भारतासमोर पाकिस्तानच्या हाराकिरीची 5 कारणं, असा मिळवला टीम इंडियानं विजय

फोटो स्रोत, ANI
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आशिया चषकातील दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 7 विकेट आणि 25 चेंडू राखून विजय मिळवला आहे.
या विजयासह भारतीय संघ आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
पहिल्या चेंडूपासून सामन्यावर वर्चस्व निर्माण करत भारतानं या सामन्यात अगदी एकहाती असा विजय मिळवला. गोलंदाजी असो वा फलंदाजी कोणत्याही बाबतीत भारतानं पाकिस्तानला डोकं वर काढू दिलं नाही.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर सामना खेळण्यासाठी अनेक स्तरांमधून विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, अशा प्रकारच्या मालिका एसीसी आणि आयसीसी आयोजित करत असल्यानं त्यातून माघार घेणं शक्य नसल्याचं सांगत भारतानं हा सामना खेळण्याची तयारी दाखवली होती.
पण सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानवरचा हा विजय भारतीय सैनिकांना समर्पित केल्याचं म्हटलं आहे. हा विजय भारतासाठी रिटर्न गिफ्ट असून, आम्ही अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
आशिया चषकात उतरलेले भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ प्रथमच दिग्गजांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरले होते. पण भारतीय संघानं त्यांची कमतरता जाणवू दिली नाही. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ अधिक आत्मविश्वासानं मैदानात उतरल्याचंही दिसून आलं.
पण आत्मविश्वासाबरोबरच भारतीय संघानं या सामन्यात अगदी सहज मिळवण्याची अनेक कारणं या सामन्यात दिसून आली. ती कारणं नेमकी कोणती हे पाहूयात.

कोणत्याही सामन्यात विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा ठरत असतो. त्यात सामना जर भारत-पाकिस्तान सारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार असेल तर त्यात हा घटक खूपच जास्त महत्त्वाचा ठरतो.
रविवारी दुबईत झालेल्या सामन्यातही त्याचं प्रत्यंतर आलं. सामन्यात अगदी पहिल्या चेंडूपासून दोन्ही संघांमध्ये असलेली ही तफावत प्रकर्षानं जाणवली.

फोटो स्रोत, ANI
हार्दिक पांड्यानं पहिल्याच चेंडूवर सायम अयूबला बाद केलं आणि भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी दुणावला. या विकेटनं भारतीय संघानं सामन्यावर जी पकड मिळवली, ती पकड सूर्यानं षटकार खेचून विजयाची औपचारकिता पूर्ण करेपर्यंत सैल होऊच दिली नाही.
पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनं शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करत धावा वाढवल्या. पण भारतीय संघाच्या आत्मविश्वासावर हल्ला करण्यासाठी त्या पुरेशा नव्हत्या.
त्याचं कारण म्हणजे या धावा करून गेल्यानंतर आफ्रिदी जेव्हा गोलंदाजीसाठी मैदानावर उतरला, तेव्हा त्याला पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार खेचत अभिषेक शर्मानं भारतीय संघ काय करणार आहे, याची झलक दाखवून दिली होती.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. पण भारताच्या विरोधात हा निर्णय कितपत योग्य होता? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव टॉसनंतर बोलताना आम्हाला गोलंदाजीच हवी होती, असं म्हणाला.
भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना उत्तम खेळ करतो हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. शिवाय भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या गेल्या काही सामन्यांचा इतिहास पाहता, पाठलाग करताना भारतानं त्यांना पराभूत केल्याचंच पाहायला मिळतं.

धावांचा पाठलाग करताना फलंदाजांवर दबाव असतो. त्यात भारतीय संघाची फलंदाजी पाहता मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता आणि त्याचा पाठलाग करताना बुमराह, पांड्या, चक्रवर्ती, कुलदीप अशा गोलंदाजांचा सामना करावा लागणार होता.
त्यामुळं सामन्यापूर्वीचा टॉस वगळता त्यानंतर या सामन्यात पाकिस्तानच्या दृष्टीनं काहीही चांगलं असं घडलंच नाही.

पाकिस्तान हा संघ वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ आहे. इम्रान खानपासून सुरू झालेली वेगवान गोलंदाजांची परंपरा पाकिस्ताननं अक्रम, वकार, शोएबच्या रुपानं यशस्वीपणे पुढं नेली. पण या सामन्यातलं चित्र मात्र वेगळं होतं.
पाकिस्तान या सामन्यात फक्त एका वेगवान गोलंदाजासह उतरला होता. तो म्हणजे शाहीन शाह आफ्रिदी. त्याची भारतीय गोलंदाजांनी सर्वाधिक धुलाई केली. त्याच्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 23 धावा कुटल्या. नंतर त्याला गोलंदाजीच मिळाली नाही.
पण, भारत हा जगभरात फिरकी गोलंदाजांचा सर्वात चांगला सामना करणाऱ्या संघांपैकी एक आहे. फिरकिपटूंचं सैन्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघानं मात्र याकडं दुर्लक्ष केलं असावं, असं वाटतं.

