धारावी ते भारतात पहिला Beat Boxing अल्बम, असा आहे अभिषेकचा 'हिपहॉप' प्रवास

फोटो स्रोत, AbhisheshKurme/Instagram
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
बीट बॉक्सिंग हा हिप हॉप संस्कृतीतील एक कलाप्रकार आहे. भारतासह जगभरात ही कला अनेक कलाकार जपतात. त्यात भारतातला पहिला बीट बॉक्सिंगचा अल्बम बनवणारा एक बीटबॉक्सिंग कलाकार मुंबईतील धारावीचा आहे.
त्याच नाव आहे अभिषेक कूर्मे उर्फ बीट्सलेयर. अभिषेक हा मुंबईतील हिपहॉप संस्कृतीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमधला आहे.
गेल्या काही वर्षात धारावीची ओळख द म्युझिकल स्लम ऑफ इंडिया म्हणून झाली आहे.
कारण महाराष्ट्रात हिप हॉप संस्कृतींची सुरुवात मुंबईतील धारावीच्या वस्तीत सर्व प्रथम झाली. सध्या अनेक रॅपर, सिंगर, बीबोईंग, बीटबॉक्सिंग करणारे तरुण पहायला मिळतात.
त्यातच हिप हॉप संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेला बीट बॉक्सिंग हा कलाप्रकार धारावीतल्या तरुणांनी आवड म्हणुन आत्मसात केला. अन् ही आवडणारी कला अभिषेक कुर्मे सारख्या तरुणाने फक्त आवड न ठेवता, आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवला आणि आता व्यवसाय म्हणून पुढे नेला आहे.


गमतीतून सुरू झाला प्रवास
धारावीसारख्या एका आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्टीत राहून पाश्चिमात्य देशात सुरू झालेल्या हिप हॉप संस्कृतीतील बीट बॉक्सिंग ही कला अभिषेक सादर करतो.
अभिषेकचं शिक्षण बॅचलर ऑफ मास मीडिया झालं आहे. तो धारावीतील कामराज नगर परिसरात राहतो. अभिषेक त्याच्या आजीच्या पिढी पासून धारावीत वास्तव्यास आहे.
अभिषेक तेलगू समाजाचा आहे. अभिषेकच कुटूंब कर्नाटक आणि तेलंगणाच्या मध्यभागी असलेल्या एका गावातलं आहे.

फोटो स्रोत, AbhisheshKurme
अभिषेकच्या घरी आई, वडील, भाऊ-बहीण , काका आणि आजी असा परिवार आहे. वडील रेल्वेत कामाला आहेत. तर भाऊही रॅपर आहे. अभिषेक हा पूर्ण वेळ बीट बॉक्सिंग करतो.
कॉलेजमध्ये असताना 2016 पासून youtube च्या माध्यमातून अभिषेकने ही कला जोपासायला सुरुवात केली. बीट बॉक्सिंग कलेबाबत तो ट्याला डब्या अश्या काही परदेशी कलाकारांकडून सगळे पैलू युट्युबवरूनच शिकला आहे.
अभिषेक ही कला, रिल, लाईव्ह कॉन्सर्ट, मित्रांसोबत जॅमिंग करत सादर करतो.
अभिषेकने गमतीत ही कला यूट्यूबवर पाहत पाहत सुरू केली, अन् पाहता पाहता त्यानं त्याला ओळखही मिळाली आहे. गमतीत सुरू झालेला बीट बॉक्सिंगचा प्रवास अभिषेकला बॉलीवूड मधील काला, हिचकी, गली बॉय, फर्जी असे चित्रपट आणि अनेक जाहिराती, लाईव्ह शो कॉन्सर्टपर्यंत घेऊन आला आहे.
अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम
बीट बॉक्सिंगची कोणतीही भाषा नाही. हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. यात भाषेचा अडथळाही येत नाही. त्यामुळं मी हे शिकायचं ठरवलं.
बाहेरील देशांमध्ये वाद्य सहज उपलब्ध होत नव्हती, त्यामुळं त्यांनी तोंडानं वाजवण्यास सुरुवात केली. त्यातूनच मग ते वाद्यांचे आवाज काढायचे. त्यालाच पुढे बीट बॉक्सिंग नाव पडले, असं बीट बॉक्सिंगबाबत वेगवेगळे जाणकार सांगतात.
मात्र ही कला भारतात पूर्वीपासून रुजलेली आहे. जसं कथ्थक नृत्य करण्यापूर्वी रिदम तोंडातूनच पूर्वीपासून येतात.
त्यातूनच बीट बॉक्सिंगची प्रथा सुरू झालीय असे वाटत असल्याचं धारावीत राहणारा अभिषेक सांगतो.

