यांनी सांगितलं. ही मुलगी त्याच्या आसपास खेळत असायची. मुलीमध्ये हार्मोनल बदल होण्यामागचं हे महत्त्वाचं कारण असू शकतं,” डॉ. गरूड सांगतात.
वेळेच्या आधी लहान मुलांच्या शरीरात बदल होण्याला वैद्यकीय भाषेत 'प्रिकॉशिअस' किंवा 'अर्ली प्युबर्टी' असं म्हटलं जातं.
प्युबर्टी म्हणजे पौगंडावस्था. यात बालपण जाऊन मुलं किशोरवयात प्रवेश करतात.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 'प्युबर्टी' ही मुलांच्या आणि मुलींच्या शरीरात बदल घडवणारी प्रक्रिया आहे. यात त्याचे लैंगिक अवयव विकसित होतात आणि प्रजननासाठी सक्षम होण्यासाठीची तयारी सुरू होते.
मुलींमध्ये पौगंडावस्था 8 ते 13 या वयात तर मुलांमध्ये 9 ते 14 या वयात सुरू होते.
मुलींमध्ये मुलांच्या तुलनेत पौगंडावस्था लवकर येते. पण वैद्यकीय पुस्तकात दिलेल्या वयाच्याही आधी पौगंडावस्था सुरू झाली तर त्याला 'प्रीकॉशिअस प्युबर्टी' म्हटलं जातं असं स्रीरोग तज्ज्ञ डॉ. एसएन बसू सांगतात.
“मुलींच्या शरीरात बदल दिसू लागल्यानंतर 18 महिने ते तीन वर्षांच्या आत मासिक पाळी येणं सुरू होतं असं काही वर्षांपूर्वींपर्यंत दिसत होतं,” डॉ. वैशाखी रस्तोगी सांगतात. त्या बालरोगतज्ज्ञ आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट (म्हणजे हार्मोन्सच्या आजारांवर उपचार देणाऱ्या डॉक्टर) आहेत.
आता मुलींना शरीरात बदल दिसू लागल्यानंतर तीन ते चार महिन्यातच पाळी सुरू होते असं त्यांचं निरीक्षण आहे.
“तसंच, मुलांमध्येही आता पौगंडावस्था सुरू झाल्यानंतर एक ते दीड वर्षांत दाढी, मिशा फुटायला सुरूवात होते. पुर्वी त्यासाठी जवळपास चार वर्षांचा काळ लागत होता,” डॉ. रस्तोगी सांगतात.
अर्चना आणि राशी दोघींच्याही मुलींवर सध्या उपचार सुरू आहेत.
कीटकनाशकांमुळे काय होतं?
एनसीबीआयवर दिलेल्या माहितीनुसार, पौगंडावस्था मुलांच्या शरीरासोबत भावनात्मक बदलही दिसतात. या सगळ्या बदलांमुळे मुलांना ताणतणावही जाणवत असतो.
वयाच्या आधीच पौगंडावस्था येण्याऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं महाराष्ट्रातल्या इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मधल्या चाइल्ड हेल्थ रिसर्च विभागातल्या डॉक्टर सुचित्रा सुर्वे यांनी केलेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे.
आयसीएमआर एनआरआरसीएचकडून केल्या गेलेल्या या अभ्यासात 2000 मुलींसोबत संशोधन करण्यात आलं होतं. मुलींच्या आयांना अनेकदा पौगंडावस्थेची लक्षणं समजतच नाहीत असं या अभ्यासात समोर आलं. मुलींमध्ये वेळेआधीच पौगंडावस्था येण्यामागे अनेक कारणं असू शकतात असं हा अभ्यास सांगतो.
सध्या या संस्थेकडून 9 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींमध्ये येणाऱ्या पौगंडावस्थेमागची कारणं आणि त्यामुळे उद्भवणारे धोके यावर अभ्यास करत आहे.
अर्चनाच्या मुलीसारखं कीटकनाशकांच्या सतत संपर्कात असणं हेही एक कारण असू शकतं असं या विषयावर काम करणाऱ्या मुंबईच्या डॉ. प्रशांत पाटील यांचं म्हणणं आहे.
विषारी कीटकनाशकांनी हार्मोन्स बदलतात आणि त्यामुळे प्रीकॉशिअस प्युबर्टी येऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे फार दुर्लभ आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे हेही कीटकनाशकांबद्दल माहिती दिली.
"पिकं वाचवण्यासाठी अनेक कीटकनाशकांचा वापर केला जातो. ही कीटकनाशकं तोंडातून आणि नाकातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. अनेकदा अन्नातून ती पोटात जातात. त्याचा परिणाम हार्मोन्स नियंत्रित करणाऱ्या मेंदूतल्या ग्रंथींवर होतो," असं डॉ. भोंडवे सांगतात.
