भारताची लोकसंख्या: बेरोजगारीमुळे शहरांकडे स्थलांतर वाढलंय?

लोकसंख्या वाढ
फोटो कॅप्शन, भारत लवकरच जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल
    • Author, बार्बरा प्लेट अशर
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, मुंबईहून

भारतात मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर होऊ लागलंय. ग्रामीण भागातून शहराकडे होणारं हे स्थलांतर मानवी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्थलांतर आहे.

भारत आता चीनला मागे टाकून जगातला सर्वांत जास्त लोकसंख्येच्या देश बननण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे इथल्या लोकसंख्येची रचना आमुलाग्र बदलतेय.

संयुक्त राष्ट्रांच्या नव्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या या वर्षाच्या मध्यापर्यंत चीनला मागे टाकेल.

तज्ज्ञांच्या मते, भारतात तरुणांची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे भारताला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही भारतापुढे त्यांच्यासाठी पुरेशा नोकऱ्या निर्माण करण्याचं आव्हान असणार आहे.

आणि याचमुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर होत आहे. तरुणांना ग्रामीण भागात पुरेशा संधी नाहीत, पुरेसा पगार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून लाखोच्या संख्येने लोक शहरांमध्ये येत आहेत.

अलीकडेच मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांनी लाठीमार केला होता.

पोलिस दलात नोकरी मिळवण्यासाठी राज्यभरातून आलेले उमेदवार जीव ओतून प्रयत्न करतात. सरकारने पोलिस भरतीसाठी 8,000 जाहिराती काढल्या होत्या. मात्र 650,000 तरुणांनी अर्ज केले होते.

पोलिस दलात संधी मिळावी यासाठी सुनील बांबळे नावाचा तरुण जवळपास 200 किलोमीटर प्रवास करून मुंबईत आला होता. हा त्याचा तिसरा प्रयत्न होता.

सुनील सांगतो, "मला ही नोकरी मिळाली तर माझं आयुष्य बदलून जाईल कारण मला निश्चित उत्पन्न मिळेल. मला नोकरीची सुरक्षा मिळेल. आणि मी लग्न करू शकेन."

याच आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात तरुणांची आर्थिक चिंता नमूद करण्यात आली आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे, 63% भारतीयांना आर्थिक समस्यांची चिंता भेडसावते आहे.

सुनील बांबळे
फोटो कॅप्शन, सुनील बांबळे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून, जगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे. पण थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या मते, बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

भारतातील तरुण सॉफ्टवेअर आणि फायनान्स सारख्या उच्च श्रेणीतील सेवांमध्ये काम करण्यासाठी गरजेचं असणारं शिक्षण घेण्यात मागे आहेत. आणि त्यामुळे बेरोजगारीचा टक्का आणखी वाढतोय.

त्यामुळे पोलीस दलातील सरकारी नोकरी मिळवणं हे त्यांचं ध्येय असतं.

सुनील सांगतो, जर त्याला त्याच्या स्वप्नातली ही नोकरी मिळाली नाही तरी तो शहरातच राहील. कारण इथे रोजगारासाठी बरेच पर्याय आहेत, पण त्याहून अधिक त्रास आहे.

"मला गावापेक्षा इथे जास्त पैसे खर्च करावे लागतील, शहरात मला सुसह्य असं आयुष्य मिळणार नाही. पण तरीही मी इथेच राहण्यास तयार आहे."

असा जुगार नालासोपारा उपनगरातील अनेकांनी खेळलाय. मागच्या 20 वर्षांत मुंबईच्या या बाहेरील भागात राहणाऱ्या स्थलांतरितांमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कमी उत्पन्न असलेल्या या परिसरातील अरुंद गल्लीबोळात घरांच्या खिडक्यांमध्ये कपडे वाळत घातलेले दिसतात. दरवाजाच्या आजूबाजूला मुलं दिसतात.

काही अंधारलेल्या खोल्यांमध्ये स्त्रिया कॉइल आणि प्लॅस्टिक एकत्र फिरवून केसांच्या क्लिप बनवताना दिसतात. हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे.

प्लॅस्टिकच्या पिना बनवणाऱ्या महिला
फोटो कॅप्शन, प्लॅस्टिकच्या पिना बनवणाऱ्या महिला

33 वर्षीय रंजना विश्वकर्मा हसत हसत सांगतात, "मला जे हवं आहे ते मी स्वतः विकत घेऊ शकते. मला साडी हवी असेल किंवा माझ्या मुलाला आवश्यक असलेली एखादी गोष्ट मी विकत घेऊ शकते. यासाठी मला माझ्या पतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही."

तिचा मुलगा स्वयंपाकघराशेजारी असलेल्या एका खोलीत शांतपणे बसून अभ्यास करत होता. गेली 10 वर्षे ती हेच आयुष्य जगते आहे. पण तिला तिच्या मुलाचं भविष्य उज्वल दिसत आहे.

ती म्हणते, "तो शहरात शिक्षण घेतोय त्यामुळे तो काहीतरी करेल. आणि आयुष्यात नोकरी मिळवून पुढे जाण्यातच अर्थ आहे."

तिच्या शेजारी राहणारा विशाल दुबे हा देखील उत्तर प्रदेशचा आहे.

तो एका इंटरनेट कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो. 12 तास काम करून तो त्याच्या वडिलांना मदत करतो. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. त्याची आई आजारी असल्याने अर्धे पैसे तर दवाखान्याची बिलं भरण्यात जातात. त्याने नुकतंच हफ्त्यावर एक घर खरेदी करण्यासाठी नोंदणी केली.

त्याचीही स्वप्न छोटी आहेत, जी स्वप्न तो पूर्ण करतोय. पण तो स्वतःसाठी मोठी स्वप्न देखील बघतोय.

तो म्हणतो, "माझ्या गावातील लोकांना मदत करण्याएवढे पैसे मी एकदिवस नक्कीच कमाविन. माझं गाव श्रीमंत व्हावं असं मला वाटतं, जेणेकरून माझ्या गावातील लोकांना परप्रांतीय होऊन शहरात जावं लागणार नाही. जो संघर्ष मला करावा लागतोय तो त्यांच्या वाट्याला येऊ नये."

पण भारताचं वास्तव बघता हे एक स्वप्नच राहील. कारण एका अंदाजाप्रमाणे, या शतकाच्या मध्यापर्यंत किमान 800 दशलक्ष भारतीय शहरांमध्ये स्थलांतरित होतील. आणि ही संख्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक असेल.

देशातील गजबजलेल्या शहरांमध्ये लोक आपल्या आशा आणि निराशा यांचा ताळमेळ कसा राखतील हा देखील एक प्रश्नच आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)