फोटो स्रोत, AbhisheshKurme
कॉलेजच्या पहिल्या वर्षात मी फक्त गंमत म्हणून रॅपिंग सुरू केलं. कॉलेजच्या वर्षात मी नियमितपणे बीट बॉक्सिंग करत होतो.
ते बीट बॉक्सिंग खूप वायरल होत होतं. मग मी बीटबॉक्सिंगबाबत गंभीर झालो. अधिक मेहनत घेतली आणि भारतातला पहिला बीट बॉक्सिंग अल्बम बनवला.
याच कलेनं मला अधिक आकर्षित केलं आणि मी आवडीनं सुरू केलेला हा प्रवास आता माझा व्यवसायही बनलाय असं अभिषेक सांगतो.
सेव्हन बंटास रॅपिंग क्रूमधून सुरुवात
अभिषेकचं शिक्षण बॅचलर ऑफ मास मीडियातून झालेलं आहे. पण त्यात पुढे करिअर करण्याचा विचार त्यानं केला नाही.
तो सध्या पूर्ण वेळ बीट बॉक्सिंग करतो. तसंच त्याच्या काकांचं एक सामाजिक ट्रस्ट आहे त्यात काम करतो. हिप हॉप संस्कृती मुंबईत रुजू लागली त्यावेळी मुंबईत अनेक तरुणांनी रॅप करण्यास सुरुवात केली होती.
त्यात 2014 साली अभिषेकसह सहा मित्रांनी मिळून सेवन बंटास या रॅपिंग क्रूची स्थापना केली. सुरुवातीला अभिषेक रॅपिंग करणाऱ्या सेवन बंटास या ग्रुपमध्ये कला जोपासायचा.

फोटो स्रोत, Abhishek Kurme
त्याचवेळी हिप हॉप संस्कृतीतील बीट बॉक्सिंग या प्रकाराबद्दल अभिषेक ला माहिती मिळाली. त्याने त्याची सुरुवात केली.
पण पुढं बीट बॉक्सिंगमध्ये स्वतंत्र काहीतरी करायचं असल्यामुळं त्यांनं तो ग्रुप सोडला. पुढे तो एकटाच बीट बॉक्सिंग करू लागला.
अनेक ठिकाणी रॅप सायफर व्हायचे तिथं अभिषेक जायचा आणि बीट बॉक्सिंग करायचा. अशीच एकदा अचानक एका चित्रपटाची ऑफर अभिषेकला मिळाली.
अचानक मिळाली चित्रपटात संधी
अभिषेक सांगतो की, एके दिवशी प्रसिद्ध रॅपर टोनी सॅबेस्टिन, रॅक अण्णा आणि त्याच्या मित्रांनी रॅप सायफर आयोजित केलं होतं.
मुंबई रॅप सायफर सुरुवातीच्या काळात खूप गाजले होते. त्यात धारावीत अनेक ठिकाणी हे सायफर व्हायचे. त्यातल्याच एका रॅप सायफर मध्ये अनेक रॅपरसह मीही गेला होतो.
तिथे काही चित्रपटाशी संबंधित लोक होते. तिथं माझं बीट बॉक्सिंग पाहून त्यांनी मला चेन्नईला यायला सांगितलं.
चेन्नईला गेलो तर भारतीय दिग्दर्शक पा रणजीत यांच्या कार्यालयात गेलो. तिथं कळलं 'काला' नावाचा चित्रपट आहे, आणि त्यात प्रसिद्ध अभिनेते रजनिकांत आहेत.
त्याच चित्रपटाचा भाग म्हणून मला संधी मिळाली हे माझं भाग्य होतं. हळूहळू अनेक शो मिळत गेले. चित्रपटांमध्येही संपर्क वाढू लागले.
बीट बॉक्सिंग कलेला मोठा इतिहास
बीटबॉक्सिंगची सुरुवात न्यूयॉर्कमध्ये झाली असे हिप हॉप क्षेत्रातले जाणकार सांगतात.
1970 आणि 80 च्या दशकातील वाढत्या हिप-हॉप संस्कृतीने रॅपिंगसह ईतर कलाकारांना "बीट बॉक्स" करण्यासाठी एक व्यासपीठ दिले.
तिथूनच हा हिपहॉप चा एक कला प्रकार पुढे जगभर वाढत गेला. याच बीट बॉक्सिंग कलेचं अनुकरण न्यूयॉर्कसह अनेक देशात केलं जातं.
भारतातही मोठ्या संख्येनं बीट बॉक्सिंग करणारे तरुण पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे भारतात रॅपरची संस्कृती वाढत गेली, त्याप्रमाणे बीट बॉक्सिंग देखील मोठ्या प्रमाणात रुजू लागले.