याशिवाय, भाज्या लवकर वाढाव्या यासाठी आणि गाई आणि म्हशीच्या दूधाचं उत्पादन वाढवण्यासाठीही हार्मोन्सचा वापर केला जातो. त्याचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
इतर अनेक कारणं
प्रीकॉशिअस प्युबर्टीची इतर अनेक कारणं असू शकतात. त्यावर अजून संशोधन सुरू असल्याने आत्ता कोणत्याही एकाच कारणावर बोट ठेवता येणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
आयसीएमआरसोबत मुंबईमधल्या बी.जे. वाडिया हॉस्पिटलने 2020 मध्ये अर्ली प्युबर्टी मोहिमेचं आयोजन केलं होतं. त्यात सहा ते नऊ वर्षांच्या मुलींसाठी एक शिबिर भरवण्यात आलं होतं.
“या शिबिरात आलेल्यांपैकी 60 मुलींनी पौगंडावस्थेत प्रवेश केला होता. काहींची तर मासिक पाळीही सुरू झाली होती,” हॉस्पिटलच्या बालचिकित्सा विभागात काम करणाऱ्या डॉ. सुधा राऊ सांगतात.
वजन जास्त असलेल्या मुलींमध्येही प्रीकॉशिअस प्युबर्टी दिसते असं त्या संगतात. कोव्हिड 19 साथरोगादरम्यान आणि त्यानंतर मुलींमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतंय.
स्क्रिनचा अतिवापर नको
स्थूलतेसोबतच मोबाईल, टीव्ही किंवा स्क्रिनचा अतिवापर करणं, व्यायाम न करणं हेही पौगंडावस्था लवकर येण्यामागची कारणं असू शकतात.
गेल्या दोन तीन वर्षांत त्यांच्या ओपीडीत मासिक पाळी लवकर आलेल्या रोज पात ते सहा मुली येतात, असं डॉ. वैशाखी सांगतात. “एप्रिलमध्ये बदल दिसू लागले आणि जून जुलैमध्ये लगेच मुलीची मासिक पाळी सुरू झाली असं सांगणाऱ्या आयाही माझ्याकडे येतात. आता मुलांमध्येही हेच दिसू लागलं आहे.”
स्क्रिन टाइम जास्त असल्यानेही अप्रत्यक्षपणे पौगंडावस्थेवर परिणाम होत असतो.
“मेंदूतलं मेलाटोनिन हे हार्मोन आपल्याला झोप येण्यासाठी मदत करतं. पण स्क्रिन टाइम वाढला तर झोपचं वेळापत्रक बिघडतं. स्क्रिनमधून येणारा प्रकाश हे संतुलन बिघडवतो. हे मेलाटोनिन आपले लैंगिक हार्मोन्स दाबून टाकायलाही मदत करत असतो. त्याचं संतुलन बिघडलं तर लैंगिक हार्मोन्स लवकर स्रवायला सुरूवात होते,” असं त्या म्हणाल्या.
तसंच, सॅनिटायझरमध्ये असणारे केमिकल्सही त्वचेतून रक्तामार्फत पसरतात आणि आपल्या हार्मोन्सवर परिणाम करत असतात.
कीटकनाशकं, खाण्यात प्रिझर्व्हेटिव्हजचं वाढलेलं प्रमाण, प्रदुषण, स्थूलता ही बाहेरची कारणं असतील.
तर शरीरात ट्युमर असणं किंवा अनुवंशिक आजारही शरीरातला सक्रेडियन रिदम म्हणजे शरीराचं दैनिक घड्याळ बिघडवून टाकतात, असं डॉ. एसएन बसू सांगतात.
पण या सगळ्या कारणांवर अजूनही संशोधन सुरू आहे. सध्या तरी फक्त 5 टक्क्यांपर्यंतच ही कारणं जबाबदार असू शकतात असं समोर आलंय.
अर्चना आणि राशी दोघींच्याही मुलींची मासिक पाळी योग्य वय येईपर्यंत थांबवण्यासाठी औषध आणि इंजेक्शन्स दिली जात आहेत.
मासिक पाळी सुरू असताना स्वतःची काळजी घेता येईल आणि स्वच्छता ठेवता येईल इतक्या या मुली शहाण्या नसतात. तसंच, पौगंडावस्था लवकर आली तर त्याने मुलींच्या मनावरही परिणाम होतो. आपण आसपासच्या मुलींपेक्षा वेगळे आहोत ही भावना बळावते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.