हवाई प्रवासात लष्करी जवानाचं हृदय बंद पडलं, रिटायर्ड नर्सने असे वाचवले प्राण

- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसीसाठी
ही गोष्ट एका नर्सची आहे. ज्या त्यांच्या कामाप्रती असलेल्या श्रद्धेसाठी ओळखल्या जातात. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी त्यांना नावाजलं जातंय. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेत. असाच एक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या नवी दिल्लीला चालल्या होत्या. कन्नूर – नवी दिल्ली विमान प्रवासात त्यांनी सीपीआर देऊन एका लष्करी जवानाचे प्राण वाचवले आहेत. त्यासाठी सर्वत्र पुन्हा एकदा त्यांचा गौरव केला जात आहे.
“आपल्या विमानात एक मेडिकल एमर्जन्सी आलीय. विमानात कुणी डॉक्टर असेल तर त्यांनी तातडीनं मदत करावी...”
एअर इंडियाच्या AI425 फ्लाईटमध्ये ही उदघोषणा झाली आणि विमानातल्या प्रवासी गीता पी. यांनी तात्काळ आजारी असलेल्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली.
32 वर्षांचे भारतीय लष्करी जवान सूमन त्यांच्या जागेवर कोसळले होते. त्यांचं शरीर अजिबात प्रतिसाद देत नव्हतं. त्यांना तात्काळ सीपीआरची गरज होती.
परिस्थिती नेमकी काय आहे हे गीता. पी यांच्या तात्काळ लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ सीपीआर सुरू केला. एखाद्या व्यक्तीच्या हृदयानं काम करणं बंद केल्याचं लक्षात आल्यानंतर त्याचं हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी सीपीआर दिला जातो. ( जाणकार व्यक्तीनं सीपीआर देणं गरजेचं असतं.)
विमानात नेमकं काय घडलं?
रविवारी सहा नोव्हेंबरला सकाळी केरळमधल्या कन्नूरमधून एअर इंडियाच्या AI425 विमाननं नेहमी प्रमाणे नवी दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं.
भारतीय लष्करी जवान सूमन त्यांची सुट्टी संपवून काश्मीरमध्ये त्यांची ड्युटी पुन्हा सुरू करण्यासाठी नवी दिल्लीला निघाले होते. पण विमान उड्डाण घेताच अर्ध्या तासात त्यांची तब्येत खालावली. ते त्यांच्या जागेवर कोसळले आणि त्याच्या शरीरानं प्रतिसाद देणं बदं केलं. हे लक्षात येताच विमानातल्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी आवाहन केलं.
महत्त्वाचं म्हणजे या विमानातून यावेळी तीन डॉक्टर आणि एक नर्स प्रवास करत होते. गीता. पी पेशाने नर्स होत्या. त्याही या विमानात होत्या.

फोटो स्रोत, P GEETHA'S FAMILY
थोडा वेळ सीपीआर दिल्यानंतर सूमन यांच्या शरीरात हालचाल होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर विमानातून प्रवास करत असलेल्या डॉ. प्रमेकुमार यांनी तात्काळ सूमन यांना कॅन्युला लावलं आणि विमानात उपलब्ध असलेल्या दोन आयव्ही त्यांना लावल्या.
त्यातून सूमन शुद्धीवर आले. गीता आणि प्रेमकुमार यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि तासाभरातच सूमन यांनी थोडं खाल्लंसुद्धा.
“त्यानंतर मात्र संपूर्ण प्रवासभर मी त्यांच्या शेजारी बसून होते,” असं गीता यांनी बीबीसीशी बोलताना सांगतिलं. विमान दिल्लीत पोहोचताच मेडिकल टीम विमानतळावर पोहोचली होती. त्यांनी तात्काळ सूमन यांना ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं.

फोटो स्रोत, P GEETHA'S FAMILY
“एकदा माझा एक सहकारी असाच कोसळला होता. त्यावेळी मी त्याला तात्काळ सीपीआर दिला आणि रुग्णालयाच्या कार्डिऍक इंटेन्सिव्ह युनिटमध्ये त्याला हालवलं. रुग्णालयात अशा घटना घडत असतात. पण, विमान हवेत असताना सीपीआर देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे,” असं गीता यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
कोण आहेत गीता पी.?
गीता कोळिकोडच्या सरकारी रुग्णालयातून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत आणि सध्या कोळिकोडमधल्याच एका खासगी रुग्णालयात त्या नव्याने सेवा देत आहेत.
विशेष म्हणजे त्या नर्सिंग क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या मानाच्या फ्लॉरेन्स नाइटअँजल अवॉर्डच्या मानकरी आहेत. नुकताच राष्ट्रपदी द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो स्वीकारण्यासाठीच गीता केरळमधून नवी दिल्लीला चालल्या होत्या. त्यावेळी विमानात हा प्रसंग उद्भवला.
WHOसाठी काम करणारे डॉ. मोहम्मद अशील याच विमानातून प्रवास करत होत. “ज्यावेगानं गीता सूमन यांची मदत करण्यासाठी धावल्या त्यावरून मला आधी गीता या सूमन यांच्या नातेवाईक असल्याचं वाटलं,” असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
“मी पाहिलं की एक महिला त्या पेशंटला तपासत होती आणि तीन डॉक्टर्स तिच्या बाजुला होते. त्यापैकी एक डॉक्टर इमर्जन्सी स्पेशालिस्ट होते. तेसुद्धा त्या महिलेला मदत करत होते,” अशील यांनी सांगितलं.
विमान उतरल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा लक्षात आलं की गीता यांना 2019 मध्ये केरळ सरकारचा सर्वोत्कृष्ट नर्सचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे, अशील पुढे सांगत होते.

फोटो स्रोत, P GEETHA'S FAMILY
हा एक विचित्र योगायोगच आहे जेव्हा एक नर्स फ्लॉरेन्स नाइटअँजल अवॉर्ड स्वीकारण्यासाठी जात आहेत आणि त्या विमान भर हावेत असताना एका पेशंटचे प्राण वाचवतात.
गीता यांना हा पुरस्कार 2020 मध्येच मिळाला होता. पण त्यावेळी कोव्हिडमुळे हा पुरस्कार सोहळा आभासी झाला होता. आता मात्र त्यांचा पुन्हा सत्कार करण्यासाठी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं होतं.
2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या निपाह व्हायरसच्या साथी दरम्यान त्यांनी केलेलं काम. तसंच केरळमध्ये 2018 आणि 2019 ला आलेला महापूर आणि कोव्हिडच्या काळात त्यांनी केलेल्या आरोग्य सेवेची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
केरळमधल्या हजारो नर्सेस सध्याच्या घडीला देशाबाहेर रुग्णसेवा करत आहेत. पण, विदेशात जाण्याचा विचार गीता यांच्या मानत कधीच आला नाही.
“ही देवाची इच्छा आहे की मी माझ्या देशातल्या रुग्णाची सेवा करावी,” असं गीता म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