फोटो स्रोत, Abhishesk Kurme
आजच्या घडीला महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात बीट बॉक्सर आहेत. सुरुवातीला अनेक रियालिटी टॅलेंट शोमध्ये बीट बॉक्सिंग हा प्रकार सर्वांना आश्चर्य चकित करणार होता.
त्यातच मुंबईतही हिप हॉप संस्कृतीचे अधिक आकर्षण वाढत असल्यानं ही कला वाढत गेली.
धारावीत रॅपिंगचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पाहायला मिळाला. त्यात धारावीतल्या गल्लोगल्ली अनेक रॅपर सध्या अस्तित्वात आहेत.
पुढे यामुळंच 'गली बॉय' सारख्या चित्रपटाची निर्मिती झाली. अन् हिपहॉप संस्कृती देशभर अधिक रुजली.
त्यातच हिपहॉप संस्कृतीतील बीट बॉक्सिंग ही कला धारावीत देखील रुजली असून धारावीतही हे कला जपणारे अनेक बीट बॉक्सर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात.
बीट बॉक्सिंगचा धारावीतून थेट बॉलिवूड मध्ये काही चित्रपटांमध्ये , जाहिरातीत आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर करिष्मा पाहायला मिळाला.
वाद्याची गरज नाही
एखादा रॅपर किंवा गायक गाणं गात असेल तिथे कोणताही वाद्य नसेल आणि बीट बॉक्सर असेल तर त्याला कोणत्या वाद्याची गरज नाही.
रॅपर आणि बीट बॉक्सर सोबत असतील तर उपस्थित लोकांना नाचवतील. मी पूर्ण वेळ बीट बॉक्सिंग करतो, तर दुसरीकडे आमचं एक सामाजिक ट्रस्ट आहे तिथे सामाजिक कार्य करतो. मी दररोज नियमित बीट बॉक्सिंगची प्रॅक्टिस करतो.
शो असतील, जॅमिंग सेशन असेल तेही तो करतोय. अगदी चालता बोलताही त्याचा सराव सुरू असतो.
उत्पन्नाचे साधन काय?
अभिषेक बीट बॉक्सिंग कलेतून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल बोलताना म्हणाला की, "अजून हा कलाप्रकार भारतात चांगल्या प्रकारे रुजलेला नाही.
त्यामुळं सध्या या कलेतून फार उत्पन्न मिळत नाही. मात्र एका ट्रॅक आणि अल्बम मधून एक लाख ते पाच लाख रुपये उत्पन्न होऊ शकते. तर काही शो आणि कॉन्सर्ट केले तर एक लाखांपर्यंत पैसे मिळतात."

फोटो स्रोत, AbhishekKurme/Instagram
अभिषेक यातूनच घर चालवतो. सोशल मीडियावर रिल्स वगैरे बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही काही पैसे कमावता येतात. एखाद्या कलाकाराने यावर पूर्ण वेळ अवलंबून असणं सध्यातरी शक्य नाही अस अभिषेकचं मत आहे.
माझी घरची परिस्थिती सध्या ठिक आहे आणि घरच्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे मी या कलेला पूर्ण वेळ देऊ शकतो. मात्र या कलेत करिअर करू इच्छिणाऱ्यांना मी सांगेन की, एक चांगलं उत्पन्न देणारं साधन तुमच्याकडे असायला हवं. तर दुसरीकडे ही कला जपणे तुम्ही सुरू ठेवू शकता असं अभिषेक सांगतो.
सुरुवातीला चिंता, आता अभिमान
सध्या आई-वडिलांना मुलगा-मुलगी डॉक्टर, इंजिनीअर आणि इतर व्यावसायिक प्रोफेशनमध्ये जावं असं वाटत असतं.
त्यामुळं आई-वडील नेहमीच मुलांच्या करिअरविषयी चिंतेत असतात. पण धारावीसारख्या भागात असंख्य तरुण तरुणी या हिपहॉप संस्कृतीतील कला प्रकारांत करिअर करू इच्छितात.
त्यामुळं सुरुवातीला या कलेतून मुलांचा उदरनिर्वाह होईल की नाही याबाबत अनेक आई-वडिलांना चिंता वाटते.
अशीच चिंता अभिषेकच्या आवडीविषयी नातेवाईक आई-वडिलांकडे व्यक्त करायचे. त्यामुळे सुरुवातीला अभिषेकच्या कुटुंबीयांनाही भीती वाटायची आणि ते देखील विरोध करायचे.
पण पुढे मुलाची आवड आणि कौशल्य पाहून, त्याला हवं ते करू देऊ लागले.
आता अभिषेक चित्रपटांसह शो आणि विविध माध्यमातून आपली कला जोपासतोय आणि नावलौकिक मिळवतोय, हे पाहून नातेवाईकही कौतुक करतात.

फोटो स्रोत, AbhishekKurme/Instagram
अभिषेकची आई यासंदर्भात म्हणाली की, अभिषेकने सुरुवात केली त्यावेळी काय होईल? अशी चिंता वाटायची. पण, पुढे आमचा दृष्टिकोन बदलला. त्याला आवडेल त्यात त्यांनं काम करावं असं आम्हाला वाटू लागलं.
वडीलही सुरुवातीला बोलायचे. पण ते नंतर पाठिंबा देऊ लागले. माझा मुलगा सेलिब्रेटी बनल्याने चांगलं वाटतं, असं ते सांगतात.
एऱ्हवी आई-वडिलांच्या नावानं मुलं ओळखली जातात. पण, आम्हाला आमच्या मुलांमुळं ओळखलं जातं. त्याचा अभिमान वाटतो असं अभिषेकच्या आई सांगतात
भविष्यात बीट बॉक्सिंगद्वारेच काहीतरी मोठं करायचं त्याचं स्वप्नं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











