You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अनेक मुलं बेशुद्ध पडल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं', करूर चेंगराचेंगरीतून वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींचा भयावह अनुभव
- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तामिळनाडूतील करूरमध्ये 'तामिळगा वेत्री कळघम' या पक्षाचे नेते आणि अभिनेते विजय यांच्या प्रचार रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली.
या चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
या चेंगराचेंगरीतून वाचलेल्या दुर्गादेवींनी बीबीसीला सांगितलं की, "सकाळपासून जे लोक आले होते, ते परत जाऊ शकले नाहीत. मी देखील या गर्दीत अडकले होते आणि काही तरुणांच्या मदतीने त्यातून बाहेर पडू शकले."
करूर चेंगराचेंगरीतून वाचलेल्या लक्ष्मी सांगतात की, "कुणालाच जेवण आणि पाणी मिळू शकलं नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की मुलं बेशुद्ध झालेली होती."
तामिळगा वेत्री कळघम या पक्षाची रॅली करूर जिल्ह्यातील वेलुसामीपुरममध्ये आयोजित करण्यात होती.
अतिरिक्त डीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) डेव्हीडसन देवसिरवत यांनी म्हटलंय की, या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे.
अभिनेता विजयला करूरमध्ये दुपारी 12 वाजता एक सभा करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, ती सभा सायंकाळी झाली. बीबीसी तमिळने या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसोबत बोलून अनुभव जाणून घेतले.
'जेवण आणि पाण्याची कमतरता'
या सभेमध्ये सहभागी झालेल्या वेलुचामिपुरमच्या रहिवाशी दुर्गा देवी यांनी सांगितलं की, त्या चेंरगाचेंगरीतून कशाबशा वाचल्या.
त्या सांगतात की, "सकाळी ठीकठाक गर्दी होती. विजयला यायला उशीर झाला. त्यामुळे, गर्दीही वाढली. गावाच्या बाहेरुनही मोठ्या संख्येनं लोक आले होते.
कालच्या प्रचारसभेमुळे दुकानं आणि हॉटेल्सही बंद होते. त्यामुळे, बाहेरुन आलेल्या लोकांना खायला-प्यायला काही मिळालंच नाही. सायंकाळी ही सभा सुरू होण्याच्या आधीच अनेक जण बेशुद्ध पडले होते."
काही युवकांच्या मदतीमुळे मी वाचले असं सांगणाऱ्या दुर्गा देवी पुढे सांगतात की, "सकाळपासून आलेले लोक परत गेलेच नाहीत. जसजसा वेळ होत गेला, तसतशी गर्दी वाढतच गेली.
सायंकाळ होईपर्यंत ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी सुरु झाली. मी देखील या चेंगराचेंगरीत अडकले होते. माझ्या गावातील काही युवकांनी मला एका इमारतीवर चढण्यासाठी मदत केली. त्यामुळे, कसलीही दुखापत न होता मी वाचू शकले."
लहान मुलंही झाली बेशुद्ध
त्याच गावच्या रहिवाशी लक्ष्मी सांगतात की, या चेंगराचेंगरीच्या आधीच अनेक मुलं बेशुद्ध पडली असल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.
बीबीसीशी बोलताना त्यांनी पुढे सांगितलं की, "सकाळी फारशी गर्दी नव्हती. सुरुवातीला तर सगळ्या सोयीसुविधा चांगल्या होत्या. मात्र, जसजशी गर्दी वाढत गेली, तसंतसं ही गर्दी नियंत्रित करणं अवघड झालं. अनेक मुलं बेशुद्ध पडल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं."
याच गावचे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आनंद कुमार सांगतात की, गर्भवती महिला आणि मुलंही सकाळपासून वाट पाहत होती.
पुढे ते सांगतात की, "मी करूरमध्ये एवढी गर्दी यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. विजय सायंकाळी पोहोचले मात्र दुपारपर्यंत प्रचंड गर्दी झाली होती.
गर्भवती महिलांना आणि मुलांना तिथं कसं काय आणण्यात आलं होतं, ते मला माहिती नाही. चाहते आनंद लुटण्याच्या मनस्थितीत होते. पुलावरही प्रचंड गर्दी होती.
संपूर्ण शहरातून आलेला लोकांचा जमाव त्याच ठिकाणी गोळा झाला होता जिथे विजय भाषण देणार होते. हेच गर्दी होण्याचं मुख्य कारण होतं."
साखरपुड्याआधीच इंजिनिअरचा मृत्यू
या चेंगराचेंगरीत मृत्युमूखी पडलेल्या अनेक जणांमध्ये रवी या सिव्हील इंजिनिअर तरुणाचाही समावेश आहे.
पत्रकारांशी बोलताना त्या मुलाच्या आईनं म्हटलं की, "माझा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून स्वत:चा व्यवसाय करत होता.
आज सकाळी (रविवारी) आम्ही त्याच्यासाठी मुलगी बघायला जाणार होतो. म्हणून तो फार उत्सुक होता. त्याने सांगितलं होतं की, तो मित्रासोबत ही सभा झाल्यावर परतेल. जाताना असं सांगून तो गेला होता. मात्र, त्याने फोनही उचलला नाही. जेव्हा तो आला, तेव्हा तो जिवंत नव्हता."
वेलुसामीपुरमजवळ इंदिरा नगरचे रहिवासी वसंता यांच्याही दोन वर्षांच्या नातवाचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे.
त्यांनी सांगितलं की, "माझ्या नातवाला त्याची मावशी घेऊन गेली होती. तो रस्त्याच्या बाजूला उभा होता. मात्र, जेव्हा गर्दी वाढू लागली तेव्हा त्याला धक्का लागला आणि तोही या चेंगराचेंगरीत अडकला."
या लहानग्याचा मृत्यू झाला असून त्याच्या मावशीवर उपचार सुरू आहेत.
करूरची रहिवाशी आणि कॉलेजमध्ये थर्ड इअरला शिकणारी विद्यार्थिनी जयपालादेखील या चेंगराचेंगरीत जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
तिचे वडील अलागिरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ते त्यांच्या मित्रांसोबत एका मीटिंगसाठी गेले होते.
"जेव्हा चेंगराचेंगरी आणि काहींच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा मी घाबरलो. मी तिला फोन केला, तर तिचा फोन बंद लागत होता.
मी तिच्या कोणत्याच मित्रमैत्रिणींशी संपर्क करु शकलो नाही. त्यांनी मला एका तासानंतर फोन करुन सांगितलं की, त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)