You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीकाकुलम : कासिबुग्गातील श्री वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 9 जणांचा मृत्यू
श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गामधील श्री वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली आहे.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक मंदिरात जमा झाल्याने घडली आहे.
भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तसेच, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
राज्याचे कृषी मंत्री के. अचेन्नायडूदेखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मंदिर प्रशासनाशी बोलून घटनेची सविस्तर माहिती घेतली. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले.
आंध्र प्रदेशचे राज्यपाल अब्दुल नजीर यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी व्यक्त केलं दुःख
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. श्री वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीमुळे काही भाविकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पण या घटनेतील मृतांचा आकडा नेमका किती, याबद्दल स्पष्ट माहिती नसल्याचंही म्हटलं आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरवर म्हटले की , "श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासिबुग्गामधील श्री वेंकटेश्वर मंदिरात झालेली चेंगराचेंगरी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत झालेला भाविकांचा मृत्यू हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो."
"या घटनेत जखमी झालेल्यांना जलद आणि योग्य उपचार देण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी पोहोचून मदत कार्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत," असंही चंद्राबाबू म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनीही चेंगरा चेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडूनही या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलंय की, "मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील:"
आंध्र प्रदेशचे राज्यपाल श्री एस. अब्दुल नझीर यांनीही दुःख व्यक्त केलं आहे.
कासीबुग्गा येथे सध्या बांधकाम सुरू असलेल्या मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली असून, या मंदिराच्या उभारणीमागे एका भक्ताची आर्त वेदना कारणीभूत आहे. हरिमुकुंद पांडा या भक्ताने बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, ते अनेक वेळा तिरुमलाला दर्शनासाठी गेले, मात्र त्यांना दर्शन मिळालं नाही. या अनुभवाने व्यथित होऊन त्यांनी स्वतःच्या मालकीच्या 12 एकर जमिनीवर तिरुमलाच्या श्री वेंकटेशाची 9 फूट उंच मूर्ती उभारली आणि मंदिराची स्थापना केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)