'अल्लाहची मर्जी असेल तर...', बांगलादेशमध्ये परतल्यानंतर काय म्हणाले तारिक रहमान

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान 17 वर्षांनंतर गुरुवारी (25 डिसेंबर) बांगलादेशला परतले आहेत. बांगलादेशमध्ये येताच ते रॅलीत सहभागी झाले.
"अल्लाहची इच्छा असेल तर आपण सगळे मिळून मेहनत करू आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे बांगलादेश निर्माण करू. येत्या काळात जो कोणी देशाचं नेतृत्व करेल, त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी काम करू," असं तारिक रहमान यांनी ढाका येथे आयोजित रॅलीत म्हटलं.
ते पुढे म्हणाले, "देशातील जनतेसाठी, देशाच्या विकासासाठी आणि लोकांचं नशीब बदलण्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे."
ही योजना नेमकी काय आहे, हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
भाषणाच्या शेवटी त्यांनी लोकांना हिंसा थांबवण्याचं आवाहन केलं आणि 'देशात शांतता राखणं ही आपली जबाबदारी आहे,' असं ते म्हणाले.
त्यांचं विमान गुरुवारी सकाळी 11.41 वाजता ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं.
तारिक रहमान यांच्या स्वागतासाठी बीएनपीचे हजारो कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरले होते. रहमान यांनीही समर्थकांचं अभिवादन स्वीकारल्याचं पाहायला मिळालं.
बांगलादेशमध्ये पुढील वर्षी 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीआधी तारिक रहमान यांचं देशात येणं महत्त्वाचं मानलं जात आहे. बांगलादेश अवामी लीगला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत बीएनपीने निवडणूक जिंकली, तर तारिक रहमान बांगलादेशचे पंतप्रधान बनू शकतात. त्यांची आई खालिदा झिया यांची प्रकृती सध्या ठीक नाही, त्यामुळे बीएनपीची सूत्रं तारिक रहमान यांच्याच हातात आहेत.

फोटो स्रोत, BNP Media Cell
खालिदा झिया गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून बांगलादेशच्या राजकारणात सक्रिय आहेत. पतीच्या हत्येनंतर बीएनपीची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली होती.
1981 मध्ये झियाउर रहमान बांगलादेशचे राष्ट्रपती होते आणि त्याच काळात त्यांची हत्या झाली. खालिदा झिया या बांगलादेशात बहुपक्षीय लोकशाहीच्या समर्थक आहेत.
बेगम झिया या 1991 मध्ये बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या. त्याच वर्षी बीएनपीने निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर त्या 2001 मध्ये पुन्हा सत्तेत आल्या आणि 2006 पर्यंत पंतप्रधानपदावर होत्या.
बीएनपीने मागील तीन निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. 2024 मध्ये शेख हसीना यांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला खालिदा झिया यांनी पाठिंबा दिला होता.
सध्या बीएनपी हा बांगलादेशातील सर्वात मोठा पक्ष मानला जातो आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत तो सत्तेत येऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
शेख हसीना पंतप्रधान असताना खालिदा झिया तुरुंगात होत्या. खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनाही अनेक प्रकरणांत न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. मात्र, मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने खालिदा झिया आणि त्यांच्या मुलाला निर्दोष मुक्त केलं.

फोटो स्रोत, BNP Media
बांगलादेशमध्ये जानेवारी 2007 मध्ये लष्कराचा पाठिंबा असलेल्या कार्यवाहक सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तारिक रहमान यांना अटक करण्यात आली होती. ते सुमारे 18 महिने तुरुंगात होते. 3 सप्टेंबर 2008 रोजी त्यांची सुटका करण्यात आली होती.
तारिक रहमान 11 सप्टेंबर 2008 रोजी, आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ढाक्याहून लंडनला गेले. तेव्हापासून ते लंडनमध्ये राहत होते.
पत्रकार परिषदेत काय सांगितलं?
या महिन्याच्या सुरूवातीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालिदा झिया यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आणि सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दाखवली होती.

फोटो स्रोत, MUNIR UZ ZAMAN/AFP via Getty
पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला खूप दुःख झालं आहे. बेगम झिया यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात बांगलादेशसाठी अनेक वर्षे खूप काम केलं आहे.
मी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो. भारत याप्रकरणी जे जे काही शक्य असेल ते सर्व करण्यासाठी तयार आहे."

फोटो स्रोत, Reuters
पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टला उत्तर देताना बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने लिहिलं की, "बीएनपीच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांच्या आरोग्यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल भारताच्या पंतप्रधानांचे आभार. बीएनपी या मदतीसाठी केलेल्या प्रस्तावाचं कौतुक करते."
यापूर्वी, भारत सरकार आणि बीएनपी यांच्यात असे सौहार्दाचे संबंध क्वचितच पाहायला मिळाले आहेत. उलट, शेख हसीना भारतात असण्याबद्दल बीएनपीने नेहमीच भारत सरकारवर टीका केली आहे.
भारताच्या पंतप्रधानांनी जून 2015 मध्ये त्यांच्या बांगलादेश दौऱ्यात खालिदा झिया यांची भेट घेतली होती.
त्या वेळी भारताने बांगलादेशसोबत सीमारेषा करार (लँड बाऊंड्री अॅग्रीमेंट) केला होता आणि शेख हसीना त्या काळात पंतप्रधान होत्या.
बांगलादेशच्या विरोधकांसोबत पंतप्रधान मोदी यांची ही असामान्य भेट होती. भारतीय पंतप्रधानांनी खालिदा झिया यांच्यासोबतच रौशन इरशाद यांचीही भेट घेतली होती.
सुरक्षेची तयारी

फोटो स्रोत, Getty Images
बीएनपीच्या नेत्यांनी तारिक रहमान यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती.
सलाहुद्दीन अहमद यांनी पत्रकार परिषेदत सांगितलं की, सरकारने पोलीस रॅपिड अॅक्शन बटालियन आणि सैन्यासह विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय साधून सुरक्षा तयारी केली. त्याचबरोबर, पक्षाकडूनही मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती.
विमानतळावर तारिक रहमान यांचं स्वागत करण्यासाठी फक्त स्थायी समितीचे सदस्यच रेड झोनमध्ये उपस्थित होते.
ढाका येथे आयोजित स्वागत समारंभात बीएनपीने पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले होते.
अहमद यांनी सांगितलं की, तारिक रहमान यांच्यासाठी 'चोख सुरक्षा व्यवस्था' करण्यात आली आहे. मात्र, यासाठी एसएसएफची मदत घेण्यात आल्याचे वृत्त निराधार आहे.
त्यांनी सांगितलं की, तारिक रहमान आल्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा विचार करून विमानतळ, '300 फूट रोड' आणि उत्तरासह विविध भागात 20 वैद्यकीय शिबिरे लावली गेली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











