कीलाडी : 'हडप्पा, मोहंजोदडो सारखं प्राचीन शहर दक्षिण भारतातही', नव्या संशोधनातून समोर आले 'हे' पैलू

    • Author, चेरिलन मोलन
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, किलाडी, तामिळनाडू येथून रिर्पोटिंग

दक्षिण भारतात सापडलेल्या 2500 वर्षे जुन्या कवट्यांमधून चेहर्‍यांचं रहस्य उलगडलं जात आहे.

मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधक आणि लिव्हरपूलच्या तज्ज्ञांच्या साहाय्याने, इतिहासातील हे प्राचीन लोक शब्दशः नसले तरी आजच्या दृष्टीने पुन्हा जिवंत होताना दिसत आहेत.

हे शोध आपल्याला फक्त चेहर्‍यांचा अंदाज देत नाहीत, तर भारतीय उपखंडाच्या प्राचीन रहिवाशांची जीवनशैली आणि स्थलांतराची गोष्ट सांगतात.

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील एका विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत संशोधक 2500 वर्षे जुन्या दातावरून एनॅमल काढण्यासाठी छोटी ड्रिल वापरत आहेत.

मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधकांच्या मते, हा दात दोन मानवी कवट्यांपैकी एकाचा आहे.

या कवट्यांचा वापर त्यांनी डिजिटल पद्धतीनं चेहरे पुन्हा तयार करण्यासाठी केला. त्या परिसरातील सुरुवातीचे लोक कसे दिसत असतील ते त्यावरून समजू शकेल, असा त्यांचा प्रयत्न आहे.

या दोन्ही कवट्या पुरुषांच्या असून कोंडगाई येथे सापडल्या आहेत. हे एक प्राचीन समाधीस्थळ किंवा दफन स्थळ आहे.

हे ठिकाण किलाडीपासून सुमारे 4 किमी (2.5 मैल) अंतरावर आहे. किलाडी हे पुरातत्व स्थळ भारतातील राजकीय वादाचे कारण बनले आहे.

'दक्षिण भारतातही प्राचीन संस्कृती होती'

तामिळनाडू राज्याच्या पुरातत्व विभागाचे संशोधक म्हणतात की, किलाडी येथे 580 इसवी सन पूर्वीच्या शहरी संस्कृतीचा पुरावा सापडला आहे. हा शोध भारतीय उपखंडाच्या इतिहासात एक नवीन पैलू जोडतो.

सिंधू संस्कृती (इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन), जी आजच्या उत्तर आणि मध्य भारतात 5000 वर्षांपूर्वी उदयास आली, ही देशाची पहिली मोठी संस्कृती आहे. आतापर्यंत शहरी संस्कृतीच्या गोष्टी फक्त उत्तर भारतापुरत्या मर्यादित होत्या.

परंतु, तामिळनाडूतील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, किलाडीतील निष्कर्षांचा विचार करता, दक्षिण भारतातही प्राचीन स्वतंत्र संस्कृती अस्तित्वात होती, हे पहिल्यांदाच समोर आलं आहे.

किलाडीतील लोक साक्षर, अत्यंत कुशल होते आणि देशात आणि परदेशात व्यापारही करत होते, असं ते सांगतात. ते लोक विटांच्या घरात राहत आणि आपले मृतदेह मोठ्या समाधी कलशांत अन्नधान्य आणि भांडी यांसह पुरत असत.

पुरातत्वशास्त्रज्ञांनी आतापर्यंत या ठिकाणाहून असे सुमारे 50 कलशांचे उत्खनन केले आहे.

मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधक आता या समाधी कलशांमधून सापडलेल्या मानवी हाडांवरून आणि इतर वस्तूंवरून डीएनए काढत आहेत. त्यावरून किलाडीतील रहिवासी आणि त्यांची जीवनशैली कशी होती याचा सविस्तर अंदाज येईल.

पण असं दिसत आहे की, अजून गहन शोध सुरुच आहे.

