You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीएची नोकरी सोडून तिने कपडे धुण्याचा व्यवसाय सुरू केला तेव्हा...
- Author, मोहर सिंग मीणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
"तिच्या व्हिजिटिंग कार्डवर सीए (चार्टर्ड अकाउंटंट) लिहिलं आहे. तिचं शिक्षण पाहून लोकांना बऱ्याचदा धक्का बसतो. तिचा एका क्लायंट तिला म्हणाला की, लोक खूप कष्टाने सीए होतात. ते सोडून तू हे लॉन्ड्रीचं काम करतेस. थोडक्यात तू आता सीए म्हणजे 'क्लीनिंग एजंट' बनली आहेस."
राजस्थानमधील उदयपूरच्या 34 वर्षीय अपेक्षा सिंघवीनी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास केली होती.
त्यांनी आयुष्यातील दहा वर्ष मोठमोठ्या संस्थांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलं. 2021 मध्ये त्यांना वीस लाख रुपयांचं पॅकेज होतं, मात्र ती नोकरी सोडून त्यांनी लाँड्री उद्योग सुरू केला. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे सर्वचजण चकीत झाले.
वेगळ्या मार्गाने केली वाटचाल...
उदयपूरच्या भुवाना मध्ये त्यांनी त्यांचा लॉन्ड्री प्लांट सुरू केलाय. आज या लॉन्ड्रीमध्ये उदयपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हॉटेल्सचे कपडे धुण्यासाठी येतात.
खरं तर 2021 मध्ये या लॉन्ड्री प्लांटची सुरुवात झाली होती. स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची उमेद घेऊन अपेक्षा सिंघवी यांनी स्वेच्छेने चार्टर्ड अकाउंटंटच्या नोकरीचा राजीनामा दिला.
अपेक्षा सिंघवींचे पती सिद्धार्थ सिंघवी उदयपूरमधील एका नामांकित संस्थेत अधिकारी म्हणून काम करतात.
अपेक्षा यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेला त्यांचा भाऊ देखील सीए आहे. एवढंच काय, तर त्यांच्या नातेवाईकांमध्येही बरेच जण सीए आहेत. अपेक्षा यांच्या सासरी आणि माहेरी अशा दोन्ही ठिकाणी स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
त्यांनी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अशा दोन्ही परीक्षा पास केल्या होत्या.
सीएच्या परीक्षेत महिला कॅटेगरीमध्ये पहिली रँक
अपेक्षा सिंघवी सांगतात, "मी नोव्हेंबर 2009 मध्ये सीए फायनलची परीक्षा दिली. सीए इंटरमध्ये ऑल इंडिया 28 वी, सीएस फाऊंडेशनमध्ये ऑल इंडिया तिसरी तर महिला कॅटेगरीमध्ये पहिली रँक मिळाली."
त्या पुढे सांगतात, "2011 च्या जानेवारी महिन्यात मला गोव्यात वेदांता ग्रुपमध्ये पहिली नोकरी लागली. मी तिथे दोन वर्ष काम केलं. त्यानंतर मी हिंदुस्थान झिंकच्या उदयपूर हेड क्वार्टरमध्ये आणि देबारी मध्ये आठ वर्ष काम केलं. जुलै 2021 मध्ये माझं पॅकेज वाढून वीस लाख रुपये झालं होतं, पण मी नोकरीचा राजीनामा दिला."
चार्टर्ड अकाउंटंट आणि लॉन्ड्री या दोन्ही कामांचा दूरदूर पर्यंत संबंध नाही. अपेक्षा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय, ओळखीचे आणि मित्रपरिवार सगळ्यांनाच धक्का बसला.
अपेक्षा यांनी सलग दोन वर्ष मेहनत घेतली आणि लॉन्ड्रीचं काम वाढवलं. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं.
लॉन्ड्रीचं कामकाज कसं चालतं?
उदयपूरच्या भुवानामध्ये असलेल्या या लॉन्ड्रीत आठ महिलांसह तीस कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. या महिला फक्त दिवसा काम करतात.
अपेक्षा यांनी या लॉन्ड्रीला 'सुविधा लॉन्ड्री सर्व्हिस' असं नाव दिलं आहे.
हॉटेल आणि इतर ठिकाणाहून कपडे ने-आण करण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये दोन गाड्या आहेत. हॉटेलमधून पडदे, बेडशीट, टॉवेल, कर्मचाऱ्यांचे ड्रेस आदी कपडे धुण्यासाठी येतात.
कपड्यांची नीट पडताळणी केली जाते, त्याच्यावर लागलेले डाग काढले जातात. कपडे धुण्यासाठी तीन मोठ्या मशिन्स आहेत.
ऑर्डरनुसार कपड्यांना इस्त्री, स्टीम प्रेस, ड्रायक्लीन प्रेस केली जाते. कपडे फोल्ड करून पॅक करून मगच डिलिव्हर केले जातात.
