शॅम्पूचा खरंच फायदा होतो का? केसांबाबतच्या या 4 गोष्टी जाणून घ्या

    • Author, एमिली होल्ट आणि यास्मिन रुफो
    • Role, बीबीसी न्यूज

सुंदर, तजेलदार आणि निरोगी केस कोणाला नको असतात? केस चमकदार असोत, कुरळे उडणारे असोत की सरळ गुळगुळीत केस- सर्वांनाच आपले केस सुंदर आणि निरोगी हवे असतात. पण खरंच हेअर केअर उत्पादनं आणि शॅम्पू केस 'दुरुस्त' करू शकतात का?

या सौंदर्याच्या शोधात आपण काही मोठ्या गैरसमजांवर तर विश्वास ठेवत नाही ना?, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

यूकेमधील सुमारे 5.8 अब्ज पाउंडच्या या मोठ्या हेअरकेअर उद्योगात असंख्य उत्पादनं, नवे ट्रेंड्स आणि इन्स्टाग्रामवरील टिप्स सतत समोर येतात.

खरं म्हणजे, निरोगी केसांसाठी भरपूर पैसे खर्च करण्याची किंवा गुंतागुंतीची दिनचर्या पाळायची गरज नसते. केवळ काही साध्या गोष्टी योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आणि गरजेचं असतं.

यूके हेअर कन्सल्टंट्सच्या ट्रायकॉलॉजिस्ट इवा प्रॉडमन आणि हेअर अँड स्कॅल्प क्लिनिकच्या ट्रेसी वॉकर यांनी केसांची काळजी कशी घ्यावी याविषयीच्या चार सामान्य गैरसमजांवर प्रकाश टाकला आहे.

1. थंड पाण्याने तुमचे केस जास्त चमकदार होत नाहीत

केस चमकदार व्हावेत म्हणून तुम्ही कधी बर्फासारख्या थंड पाण्याच्या शॉवरमधून आंघोळ केली आहे का?

पण आता तुम्ही अशी आंघोळ करणं बंद करून उबदार पाण्याचा आनंद घेऊ शकता. कारण प्रॉडमन यांच्या मते थंड पाण्यामुळे केसांना अतिरिक्त चमक येत नाही.

प्रॉडमन म्हणतात, "केस बर्फासारख्या थंड पाण्यात धुण्याची काहीच गरज नाही, कारण त्याचा कोणताही फायदा होत नाही. त्याऐवजी तुमच्या केसांचं रासायनिक पदार्थ, उष्णता आणि आजूबाजूच्या वातावरणापासून संरक्षण करणं जास्त महत्त्वाचं आहे."

त्या असंही म्हणतात की, खूप गरम पाण्यात केस धुणंही टाळा, कारण त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात आणि केसाच्या मुळांवरील त्वचा जळू शकते, अगदी आपल्या त्वचेसारखाच त्या त्वचेलाही अपाय होऊ शकतो.

2. कोणतंही प्रॉडक्ट खराब झालेले केस पूर्णपणे दुरुस्त करू शकत नाही

जर तुम्ही फुटलेले केस स्वतःच ठीक करायचा प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा, केस कापणंच याचा एकमेव उपाय आहे.

प्रॉडमन सांगतात, स्प्लिट एंड म्हणजे तुटलेले टोक जसं पुन्हा पूर्वीसारखं होऊ शकत नाही, तसंच ते केसही दुरुस्त करता येत नाही.

वॉकर म्हणतात की, जर केस तुटत (हेअर फ्रॅक्चरिंग) आहेत, असं तुम्हाला वाटत असेल आणि मायक्रोस्कोपखाली पाहिलं, तर केसावर दोन-तीन छोटे कोंब वाढल्यासारखं दिसतात.

"बाजारातील उत्पादनं केस जुळवणाऱ्या ग्लू सारखं काम करतात, ज्यामुळे केस आणखी चांगले दिसतात."

त्या म्हणतात, हे फक्त तात्पुरते उपाय आहेत. त्यामुळे जी उत्पादनं 'सर्व काही दुरुस्त करु' असं आश्वासन देतात, त्यांच्यावर जास्त पैसे खर्च करू नका.