'प्राचीन जागतिक स्थलांतराचे संकेत'

"आपल्या पूर्वजांविषयी आणि त्यांच्या स्थलांतराच्या मार्गांविषयी समजून घेण्याची आमची इच्छा आहे," असं विद्यापीठातील जनुकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जी. कुमारेसन म्हणतात.

"हा शोध मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकडे घेऊन जातो, 'आम्ही कोण आहोत आणि इथं कसं आलो?', असं ते म्हणाले.

2500 वर्ष जुन्या कवट्यांचे चेहरे पुन्हा तयार केल्याने असे काही संकेत सापडले आहेत, जे किमान या प्रश्नाचा एक भाग समजून घेण्यास मदत करू शकतात.

"या चेहऱ्यांमध्ये प्रामुख्याने प्राचीन दक्षिण भारतीय लोकांची वैशिष्ट्ये दिसतात. हे लोक भारतीय उपखंडातील पहिल्या रहिवाशांपैकी असल्याचा विश्वास आहे," असं प्रा. कुमारेसन म्हणतात.

या चेहऱ्यांमध्ये मध्यपूर्व युरेशियन आणि ऑस्ट्रो-एशियाटिक पूर्वजांचेही काही अंश दिसतात. ते जागतिक स्थलांतर आणि प्राचीन लोक यांच्या मिश्रणाचा संकेत देतात.

परंतु, प्रा. कुमारेसन म्हणतात की, किलाडीतील रहिवाशांच्या पूर्वजांविषयी नेमकं सांगण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.

कोंडगाईतील कवटीच्या चेहऱ्याची पुनर्बांधणी किंवा चेहरा पुन्हा तयार करण्याची प्रक्रिया मदुराई कामराज विद्यापीठातील संशोधकांनी कवट्यांचे थ्रीडी स्कॅन तयार करण्यापासून सुरू केली.

हे डिजिटल स्कॅन नंतर यूकेमधील लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील फेस लॅबकडे पाठवले गेले. फेस लॅब फॉरेन्सिक, कलात्मक आणि वैज्ञानिक तत्त्वे आणि तंत्रज्ञान वापरून डिजिटल कवटीचे (डिजिटल क्रॅनिओफेशियल) चेहरे तयार करण्यात वाकबगार आहे.

लॅबमधील तज्ज्ञांनी संगणकाच्या सॉफ्टवेअरचा वापर करून कवट्यांच्या स्कॅनवर स्नायू, मांस आणि त्वचा घालून त्यांच्या चेहऱ्याची रचना तयार केली. ही प्रक्रिया मानवी शरीररचना आणि मोजमापांनुसार केली गेली.

'जात, संस्कृती अन् वारसा यांच्याभोवतीचे भेद अधोरेखित'

मग मोठं आव्हान आलं, फोटोंमध्ये रंग भरणं.

यामुळं असे प्रश्न उभे राहिले की, पुरुषांची त्वचा कोणत्या रंगाची असावी, डोळ्यांचा रंग कोणता असावा आणि केस कसे दिसावेत?

प्रा. कुमारेसन म्हणतात की, सध्या तामिळनाडूत राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक वैशिष्ट्यांशी जुळणारे रंग वापरणे हे मानक पद्धतीनुसार केलं गेलं, परंतु डिजिटल चित्रांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू केली.

यामुळे भारतीय समाजातील जात, संस्कृती आणि वारसा यांच्याभोवती दीर्घकाळ सुरू असलेले भेद अधोरेखित झाले.

इतिहासात असं वर्णन केलं गेलं आहे की, आर्य लोक (सामान्यतः उत्तर भारतात राहणारे लोक) हे देशाचे 'मूळ नागरिक' आहेत, तर या संकल्पनेला दक्षिण भारतातील रहिवासी द्रविड लोकांचा (प्रामुख्याने दक्षिण भारतीय राज्यांमध्ये राहणारे) हक्क असल्याचे सांगणारे मतप्रवाहही आहे. या दोन मत प्रवाहांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

भारतामध्ये नेहमीच उत्तर-दक्षिण फरक दिसून येतो, ज्याचं मुख्य कारण लोकांमध्ये अशी समज आहे की, भारतीय संस्कृती- भाषा, संस्कृती आणि धर्म यांसह उत्तर भारतात उगम पावली आणि संपूर्ण देशावर तिनं परिणाम केला.