अपेक्षा सांगतात, "लॉन्ड्री कामात सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे क्वॉलिटी आणि कपड्यांची वेळेवर डिलिव्हरी. कारण हॉटेल्सना गेस्टसाठी रूम्स तयार करायच्या असतात."
स्वतःच करतात मार्केटिंग
अपेक्षा स्वतःचा अनुभव सांगतात की "चांगल्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर खूप लोकांनी माझ्या कामाचं कौतुक केलंय. काही क्लायंट काम देताना म्हणाले की, तुम्ही स्वतः महिला आहात आणि तुमच्या लॉन्ड्री मध्ये महिला कामगार असल्यामुळे आम्ही हे काम तुम्हाला देतोय. कारण स्त्रिया त्यांचं काम खूप समर्पित होऊन करतात."
पण सर्वच अनुभव चांगले होते असं नाही, काहींनी कामं दिली नाहीत.
अपेक्षा सांगतात, "मला लॉन्ड्रीचा कोणताच अनुभव नसल्याने काही लोकांनी काम द्यायला टाळाटाळ केली."
अपेक्षा सिंघवी यांना साडेचार वर्षांचा एक मुलगा आहे. त्या एका आईची भूमिका तर पार पाडतातच पण सोबतच लॉन्ड्रीचं काम देखील सांभाळतात.
चेहऱ्यावर हसू आणून त्या सांगतात की, "जेव्हा एखादा नवा क्लायंट जॉईन होतो तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. ज्या कंपनीत मी काम करत होते त्या कंपनीत मोठ्या पदावर जाण्याची लोकांची स्वप्न असतात. पण मी हे सगळं सोडून माझा उद्योग सुरू केला आणि स्वतःला खरं ठरवलं."
लॉन्ड्रीमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालतं. या दोन्ही शिफ्टमध्ये तीस कर्मचारी 24 तास काम करतात.
अपेक्षा सांगतात, "सुरुवातीच्या काळात फक्त पाच क्लायंट होते. पण आज उदयपूरमधील पन्नास हॉटेल्स आमचे क्लायंट आहेत. नवीन क्लायंट जोडण्यासाठी मी सतत उदयपूरमधील हॉटेल्सला भेटी देत असते."
या लॉन्ड्रीत काम करणाऱ्या कर्मचारी विजया सांगतात, "मी गेल्या सहा वर्षांपासून लॉन्ड्रीत काम करते आहे. मी इथे नोकरीला लागून दीड वर्ष झालं असेल. एक महिला असून देखील त्या लाँड्रीचं काम करतात हे बघून आम्हाला चांगलं वाटतं. यातून आणखीन महिला प्रेरित होतात."
कुटुंबाकडून मिळालेला सपोर्ट
सीएचं प्रोफेशन सोडून अगदी नवखा पर्याय निवडणे कुटुंबातील सगळ्यांनाच विचित्र वाटलं. सर्वांनी मला विचारलं की, चांगली नोकरी सोडून तू एवढं मोठं पाऊल का उचलते आहेस.
अपेक्षा सांगतात, "माझ्या आई वडिलांना वाटत होतं की, मुलाबाळांना इतकं शिकवलं, लायक बनवलं. मात्र मी नोकरी सोडून अगदीच नवा व्यवसाय सुरू केला. आणि विशेष म्हणजे यात यशाची शाश्वती नव्हती. पण शेवटी सगळ्यांनी सपोर्ट केला."
अपेक्षाचे पती सिद्धार्थ सिंघवी सांगतात, "नोकरी सोडून स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे असं अपेक्षाने मला येऊन सांगितलं. उदयपूरला अनेक पर्यटक भेट देतात, इथे अनेक हॉटेल्सही आहेत. त्यामुळे लॉन्ड्री सुरू केली तर व्यवसाय जोरात चालेल असं मला वाटलं."
"शेवटी अपेक्षाने चांगली नोकरी सोडून लॉन्ड्रीचं काम सुरू केल्याबद्दल लोकांना आश्चर्य वाटलं. पण काळाच्या ओघात सर्वांचा दृष्टिकोन बदलला."
अपेक्षा सांगतात, "जेव्हा मी लॉन्ड्रीच्या कामासाठी बाहेर जायचे, तेव्हा माझ्या घरच्यांनी मुलांची काळजी घेण्यासाठी मदत केली. जर घरच्यांचा पाठिंबा नसता तर हे काम करणं कठीण झालं असतं."
त्या पुढे हसून सांगतात, माझा धाकटा भाऊ सुद्धा सीए आहे. मी मोठी असल्याने त्याच्यापुढे माझा आदर्श आहे. पण आता आई-वडिलांना वाटतं की कदाचित तो सुद्धा नोकरी सोडून स्वतःचं काहीतरी सुरू करेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)