भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि चाहते संतापले; म्हणाले, 'आम्ही इतकेही सक्षम नाही की...'

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 14 सप्टेंबरला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावेळी, पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

आशिया चषक 2025 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यात रविवारी (14 सप्टेंबर) भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रूममध्ये परतले.

मे महिन्यात दोन्ही देशांदरम्यान झालेल्या लष्करी संघर्षानंतर, दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांमधील हा पहिलाच सामना होता.

सामना संपल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू पुढे सरसावले, पण तोपर्यंत भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले होते. टॉसच्या वेळीही सूर्यकुमार आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्यात 'हँडशेक' झाला नाही.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले, "सामन्यानंतर आम्ही हस्तांदोलन करण्यास तयार होतो. आमच्या विरोधी संघानं असं केलं नाही म्हणून आम्ही निराश झालो आहोत."

"आम्ही हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आलो होतो, पण तोपर्यंत ते ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले. सामन्याचा शेवट निराशाजनक ठरला. आम्ही आमच्या खेळावर आधीच निराश होतो, परंतु आम्ही हात मिळवण्यास तयार होतो."

मात्र, सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा प्रेझेंटेशनच्या वेळी तिथे पोहोचला नाही. तसेच तो पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला नाही.

पाकिस्ताननं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. ज्यासाठी तो ओळखला जातो, त्या गोलंदाजीतही पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही.

पाकिस्तान संघाच्या या कामगिरीवर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटूंकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सोशल मीडियावर अनेकांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही टीका केली.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू काय म्हणाले?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा सामना सुरू असताना एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेत सहभागी झाला.

सामन्याच्या शेवटी त्याची पहिली प्रतिक्रिया होती, "मी अवाक आहे. हे खूप हृदयद्रावक आहे आणि काय बोलावं हे मला समजत नाही. भारताला सलाम."

तो म्हणाला, "तुम्ही खूप चांगली कामगिरी केली, पण हा क्रिकेट सामना आहे, त्यात राजकारण आणू नये. हस्तांदोलन केलं पाहिजे. थोडा नम्रपणा दाखवावा लागेल. लढाया-भांडणं होत असतात. त्या घरातही होत असतात, परंतु हस्तांदोलन करायचं नाही, असा याचा अर्थ होत नाही."

मात्र, सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगा याच्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याच्या निर्णयाचं शोएब अख्तरनं "तो नाही गेला, चांगलं केलं. खुप छान", अशा शब्दांत समर्थन केलं आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाहिद आफ्रिदीनं क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवण्याचं आवाहन केलं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पाकिस्तान संघाबद्दल शोएब अख्तर म्हणाला, "आज फरक स्पष्टपणे दिसून येतो आहे की, जग उच्चप्रतीचं क्रिकेट खेळत आहे आणि आपण क्लब स्तरावरील क्रिकेटही खेळत नाही. टेक्निक नाही, सिंगल घेता येत नाही, आपल्याकडे फलंदाजीची गुणवत्ता नाही."

"तुमच्याकडे गोलंदाज नाहीत. सिंगल घेता येत नाही. सूर्यकुमार यादवनं अप्रतिम फलंदाजी केली, आपण त्याच्याकडून शिकलं पाहिजे. कट, स्वीप, कट, स्वीपनंतर चौका. अभिषेकला पहा मोठे फटके मारण्याचा परवाना मिळाला होता."

"बाकी तुम्ही म्हणता की, आम्ही चांगली फिरकी खेळली आहे, मग आपण सामना का हरलो? दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंडसारख्या संघांशी खेळू शकणारा आपला संघ नाही", असंही मत शोएब अख्तरनं व्यक्त केलं.

पाकिस्तानचा आणखी एक माजी क्रिकेटपटू कामरान अकमल यानं आणखी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं , "आम्ही इतकेही सक्षम नाही की, पहिल्या 5 किंवा 6 संघांसोबत खेळू. बांगलादेशसारख्या तळाच्या क्रमांकावर असलेल्या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला चांगलं वाटतं."

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेबद्दल शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानी चॅनेल समा टीव्हीवर म्हटलं , "क्रिकेटला क्रिकेटच राहू द्या. क्रिकेट जगभरात पाहिलं जातं आणि लोकांना ते आवडतं. खेळताना तुम्ही तुमच्या देशाचे दूत असता. क्रिकेट थांबायला नको."

इस्लामाबादमध्ये काय परिस्थिती होती?

सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी चाहत्यांमध्ये उत्साह होता, परंतु सामना संपताना निराशा स्पष्ट दिसत होती.

