You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्यूआर कोडसह येतंय नवीन पॅनकार्ड 2.0, जुन्या पॅनकार्डचं काय होणार?
- Author, विशाखा निकम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सध्या तुमच्या पर्समध्ये असलेलं पॅनकार्ड लवकरच जुनं होणार आहे, आणि त्या पॅनकार्डची जागा पॅनकार्ड 2.O घेणार आहे.
पॅन 2.O या प्रकल्पाला कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) कडून मंजुरी मिळाली आहे.
पण घाबरू नका या नव्या 2.0 पॅनकार्डसाठी तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा नाही, किंवा या अपग्रेडसाठी कुठेही अतिरिक्त पैसेही द्यावे लागणार नाही.
सरकारनं दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे जुनं पॅनकार्ड आहे त्यांना काहीही बदलण्याची गरज नाही. यासाठीची प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करावी लागणारे.
हे पॅन कार्ड 'कॉमन बिझनेस आयडेंटिफायर' म्हणूनही विकसित केलं जाईल, म्हणजेच तुम्ही हे पॅनकार्ड वेगवेगळ्या व्यवसायांसाठी ओळख क्रमांक म्हणूनही वापरू शकणार आहात.
अर्थ मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकानुसार, सध्याचं पॅनकार्ड हे पॅन 2.0 आल्यावरही वैध राहील. जुन्या पॅन धारकांना नवीन कार्डसाठी अनिवार्यपणे अर्ज करण्याची आवश्यकता नाही मात्र ते त्यांचं पॅन विनामूल्य अपग्रेड करू शकतील.
पॅन नंबर आणि बाकी सगळे तपशील हे जुन्या पॅनवर आहेत तेच राहतील. क्यूआर असलेलं पॅन हे नागरिकांना विनामूल्य मिळेल आणि ई-पॅन नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल.
प्रत्यक्ष प्लास्टिकच्या पॅनकार्डसाठी, अर्जदाराला 50 रुपये भरावे लागतील. तुम्ही भारताबाहेर राहात असाल तर तुम्हाला घरपोहोच कार्ड मिळेत मात्र त्यासाठी 5 रुपये अधिक पोस्टल शुल्क आकारलं जाईल.
यासाठी सरकारनं साधारण 1400 कोटी रुपये खर्च केलेत.
पॅन 2.0 मधील QR कोडमुळे तुमचं पॅनकार्ड अधिक सिक्युअर राहील. आणि कुणाला तुमचं बनावट पॅनकार्ड तयार करता येणार नाही. याशिवाय पॅनकार्ड व्हेरिफिकेशन करणंही सोपं जाईल.
QR कोड स्कॅन करून माहितीची थेट पडताळणी करता येणं शक्य झाल्यानं तुम्ही मोबाईल ॲप किंवा पोर्टलद्वारे ती स्कॅन करून लगेच माहिती मिळवू शकणार आहात.
क्यूआर कोडमध्ये नाव, जन्मतारीख, पॅन क्रमांक आणि इतर तपशील एनक्रिप्टेड स्वरूपात असतील, ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होईल.
पॅन 2.0 ची घोषणा करताना, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “पॅन कार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो मध्यमवर्गीय आणि लहान व्यवसायांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या अपग्रेडवर प्रचंड काम केलं गेलं आहे आणि आज पॅन 2.0 मंजूर झालं आहे."
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने शेअर केलेल्या माहितीनुसार, PAN 2.0 हे परमनंट अकाउंट नंबर (PAN) सिस्टीमचे सर्वसमावेशक अपग्रेड आहे.
"सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला बळकटी देत, हा उपक्रम PAN/TAN सेवांना पेपरलेस म्हणजेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करेल.
'कॉमन बिझनेस आयडेंटिफायर' म्हणजे काय?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, उद्योग आणि व्यावसायिक जगताकडून 'कॉमन बिझनेस आयडेंटिफायर' असण्याची मागणी होत आहे जेणेकरून व्यापाऱ्यांना व्यवसायाशी संबंधित कामांसाठी वेगवेगळे नंबर किंवा कार्ड ठेवावे लागणार नाहीत.
केंद्रीय मंत्री अश्विनी म्हणाले, "आम्ही हे समान ओळखपत्र म्हणून वापरता येईल का हे पाहण्याचाही प्रयत्न करणार आहोत. सध्याचं सॉफ्टवेअर 10-15 वर्षे जुनं असल्यानं त्यासाठी एक नवं पोर्टल तयार केलं जाईल. आणि सोबतच यासाठी नवं तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.