भारताच्या तिन्ही विकेट सॅम अयूब या फिरकिपटूनंच घेतल्या हे खरं असलं, तरी तो पूर्णवेळ गोलंदाज नसून प्रामुख्यानं फलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. पाकिस्तानच्या इतर फिरकिपटूंची मात्र भारतीय गोलंदाजांनी पिसं काढली.
दुसरीकडं भारतीय संघाच्या फिरकिपटूंचा मात्र सामन्यात दबदबा पाहायला मिळाला. बुमराह आणि पांड्या यांनी सुरुवातीलाच झटके देत पाकिस्तानला नामोहरम केलंच. पण त्यानंतर फिरकीपटूंनी पाकच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही.
कुलदीपनं 3, अक्षरनं 2 तर वरुण चक्रवर्तीनं एक विकेट घेत पाकिस्तानला भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तानचे फलंदाजही फिरकीविरोधात चांगली फलंदाजी करतात. मात्र, भारताविरोधात त्यांना या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

रविवारच्या या सामन्यात पाकिस्तानचा संघ सगळ्याच पातळ्यांवर मागे पडल्याचं पाहायला मिळालं. पण त्यातही महत्त्वाचं ठरलं ते फलंदाजांचं अपयश. ज्या फलंदाजांच्या जोरावर सलमान आगानं टॉस जिंकून फलंदाजी निवडली, त्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर मात्र नांगी टाकल्याचं पाहायला मिळालं.
सलामीवीर फरहानच्या 40 धावा आणि तळाच्या शाहीन शाह आफ्रिदीच्या 33 धावा वगळता एकाही फलंदाजाचा मैदानावर टिकाव लागला नाही. विशेष म्हणजे भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी फटके मारण्याच्या प्रयत्नातही पाकिस्तानचे काही फलंदाज विनाकारण बाद झाल्याचं दिसून आलं.

कुलदीपच्या ओव्हरमध्ये कुलदीपच्या हातून झेल सुटल्यानंतर हसन नवाजनं पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. सतत विकेट पडत राहिल्यामुळं पाकिस्तानला सावरताच आलं नाही.
दुसरीकडं भारतीय फलंदाजांनी मात्र अत्यंत खास शैलीमध्ये पहिल्याच चेंडूपासून सामना खिशात असल्याचं दाखवून दिलं. अभिषेक शर्मान पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानवर हल्ला चढवला.
अभिषेकनं 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 13 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या. फटकेबाजीच्याच प्रयत्नात तो बाद झाला. पण सुरुवातीला केलेल्या या फटकेबाजीमुळं त्यानं पाकिस्तानला विजयापासून एवढं दूर केलं की त्यांना पुनरागमन करताच आलं नाही. त्यानंतर शिल्लक राहिलेली औपचारिकता भारताच्या मधल्या फळीनं पूर्ण केली.

फलंदाजी असो वा गोलंदाजी आतापर्यंत या मालिकेत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ अत्यंत संतुलित असल्याचं पाहायला मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कमी अनुभव असलेल्या UAE विरोधातही भारतानं पहिला सामना मोठ्या फरकानं जिंकला होता.
त्यानंतर पाकिस्ताबरोबरही सगळ्याच बाबतीत भारतीय संघानं उजवी कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये तीन फिरकीपटूंचा समावेश आणि फलंदाजीत आठव्या क्रमांकापर्यंतचे पर्याय यामुळं भारतीय संघ स्पर्धेत विजयाचा दावेदार असल्याच्याही चर्चा आहेत.

भारतीय संघाच्या संतुलनाबाबतचं आणखी एक उदाहरण या सामन्यात पाहायला मिळालं ते म्हणजे मधली फळी. सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार फलंदाजीला आला. पण त्यानं संघाला काय गरज आहे लक्षात घेतलं आणि नैसर्गिक फटकेबाजीचा खेळ बाजुला ठेवत एक बाजू सांभाळली.
त्यामुळं दुसऱ्या बाजुला नवीनच आलेल्या तिलक वर्माला संधी मिळाली आणि त्यानं फटकेबाजी केली. त्यामुळं मधल्या फळीनं कशाप्रकारे संयमी खेळी करायची असते हे सूर्या आणि तिलकनं दाखवून दिलं. भारतीय संघामध्ये असलेल्या या संतुलनाचा अभाव पाकिस्तानच्या संघाच्या कामगिरीत दिसून आला.
तसं पाहता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये नव्या दमाच्या खेळाडुंची संख्या अधिक होती. दोन्ही संघातील खेळाडुंना तसा आंतरराष्ट्रीय पातळीवरील फार अनुभव नव्हता. त्यात भारत-पाकिस्तान सामन्याचं असणारं दडपण. पण, भारतीय संघानं या सर्वावर मात करत यश कसं मिळवायचं असं ते दाखवून दिलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