परंतु, प्रा. कुमारेसन म्हणतात की, किलाडीतील कवट्यांचे चेहरे अधिक गुंतागुंतीचा आणि सर्वसमावेशक असा संदेश देतात.

"आपण सर्वांनी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपण जितके समजतो त्यापेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आहोत, आणि याचा पुरावा आपल्या डीएनएमध्येच आहे," असं ते म्हणतात.

भारतातील संशोधकांनी प्राचीन कवट्यांमधून चेहरे पुन्हा तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही.

2019 मध्ये, शास्त्रज्ञांनी राखीगढी येथील एका स्मशानभूमीत सापडलेल्या दोन कवट्यांचे चेहरे पुन्हा तयार केले होते.

राखीगढी हे सिंधू संस्कृतीचे एक महत्त्वाचे स्थळ आहे. पण त्या स्केचेसमध्ये रंग आणि इतर शारीरिक वैशिष्ट्यांचा समावेश नव्हता.

"माणसांमध्ये चेहर्‍यांबद्दल एक विशेष आकर्षण असतं. चेहेरे ओळखण्याची आणि समजण्याची आपली क्षमता आपल्याला सामाजिक प्रजाती म्हणून यशस्वी बनवते," असं कॅरोलिन विल्किन्सन म्हणतात. त्यांनी किलाडीतील पुरुषांवर काम करणाऱ्या फेस लॅब टीमचे नेतृत्व केलं आहे.

"या चेहर्‍यांच्या चित्रांमुळे प्रेक्षकांना प्राचीन अवशेषांना फक्त वस्तू म्हणून नव्हे, तर माणसांप्रमाणे समजून घेण्यास मदत होते, आणि मोठ्या लोकसंख्येच्या इतिहासाऐवजी वैयक्तिक कथनाद्वारे त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त होते," असं त्या म्हणतात.

'किलाडीतील लोक साक्षर आणि व्यापारही करत'

मदुराई कामराज विद्यापीठात किलाडीचा अभ्यास सिंधू संस्कृतीप्रमाणे सखोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

"आत्तापर्यंत आम्हाला समजलं आहे की, किलाडीतील लोक शेती, व्यापार आणि पशुपालनात गुंतलेले होते. त्यांनी हरणं, मेंढी आणि जंगली डुक्कर पाळले आणि ते भरपूर तांदूळ आणि डाळी, कडधान्यं खात," असं प्रा. कुमारेसन म्हणतात.

"आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आम्हाला असा पुरावा सापडला आहे की, ते खजूरही खात होते. सध्या तामिळनाडूत खजूराची झाडं सर्वत्र आढळत नाहीत," असं ते पुढं म्हणाले.

पण त्यांच्या टीमसाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे कोंडगाईत सापडलेल्या मानवी सांगड्यांमधून पुरेसा डीएनए काढून जनुकीय ग्रंथालय (जीन लायब्ररी) तयार करणं.

कारण सांगाडे खूप खराब झालेले आहेत, त्यामुळे त्यातून मिळणारा डीएनए कमी आणि खराब दर्जाचा आहे. तरीही प्रा. कुमारेसन आशावादी आहेत की, या प्रयत्नांतून काही चांगले निष्पन्न होईल.

"प्राचीन डीएनए ग्रंथालयं म्हणजे भूतकाळात जाण्याचे दरवाजे आहेत, ते जीवन कसं होतं आणि आज आपण त्याला कसा अनुभवतो याबद्दल रोचक माहिती समोर आणू शकतात," असं ते सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.