'केस कापल्याने ते लवकर वाढतात', हा दावा खोटा असल्याचे प्रॉडमन सांगतात.

"केस लवकर वाढवणं शक्य नाही. त्यामुळे जी उत्पादन असं सांगतात, ते खोटं बोलत आहेत."

3. तुमचे केस आपोआप स्वच्छ होत नाहीत

कदाचित तुम्ही काही असे लोक पाहिले असतील, जे सांगतात की त्यांचे केस 'आपोआप स्वच्छ होतात'. त्यामुळे ते त्यांचे केस क्वचित किंवा कधीच धुवत नाहीत.

पण प्रॉडमन म्हणतात, असं करणं तुमच्या केसांसाठी चांगलं नाही. "तुमच्या टाळूमध्ये 1,80,000 तेल ग्रंथी आहेत आणि जर केस नियमितपणे धुतले नाहीत, तर ते घाण आणि कचरा जमा करतात."

वॉकर याबाबत सहमत आहेत. त्या म्हणतात की, जसं कपड्यांवरील तेलकट डाग किंवा घाण केवळ पाण्याने हटवता येत नाही. तसंच केसही फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत, त्यासाठी शॅम्पू लागतो.

त्या म्हणतात, "केस नियमितपणे धुवत नसल्यास वास येऊ शकतो आणि खाज सुटणारे डँड्रफसारखे (कोंडा) डोक्याचे आजार वाढू शकतात. केस जास्त तेलकट ठेवल्यास यीस्ट आणि बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे टाळूची खाज वाढते, परिस्थिती आणखी बिघडू शकते."

प्रॉडमन सुचवतात की, जर तुमचे केस खूपच तेलकट असतील किंवा तुम्ही भरपूर उत्पादनं वापरत असाल, तर दर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुवावेत.

हडर्सफील्ड युनिव्हर्सिटीच्या औषध विश्लेषण (फार्मास्युटिकल ॲनालिसिस) प्राध्यापिका लॉरा वॉर्टर्स म्हणतात की, ज्या लोकांचे केस खूप तेलकट असतात त्यांना मजबूत क्लीन्सिंगचा फायदा होऊ शकतो. पण ज्यांचे केस कोरडे असतात त्यांनी सल्फेट-फ्री शॅम्पू वापरावा. हा महाग असतो, पण केसातील नैसर्गिक तेल काढत नाही.

4. ड्राय शॅम्पू हा केस धुण्यासाठी पर्याय नाही

काम, व्यायाम आणि मित्रमंडळींची भेट यामध्ये, सगळ्यांनाच वॉश, ब्लो-ड्राय आणि स्टाइलसाठी वेळ मिळत नाही. म्हणून, अनेक लोक शॉवर न घेता तेलकट केस तात्पुरते स्वच्छ करण्यासाठी आणि केस ताजे दिसण्यासाठी ड्राय शॅम्पूचा वापर करतात.

प्रॉडमन म्हणतात की, 'ड्राय शॅम्पू वापरणं पूर्णपणे ठीक आहे,' पण ते फक्त केस धुताना एकदाच वापरावे.

जेव्हा तुम्ही केस धुवत नाहीत पण ड्राय शॅम्पू सलग काही दिवस वापरता, तेव्हा समस्या निर्माण होते.

"डोक्याच्या (स्काल्प) त्वचेतील नैसर्गिक तेल शॅम्पूमध्ये शोषले जाते आणि त्यावर वाढलेले यीस्ट त्याचा उपयोग करतात," असं प्रॉडमन सांगतात.

"जर सावध राहिलं नाही, तर डोक्याला खाज सुटते आणि कोंडा होऊ शकतो."

शेवटी त्या असं सांगतात की, तुमच्या केसांच्या मुळांची काळजी त्याच पद्धतीने घ्या जसं तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेता.

तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप न काढता आणि तो धुतल्याशिवाय त्यावर नवीन मेकअप लावत नाही ना, अगदी त्यापद्धतीनेच तुम्ही आपल्या डोक्याशी वागा.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.