इस्लामाबादमध्ये उपस्थित असलेले बीबीसीचे वार्ताहर फरहत जावेद आणि फकीर मुनीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमची कामगिरी पाहून लोकांमध्ये नाराजी होती, तर दुसरीकडे काही लोक भारतीय संघाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करत होते.

सामन्याच्या प्रसारणासाठी पाकिस्तानमधील सर्व प्रमुख शहरांतील उद्यानं, रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी मोठे पडदे लावण्यात आले होते, जिथे लोक सामन्याचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमले होते.

हा सामना सर्वत्र मोठ्या पडद्यावर प्रसारित केला जात होता. उपस्थितांपैकी एकानं सांगितलं, "गेल्या वेळी जेव्हा पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला होता, तेव्हा मी आशा सोडली होती आणि मी अशा प्रकारे सामना पाहण्यासाठी येऊन एक वर्ष झालं आहे."

तिथं उपस्थित असलेल्या एका महिलेनं सांगितलं, "खेळ हा खेळ आहे, पण पाकिस्ताननं कशासाठी तरी संघर्ष केला पाहिजे. धावा चांगल्या असत्या, तर अधिक मजा आली असती. थोडा उत्साह वाढला असता. जिंकणं किंवा हरणं ही काही मोठी समस्या नव्हती."

प्रातिनिधिक फोटो
फोटो कॅप्शन, सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी चाहत्यांमध्ये उत्साह होता, परंतु सामना संपताना निराशा स्पष्ट दिसत होती.

हॉस्टेलमधून सामना पाहण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीनं सांगितलं, "आम्ही खूप उत्साही होतो. आम्ही हरायला नको होते."

पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे एक व्यक्ती अस्वस्थ दिसत होती, "सॅम अयुब तीन बळी घेत आहे. यावरून संघाची अव्यावसायिक शैली स्पष्ट होते. शाहीन शाह आफ्रिदीनं 3 षटकार मारले आहेत. म्हणजे जर गोलंदाज षटकार मारत असेल आणि फलंदाज विकेट घेत असेल, तर याचा अर्थ असा होतो की आम्ही योग्य लोकांना योग्य ठिकाणी ठेवलं नाही."

आणखी एका व्यक्तीनं म्हटलं, "मी बराच वेळ वाट पाहत होतो आणि बरीच कामं सोडली."

मात्र, काही लोक भारतीय खेळाडूंचं कौतुकही करत होते. एकानं म्हटलं, "मी भारताचा खूप मोठा चाहता आहे. विशेषत: विराट कोहली असेपर्यंत मी त्याचा खूप मोठा चाहता होतो. मी आजही माझ्या मित्रासोबत भारतासाठी पैज लावली होती. बाकी हृदय, तर पाकिस्तानीच आहे.

फरहत जावेद म्हणाला की, मे महिन्यात लष्करी तणावानंतर हा पहिला सामना होता. त्यामुळे क्रिकेट मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून परिस्थिती सामान्य होईल, अशी आशा अनेकांमध्ये होती.

पाकिस्तानी क्रिकेट चाहते काय म्हणाले?

आमिर अली नावाच्या एका क्रिकेट चाहत्यानं पीसीबीवर टीका केली आणि एक्सवर लिहिलं, "असं दिसतंय की पीसीबीची एकमेव कायमस्वरूपीची रणनीती म्हणजे अपमानित होण्याचं चक्र सुरू ठेवणं. ते खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये फेरबदल करू शकतात, परंतु अपमान सुरूच राहतो."

आणखी एका युजरनं एक्सवर लिहिलंय , "पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे शक्य आहे की, सलामीचा गोलंदाज त्याच्या संघाचा सर्वोत्तम फलंदाज सिद्ध झाला, तर सलामीवीर असलेला फलंदाज आपल्या संघाचा सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं सिद्ध झालं."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काही लोकांना 2021 च्या टी-20 वर्ल्डकप सामन्यानंतरचा तो क्षणही आठवला, जेव्हा मोहम्मद रिझवानला विराट कोहलीनं मिठी मारली होती.

सामना संपल्यानंतर हस्तांदोलन न करण्याबद्दल सादिक आफ्रिदी या व्यक्तीनं लिहिलंय, "भारतानं पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आणि त्यांच्या ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद केले. मी खेळात अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती."

पाकिस्तानी संघाच्या कामगिरीची तुलना करताना अनेक सोशल मीडिया युजर्सनी माजी कर्णधार बाबर आझमचीही आठवण काढली. बरेच लोक म्हणाले, "तुम्ही गेल्यानंतर मला तुमची आठवण येते आहे."

काही लोकांना 2021 च्या टी-20 वर्ल्ड सामन्यानंतरचा तो क्षणही आठवला, जेव्हा मोहम्मद रिझवानला विराट कोहलीनं मिठी मारली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)